'तो' कुलाब्याच्या कॉजवे मार्केटहून यायचा. हॅण्डसम देखणा. अगदी मदनबाण वगैरे म्हणतात तसा अतिशय आकर्षक नसला तरी तरुण पुरुषाच्या अंगी असणाऱ्या खाणाखुणा त्याच्या ठायी होत्या. उंचापुरी भक्कम पिळदार अंगयष्टी. गौर वर्ण, कुरळे केस, उभट चेहरा, काहीशा दाट जाड भुवया आणि त्याखालचे मत्स्याकृती पाणीदार डोळे, विस्तीर्ण कपाळ, त्यावर रेंगाळणारी मस्तीखोर झुल्फं, सरळ नाक, वर आलेले गालाचे चीक मसल्स, उभट निमुळती हनुवटी यामुळे त्याचं इम्प्रेशन मॉडेलिस्टीक असायचं. कुणीही त्याला पाहिलं की किमान काही दिवस तरी त्याला विसरणं शक्य नसे, त्याची वेशभूषा ही अत्यंत आटोपशीर आणि रॉकींग होती. बहुतांश करून फिकट रंगशैलीचा चौकडा शर्ट आणि काळी जीन्स, व्हाईट स्पोर्ट्स शूज असा त्याचा वेष असे. शर्टचं वरचं बटन खुलं असे ज्यातून त्याची भक्कम छाती डोकावत असे.त्याची नजरही कमालीची तीक्ष्ण होती. तो काही एकटक पाहायचा नाही मात्र त्यानं एकदा जरी पाहिलं तरी समोरच्या व्यक्तीला वाटे की तो एकसारखा आपल्याकडेच पाहतो आहे. प्रत्यक्षात त्यानं आपल्याकडे पाहत राहावं असं समोरच्याची अपेक्षा असे. तो कॉजवे मार्केट परिसरात एका मरीन कंपनीत सेल्स एक्झिक्युटीव्ह होता. कमाई खूप काही नव्हती पण जितकी होती त्यात तो खुश होता. एके दिवशी त्याच्या आयुष्यात 'ती' आली.