'एक जिप्सी आहे माझ्या खोल मनात दडून
आठवते बालपण जेव्हां होतो मी खेळत
होतो बांधीत मी घर सवंगड्यांच्या संगत
कौले पानांची घराला आणि झावळ्यांच्या भिंती
आठवते अजूनहि होतो रंगत मी किती !
पण अकस्मात होतो जात सारे उधळून
एक जिप्सी आहे माझ्या खोल मनांत दडून.........
घर असूनहि आता घर उरलेले नाही
चार भिंतींची जिप्सीला ओढ राहिलेली नाही
कुणीं सांगावे ? असेल पूर्वज्मींच्या हा शाप
घडी सुस्थिरपणाची विसकटे आपोआप …
कुणी तरी साद घाली दूर अनंतामधून …
एक जिप्सी आहे माझ्या खोल मनांत दडून...'
सर्वांच्या मनामनात एक अवखळ, निष्पाप निरागस असं शैशव दडून बसलेलं असतं, प्रत्येकाला अखेरपर्यंत ते जाणवतं मात्र ते कधी व्यक्त करता येत नाही. जनमानसाच्या मनातील भावनांच्या प्रकटीकरणाचं हे काम कवी मंडळी करतात. सर्वच कवींना हे जमतं असं नाही. काही कवी ते वैयक्तिक अनुभव म्हणून मांडतात मग तो त्यांच्यापुरता मर्यादित होऊन जातो. मात्र अद्वितीय प्रतिभा लाभलेला एखादा कवी अगदी सहजतेने, उत्कटतेने अशा काही शैलीत हा अक्षरगंध रेखाटतो की त्या भावना वैयक्तिक कवीपुरत्या सीमित न राहता सर्वंकष स्वरूप धारण करतात. ते काव्य वाचताच रसिक उद्गारतात की नेमके माझ्या मनातले भावच कवींनी मांडले आहेत. ही किमया करतानाच जर त्या कवींनी बालकवितांपासून प्रेमकविता, गूढकविता, निसर्गकविता, सामाजिक आशयाच्या कविता, बडबडगीते, विरहगीते, चित्रपटगीते, भावगीते अशा सर्व प्रकारचे विपुल काव्यलेखनातून एक अलौकिक श्रेष्ठ दर्जाची साहित्यनिर्मिती केली असेल तर त्या कवीला कविश्रेष्ठच म्हटले पाहिजे. कवी मंगेश पाडगावकर यांचे नाव यामुळेच मराठी साहित्यात सुवर्णाक्षराने लिहिले गेले आहे.