मंगळवार, २० सप्टेंबर, २०१६

अखिल बिरादरीचा बापवृक्ष .....



माती आणि आई ही प्रेमाची सर्वोच्च रूपे आहेत. प्रत्येक जण प्रेम व्यक्त करताना यांचा दाखला देतोच. ममता, माया, स्नेह आणि आपुलकीने ओथंबलेलं नातं दर्शवताना आई किंवा मातीचं रूपक वापरलं जातंच. जो तो आपल्या परीने हे ममत्व जोपासतो. आपण आपल्या आईवर किती प्रेम करतो किंवा आपली काळी आई आपल्यासाठी किती प्राणप्रिय आहे हा सर्वांचा जिव्हाळयाचा विषय असतो. आईवरचं प्रेम कुणीही व्यक्त करू शकतो, अगदी वन्य वा पाळीव प्राण्यातही पिलांचा आपल्या मातेप्रती स्नेहभाव असतो. ज्या प्रमाणे गाय आपल्या वासराला चाटते त्याच मायेने वाघीण देखील आपल्या बछडयाला तितक्याच मायेने चाटत असते. हे सर्व आपले प्रेम व्यक्त करू शकतात कारण ते सचेतन सजीव आहेत. चालू बोलू शकतात. मात्र मातीवर प्रेम व्यक्त करणाऱ्या जीवात अचल सजीवही असतात ! फक्त माणूसच ह्या काळ्या आईवर प्रेम करतोय असं काही नाही. माणूस बोलून दाखवतो पण वृक्षवल्ली आपलं प्रेम कसं व्यक्त करत असतील याचं नेमकं उत्तर देता येणार नाही. म्हणूनच मातीवर प्रेम करणाऱ्यांचा धांडोळा घ्यायचा झाला तर केवळ माणसांचाच विचार करून चालणार नाही. मातीवरील अस्सल प्रेमाचे जगातील सर्वात श्रेष्ठ प्रतिक काय असेल तर तो वटवृक्ष ! एका अंकुराच्या रूपाने उगवलेलं इवलंसं रोप मातीत खोल रुजत जातं आणि त्याची देहयष्टी फुलत जाते. बघता बघता त्याचा बुंधा भरत जातो अन त्याच्या फांदया वाऱ्याला कवेत घेऊ पाहतात. कधी काळी हातांच्या मिठीत मावणारे त्याचे खोड काही वर्षात भले मोठे होऊन जाते. चार जणांनी फेर धरला तरी त्याचा बुंधा हातात मावत नाही इतका प्रचंड पसारा वाढतो.
जणू जास्तीत जास्त मातीला ऊन, वारा, पाऊस यांपासून जपण्यासाठी तो अस्ताव्यस्त पसरतच जातो ; थंडगार सावली मातीला देऊ लागतो. वड उभा आडवा वाढू लागतो पण त्याला ज्या मातीत आपली मूळं खोल शिरलेली असतात, ज्या मातीतलं पाणी शोषून त्याची पाने फुले डवरलेली असतात त्या मातीची ओढ त्याला कायमच राहते, त्या ओढीतूनच त्याला मग पारंब्या फुटतात. या पारंब्या मातीच्या दिशेने झेपावतात, जणू काही दूरदेशी गेलेला एखादा भूमीपुत्र आपल्या भाळास माती लावण्यासाठी व्याकूळ व्हावा तशा या पारंब्या मातीसाठी स्पर्शातुर झालेल्या असतात. पारंब्या मातीवर आपला माथा टेकतात अन हळूहळू मातीत शिरतात ! जसजसे दिवस जात राहतात तसतसा आभाळाच्या दिशेने वड वाढतच राहतो अन तो ज्या गतीने उंच वाढू लागतो त्या गतीने त्याच्या पारंब्या मातीच्या दिशेने वाढू लागतात. मुलगा कितीही मोठा झाला तरी तो आपल्या मायबापास वा मायभूमीस विसरू शकत नाही हेच जणू त्या वटवृक्षाला सुचवायचे असेल. मातीत खोलवर गेलेल्या त्याच्या मुळ्याच त्याला नभांकडे जाण्यास उद्युक्त करत राहतात तर त्याच्या जड होत चाललेल्या पारंब्याचे ओझे त्याला मातीकडे झुकायला लावते !

काळ पुढे सरकत राहतो, वड वाढतच जातो अन मग विशाल जटा मोकळ्या सोडून ध्यानस्थ बसलेल्या एखादया तेजःपुंज ऋषीसारखा तो दिसू लागतो. त्याला सौभाग्यलक्षणी सुकेशिनी आपल्या सोबतच्या धाग्यात गुंफतात तेंव्हा त्याला उधाण येतं. पोरंबाळं त्याच्या पारंब्याशी खेळायला लागतात तेंव्हा तो गदगदून जातो. एखादा वाट चुकलेला वाटसरू त्याच्या सावलीत येऊन बसतो, पाठ टेकतो तेंव्हा त्याला सावलीचे पांघरूण घालतो. थकले भागले कष्टकरी जीव त्याच्या सावलीत येऊन भाकरी बांधून आणलेले गाठोडे सोडतात, दोन घास पोटात ढकलतात तेंव्हा वटवृक्षच त्यांच्या आधी तृप्तीचे ढेकर देतो. तळ्याकाठचा वड तर त्या निळ्यासावळ्या पाण्याच्या थरथरणाऱ्या गोलाकार तरंगांशी गुजगोष्टी करतो अन अधून मधून त्याच्या देहावरून ओघळत येणारे पिवळे पान अंगाभोवती तालबद्ध गिरक्या घेत खाली येते अन त्या शांत शीतल पाण्यास हलकेच चुंबते ! मग लाजेने चूर झालेल्या पाण्यावरचे तरंग हलकेच आपली नादब्रह्माची अखंड समाधी मोडून त्याच्याशी तादात्म्य पावतात !

गावातल्या भल्या मोठ्या वडाभोवती एक मस्त ऐसपैस गोलाकार कट्टा बांधला की झाला पार तयार ! मग रिकाम्या माणसांनी तिथं येऊन तासंसास चकाट्या पिटत बसावं अन पारानं त्या ऐकत राहावं ! क्षणभराच्या उसंतीत जाणलेल्या ख्याली खुशालीपासून ते आपल्या सासूरवाशीण बहिणीबाळीच्या अडचणी अन आईवडिलांच्या आजारपणापर्यंतच्या सर्व गावगप्पा येथे होतात. कोणाच्या घरी पाहुणे आलेत इथपासून ते कोणाच्या घरी ‘खमंग’ देवदेव आहे इथपर्यंतची पहिली खबर या पारावरून गावात पसरते. इथल्या वडाने गावातली पंचांची पंचायत बघितलेली असते अन त्यात आलेले ‘आसू’ आणि ‘हसू’चे अनेक भावानुभव आपल्यात साठवलेले असतात. लहान मुलांच्या अनेक विट्या या वडाने अलगद झेललेल्या असतात तर कधी कटून आलेला एखादा पतंग त्याच्या शहाजोग फांद्यांनी आपल्या गळ्यात अडकवून ठेवलेला असतो. वडाभोवतालचा हा कट्टा गावाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे मंच म्हणून जेंव्हा जगत असतो तो तेंव्हा अभिजात प्रतिभेचे नवनवोन्मेषाचे अगणित हुंकार बनतो. कधी एखाद्या सभेचे तर एखाद्या बैठकीचे दमदार बोल ऐकण्यासाठी गावकरी त्याच्याभोवती गोळा झालेले असतात तर कधी पावसाळी दिवसात तिथं साठलेल्या पाण्यात खेळणारी पोरंठोरं पाराने आपल्या कुशीत घेऊन त्यांच्याशी धमाल मस्ती केलेली असते. वडाचा पार गावाची कळा सांगतो. पार स्वच्छ अन प्रसन्न असेल तर गावगाडा खुशीत अन शिस्तीत चाललेला आहे याचे ते प्रतिक असते. जर पाराभोवती कचरा साठलेला असेल अन पार उदास भासला तर गावात काहीतरी अप्रिय घडल्येय कुणीतरी गेलेय याची ती चाहूल असते.

हा वटवृक्ष गावातल्या रग अन रंगेलपणाचाही अंदाज बांधत असतो. मिशीवर पीळ देत इथं दिली घेतलेली आव्हाने अन जीवावर उदार होऊन लावलेल्या नानाविध पैजा याचे अनेक नादस्पर्श तिथल्या पारंब्या शिवता क्षणीच मस्तकातून भिनतात. पारात कैद असतात अनेक अपेक्षा व उपेक्षांची जीवघेणी गाऱ्हाणी. यांना मात्र वटवृक्ष फक्त आपल्या एकट्याच्या अंतःकरणात ठेवून असतो त्याचे कसलेही शेअरिंग नसते. वडाचे ते असहाय दुःख असते, त्याच्या अबोलव्यथांचे प्रकटन कधी करत नाही. एरव्ही सर्व ऋतूत सदाकाळी तो आपले अंतःकरण खुले करून उभा असतो. वड कुठेही असो तो भारदस्तही वाटतो अन आपलासा वाटतो. त्याच्या भोवती धागे गुंडाळल्याने सात जन्म तोच पती कुणा सौभाग्यवतीला मिळतो का नाही हे नक्की माहिती नाही पण त्याचे आणि आपले प्रेमाचे बंधन असेच शाबूत ठेवून आपण त्याची रक्षा केली तर आपल्या येणाऱ्या सात पिढ्या वसुंधरेचा खरा आनंद घेऊ शकतील हे नक्की..

उनाड वाऱ्याने कधी वादळाचे रूप घेतले तर त्याच्याशी तो साऱ्या ताकदीनिशी भिडतो अन त्याला आवरण्याचा प्रयत्न करतो. सोसाट्याच्या वाऱ्यावावदानात उभा असलेला विशालकाय वटवृक्ष म्हणजे रणभूमी एकटयाने गाजवणारा महाबली, वज्रबाहू असणारा एखादा निष्णात मल्लच जणू ! धोधो पडणाऱ्या पावसांत तो चिंब भिजून जातो पण अंगाखांदयावरची घरटी खाली पडू देत नाही. त्या सर्व विहंगकुळांचा तो आदयप्रपालक असावा असे भासत राहते. जर कधी पाऊस खूपच बेभान झाला, मेघगर्जनांनी सृष्टीच्या कानठळ्या बसवल्या तर मात्र वड लगेच सावध होतो. आपल्या बाह्या सरसावतो. काळ्या आभाळात लखलख करत कर्णकर्कश्श आवाजात देहभान विसरून कुठेही कोसळणारी सैरभैर झालेली सौदामिनी हे त्याचं लक्ष्य असतं. तो तिला विनवण्या करतो, 'बळीराजाच्या घरादारावर पडू नकोस, गोठयात लोळू नकोस, गायीवासरांच्या जीवावर उठू नकोस, लहान सहान झाडांना छळू नकोस. मी एकटाच पुरेसा आहे तुला बाहूत घेण्यासाठी' ! अन वटवृक्ष हसत खेळत तिला आभाळमिठी मारतो ! तिच्या बाहुपाशात हसत खेळत तो जळून जातो.

आपल्याला मदत करणाऱ्या माणसाला दुःख कष्ट देणं हे उलट्या काळजाच्या माणसाचं कृतघ्नतेचंच आद्यलक्षण आहे, जो माणूस आपल्या नात्यागोत्यांची कदर करत नाही तो झाडांची काय कदर करणार. आजन्म सावली देणाऱ्या झाडांनाही तो कुऱ्हाडीचं पातं लावतो. वटवृक्ष त्याच्या थोटक्या कुऱ्हाडीच्या मापाबाहेरचा असतो मग माणूस त्याचा जालिम उपाय करतो. त्याला मोठाल्या आऱ्या लावून कापले जाते, त्याचा अजस्त्र बुंधा तुटून पडतो अन भलेमोठे खोड आपला जबडा उघडा करून निपचित राहते. त्याच्या फांद्यावरची पाखरांची घरटी कोसळतात, पण त्यातली पिलं रडत नाहीत कारण त्यांचा आधारवडकच कोसळल्यामुळे त्यांचे अश्रू मुके झालेले असतात. रणांगण गाजवून गतप्राण होऊन पडलेल्या रणवीरासारखं वडाचे कलेवर तिथे पडून राहते. हळूहळू त्याची रया जाते. त्याच्या फांदयानफांदया कापल्या जातात. एखादया थकलेल्या जरठ वृद्धास लाथाबुक्क्याने तुडवून विद्ध करून ओसाड माळावर फेकून दयावे तसे वटवृक्षाचे फक्त अवशेषच तिथे उरतात. काही फांदया इतस्ततः पडलेल्या असतात अन मातीत अर्धवट आत राहिलेल्या मुळ्या इतकंच काय ते सचेतन अस्तित्व बाकी असतं. पण मातीचा हा सच्चा सपूत असल्याने मातीदेखील त्याच्यावर तितकेच प्रेम करते अन पाहता पाहता एका पावसाळ्यात त्या शुष्क अवशेषावर जीवनासक्त कोंबांची गंधभारीत हिरवाई आपलं सानुलं पाऊल कोवळ्या पानाच्या रूपातून उमटवते. अन वटवृक्षाच्या जीवनचक्राची कहाणी पुन्हापुन्हा सुफळ होत राहते.

शून्यातून उभं राहण्याच्या या अफाट ताकदीमुळेच हा वृक्ष मला पित्यासमान भासतो. वटवृक्ष म्हणजे आपले खडबडीत हात पाठीवरून फिरवणारा, केसाच्या बटातून आपली थकलेली बोटे हळुवार फिरवणारा, कुटुंबासाठी जगताना आपलं जगणं विसरून गेलेला प्रेमासक्त हळवा बाप वाटतो. जो अनेक आघात सोसतो, आयुष्यभर सर्वांसाठी खस्ता खातो अन पोराबाळांनी धोके दिले तरी पुन्हा पुन्हा ताठ मानेने उभा राहतो अन मातीत मिसळून फक्त आणि फक्त तिला आपले गाऱ्हाणे सांगत राहतो. मात्र आपला अंकुरण्याचा गुणधर्म कधी सोडत नाही अन हार कधी मानत नाही. याचसाठी म्हणावे वाटते की हा काही केवळ एक वृक्ष नाही हा तर अखिल बिरादरीचा बापवृक्ष आहे !

- समीर गायकवाड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा