Wednesday, March 30, 2016

फोटोची गोष्ट - तपकीरवाली मावशी .....काही क्षणच असे असतात की एका झटक्यात काही वर्षे मागे घेऊन जातात, तसाच हा क्षण होता...."विटून गेलेल्या हिरव्या रंगाचे काठापदराचे नऊ वारी लुगडं अन रुपेरी बुट्टीची इरकली खणाची चोळी अशा टिपिकल गावाकडच्या वेशातल्या आजींना पाहून मी एका झटक्यात अनेक वर्षे मागे गेलो. खिळे ठोकलेल्या ढवळपुरी जाड चपला त्यांच्या पायात होत्या. नक्षीचे छर्रे उडालेल्या हिरव्या बांगड्या त्यांच्या दुई हातात भरलेल्या होत्या, माळकरयांचे भूषण असणारी तुळशीची माळ अन एक काळ्या मण्यांची सर गळ्यात होती. कपाळावर बारीक तुळशीचे पान गोंदवलेलं होते....."


Tuesday, March 29, 2016

गँगस्टर्सची दुनियादारी ...


नुकतीच सेनाभाजपाची नव्याने युती झाली आणि एक रिपोस्ट करावीशी वाटली..
लग्न आणि मयत याचा राजकारणी लोक खुबीने वापर करतात. आमच्याकडे तर काही महाभाग नगरसेवक तर असे आहेत की ते ३६५ दिवस लग्न, बारसे वाढदिवस, मुंजी, एकसष्टी, पासष्टी, पंच्याहत्तरी की अमृतमहोत्सव किंवा तत्सम जे काही असतो तो महोत्सव, सहस्त्रचंद्र दर्शन, लग्नाचा वाढदिवस आणि मयत यात हजेरी लावून निवडून येतात. लोकही यावर खुश असतात, आपला माणूस आहे आपल्याला सुखदुःखात भेटायला येतो, याहून आणखी काय हवे असा त्यांचा उलट सवाल असतो. हेच राजकारणी लोक एकमेकासाठी बंद झालेले दरवाजे अशा घटनांतून नेमकी फट शोधून उघडत असतात, जुनी दुष्मनी मिटवण्यासाठीही अशा कार्यक्रमात जातात अन कालांतराने सांगतात की आमच्यातली बेदिली आता संपुष्टात आलीय. आपसातले ट्युनिंग जुळवण्यासाठी फक्त राजकारणी याचा वापर करतात असे नव्हे तर मोठाले गँगस्टर देखील या संधीची चातकासारखी वाट बघत असतात. या सुखदुःखाच्या क्षणात एकमेकाला भेटून ते आपले बस्तान घट्ट करतात. असाच एक किस्सा आठवतो...


Monday, March 28, 2016

सर्वसामान्याचा अनोखा ताजमहाल !महाल,राजवाडे,प्रतिके,स्मारके काय राजे लोकांनीच बांधावीत का ? सामान्य माणसाचे प्रेम हे बादशहाच्या प्रेमाइतके उत्तुंग प्रेम नसते का ? साध्या भोळ्या सर्वसामान्य माणसालाही प्रेमाचे प्रतिक निर्माण करावे वाटले तर त्याने काय करावे ? राजा महाराजांनी आपल्या प्रेमाच्या खातीर उंचे राजवाडे, महाल उभे केले म्हणून त्यांचे प्रेम श्रेष्ठ अन म्हणूनच इतरांचे प्रेम कदाचित तितके श्रेष्ठ ठरवले जात नाही असे का ? राजा महाराजांकडे तितकी संपत्ती, तितके मनुष्यबळ सहज उपलब्ध होते, सामान्य माणसाचे तसे नसते. पण एखाद्या सर्वसामान्य माणसाला देखील आपल्या प्रेमाचे तसेच उत्तुंग प्रतिक उभारावे वाटले तर त्याकडे जग कुतूहलाने पाहते. आपल्या पत्नीवर असीम प्रेम करणारी काही आगळी वेगळी माणसे अशीच झपाटून जातात अन काही तरी वेगळे करून दाखवतात. ही माणसे इतरांच्या दृष्टीने चर्चेचा विषय बनतात.


Sunday, March 27, 2016

वळवाचा पाऊस - आभाळाचं गणगोतभर दुपारी दूरवर उडणारया टिटव्यांचा टीटीवीटीवटीवचा आवाज, चिंच लिंबांच्या झाडांतनं मधूनच येणारा होल्यांचा आवाज अन जोडीला सुतार पक्षाची टॉकटॉक सोडल्यास रानात दूरवर कुणीच बोलत नसतं. म्लान नीळं आकाश बगळ्यासारखं मान वाकवून मातीकडे सुकल्या ओठांनी बघत असतं. वितळत्या उन्हात आभाळाकडं तोंडं करून झाडं मुक्यानं उभी असतात. झाडांची थरथरणारी सावली मागेपुढे होत कवडशांचे डाव मातीत उतरवत असते. त्राण नसलेला वारा आस्ते कदम पानांच्या देठांना कुरवाळत फिरतो, पिकल्या पानांचे अश्रू सोबत घेऊन पुढे जात राहतो. नुकतेच फुटलेले कोंब उष्म्यानं कावरेबावरे झालेले असतात. अवतीभवती थिरकणाऱ्या फुलांच्या रंगीबेरंगी कोमल पाकळ्यांची एव्हाना शुद्ध हरपलेली असते. डोक्याचं ओझं झाल्यागत फुलांचे गुच्छ मातीच्या दिशेने लोंबकळत असतात. भिरभिरणारी फुलपाखरं हरेक फुलांची समजूत घालत त्यांना सबुरीचा सांगावा देत जलदगतीने फिरत असतात. झाडांच्या सुन्या ढोलीत कोळ्याचे बिऱ्हाड स्वतःच्याच जाळ्यात अडकून पडलेले असते, पिंपळाच्या फांद्यांच्या गुंत्यात तरंगत असणारया घरट्यांच्या काटक्या एकेक करून हळूहळू निखळत असतात. चिंचेची पानं गिरक्या घेत मातीवर नक्षी काढत पडत असतात.Thursday, March 24, 2016

गोष्टीवेल्हाळाची बाराखडी - साहित्यिक वर्कशॉप !माझ्या गोष्टीवेल्हाळ बाराखडीतला एक साहित्यिक पाठ....
"वडाच्या झाडापाशी बराच वेळ वाट पाहून झाल्यावर सांजेस सुजित नजरेस पडला तेंव्हा कौमुदीस बरे वाटले..." या एकपंक्तीय घटनेची मराठी साहित्यिकांनी कल्पनाविलासाद्वारे कशी मांडणी केली असती याचे हे प्रकटन.Wednesday, March 23, 2016

एलिझाबेथ टेलर - रिअल लाईफ 'क्वीन क्लिओपात्रा' ...

असीम सौंदर्य, दमदार अभिनय आणि मुक्त जीवनाच्या उन्मत्त आविष्काराचं एकच नाव असू शकतं ते
high voltage Elijhabeth  ...
म्हणजे एलिझाबेथ टेलर. एखाद्या अभिनेत्रीच्या वाट्याला दीर्घ आयुष्य येणं बरं नव्हे, असं म्हणतात. तरुणपण व सौंदर्याच्या खाणाखुणा पुसल्या जाणं रसिकांच्या काळजाला चिरणारं असतं. लिझच्या बाबतीत असं झालं नाही. चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांपेक्षाही तिचे निळेजांभळे डोळे रसिकांचा ठाव घेत राहिले. व्हीलचेअरवरच्या एलिझाबेथला पाहून कुणी चुकचुकलं नाही. उलट तिचं या वयात प्रेमात पडणं, लग्न आणि घटस्फोटाला सामोरं जाणं लोकांच्या अधिक लक्षात राहिलं. तिचा अभिनय २५ वर्षांपूर्वीच थांबला होता. चर्चेत असणं मात्र कायम होतं.


Tuesday, March 22, 2016

पाऊलवाट…पाऊलवाट हे वाटसरूच्या मनावर होणारे एक गारुड असते, वाटसरूनी तयार केलेले ते जादुई रस्ते असतात. कधीतरी कुणीतरी उजाड माळरानातून पायी जाताना या वाटा तयार होतात.कधी भरल्या रानातून तर कधी उंच सखल शिवारातून पायी जाताना या वाटा तयार होतात. आधी गेलेला खाच खळग्यातून, अडथळ्यातून पार गेलेला असतो. त्याच्या पावलाच्या ठसे मागून येणारयाला दिशा दाखवतात. अन अनेक माणसे त्या वाटेने जाऊ लागतात, अन तयार होते पाऊलवाट.वाटेने लागणारे काटे-कुटे जाणारा प्रत्येक माणूस काढून बाजूला टाकून देतो, काटाडयांनी भरलेले वाळके फांद्यांचे तुकडे देखील आधी जाणारे मागून येणारयासाठी बाजूला सरकवत जातात. पाऊलवाटेत अडथळे काहीही असोत ते बाजूला केलेले असतात, एखादी भली मोठी शिळ आडवी आली तर तिला वळसा घालून ही वाट पुढे सरकते. डोंगराच्या अल्याड पल्याड नाचत नाचत जाते,खोल दरीत निसरडी होऊन हळूवार उतरते पण चालणारयाला हाताचा आधार मिळेल याची तजवीज करते. झरे,ओहोळ,ओढे,नाले याना पार करून मागे पुढे जाते. शेताच्या रस्त्याने कधी नागमोडी होते तर कधी सरळसोट असते. पाऊलवाटेवर कधी कुठले दिशादर्शक फलक नसतात, पण आधी जाणारयाने मागच्यासाठी एक विश्वास तयार केलेला असतो त्याच्या आधारावर मागचा त्याच वाटेने पुढे जातो......


Wednesday, March 16, 2016

चक्रव्युहातले भुजबळ ….बालपणीचे हलाखीचे दिवस काढणाऱ्या भुजबळांपासून ते आताच्या अब्जाधीश भुजबळांच्या वाटचालीचा मागोवा घेणारा हा लेख …
छगन चंद्रकांत भुजबळ यांचा जन्म १५ ऑक्टोबर, १९४७ रोजी नाशिक जिल्ह्यातला. भुजबळ चार वर्षाचे असताना त्यांचे आई-वडील वारले . त्यांच्या आईच्या मावशीने त्यांचा व त्यांच्या भावंडाचा सांभाळ केला. त्यामुळे त्यांचे बालपण हलाखीचे गेले. माझगावला पत्रा चाळीत ते वाढले. पुढे पोटापाण्यासाठी भायखळा भाजी मंडई बाजारात ते भाजीपाला विकू लागले. मात्र, नंतर तेथील जागा, दुकान गावगुंडांनी ताब्यात घेत हडप केले. पुढे काहीतरी करायचे म्हणून स्थानिक नेत्यांच्या मदतीने आपल्या जागेचे दिवसाला दोन रुपये भाडे गोळा करण्याचे काम सुरु केले. २ रुपये घ्यायचे व जमेल तशी भाजी गोळा करून फूटपाथवर विकत बसायचे. दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्निकल इन्स्टिट्यूटमधून मेकॅनिकल इंजिनियरिंगचा डिप्लोमा केला. शिक्षण घेत असताना त्यांनी आपला व्यवसाय बंद केला नव्हता ह्या बाबीचा इथे उल्लेख करावा वाटतो. भाजी मंडई, नातेवाईकांची शेती व या शेतीवर आधारित व्यवसाय भुजबळांनी सुरु केला. पुढे सामाजिक व राजकीय क्षेत्रात रस निर्माण झाला व त्यातूनच त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या दरम्यान त्यांचे डिप्लोमाचे शिक्षण सुरु होते अन तरीही ते सक्रीय शिवसैनिक झाले ! ते सेनेत शाखाप्रमुख झाले. ७० - ८० च्या दशकातला सेनेचा शाखाप्रमुख काय चीज असायची हे वेगळे लिहायचे गरज नाही !


Tuesday, March 15, 2016

भावकवी - भा.रा.तांबे....


कविवर्य भा.रा.तांबे अंथरुणास खिळले होते तेंव्हाची काव्य जन्माची एक कथा आहे… आपण आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात आलो असल्याचे त्याना जाणवत होते त्यावेळी त्यांचे एक स्नेही जवळ येऊन त्यांच्यापाशी कविता लिहिण्याचे आर्जव करू लागले. तांबेंनी आयुष्याच्या अंतिम वाटेवर काही तरी बोलावे किंवा लिहावे अशी विनवणीही त्यांनी जाता जाता केली…. काही दिवसांनी त्या संपादक महोदयांचे कविता पाठविण्यासाठीचे आठवण वजा विनंती करणारे पत्र तांबेंना मिळाले. त्यांच्या त्या विनंतीस उत्तर म्हणून भा.रा. तांबेंनी या प्रसंगावर त्यांना सुचलेली एक कविता पोस्टकार्डावर लिहून त्या संपादक मित्रास पाठवली होती.पाठविली होती...


Sunday, March 13, 2016

मनोरंजांची अक्षय शिदोरी - 'शोले' !!"आओ ठाकूर, मैं जानता था की तुम जरूर आओगे !" कानात सोन्याची बाळी अडकवलेला, दाढीचे खुंट वाढलेला, शर्टच्या वरच्या दोनचार गुंड्या तशाच मोकळ्या ठेवून मळक्या कपड्यातला गब्बरसिंह आपल्या डाव्या हातावर रुमालात गोळ्यांचा पट्टा बांधून अन उजव्या हाताच्या मनगटावर पाचसहा पदरी काळा धागा गुंडाळून मुठीत धारदार तलवार सहज धरून किंचित वाकून ठाकूर बलदेवसिंहच्या दिशेने चालत जात पुटपुटतोय.


Thursday, March 10, 2016

मर्मकवी - अशोक नायगावकर !मोठाल्या मिशांचे नायगावकर आपल्या त्या चिरंतन हास्य मुद्रेत ऐसपैस मांडी घालून बसतात, त्यांच्या उजव्या हातात कवितेचे टिपण वाट बघत असते अन निवेदकांनी, संयोजकांनी माईकचा ताबा त्यांच्याकडे दिला की ते थोडे बाह्या सरसावून बसतात अन मग सुरु होते शब्दांची आतिशबाजी, कोट्यांचे षटकार अन अंगावर न उमटणारे पण मनावर करकचून आसूड ओढणारे शब्दांचे फटके !


Saturday, March 5, 2016

रस्त्याचे ऋण ....


पूर्वी आमचा सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्ग हा असा दिसायचा. दोन्ही बाजूनी दाट झाडी अन त्या झाडांच्या अर्धवर्तुळाकार कमानी सारया रस्त्याने स्वागताला उभ्या असत. झाडांच्या या कमानी इतक्या दाटीवाटीने उभ्या असत की आपण झाडांच्या कंच हिरव्यागार पानांच्या हिरवाईतल्या गुंफातून प्रवास करतो आहोत की काय असे वाटायचे. रस्त्याच्या दुतर्फा असणारया या झाडांच्या भाऊगर्दीत प्रामुख्याने लिंब, बाभूळ, चिंच, वड, पिंपळ, पळस, सुबाभूळ आणि निलगिरी यांची झाडे जास्त करून असत. त्यातही कडूलिंबाची मेजोरिटी मोठी होती. एकमेकाच्या गळ्यात हात घालून रेलून बसावं तसे या झाडांच्या फांद्या एकमेकाच्या फांदयात अडकून गेलेल्या असत. दाट सावलीच्या संगतीने प्रवास होई मात्र मध्येच एखादे झाडी नसलेले वळण आले की जाणवत असे की बाहेर उन्हे किती कडक आहेत. प्रवास कोणत्याही गाडीतला असो अगदी बैलगाडी, लाल एसटी बस, टेम्पो, जीप,ट्रक वा लक्झरी कार काहीही असो,सर्व प्रवाशाना समान सुख या प्रवासात मिळायचे त्याचे कारण ही हिरवाई होती.आपल्या विरुद्ध दिशेने पळणारी झाडे कधी संपतच नसत.आपला वेग वाढला की त्यांचाही वेग वाढायचा अन वाऱ्याच्या झुळूकेवर उडून येणारी त्यांची पाने वाहनाच्या खिडकीतून अलगद आता येऊन पडत, त्यांना मातीचा आणि झाडाचा दोन्हीचा मिळून एक संमिश्र गंध असे. हा वास अजूनही माझ्या स्मृतींच्या कुपीत अजूनही मी जतन करून ठेवला आहे.