शुक्रवार, २४ जुलै, २०२०

रेड लाईट डायरीज - भवताल


एका आर्टिकलमध्ये वाचण्यात आलेलं की मुलं किती छान संस्कारी पद्धतीने वागत आहेत, घरातल्या सर्व व्यक्तींची त्यांना चिंता आहे वगैरे. वाचून अनेकांनी मुलांचं कौतुक केलेलं, काहींनी पालकांचेही अभिनंदन केलेलं. भवतालच्या वातावरणाचा आणि पालकांच्या वर्तनाचा प्रभाव मुलांवर पडतो. लहान मुलं खूप अनुकरणशील असतात. यावरून मला ताहिरा आठवली. तिची चिमुरडी पोर आयेशा आठवली. ताहिरा धंदा करायची. कामाठीपुऱ्यातल्या तेराव्या लेनमध्ये यमुनाबाईच्या कुंटणखान्यात तीन बाय सहाच्या फळकुटात राहायची. 2007 ची घटना असेल. यमुनाचा कुंटणखाना दुसऱ्या मजल्यावर होता. तळमजल्यावर अरुण परदेशीचा दारू धंदा चाले. दिलीप पांडे नावाच्या इसमाची ती इमारत होती. त्यानं सुनील मथाईला ती किरायाने दिलेली. मथाईने तिथे धंदा उघडलेला. विकास मिश्रा याने तिथे युपीमधून मुली आणलेल्या. ( हा विकास मिश्रा पुणे पोलिसांनी 2012 मध्ये गजाआड केला, पुढे जामीनवर सुटल्यानंतर त्यानं नागपूरचं गंगाजमुना गाठलं) मथाईच्या अख्ख्या इमारतीची पूर्ण कळा गेलेली होती. संपूर्ण इमारतीत जवळपास चारशे बायकापोरी होत्या. सगळ्या युपीबिहारच्या. यांच्यातलीच एक होती ताहिरा. 1992 मध्ये ताहिराला बाईपणाचे भोग कळले. देहातली एक भेग काळजाच्या चिरफळ्या कशा उडवते ते तिने अनुभवलेलं.

सोमवार, ६ जुलै, २०२०

लॉकडाऊन स्टोरीज - रामपुकार पंडीतची अनसुनी पुकार


हा फोटो एका अत्यंत असहाय हतबल बापाचा आहे...
'शोले'मध्ये एक सीन आहे ज्यात कोवळ्या अहमदला (सचिन) गब्बरने हालहाल करून ठार मारून त्याचं प्रेत घोडयावर लादून रामगढला पाठवून दिलेलं असतं. अहमदचं कलेवर पाहून गाव थिजून जातं. संतापाची लाट येते आणि सर्वांचा राग जय वीरूवर उफाळून येतो. ठाकूर बलदेवसिंग मध्ये पडतो तरी गावकरी ऐकत नाहीत. ते म्हणतात की आम्ही इतकं दुःख सहन करू शकत नाही, या दुःखाचं कारण असणाऱ्या जय वीरूला गब्बरच्या हवाली केलंच पाहिजे. इतका वेळ आपल्या मुलाच्या मृतदेहावरून हात फिरवणारा म्हातारा रहीमचाचा कळवळून उठतो आणि दुःखाचा आवेग आवरत म्हणतो, "जानते हो दुनिया का सबसे बडा दुख क्या होता है ?"

रविवार, ५ जुलै, २०२०

बेंजामिन मोलॉईस - गीत विद्रोहाचे


मार्टिन ल्युथर किंग यांचं “ए रायट इज ए लँग्वेज ऑफ अनहर्ड !”(ज्यांचं ऐकून घेतलं जात नाही अशांची भाषा म्हणजे दंगे !) हे वक्तव्य प्रसिद्ध आहे. या वक्तव्याच्या संदर्भाशिवाय हा लेख अधुरा राहील. सद्यकाळात अमेरिकेस दंगलींच्या खाईत लोटणाऱ्या घटनेची पार्श्वभूमी आजच्या लेखास समांतर आहे. बनावट चलनाविषयीची एक तक्रार मिनिआपोलिसच्या पोलिसांकडे आली होती. यावर कारवाई करणाऱ्या पोलिसांनी कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉईड यांची गाडी रोखली. पोलिसांनी त्यांना कारपासून दूर जाण्यास सांगितलं. त्याचा त्यांनी प्रतिकार केल्यानंतर त्यांना हथकड्या ठोकण्यात आल्या. या घटनेच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक श्वेतवर्णीय पोलीस जमिनीवर पडून असलेल्या फ्लॉईड यांच्या गळ्यावर तब्बल नऊ मिनिटे गुडघा दाबून बसल्याचं दिसतं. "प्लीज, मला श्वास घेता येत नाहीये," "माझा जीव घेऊ नका," अशी विनवणी फ्लॉईड करतात. रस्त्यावरच त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला. जगाला मानवाधिकाराचे डोस पाजणारं अमेरिकेन नेतृत्व स्वतःचे हात किती डागाळलेले आहेत यावर कधी भाष्य करत नाही. वंशवाद आणि वर्णभेद आजही तिथे मोठ्या प्रमाणत आढळतो. कृष्णवर्णीयांनी अमेरिका सोडून जावं असं जाहीररित्या सांगणारे उजव्या विचारांचे ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून तर वर्णभेदास अधिक धार चढली आहे. त्यामुळे साहजिकच श्वेतवर्णीय उन्मत्तांना बळ प्राप्त झालंय. आपल्याला असुरक्षित समाजणाऱ्या कृष्णवर्णियांना अधिकच भीती वाटू लागलीय. काही दशकापूर्वी जगात सर्वाधिक वर्णभेद दक्षिण आफ्रिकेत केला जायचा, विशेष म्हणजे तो तिथे गुन्हा नव्हता. त्याच आफ्रिकेत एका कवीने त्या राजवटीचे बुरूज ढासळवणार्यात कविता रचल्या आणि जगापुढे नवा इतिहास मांडला गेला. त्या कवीचे नाव होते बेंजामिन मोलॉईस.

करोनाबाधेतील एक दुजे के लिये...

curtis and betty tarpley
कर्टीस आणि बेट्टी टारप्ले  

अमेरिकेत कोरोनाने प्रचंड हाहाकार माजवलेला असल्याच्या बातम्या आपण सर्वचजण पाहतो आहोत. संपूर्ण अमेरिका या विषाणूच्या साथीने स्तब्ध झालीय. त्याची एक गहिरी दास्तान या इस्पितळात लिहिली गेलीय. त्याची ही अद्भुत चैतन्यमय हकिकत. १८ जून २०२० ची ही घटना आहे. अमेरिकेच्या टेक्सास प्रांतामधील फोर्टवर्थ भागातलं टॆक्सास हेल्थ हॅरिस मेथॉडिस्ट इस्पितळ. पहाटेपासूनच कर्टीस टारप्ले यांचा श्वास मंदावत चालला होता. त्यांची पल्स हरवत होती. डोळे अर्धमिटले झाले होते. गात्रे शिथिल होत होती. ओठ थरथरत होते, त्यांना काही तरी सांगायचं होतं. त्यांच्या सेवेत असलेल्या परिचारिका ब्लेक थ्रोन यांनी ते ओळखलं होतं. कर्टीससोबत त्यांची गाढ दोस्ती जी झाली होती.

फिर तेरी कहानी याद आई ...

fir teri kahani yaad ayee


तो एक प्रतिभाशाली कर्तृत्ववान विवाहित पुरुष, एका बेसावध क्षणी एका कमालीच्या देखण्या अप्सरेचं त्याच्यावर मन जडतं. तो तिला टाळू पाहतो पण तिच्यापासून दूर जाऊ शकत नाही आणि तिला जवळही करू शकत नाही. त्याचा संसार उध्वस्त व्हायची वेळ येते. त्याची पत्नी उन्मळून जाते, त्यांचं आयुष्य विस्कटतं. पण तो पत्नीशी सर्व गोष्टी शेअर करतो. ती ही त्याच्यावर विश्वास ठेवते. तुझे मन माझेच असेल, देह कोणाचाही असू शकतो असं त्याला सांगते. मात्र तरीही त्यांच्यात गैरसमज होत जातात. अखेर त्यांचा घटस्फोट होतो. तोवर बराच उशीर झालेला असतो. ती शापित अप्सरा तोवर खचून गेलेली असते. ती अंधाऱ्या विजनवासाच्या एकांती गुहेत जाते. इकडे तो दुसरे लग्न करतो तेही एका मनस्वी समजूतदार स्त्रीशी !