रविवार, ३० जुलै, २०२३

लोभ आणि धर्म - ओशोच्या गोष्टी.



एकदा मी एका छोट्याशा गावात गेलो होतो. तिथे नवीन मंदिर बांधण्यात आले होते आणि मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा चालू होता.
शेकडो पुरोहित आणि संन्यासी जमले होते. हजारो बघ्यांची गर्दी जमली होती.
पैशाचा बिनधास्तपणे मुक्तहस्ते व्यय सुरु होता. गाव मात्र वेगळ्याच कारणाने थक्क झाले होते!
कारण ज्या व्यक्तीने मंदिर बांधले आणि या सोहळ्यात एवढा पैसा खर्च केला त्याहून अधिक कंजूष माणूस कोणी असू शकत नाही, असे त्या गावातील लोकांना वाटत असे. ती व्यक्ती कंजूषपणाची आदर्श होती.

त्याच्या हातातून एक पैसाही कधी सुटलेला दिसला नव्हता. मग त्याच्यात हा बदल कसा झाला?
ही चर्चा आणि चमत्कार सर्वांच्याच ओठावर होता.
भिकारीसुद्धा त्या व्यक्तीच्या दारात कधी जात नसत. कारण त्या घराच्या दरवाजांना केवळ घ्यायचंच ठाऊक होतं. त्यांना देण्याचे ज्ञानच नव्हते.
मात्र नंतर असे काय झाले की त्या व्यक्तीने जे स्वप्नातही केले नव्हते ते प्रत्यक्षात डोळ्यांसमोर घडत असल्याचे पाहून सर्वजण थक्क झाले होते.
या प्रसंगाने चकित झालेल्या एका वृद्धाने मला विचारले - "यामागे काय रहस्य आहे? ती व्यक्ती अंतरबाह्य बदलली आहे का?"

उत्तरादाखल त्याला मी एक घटना सांगितली.

एकदा एका लहान मुलाने एक रुपयाचे नाणे गिळले होते. त्याला बाहेर काढण्याचे सर्व प्रयत्न व्यर्थ गेले. त्याची आई आपल्या पतीला वारंवार सांगत होती - 'लवकर डॉक्टरांना बोलवा.'
त्यावर मुलाचा पिता म्हणजे त्या स्त्रीचा पती म्हणाला - "डॉक्टर नको, मला वाटते की धर्मगुरूस बोलावणे जास्त योग्य आहे. होय ना?"
बायको आश्चर्यचकित होऊन म्हणाली "धर्मगुरु? धर्मगुरूला बोलवावेसे वाटते म्हणजे माझे मूल जगू शकणार नाही, असे तुम्हाला सुचवायचेय का?"
नवरा म्हणाला, "नाही. तसे म्हणूनच नाही. कारण कोणाकडूनही पैसे काढून घेण्यात धर्मगुरूंचा हात कुणीही धरू शकत नाही!"

त्या दांपत्याचा हा संवाद सांगून त्या वृद्धास मी म्हणालो, 'इथे गावात घडत असलेल्या मंदिर उभारणीद्वारे 'त्या' कंजूष व्यक्तीचा लोभ संपला आहे असे समजू नका. इथे मंदिर बांधल्याबद्दल परलोकात कोणते फळ मिळते हे त्या व्यक्तीने जाणून घेण्याचे प्रयत्न केले होते! हा सगळा परोपकार-धर्मही 'त्या' फळाच्या लोभाचाच प्रसार आहे.
मंदिर उभारणीस केलेली ही मदत त्याच्या कंजूषपणाच्या पूर्वप्रवृत्तीला विरोध नसून त्याचाच विस्तार आहे.
आयुष्य हातात असताना माणसाचा लोभ पैसा जोडतो.
आणि जेव्हा मृत्यू जवळ येतो तेव्हा माणसाचा तोच लोभ धर्मात भर घालतो.
हा सर्व एकाच मनाचा खेळ आहे. धर्मगुरू त्या लोभाला नवी दिशा देतात. ते धर्मफलाच्या अदृश्य नाण्यांचे (परिणामांचे) प्रलोभन निर्माण करतात.

हे केले नसते तर तो कंजूष नीट मेलाही नसता! परलोकातील फलाचा लोभ तृप्त करण्याचा दुसरा कोणताही मार्ग दिसत नसल्याने तो दानाची, मदतीची, धर्मसेवेची अदृश्य नाणी गोळा करू लागलाय. अर्थात, त्यासाठी धर्मगुरूंना त्या बदल्यात खरीखुरी चलनातली नाणी द्यावी लागताहेत. 
असे धर्मगुरू पैशाला पैसे जोडत राहतात आणि तथाकथित दानी / भक्त व्यक्ती आपल्या गाठीस धर्म जोडतात. मरणानंतर कोणीही परत येत नसल्यामुळे, कुठल्याही व्यक्तीने खर्च केलेल्या चलनी नाण्यांच्या बदल्यात पारलौकिक लाभाची अदृश्य नाणी त्या त्या व्यक्तीस मिळतात की नाही हे देखील कळत नाही!

यामुळे धर्मगुरूचा व्यवसाय अखंड सुरु राहतो. मृत्यू हा धर्मगुरूचा मोठा सहयोगी आहे. हाच त्याच्या व्यवसायाचा आधार आहे. त्याच्या सावलीत त्याचे शोषण चालू असते.

ती कंजूष व्यक्ती अजिबात बदललेली नाही.
त्याच्या हातातून फक्त जीवन सुटत चालले आहे.
तो वयस्क होतो आहे आणि त्याला मृत्यूच्या पाऊलखुणा ऐकू येऊ लागल्या आहेत.
आणि हे सर्वज्ञात आहे की जिथे मृत्यू आहे तिथे धर्मगुरू असतो.
तो मृत्यूचा धंदा करणारा असतो.

जीवनाचा उपभोग घेत असताना केलेली मदत, दानधर्म आणि भक्ती ही अधिक खरी होय आणि मृत्यूची चाहूल लागल्यानंतर वार्धक्याकडे झुकू लागल्यानंतर बदललेली भक्तीची दानाची मदतीची परोपकाराची भावना ही देखील एक लोभवृत्तीच असते जी त्या व्यक्तीच्या ठायी आयुष्यभर असते!

- ओशो.

Osho's stories in marathi by Sameer Gaikwad

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा