मंगळवार, २७ ऑगस्ट, २०१९

रेड लाईट डायरीज - लता, नट्टीबाई, गुरुदत्त आणि प्यासा ...


सोबतच्या फोटोत दिसणारी लता आहे. सात महिन्याची गर्भवती आहे, तरीही बाजारात उभी आहे. या अवस्थेत असताना तिच्याकडे येणार्‍या गिऱ्हाईकात सगळे आंबटशौकीन भरलेले असत. गर्भवती बाईसोबतची 'मजा' कशी असते याचा अधाशी हव्यास असणारे लोक तिच्याकडे येत. पन्नास ते पंधरा असा त्यांच्या वयाचा लंबक होता. असो..     
लताच्या फोटोचा आणि गुरुदत्तच्या 'प्यासा'चा घनिष्ट संबंध आहे. लताला पाहिल्याबरोबर गुरुदत्तचा 'प्यासा'मधला तो सीन आठवला होता कारण लता सात महिन्याची गरोदर असूनही चमडीबाजारमध्ये रात्रीच्या अंधारास आपल्या उरावर घेण्यासाठी नटून थटून तयार व्हायची. शक्य झालं असतं तर अंधारानेही तिच्याशी समागम केला असता का असा प्रश्न पडावा अशी स्थिती.

दुपारची जेवणं झाली की या बायका आपली दमलेली शरीरं घेऊन आपआपल्या पिंजऱ्यात झोपी जातात, अस्ताला जाणारा सूर्य यांच्यापर्यंत पोहोचत नाही पण तो अस्त पावल्याची खूण म्हणून अंधार तिथं येतो, पाठीवरचं कुबड सांभाळत पाय खुरडत खुरडत यावं तसा हा अंधार येतो. जिला जास्त गरज असते ती आपल्या देहाचं गाठोडं ढिलं करते आणि आरशापुढे बसते, लेप चढवत राहते. आरसा छद्मीपणे हसत राहतो, रात्रभर कपडे चढत राहतात उतरत राहतात. तयार होण्याआधी चरबटलेल्या केसांवर वेटोळं घालून बसलेला अधाशी मोगरा मध्यरात्री उलटून गेल्यावर पुरता चोळामोळा झालेला.

गुरुवार, २२ ऑगस्ट, २०१९

दुर्गापूजा आणि वेश्या - एक अनोखा संबंध ..

आतल्या खोलीचा मुख्य भाग ज्यात दुर्गा प्रतिष्ठापना केली गेली होती..

दुर्गापूजेचा वेश्यावस्तीशी संबंध आहे हे आपल्याला  ठाऊक नसते ! हे लिहिण्याचे कारण म्हणजे गणेशोत्सव तोंडावर आलेला आहे. तुम्ही म्हणाल गणेशोत्सवाचा याच्याशी काय संबंध ?
आहे, संबंध आहे. खास करून पुण्या, मुंबईतील गणेशोत्सवाचा तर नक्कीच आहे. दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर ज्या परिसरात आहे तिथून वेश्यावस्ती असलेली बुधवार पेठ खूप जवळ आहे ! केवळ एव्हढ्या एका गोष्टीसाठी मी सुतावरून स्वर्ग गाठत नाहीये.....