Tuesday, November 29, 2016

'ब्लॉग माझा' - एक धक्का सुखाचा ...ब्लॉग'माझा' नव्हे ब्लॉग 'तुम्हा सर्वांचा' - गोष्टीवेल्हाळाची बाराखडी...

तुम्हा सर्वांना सांगायला आनंद होतो की, 'एबीपीमाझा' या वृत्तवाहिनीतर्फे मराठीतील सर्वोत्कृष्ट वाचनीय ब्लॉग निवडीसाठी घेतलेल्या 'ब्लॉगमाझा' ह्या स्पर्धेसाठी माझ्या ब्लॉगची निवड प्रथम क्रमांकासाठी करण्यात आलेली आहे.पोळा- मुक्या जीवाचे ऋण...

पोळ्याचं आवतण बैलाना कालच दिलंय. कालच खांदमळणी अगदी दमात झालीय. पळसाच्या द्रोणात कढी घेऊन ती बैलाच्या खांदयावर लावलीय आणि हळद तेल-तुपाने त्यांचे दमलेले खांदे मस्त पैकी मळून झालेत. सगळ्यांची शिंगे साळून झाली आहेत. त्याला आता केशरी लाल हुंगुळ लावला की शिंगे चमकदार दिसतील अन बैल उठून दिसतील..आंबाडीचे सुत काढून तयार केलेली नवी वेसण दुरडीत तयार आहे. नवा कोरा पांढरा शुभ्र कासरा लावून लाल लोकरीचे गोंडे, नविन घुंगर माळा, कवड्यांचे हार, नविन रंगीबेरेंगी चित्रांच्या झुली दुपारी यांच्या अंगावर चढतील. पैंजण, पट्टे,झेंडूचे हार अशी सामग्री तयार आहे.


Saturday, November 26, 2016

गावाकडची रम्य सकाळ ....

वर्षभरातला कोणताही ऋतू असला तरी गावाकडच्या दिनमानात फारसे बदल होत नसतात. त्यातही सकाळचे दृश्य कधी बदलत नाही. राज्यातील कोणत्याही खेड्यात कोणत्याही ऋतूमानात गेलं तरी एक सुखद प्रभातचित्र सृष्टीने साकारलेले असते. हे प्रभातचित्र ज्याला बघायला मिळते तो व्यक्ती नशीबवानच. आणि ज्या लोकांना हे सुख प्रत्यक्ष अनुभवायला मिळते ते खरे भाग्यवंत होत. गावाकडची सकाळ खरं तर नेमक्या शब्दात चितारणे अशक्य आहे कारण तिला अनेक पैलू आहेत, अनेक रंगढंग आहेत. नानाविध पदर आहेत. मातीवर जीव असणाऱ्या प्रत्येक सृजनास वाटते की आपण आपल्या परीने हे चित्र रंगवावे, ते पूर्णत्वास जात नाही याची माहिती असूनही हा प्रयत्न अनेकांनी केला आहे. Friday, November 25, 2016

बिनकामाचे शहाणे...


पेशवाईत साडेतीन शहाणे होते. त्यातला एक 'पूर्ण शहाणामाणूस इतका पाताळयंत्री आणि छद्मी होता की कुणी त्याला मारूही शकले नाही अन टाळूही शकले नाही. काही माणसं असून अडचण नसून खोळंबा असतात. तर काहींची नुसती अडचण असते असे नव्हे तर त्यांचा प्रचंड उपद्व्यापही असूनही त्यांच्याविरुद्ध कारवाई करता येत नाही. पेशवाईत असाच एक मुत्सद्दी होऊन गेलासखाराम बापू बोकील त्यांचं नाव. बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशव्यांपासून ते माधवराव अन अखेरीस नारायणराव पेशवे या सर्वांच्या काळात खऱ्या अर्थाने खलपुरुष जर कोण असतील तर ते सखाराम बापू होत. रामायणात जी भूमिका मंथरेने निभावली तशा आशयाची भूमिका सखारामबापूंनी पेशवाईत बजावली. 
एक उचापतखोरकुरापतखोरकपट कारस्थानी आणि भ्रष्ट माणूस अशी त्यांची इतिहासात प्रतिमा आहेच पण या जोडीला असणारी पराकोटीची छद्म बुद्धीकुशाग्र कूटनीती आणि तल्लख बुद्धिमत्ता ही त्यांची गुणवैशिष्टये होती. त्यांचे पूर्ण नांव सखाराम भगवंत बोकील. हे हिंवर्‍याचा कुलकर्णी होते. त्यांचे पूर्वज पणतोजी गोपीनाथ कुलकर्णी यांना १६५९ मध्ये शिवरायांकडून हिंवरें गांव इनाम मिळालेले होते.


Thursday, November 24, 2016

सच्च्या प्रेमाची अदुभूत गाथा - अमृता - इमरोजची लव्ह स्टोरी !


शारीरिक ओढीच्या पलीकडचे प्रेम कसे असते ? जाणून घ्यायचंय ?
मग अवश्य वाचा सच्च्या प्रेमाची मधुर गाथा ....
ती एक हळव्या मनाची किशोरी ; वयाच्या १६ व्या वर्षी असंवेदनशील, व्यसनी आणि थोराड पुरुषाबरोबर तिचं लग्न झालं तर ?
ती त्याच्याशी विवाह करते, मात्र त्याला पूर्णतः स्वीकारत नाही, ती त्याला तन देऊ शकते पण मन देऊ शकत नाही.
एकमेकाचे विचार भिन्न असूनही एकत्र राहणे योग्य की अयोग्य ?
मग 'तिला'च याची जाणीव होते अन ती स्वतःची सारी कुचंबणा त्याच्या गळी उतरवते. पुढे ते विभक्त होतात, पण तोवर तिच्या पोटी त्याचं बीज वाढतं.
या दरम्यान तिच्या आयुष्यात तिच्या सारखाच हळव्या मनाचा,प्रतिभाशाली, संवेदनशील व उमदा कवीमनाचा पुरुष येतो.
ती त्याच्यात पूर्ण गुंतून जाते आणि एके दिवशी आपल्या कवितेच्या इप्सिताच्या शोधात तो तिला अर्ध्यात निरोप देऊन आपलं राहतं शहर सोडून मुंबईला निघून जातो.


Wednesday, November 23, 2016

हायवे.......


गोष्ट पावसाळयातील आहे. आषाढातील एका पावसाळी दिवसांत बहुधा ऑगस्टचा महिना अखेर असावा, घराकडे निघायला मला बराच उशीर झाला होता. त्या दिवशी पुण्याहून सोलापूरकडे येणारी कन्याकुमारी   एक्स्प्रेस खूपच उशिरा आल्याने स्टेशनवरून निघायला रात्रीचे दिड वाजले होते. पार्किंग लॉटमध्ये सकाळी जाताना ठेवलेल्या गाडीच्या सीटवर जमा झालेली धूळ हाताच्या एका फटक्यात उडवून काहीशा त्राग्याने बाईक स्टार्ट केली. जुना पुणे नाका क्रॉस करून पुढे गेलो. शहरी वसाहतीचा भाग संपला. पावसाळी दिवस असल्याने रस्ता निसरडा झाला होता. मध्यरात्र उलटून गेलेली असल्याने क्वचित एखादी दुसरी लहान सहान दुचाकी रस्त्यावर दिसत होती. हायवेचे काम नुकतेच पूर्ण झालेले असल्याने चकाचक टार रोडवरून सुंइक आवाज करत कट मारत, ओव्हरटेक करत गाड्या पळवण्याचे काम मोठे जोमाने चालू होते. मोठाले मालट्रक. अजस्त्र कंटेनर आणि वेगाने धावणारया कार्सनी रस्त्याचा जणू ताबाच घेतला होता.Saturday, November 19, 2016

सदाबहार 'वक्त' आणि 'आगे भी जाने ना तू'ची रंजक कथा ......'आगे भी जाने ना तू ..' हे गाणं होतं बी. आर. चोप्रा निर्मित आणि यश चोप्रा दिग्दर्शित ‘वक्त’मध्ये. साठीच्या दशकात आलेला वक्त अनेकार्थाने महत्त्वपूर्ण चित्रपट होता. व्यवसायाच्या दृष्टीने तर तो खूप यशस्वी ठरलाच; पण सुनील दत्त, शशी कपूर, राजकुमार, बलराज सहानी, साधना, शर्मिला टागोर, अचला सचदेव अशी मोठी नावे असलेल्या वक्तने मल्टीस्टार चित्रपटांचा ट्रेंडही स्थिर केला. शिवाय काळाच्या तडाख्याने कुटुंबाची ताटातूट होणे आणि त्याच काळाच्या कृपेने कुटुंब पुन्हा एकत्र येणो या जुन्याच फॉर्म्युल्याचेही पुनरुज्जीवन केले. पुढे अनेक वर्षे त्यावर अनेक बरेवाईट चित्रपट येत गेले. पण 'वक्त'चे वेगळेपण तेवढय़ापुरतेच मर्यादित नाही.


Saturday, November 12, 2016

रंग 'हरवलेली' रंगपंचमी ...

'बालपण देगा देवा’ असं सर्वचजण म्हणत असतात पण बालपण काही केल्या परत मिळत नसतेमात्र आयुष्यात काही क्षण असे येतात की आपल्याला बालपणाचा आनंद पुन्हा लुटता येतोहे क्षण आपल्याला पुन्हा त्या वयातील आठवणींचा पुनर्प्रत्यय देतातत्या आनंदाची तशीच पुनरावृत्ती होतेआपणही त्या क्षणांत हरखून जातोप्रत्येकाच्या जीवनात काही प्रसंगकाही घटना आणि काही आठवणी अशा असतात की मनाच्या गाभाऱ्यात त्या चिरंतन टिकून असतातत्यातही शैशवाच्या गोड स्मृतींना उजाळा देण्याचं काम हे क्षण करत राहतातअशा चैतन्यदायी क्षणांची अख्खी शृंखला आपल्यासमोर साकारण्याचे काम रंगपंचमी करायची.


Thursday, November 10, 2016

'नर्गिस'ची दास्तान ....साठच्या दशकातल्या अभिनेत्रीपैकी नूतनमध्ये सादगी होती, मधुबालेकडे असीम सौंदर्याच्या जोडीने अल्लड अवखळपणा होता, वैजयंतीमालेत मादक अदा होती, मीनाकुमारीत कारुण्य शिगोशिग भरलेले होते, वहिदा रेहमान कडे कातिल अदा होती, साधना स्टाईल आयकॉन होती, माला सिन्हा फॅशन दिवा होती तर नर्गिसमध्ये ह्या सगळ्यांचे कॉम्बो होते ! नर्गिस करोडोतली देखणी' ह्या कॅटेगरीतली आरसपानी अप्सरा नव्हती मात्र तिच्या आवाजात मीनाकुमारी सारखा कंप होता. तिच्याकडे मधुबालेसारखं निखळ हास्य होतं. वैजयंतीमाले सारखं मादक सौंदर्य तिच्याकडे नसलं तरी नजरेने घायाळ करण्याचं सामर्थ्य तिच्याकडे होतं. नूतनइतका साधेपणा तिच्यातच काय आजवरच्या कुठल्याच अभिनेत्रीत दिसला नाही पण वेळप्रसंगी ती एकदम 'गांव की भोली भाली सिधीसी लडकी' वाटायची अन समयानुरूप 'सेठ किरोडीमल की ईकलौती लाडली बेटी' देखील वाटायची ! साधनेसारखी तिची स्वतंत्र आयकॉनिक स्टाईल नव्हती मात्र कुठलाही गेटअप तिला खुलून दिसे. बॉबकट असो वा सैल बांधलेला अंबाडा असो तिला खुलून दिसे.Monday, November 7, 2016

सवाल...एका प्रश्नाचे उत्तर शोधित निघालो होतो तेंव्हाची ही कथा.....
उत्तराच्या शोधात हातोडयाने राजकारणी लोकांच्या डोक्यात खिळे ठोकले तेंव्हा सर्वांचेच रक्त लाल निघाले,
भगवे, हिरवे वा निळे अन्य कुठल्या रंगाचे रक्त कुठेच दिसले नाही.
देशाच्या नकाशात कुठे भाषा, प्रांत, जात, धर्माची कुंपणे दिसतात का बघावीत म्हणून दुर्बीण घेऊन बसलो,
पण कोण्या राज्यांच्या सीमांवर कसलीही कुंपणे दिसली नाहीत.
सर्व महापुरुषांची पुस्तके वाचून काढली, त्यांचे विचार अभ्यासले, त्यांना अनुभवले,
पण एकानेही एकमेकाविरुद्ध लिहिल्याचे कुठे वाचनात आले नाही.
वरपासून खालपर्यंत वाहणारया नदयांचे काही बोडके तर काही समृद्ध खोऱ्यांचे का धुंडाळले,
नदयांचा प्रवाह कुठे भेद करत नव्हता, मार्ग मिळेल तिकडे आरामात वळत होता.