५ जून १९६६च्या मार्मिकच्या अंकात एक आवाहन छापून आले होते. "यंडुगुंडूंचे मराठी माणसाच्या हक्कांवरील आक्रमण परतवून लावण्यासाठी शिवसेनेची लवकरच नोंदणी सुरू होणार ! विशेष माहितीसाठी ‘मार्मिक’चा पुढील अंक पाहा !"१९ जून १९६६ ला 'मार्मिक'चा पुढचा अंक आला आणि त्यातील आवाहन वाचून मुंबईकर भारावून गेला त्याने तुफान प्रतिसाद दिला ! नोंदणीचे २ हजार तक्ते अवघ्या तासाभरात संपले ! प्रबोधनकार ठाकरे यांनी नाव दिलेल्या ‘शिवसेना’ या चार अक्षरी मंत्राची रीतसर स्थापना झाली. 'मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा' या वचनाप्रमाणे मराठी माणसाच्या हक्कासाठी म्हणून शिवसेनेची स्थापना झाली.
रविवार, १९ जून, २०१६
शिवसेना - वाघाची पन्नाशी ! - एक आलेख ....
५ जून १९६६च्या मार्मिकच्या अंकात एक आवाहन छापून आले होते. "यंडुगुंडूंचे मराठी माणसाच्या हक्कांवरील आक्रमण परतवून लावण्यासाठी शिवसेनेची लवकरच नोंदणी सुरू होणार ! विशेष माहितीसाठी ‘मार्मिक’चा पुढील अंक पाहा !"१९ जून १९६६ ला 'मार्मिक'चा पुढचा अंक आला आणि त्यातील आवाहन वाचून मुंबईकर भारावून गेला त्याने तुफान प्रतिसाद दिला ! नोंदणीचे २ हजार तक्ते अवघ्या तासाभरात संपले ! प्रबोधनकार ठाकरे यांनी नाव दिलेल्या ‘शिवसेना’ या चार अक्षरी मंत्राची रीतसर स्थापना झाली. 'मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा' या वचनाप्रमाणे मराठी माणसाच्या हक्कासाठी म्हणून शिवसेनेची स्थापना झाली.
विठ्ठलभक्तीची पाऊसवारी...
आषाढी वारीतलं कुंद पावसाळी वातावरण, टाळमृदंगाचा तालबद्ध नाद, वारकऱ्यांची एका लयीत पडणारी पावले आणि वारकऱ्यांच्या प्रतिक्षेत तिकडे पंढरपुरात कंबरेवर हात टेकवून विटेवर उभं असलेल्या विठ्ठलाच्या जीवाची होणारी तगमग हे सारंच अद्भुत असतं. याचा सर्वात मोठा आणि सर्वकालीन साक्षीदार असतो तो पाऊस. या पावसाचं आणि आषाढीचं नातं मायलेकरासारखं आहे. हा पाऊस पेशाने शेतकरी असलेल्या वारकऱ्याच्या जीवनांत अनन्यसाधारण स्थानी आहे. कारण त्याचं अवघं जीवन त्याच्याभोवती गुंफलेलं आहे. कदाचित यामुळेही ऐन पावसाळ्यातल्या आषाढी वारीस दिवसेंदिवस अधिकाधिक महत्व येतेय.
गुरुवार, १६ जून, २०१६
आता वंदू कवीश्वर ..
अंधार होत आलेला आहे आणि तिच्या आठवणींनी व्याकुळ झालेला तो क्षितिजाकडे बघत उभा आहे आणि इतक्यात आकाशीच्या चांदण्यात तिचा चेहरा लुकलुकतो. या कल्पनेवर दिग्गज कवींनी कसे काव्य केले असते याची मी केलेली ही उचापत आहे. या सर्व प्रतिभावंत कवींची त्यासाठी माफी मागतो. या मांडणीत काही चुकले असल्यास दोष मला द्या आणि काही बरे वाटले तर त्याचे श्रेय या दिग्गजांच्या काव्यशैलीस द्या. (मागे काही श्रेष्ठ लेखकांचे अशाच तऱ्हेचे एकसुत्रावर आधारित लेखन केले होते तेंव्हा आपण सर्वांनी दिलेले प्रोत्साहन पाठीशी असल्यामुळे हे दुस्साहस केले आहे..)
सुरेश भट -
क्षितिजास साक्षुन मी रिता करतो आठवणींचा काजळप्याला
पाहताच तिला चांदण्यात, कैफ अंधारास अल्वार कसा आला !
गुरुवार, ९ जून, २०१६
अजुनी रुसून आहेचे अक्षय भावगीत ... कवी अनिल .
साल होते १९१९. विदर्भातल्या अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापुर या अगदी छोट्याशा शहरातुन शिक्षणाच्या निमित्ताने अठरा वर्षे वयाचा एक हळव्या मनाचा उमदा तरुण पुण्यात आला. शालेय शिक्षण गावाकडे पूर्ण केल्यानंतर त्याने पुण्यात येऊन थेट फर्गसन महाविद्यालयात प्रवेश घेतला. किंचित अबोल स्वभावाच्या या तरुणाला तिथे जमवून घेणे थोडे कठीण जात होते. असेच दिवस पुढे जात राहिले आणि त्याच दरम्यान पुण्यातल्या हुजूरपागा शाळेत मॅट्रिकला असणाऱ्या तरुणीशी ओळख झाली. दोघात काही विलक्षण साम्य होते. दोघेही हळवे आणि कवी मनाचे होते. दोघेही विदर्भातले. तो अकोला जिल्ह्यातला तर ती अमरावतीची. तो मॅट्रिकपर्यंत मुर्तीजापुंरात तर तिचे प्राथमिक शिक्षण अमरावतीत झालेले. पुढे तो पुण्यात आलेला तर ती मॅट्रिक व कनिष्ट महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत पुण्यातच होती. दोघांच्या ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.अगदी सच्चे आणि गहिरे प्रेम दोघामध्ये होते. पुढे ती नागपूरास गेली, तो पुण्यातच राहिला. अधून मधून भेटीगाठी होत राहिल्या, पण मनातले बोल जास्त करून पत्रांतून व्यक्त व्हायचे. पत्रे इकडून तिकडून जात राहिली, इतकी की त्यावर नंतर सुंदर पुस्तक निर्मिले गेले. दोघेही कलाशाखेतून पदवीधर झाले. तिला नागपूर विद्यापीठाच्या बीएच्या परीक्षेत सुवर्णपदक मिळाले, आणि मध्य प्रांत-विदर्भ सरकारची विशेष शिष्यवृत्ती मिळवून ती इंग्लंडला गेली. पुढे इंग्रजी साहित्यातली लंडन विद्यापीठाची पदवी मिळवून ती १९२९ला भारतात परतली. तोवर हा तरुण कला शाखेची पदवी मिळवल्यावर भारतीय कलांचा अभ्यास करण्यासाठी कोलकाता इथे गेलेला. भौगोलिक अंतर वाढलेले पण दोघांमधले प्रेम तसूभरही कमी झाले नव्हते. दोघेही एकमेकाची प्रतीक्षा करत होते. अखेरीस १९२९ ला त्यांचा विवाह झाला. त्याने पुढे विधीशाखेची पदवी घेतली अनेक मोठ्या हुद्द्यांवर नोकरी केली. दोघांचा स्वभाव हळवा आणि कवीमनाचा असल्याने दोघेही एकमेकावर जीवापाड प्रेम करत करत लेखन करत राहिले. तो कवितेवर जीव लावून होता, तर कथा हा तिचा आवडता पिंड होता. सुखाचा संसार होत गेला. लग्नाला आता चांगली ३२ वर्षे झाली होती आणि प्रेमाची चाळीशी पार झाली होती. तिने तर भीमपराक्रम केला, १९६१ मध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची ती पहिली महिला अध्यक्ष झाली अन त्याला हाच मान १९५८ मध्ये मिळाला होता. प्रेमाने ओथंबलेल्या या दोघांनी आपल्या आयुष्यातली हे सर्वोच्च शिखर सर केले होते. आयुष्य आनंदाने व्यतित होत होते....
गावाकडचा पाऊस ....
गावाकडे आता पाऊस सुरु झालाय...माहेरवाशिनी सारखे त्याचे डोळ्यात पाणी आणून स्वागत झालेय...
मी इकडे सोलापूरात. इथला पाऊस अगदीच अरसिक.
त्याचं स्वतःच असं काही वेगळेपणच नाही. तो कधी असा मनाशी गुजगोष्टीही करत नाही, तो देखील शहरी झालाय. तोंड देखलं पडून जातो, त्याच्यात कोसळण्याची विशेष उर्मी अशी नसतेच. तो येतो आणि पडून जातो. खेरीज इकडे शहरी भागात त्याचे रुक्ष वर्णन मॉन्सूनने होते...
गावात पाऊस आला की पांडुरंगाला दह्यादुधाचा अभिषेक होतो, घरी काही तरी गोड धोड होते. घरधनी धोतराच्या सोग्याला डोळे पुसत पुसत आभाळाकडे बघून काहीबाही पुटपुटतो, त्याचे ते पुटपुटणे एखाद्या अभंगाच्या ओवीसारखे असते. पावसाच्या स्वागतासाठी पेज होते. त्यासाठी माजघरातल्या चुलीवर पातेले चढले की बाहरेच्या पावसाचा आवाज, चुलीवरल्या पातेल्यातला रटरटणारा आवाज आणि चुलीतल्या जळणाच्या वासात मिसळलेला मृद्गंधाचा वास सारं कसं मस्तकात भिनत जातं....
मंगळवार, ७ जून, २०१६
मायेचं कष्टाळू गणगोत - बैल
मऊसुत रेशमी अंगाचं पांढरं शिफट खोंडं होतो तेंव्हा धन्याने घोडेगावच्या बाजाराहून आणलं होतं तो दिवस अजून आठवतो. तेंव्हा गावात कैकांच्या शेतांनी मोट होत्या. पाऊसपाणी वेळेवर होत होतं. सगळ्यांच्या रानात औत ओढण्यापासून, नांगरट, कुळवण, मळणी आणि उसाची गाळणी अशी खंडीभर कामं असायची. त्या कामांसाठी बैल कमी पडायचे, मग एकमेकाचे बैल घेतले दिले जायचे. दावणीत तेंव्हा कधी टाचकं पडलेलं नसं. कडबा असायचा. पाऊसपाणी झालं की बाटूक असायचं, हिरवा गवत-घास असायचा. पाऊस आटला की भरडा- कडवळ. जेंव्हा औतं जोरात होते तेंव्हा धन्याने कधीकधी गुळपोळी सुद्धा खाऊ घातली होती.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)