Thursday, June 16, 2016

आता वंदू कवीश्वर ..अंधार होत आलेला आहे आणि तिच्या आठवणींनी व्याकुळ झालेला तो क्षितिजाकडे बघत उभा आहे आणि इतक्यात आकाशीच्या चांदण्यात तिचा चेहरा लुकलुकतो. या कल्पनेवर दिग्गज कवींनी कसे काव्य केले असते याची मी केलेली ही उचापत आहे. या सर्व प्रतिभावंत कवींची त्यासाठी माफी मागतो. या मांडणीत काही चुकले असल्यास दोष मला द्या आणि काही बरे वाटले तर त्याचे श्रेय या दिग्गजांच्या काव्यशैलीस द्या. (मागे काही श्रेष्ठ लेखकांचे अशाच तऱ्हेचे एकसुत्रावर आधारित लेखन केले होते तेंव्हा आपण सर्वांनी दिलेले प्रोत्साहन पाठीशी असल्यामुळे हे दुस्साहस केले आहे..)        

सुरेश भट -

क्षितिजास साक्षुन मी रिता करतो आठवणींचा काजळप्याला
पाहताच तिला चांदण्यात, कैफ अंधारास अल्वार कसा आला !


नामदेव ढसाळ -

अंधाराचे गरळ प्राशत आठवणींचे ओझे घेऊनी मी ठाकतो क्षितिजाच्या छाताडावरी
गद्दारच दिशा त्या थिरकतात, पाहताच चांदण्यातली छबी तुझी हसरी निलाजरी !!

कुसुमाग्रज -

अंधारल्या दिशांच्या गर्द सावलीत मी स्तब्धतो आठवांचा सागर पिऊनि
लुकलुकताच तिने चांदण्यात, क्षितिज झिंगते प्रेमात तिच्या न्हाऊनि....

ग्रेस-

तमोत्सुक दिगंतापाशी आत्ममग्न औदुंबराचा चिंतनडोह डोळ्यात घेऊनि मी निमूट उभा असतो,
अन चांदण्यात तिचा चेहरा लखलखताच, अंधारल्या दिशांना प्रेमसुक्ताचा कैफ चढलेला असतो....

बा.सी. मर्ढेकर -

त्या नभांच्या अंधारल्या अभ्र्यांत मी विणतो आठवणींचा धागा
उतरताच चांदण्यात छबी तिची, दरवळ प्रेमाचा दिशांतुनी जागा

केशवसुत -

मज संधीकाळच्या आठवणीचे घनव्याकुळ साकळती येताच क्षितिजापाशी
पडताच तिचे प्रतिबिम्ब चांदण्यात, प्रेमकल्लोळ होई दिशांच्या अंतरंगाशी

नारायण सुर्वे -

कंठातल्या माझ्या थकलेल्या आठवणींचा कढ अर्पितो मी क्षितिजाच्या खिन्न मस्तकी
म्लान चांदण्यात तरळताच चेहरा तुझा, लखलखती दिशा सत्वर देहभान हरपुनी      

ना.धो. महानोर -

आठवणींच्या पानगळीत चिंब भिजताच क्षितिजात घनगर्द अंधार झिम्मडला
बिल्रोरी चांदण्यात गोंदणखुणा दिसताच तिच्या, दिशांतुनी नीळकंठ थरारला

बा.भ.बोरकर -

शांत अंधारल्या नदीतीरी आठवणीत वाहवत जावे तसे स्मरतो तुला क्षितिजी
झंकारती तमोसक्त दिशा, प्रसवताच आभा तुझ्या चेहऱ्याची लख्ख चांदणदेही  

शांता ज. शेळके -

मी साहते आठवणींचे तिमिर तुफान क्षितिजाच्या दारावरी
उल्हासती तरी दिशा अलगद, चांदण्यातल्या तुझ्या दर्शनी

- समीर गायकवाड.(सोबतचे छायाचित्र रत्नाकर महाजन यांच्या आता वंदू कवीश्वर या पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे आहे)