शनिवार, २४ जुलै, २०२१

पाऊस कुठं चुकलाय ?


लोक म्हणताहेत पाऊस कोपलाय.. 
वर्षाची सरासरी अवघ्या काही दिवसांत गाठत तो वेड्यासारखा कोसळतोय. 
असं काही नाही. त्याचं कुठं काय चुकलंय? 
पूर्वी तो वेळेवर न चुकता जूनच्या पहिल्या आठवड्यात यायचा 
आणि सप्टेबरअखेर पर्यंत दमादमाने आस्ते कदम बरसत राहायचा. 
शाळेच्या सुरुवातीला पोराठोरांसंगे दंगा करायचा,
ज्येष्ठात तांबड्या मातीतल्या भातशेतीतून लोळण घेत शिवारभर फिरून दमल्यावर 
कौलारू घरांवरून घसरगुंडी खेळायचा. 
आषाढात वारकऱ्यांच्या पायात घुटमळत दिवेघाटातून दरवळत भवतालात घुमायचा,
काळ्या मातीत पेरलेल्या बीजांना गोंजारायचा. 
आभाळमाया करायचा, सह्यकड्यापासून सातपुड्यापर्यंत डोंगररांगांवर अभिषेक करायचा, 
वसिष्ठीला वंदन करुन तापीच्या पायावर लीन व्हायचा,
त्याचा हा प्रवास ठरलेला असायचा... 

बुधवार, ७ जुलै, २०२१

'सुहाना सफर' दिलीपसाब आणि सायराचा !....




अखेर आज त्याचे श्वास थांबले...
 
ओढ ज्याची त्याची असते, ज्याला त्याला ती कळत असते मात्र त्याच्याशी एकरूप झालेल्या जीवाला ती अधिक कळते .....

तो 'अखेरचा रोमन' आता जवळ जवळ गलितगात्र होऊन गेला होता अन ती 'हिमगौरी' आता थकून गेली होती....
पण त्यांनी अजून हार मानली नव्हती, त्याची स्वप्ने त्याचा पिच्छा सोडत नव्हती
अन ती त्याची सेवाशुश्रूषा थांबवत नव्हती..
त्याचा श्वास हाच जणू तिचा ध्यास झाला होता...
त्याचे श्वास अलीकडे मंद होत होते..
त्याच्या डोक्याखाली तिने आपल्या हाताचीच उशी केली होती.

तिच्या डोळ्याखालची काळी वर्तुळे आता अधिक गडद होत होती अन त्याच्या देखण्या चेहऱ्यावरचे सुरकुत्यांचे जाळे अधिक दाट होत चालले होते..

शुक्रवार, २ जुलै, २०२१

मला दिसलेला श्रीमंत माणूस ...

घराकडे जायच्या रस्त्याला जुना पुणे नाक्याच्या वळणाच्या पुढे काही भणंग भटके नेहमी नजरेस पडतात. गर्दीत त्यांचे अस्तित्व नगण्य असते तरी रोज एकदा तरी त्यांच्याशी दृष्टादृष्ट होतेच. त्यांचा ठिय्याच आहे तो. असो. आजचीच एक घटना आहे.. 

चार वाजण्याआधी घाईने दुपारी घराकडे जाताना समोरून एक टू व्हिलरवाला पोरगा अगदी वेगाने जवळून निघून गेला. रस्ता अगदी मोकळा होता तरीही त्याचं बेदरकार बाईक राइडिंग जाणवलं.

मी माझ्या तंद्रीत पुढे सरकलो. काही क्षणांनी एक क्षीण आवाज जाणवला, फट्ट ! काही तरी फुटलं असावं असं त्यातून जाणवलं.

आरशातून मागे पाहिलं तर बाईकस्वार पुढे निघून गेला होता मात्र रस्त्यावर कुत्री गोळा झाली होती, ती भुंकत नव्हती. एका विशिष्ट स्वरात कुळकुळत होती.