रविवार, २१ एप्रिल, २०१९

न्यायाच्या प्रतिक्षेतला इतिहास...दक्षिणपूर्व इंग्लंडमधील केंट येथील एका पबमध्ये एके दिवशी लेखक किम वॅग्नर यांना शोकेसमध्ये ठेवलेली एक कवटी दिसली. कुतुहलापोटी त्यांनी ती उचलून घेतली. कवटीच्या आतल्या बाजूस एक हस्तलिखित चिठ्ठी होती. चकित झालेल्या वॅग्नरनी ती चिठ्ठी वाचली. त्यावरील मजकुरानुसार ती कवटी ब्रिटीश सैन्यात सेवेस असलेल्या आलम बेग या भारतीय जवानाची होती. ४६ व्या बंगाल नेटिव्ह इन्फंट्रीचा तो शिपाई होता. १८५७च्या बंडानंतर झालेल्या कारवाईत त्याला ठार मारण्यात आलं होतं. भारतात वास्तव्यास असलेल्या काही ब्रिटीश नागरिकांची हत्या केल्याचा आरोप ठेवून त्याला तोफेच्या तोंडी देऊन मारण्यात आलेलं. त्यावेळी तिथं तैनात असलेल्या आयरिश सैन्य अधिकाऱ्यानं त्याचं शीर इंग्लंडला आणलं. जणू काही ट्रॉफीच आणली असा अविर्भाव त्यामागे होता ! ती कवटी पाहून अस्वस्थ झालेल्या वॅग्नरनी यावर संशोधन करायचे ठरवलं आणि त्यातून जे समोर आलं ते थक्क करणारं होतं. त्यांनी त्यावर झपाटल्यागत काम केलं, त्यातून एक शोधकादंबरी प्रसवली.

रविवार, ७ एप्रिल, २०१९

झाडांची अज़ान..


गावात हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच मुस्लिमांचे उंबरठे होते. त्यातला एक उंबरा मकबूल हुसैन यांचा होता. बाकीची घरं त्यांच्या जामातमधली, रिश्तेदारीतली होती. काही दिवसापूर्वी साठीतले मकबूलचाचा गाव सोडून थोरला मुलगा मोहसीनकडे हवापालटासाठी गेले तेंव्हा रणरणत्या उन्हात त्यांना निरोप द्यायला अख्खं गाव सडकेवर लोटलेलं. तेंव्हा ताठ कण्याचा तो डेरेदार पिंपळ माणसांच्या गर्दीने गलबलून गेला. "जिंदगी में हज जा न सका लेकीन विदाई तो उससे भी बेहतरीन मिल गयी, न जाने अब ये मिट्टी नसीब में गंवारा होगी की नही.." असं म्हणत चढलेल्या बसमधून खाली उतरून त्यांनी मातीचं चुंबन घेतलं तेंव्हा आयाबायांनी डोळयाला पदर लावला. वाकताना त्यांच्या पांढूरक्या दाढीला माती चिकटली, ती त्यांनी पुसलीदेखील नाही. तसेच स्तब्ध होऊन उभं राहिले. त्यांच्या भावूक अवस्थेनं गलबलून गेलेल्या गावातल्या जुन्या खोंडांनी मोहसीनला हक्कानं फर्मावलं, "मकबूलकडे लक्ष दे बाबा, त्याला काय पाहिजे काय नको याची वास्तपुस्त कर. तब्येतीकडं ध्यान दे.." मोहसीन मान हलवत होता. इकडे मकबूलचाचांना लोकांच्या नानाविध सूचना सुरु होत्या. काहींनी त्यांना खाण्यापिण्याच्या जिनसा दिल्या, कुणी पायजमा बंडीचं कापड दिलं, तर कुणी पानाची चंची दिली. तेव्हढ्यात मध्येच सवाष्ण बायका पोरी त्यांच्या पायावर डोकी टेकवत होत्या. ते उदार अंतःकरणाने आशीर्वाद देत होते. काही लोक दुआ मागायला आलेले. मकबूलभाई त्यांच्या मस्तकावर हात ठेवून डोळे मिटत आकाशाकडे बघत तीन वेळा 'बिस्मिल्लाह' म्हणून दुआ पुटपुटायचे. यामुळे सडकेवरची गर्दी काही केल्या कमी होईना तसं आत बसलेल्या मोहसीनसह बसमधले बाकीचे प्रवासी वैतागले, कंडक्टरने घंटी वाजवायचा सपाटा लावला. अखेर गावकरी मागे हटले पण मकबूलचाचांचे पाय काही केल्या उचलत नव्हते.

बुधवार, ३ एप्रिल, २०१९

रेड लाईट डायरीज - अधम

काचेच्या तावदानातून खाली पाहताना
तिला रस्त्यावरचे जथ्थे दिसायचे

गर्दीला चेहरा नसतो असं कोण म्हणतं?
इथे तर चेहरा आहे कराल, अक्राळ विक्राळ वासनेचा !

घरी नातवंडे असलेली
कंबरेत पोक आलेली माणसे सुद्धा इथे आलीत,
वर्षाकाठी कित्येक पोरींशी अफेअर करणारी पोरंही आहेत,
वळवळ वाढली आहे त्यांच्या डोक्यात.

ढेरपोटे आहेत, बरगडया मोजून घ्याव्यात असेही आहेत,
भुकेकंगालही आले आहेत आणि
लॉकेट ब्रेसलेटानी मढलेलेही आलेत.