रविवार, ७ एप्रिल, २०१९

झाडांची अज़ान..


गावात हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच मुस्लिमांचे उंबरठे होते. त्यातला एक उंबरा मकबूल हुसैन यांचा होता. बाकीची घरं त्यांच्या जामातमधली, रिश्तेदारीतली होती. काही दिवसापूर्वी साठीतले मकबूलचाचा गाव सोडून थोरला मुलगा मोहसीनकडे हवापालटासाठी गेले तेंव्हा रणरणत्या उन्हात त्यांना निरोप द्यायला अख्खं गाव सडकेवर लोटलेलं. तेंव्हा ताठ कण्याचा तो डेरेदार पिंपळ माणसांच्या गर्दीने गलबलून गेला. "जिंदगी में हज जा न सका लेकीन विदाई तो उससे भी बेहतरीन मिल गयी, न जाने अब ये मिट्टी नसीब में गंवारा होगी की नही.." असं म्हणत चढलेल्या बसमधून खाली उतरून त्यांनी मातीचं चुंबन घेतलं तेंव्हा आयाबायांनी डोळयाला पदर लावला. वाकताना त्यांच्या पांढूरक्या दाढीला माती चिकटली, ती त्यांनी पुसलीदेखील नाही. तसेच स्तब्ध होऊन उभं राहिले. त्यांच्या भावूक अवस्थेनं गलबलून गेलेल्या गावातल्या जुन्या खोंडांनी मोहसीनला हक्कानं फर्मावलं, "मकबूलकडे लक्ष दे बाबा, त्याला काय पाहिजे काय नको याची वास्तपुस्त कर. तब्येतीकडं ध्यान दे.." मोहसीन मान हलवत होता. इकडे मकबूलचाचांना लोकांच्या नानाविध सूचना सुरु होत्या. काहींनी त्यांना खाण्यापिण्याच्या जिनसा दिल्या, कुणी पायजमा बंडीचं कापड दिलं, तर कुणी पानाची चंची दिली. तेव्हढ्यात मध्येच सवाष्ण बायका पोरी त्यांच्या पायावर डोकी टेकवत होत्या. ते उदार अंतःकरणाने आशीर्वाद देत होते. काही लोक दुआ मागायला आलेले. मकबूलभाई त्यांच्या मस्तकावर हात ठेवून डोळे मिटत आकाशाकडे बघत तीन वेळा 'बिस्मिल्लाह' म्हणून दुआ पुटपुटायचे. यामुळे सडकेवरची गर्दी काही केल्या कमी होईना तसं आत बसलेल्या मोहसीनसह बसमधले बाकीचे प्रवासी वैतागले, कंडक्टरने घंटी वाजवायचा सपाटा लावला. अखेर गावकरी मागे हटले पण मकबूलचाचांचे पाय काही केल्या उचलत नव्हते.


राहून राहून त्यांची भिरभिरती नजर शोध घेत होती. कपाळावर हात आडवा धरत खोल गेलेल्या म्लान डोळ्यांनी त्यांनी दूरवर पाहिलं पण हवं असलेलं दिसलं नाही. खांद्यावर टाकलेल्या राखाडी चौकड्या टॉवेलनं त्यांनी नकळत डोळे पुसले आणि ते पुन्हा बसमध्ये चढले. खडडरंर्र आवाज करत गाडीचं इंजिन सुरु झालं, थरथरणाऱ्या खिडक्यांच्या तावदानांचा आणि ढिल्या झालेल्या सीटच्या लोखंडी साठयांचा आवाज त्यात एकजीव होऊन गेला. बसचं अगम्य संगीत सुरु झालं तसं खिडकीजवळ बसलेल्या मकबूलचाचांचे प्राण नजरेत एकवटून पांदीकडून येणाऱ्या पायवाटेच्या दिशेने लीन झाले. गिअर टाकून बस काही फर्लांगभर पुढे गेली असेल नसेल तोच आसमंतास चिरून टाकणारी 'चाच्चाजान'ची आर्त हाक कानी आली आणि बसमध्ये बसलेल्या त्या वृद्ध देहातली वीणा झंकारून उठली ! निमिषार्धात त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू  तरळले. बस पुन्हा एकदा थांबली. आता मकबूलचाचांना पुन्हा खाली उतरता आलं नाही कारण मोहसीनच्या चेहऱ्यावर उमटलेली नाराजी त्यांना स्पष्ट दिसत होती. चिमुरडया एहसानसह धावत आलेली शबाना धपापलेल्या उरानं आत शिरली आणि आपल्या सासऱ्याच्या गळ्यात पडली. ओक्साबोक्शी रडू लागली. काही केल्या तिच्या डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते. एहसानला छातीशी धरत शबानाच्या डोक्यावरून मायेनं हात फिरवत, शांत करत मकबूलचाचा बोलत होते, "बेटा अब मैं सुकून की विदाई साथ ले जा रहा हुं, तुम दिल छोटा मत करो...परवरदिगार रहमदिल हैं, वो सब ठीक कर देगा.. उसपर यकीन करो.. अब मुझे हसते हसते विदाई दो..." आजूबाजूला बघत एक मोठा आवंढा गिळत सुकलेल्या ओठावरून जीभ फिरवत ते बोलते झाले, "अपने इक्बालमियां का खयाल रखना, बडा जिद्दी और नेक जाने फर्जंद हैं वो.. उसे कहना अब्बूने जाते वक्त भी याद किया था, मग रोते हुये नही !" डोळ्यातलं पाणी लपवत एहसानच्या रूपातला काळजाचा तुकडा त्यांनी शबानाच्या हाती सोपवला, सनई ठेवलेल्या थैलीला कुरवाळत ओठावर हसूं आणलं. मकबूलचाचांना खोटं खोटं हसण्याची कला चांगलीच अवगत होती !

बस निघताच डोळे पुसत, डोक्यावर ओढणी ओढत एहसानला सावरत शबाना बसमधून खाली उतरली. बसने वेग घेतला तसे रस्त्यावरचे हात हलले, खिडकीआडचा थकलेला भेगाळलेला जड हातही संथ हलला. तावदानावरल्या मेघांच्या पांढऱ्या निळ्या प्रतिबिंबात आस्तेकदम विरघळून गेला. मकबूलचाचांच्या डोळ्यात मळभ गोळा झालेलं. बसबाहेरचं दृश्य हळूहळू धुरकट होत गेलं तसं त्यांना भूतकाळाचा पट पळत्या झाडांसोबत मागेपुढं दिसत राहिला. त्यांच्या किती पिढ्या गावात गेलेल्या हे त्यांनाही ठाऊक नव्हतं. त्यांचे वडील रहमतचाचा गावातले एक जुने जाणते बुजुर्ग. त्यांच्याकडनं पिढीजात आलेला व्यवसाय म्हणजे सनई वादन. गावात कुठलंही मंगल कार्य असलं की रहमतचाचा आपल्यासोबत किशोरवयीन मकबूलला घेऊन जात. बापलेक सनई वाजवत, जोडीला मकसूदभाई ताशा वाजवे. दोन सनया, एक सुंद्री आणि एक ताशा एव्हढ्यावरच ते मौसम बदलून टाकीत. वाजंत्री होण्याचं वेड डोक्यात शिरल्यानं शाळेशी त्यांचं सूत कधी जमलंच नाही. अक्षरशत्रू होते ते. लिहिता वाचता आलं नसलं तरी माणसं वाचण्यात ते वाकबगार होते. रहमतचाचांचा इंतकाल झाल्यानंतर आणखी एक जबाबदारी त्यांच्या अंगावर वारसा स्वरूपाने आली, ती म्हणजे फकीरत ! गावाबाहेरील दर्गाहची देखरेख करायची, तिथं येणाऱ्या हिंदूमुस्लीम श्रद्धाळूंचे गाऱ्हाणे ऐकून खुदापाशी त्यांच्या सलामतीसाठी इबादत करायची हे ओघानं आलं. चाळीसेक वर्षात मकबूलचाचांनी गावातल्या इतक्या मुलींच्या लग्नात सनई वाजवली होती की गावात एकही माहेरवाशीण अशी नव्हती की तिला मकबूलचाचा ठाऊक नव्हते. मात्र वडीलांच्या पाठीमागे त्यांचे सनईवादन बंद झालं तरी पिढीजात वारसा म्हणून धाकट्या इक्बालने त्यावर जीवापाड प्रेम केलेलं. संगीत हा त्याचा जीव की प्राण होता. इक्बालचं आपल्यासारखं समांतर वागणं मकबूलचाचांना आवडायचं पण मोहसीनला वाईट वाटेल म्हणून कधी मोकळ्या मनाने ते कौतुक करत नसत. मोहसीनचं नास्तिक असणं त्यांना खुपलं नाही पण त्याच्या त्या एका गुणापायी त्यांनी झिडकारलंही नाही. मात्र त्यांचं नातं कलम केलेल्या झाडासारखं होतं, विरोधाभासी गुण असूनही एकत्र वाढणारं !

मोहसीनने अभ्यासात चमक दाखवून चांगली नोकरी मिळवली. खेड्यात राहणाऱ्या मुस्लीम अल्पशिक्षित कुटुंबातून त्याने हे यश संपादन केल्याने अख्ख्या गावाला त्याचा अभिमान होता. इक्बाल मात्र भौतिक गोष्टींवर जीव लावण्याऐवजी जगण्याच्या अर्थावर प्रेम करणारा होता. गावाचा लाडका होता तो. तो देखील किशोरवयापासून आपल्या वडीलांसवे मंगलकार्यात जायचा. माध्यमिक शिक्षणानंतर त्यानं शाळेला अलविदा केलेलं. वरवर त्रिकोणी वाटणाऱ्या या कुटुंबात आणखीही घटक होते. मकबूलचाचांना इक्बालच्या पाठीवर झालेल्या पाच मुली होत्या. कमाई कमी आणि खाणारी तोंडे जास्त. त्यात पुन्हा घर जाळून परोपकाराची ओढ, यामुळं त्यांची पत्नी हमीदाची खूप फरफट झाली. मोहसीनचा आईवर अतोनात जीव होता. त्यानं अनेकदा इच्छा व्यक्त करूनही हमीदाबी कधीच त्याच्याकडं हवापालट म्हणून गेल्या नाहीत. आपला नवरा कमावत नसला तरी मनाचा भला आणि सच्चा आहे हे त्या जाणून होत्या. इक्बालचं आईवडीलात, गावगाड्यात विरघळून जाणं त्यांनाही आवडलं होतं. पण मोहसीनवर त्यांचा काकणभर जास्ती जीव होता. लहानपणापासून स्वतःची रेघ मोठा करत गेलेला पोरगा आईची सगळी दुःखे जाणून होता. आईच्या सुखदुःखाची सर्वाधिक पर्वा तोच करायचा. त्याच्या नोकरीच्या बळावरच पाचही मुलींची लग्ने होऊ शकली, अन्यथा हा मामला मकबूलजींच्या आवाक्याबाहेरचा ठरला असता. मात्र याचं श्रेय ते खुदालाही देत जे मोहसीनला मान्य नसे. आपल्या वडीलांनी आईची फरफट केली आणि धाकट्या भावालाही त्याच मार्गाने नेलं याचं त्याला शल्य होतं. बहिणींच्या निकाहनंतरच त्याचा निकाह झालेला त्यामुळे त्याच्या संसारास अंमळ उशीर झालेला. गावातली मोजकी माणसं त्याच्या निकाहला हजर होती. त्याचं जीवन नव्या विचाराशी जुळणारं होतं मात्र वडील आणि भावाचं वर्तन त्याच्या विरोधी विचारांचं होतं. मोहसीनला मुलगी झाली तेंव्हा मकबूलचाचा सगळ्या बिरादरीला त्याच्या घरी घेऊन गेलेले. त्यानंतर त्यांचं फारसं येणंजाणं नव्हतं.

आयुष्यभर काबाडकष्ट करून थकलेल्या हमीदाबीनं अंथरूण धरलं तेंव्हा नवरा दिवसभर दर्ग्यात आणि पोरगा पोटाच्या खळगीसाठी दारोदारी अशी अवस्था होती. आई आजारी असल्याचं कळताच गावी आलेल्या मोहसीनने खूप आग्रह करूनही त्याच्याबरोबर त्या गेल्या नाहीत. वडीलांवरील अंधप्रेमापायी आई येत नाहीये हे त्याने ओळखलं होतं. खेरीज ती इक्बालच्या चिंतेनेही झिजते आहे हे ही तो ओळखून होता. हमीदाबीच्या दवाखान्यावरून त्या कुटुंबात अखेर मोठं घमासान झालं. रागाच्या भरात मोहसीनच्या तोंडून नको ते शब्द आले. त्यामुळे मकबूलचाचांचा स्वाभिमान दुखावला गेला. नवऱ्याच्या डोळ्यातलं पाणी पुसायचं की आपल्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या मुलाचे अश्रू टिपायचे या कात्रीत हमीदाबी अडकल्या. आयुष्याच्या जोडीदाराला सोडून जायला त्यांचं मन तयार नव्हतं आणि दर्गाह वाऱ्यावर सोडून जायला मकबूलचाचा राजी नव्हते. पत्नी शबानाने त्यांची काळजी घेतली तरी गावातली कुणाची वर्दी आली तर मोठी पंचाईत होण्याची भीती इक्बालला वाटत होती. या त्रांगडयामुळे आई आपल्यासवे येत नाही या जाणीवेनेच दुःखीकष्टी होऊन मोहसीन घरी परतला. त्यानंतर दोनेक दिवसांतच हमीदाबी अल्लाहच्या दरबारी आपली फरियाद घेऊन गेल्या. आई अकस्मात गेल्याचा मोहसीनला जबर धक्का बसला. त्यानं याचा ठपका भाऊ आणि वडीलांवर ठेवला. या घटनेनं बापलेकांच्या तणावात बरीच वर्षे निशब्द गेली. इक्बालला मुलगा झाला तरी मोहसीन गावी आला नाही. 


अखेर खुदानेच यावर तोडगा काढला. मकबूलचाचांना  हृदयविकाराचा धक्का आल्याचं निमित्त झालं, मोहसीन त्यांना न्यायला गावी आला. खरं तर त्याचं मन त्याला खात होतं पण यायला निमित्त नव्हतं. आईच्या बरसीला येऊन गेल्यानंतर एका तपानं तो गावी आला होता. मकबूलचाचा गाव सोडून जायला आतून राजी नव्हते. पण मोहसीनचा संसारही बघितला पाहिजे, तिथल्या नातवाच्या डोक्यावरूनही आपला हात फिरला पाहिजे, त्या सूनेवरही माया केली पाहिजे या उदात्त भावनेने ते मोहसीनसोबत गेले. जाताना सनई सोबत घेऊन गेले. त्यांच्या जाण्यास इक्बालचा विरोध होता त्यामुळे निरोप द्यायला तो काही आला नव्हता. त्याच्या येण्याची वाट पाहून शबाना आपल्या मुलाला घेऊन अगदी अखेरच्या क्षणी तिथं आली होती.

मोहसीनच्या घरी गेल्यानंतर त्यांचे सुरुवातीचे काही दिवस ठीकठाक गेले पण राहून राहून त्यांना गावाची याद येऊ लागली. नात आणि सूनेशी त्यांचं सुत चांगलं जमलं होतं पण हमीदाबीनंतर सकाळ संध्याकाळ त्यांची सावली बनून राहिलेली शबाना त्यांना जास्त आठवत होती. आपल्या आजोबाला घोडा करणारा चिमुरडया एहसानचा भास झाला नाही असा दिवस जात नव्हता. पाच वक्तची नमाज पडताना दर्ग्यात चेतवलेल्या ऊदाचा वास आठवायचा, गावातली माणसं डोळ्यापुढे फेर धरून नाचायची. पीरसाहेबाची मजार सतत डोळ्यापुढे तरळायची. तिथं अंथरलेल्या चादरीचा गंध दरवळायचा. सतत भास होत असूनही केवळ मोहसीनला वाईट वाटेल म्हणून मनातली गोष्ट त्याला सांगितली नाही. अगदीच जीव लागेनासा झाला तेंव्हा खोलीची दारंखिडक्या बंद करून ते एकांतात हळू आवाजात सनई वाजवायचे. सुनेने त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न केला, ती कुठेही कमी पडली नाही. पण ती परिस्थितीच तिच्या परिघाबाहेरची होती. यातून व्हायचं तेच झालं. त्यांचा रक्तदाब वाढला, पक्षाघाताचा झटका आला. त्यांना इस्पितळात भरती केलं गेलं. गावाकडे खबर कळताच इक्बाल त्यांना भेटायला आला पण मकबूलचाचांनी त्याला आल्या पावली परत पाठवला. शबाना आणि एहसान काही दिवस राहून पुन्हा गावाकडे गेले. या नंतर त्यांची प्रकृती वारंवार ढासळू लागली. त्यातच एके दिवशी त्यांना पुन्हा एकदा हृदयविकाराचा तीव्र झटका आला, तेंव्हा डॉक्टरांनी मोहसीनला सावध केलं. मग मात्र मोहसीननं स्वतःला सावरत त्यांच्या मनातली इच्छा ओळखत तिला मान दिला. पण तोवर उशीर झाला होता. मकबूलचाचांच्या मनावरचं ओझं आता चांगलंच हलकं झालं होतं. आता त्यांना मातीची ओढ लागली होती, 'खाक ए सुपूर्त'ची तयारी त्यांच्या मनाने सुरु केली होती. भावकीची काही माणसं घेऊन मोहसीनने इक्बालला पाचारण केलं. भेदरलेल्या अवस्थेत इक्बाल दवाखान्यात आला, वडीलांच्या पायापाशी झोपी गेलेल्या मोहसीनला पाहून त्याचं मन द्रवलं. सगळा संताप, कोलाहल एका क्षणात नाहीसा झाला. त्यानं भावाला मिठी मारली. त्याच्या अश्रुने मोहसीनचा शर्ट ओला झाला. या दृश्याने मकबूलचाचा भारावून गेले. अल्लाहकडे दुआ मागण्यासाठी विकलांग झालेला हातही त्यांनी त्या दिवशी कसाबसा उचलला.

दोन्ही मुलं, सुन, नातवंडासह मकबूलचाचा गावाकडे निघाले. वाटेतल्या प्रवासात त्यांना मेघांच्या अभ्र्यात हमीदाबीची धूसर तस्वीर दिसत होती, तिला पाहून त्यांच्या चेहऱ्यावर अल्वार स्मितरेषा उमटत होती. बरयाच दिवसांनी त्यांना हसताना पाहून कुटुंब खुश झालं पण हे समाधान अल्पायुषी ठरलं. पश्चिमेला सूर्याचं रंगकाम सुरु असतानाच्या सुमारास ते गावी परतले. त्यांच्या हट्टापायी घराच्या अंगणात बाज टाकून त्यावर त्यांना झोपवण्यात आलं. रात्रभर त्यांना भेटायला गावातली माणसं येत होती, बायका पोरी घडीभर बसून जात होत्या. बिरादरीचं कुराण पठण सुरु होतं. दोन्ही मुलं कासावीस झाली होती, नातवंडं कोमेजून गेली होती. अशक्त झालेल्या उजव्या हाताने  जपमाळेचे मणी हळुवार ओढणाऱ्या, अलगद डोळे मिटून पडलेल्या मकबूलचाचांच्या चक्षुसमोर आठवणींनी फेर धरला होता. अस्मानातला चांदतारा डोळ्यापुढे झुलत होता, अज़ानचे ध्वनी कानात घुमत होते, मध्येच हमीदाबीचा नाजूक किनरा आवाजही ऐकू येत होता. पहाटेच्या सुमारास त्यांचे श्वास जड होत गेले आणि बरोबर पहिल्या जुम्मा नमाजच्या वेळी त्यांचा देह निमाला. सगळं कुटुंब शोककल्लोळात बुडून गेलं. दुपारच्या वेळी त्यांना मूठमाती दिली गेली. फातेहा पढताना इक्बालचा कापरा स्वर कंठाशी आलेला. सगळं गाव हेलावून गेलेलं. कब्रस्तानमधली झाडंझुडपं स्तब्ध झाली होती. वाऱ्यानं स्वतःला बांधून घेतलेलं. 'अल हम्दु लिल्लाहि रब्बिल आलमीन..'चा धीरगंभीर आवाज घुमला आणि दर्ग्याच्या मीनारावर बसलेल्या कबुतरांनी एकच गलका करत आसमंतात ऊंच कूच केले, सगळीकडे त्यांच्या पंखाचा फडफडाट घुमला. संध्याकाळी जिकडे तिकडे पांगापांग झाली. ग्यारवी उरकून मोहसीन त्याच्या घरी परतला. याला आता बराच काळ उलटून गेलाय.    

गावाकडे आता इक्बालने मकबूलचाचांची जागा घेतलीय. एहसान मन लावून शिकतोय, तो वर्गात पहिला आलाय. इकडे मोहसीन दिवस ढळताना खूप कावराबावरा होऊन जातो. वडीलांच्या फोटोकडे एकटक बघत बसतो. त्याने प्रौढत्वात चक्क सनई शिकण्याचा वर्ग लावलाय. त्याच्या घरातून निघालेले सनईचे सुरेल स्वर वाऱ्यावर स्वार होऊन उत्तररात्रीस गावातल्या दर्ग्याच्या मीनारापाशी थडकतात तेंव्हा कंपने उठतात आणि झाडं अज़ान म्हणतात ! 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा