मंगळवार, ११ नोव्हेंबर, २०२५

धर्मेंद्र - जट यमला पगला!


त्याचे श्वास अजून जारी आहेत, त्याच्या सिनेमाविषयी वा त्याच्या करिअरविषयी खूपजण खूप काही सांगतील; मला थोडेसे वेगळे सांगायचेय.. 

धरमची गोष्ट सुरु होते 1935 मध्ये. 8 डिसेंबरला पंजाबच्या साहनेवाल गावात जन्मलेला हा एक साधा जाट मुलगा. धर्म सिंह देओल त्याचं नाव. जग त्याला 'धर्मेंद्र' म्हणून ओळखते, त्याच्या आयुष्याची कहाणी, केवळ चित्रपटांच्या यशाची नाही, तर अंतर्मनातील एकाकीपणाची, प्रेमातील द्वंद्वाची आणि संघर्षातील जयपराजयाची आहे. त्याने बॉलीवूडला 'ही-मॅन' दिला, त्याच्या जीवनात असे अनेक क्षण येऊन गेलेत जेव्हा त्याच्या डोळ्यांत अश्रू तरळले, हृदयात अपराधीपणाची जखम खोलवर रुजली आणि एकाकी एकांताने त्याला शांत केलं.

बुधवार, ५ नोव्हेंबर, २०२५

ड्रॅक्युला - सैतानी दुनियेच्या अनभिषिक्त सम्राटाची जन्मकथा!


हॉरर, थ्रिलर सिनेमे पाहाणाऱ्या दर्दी रसिकास 'ड्रॅक्युला' माहिती नसावा असे होत नाही! ब्रॅम स्टोकरने ज्या काळात ड्रॅक्युला ही कादंबरी लिहिली तो व्हिक्टोरियन एरा होता. या कालखंडात प्रामुख्याने चार वर्ग होते - उच्च, मध्यम, श्रमिक आणि तळाशी असणारा निम्नवर्ग. या चारही वर्गांची विभागणी केवळ सामाजिक स्तरावर नसून आर्थिक स्तरदेखील त्यात अंतर्भूत होता. या वर्गवारीचे युरोपमध्ये बऱ्यापैकी सक्त आणि कठोर विधीसंकेत होते. व्यक्तीचा आर्थिक स्तर, त्याचा हुद्दा, शिक्षण यावरून त्याचा वर्ग ठरे. यामुळे सामाजिक देवाणघेवाण अगदी कमी होई, असे असले तरी पुरुष हवे तिथे तोंड मारत आणि स्त्रियांची कुचंबणा ठरलेली असे, मग ती कोणत्याही वर्गातली असली तरीही! एखाद्या उमरावाच्या पत्नीचे जीवन भलेही ऐश आरामात, आनंदात जात असले तरी व्यक्तीस्वातंत्र्याच्या बाबतीत तिचा आणि तळाच्या स्त्रीचा स्तर जवळपास समान असे. बाहेरख्याली पुरुषांना आपल्या अवतीभवती पाहून, त्या स्त्रियांच्या मनात कोणते विचार येत असतील यावर विपुल लेखन झालेय, मात्र त्यांच्या लैंगिक शोषणाविषयी बोलताना त्यांच्या लैंगिक गरजांविषयी तुलनेने कमी लिहिले गेलेय. ब्रॅम स्टोकरने हा मुद्दा बरोबर पकडला आणि त्याच्या मनात घोळत असलेल्या गोष्टी त्यात बेमालूम मिसळल्या.

गोष्ट सुटकेसमध्ये ठेवलेल्या मृतदेहाची!


बेनाव्हिडेस हा मध्यमवयीन पुरुष. भरकटलेला आणि जगण्याच्या विविध समस्यांनी हैराण झालेला माणूस. एके दिवशी त्याच्या संयमाचा विस्फोट होतो, तो अत्यंत विचलित होतो. संतापाच्या भरात, तिशीच्या वयातल्या पत्नीची हत्या करतो. तिची हत्या केल्यानंतर काही वेळाने तो भानावर येतो. रागाच्या भरात आपण हे काय करून बसलो याचे त्याला शल्य वाटू लागते. तो गोंधळून जातो, आता काय करावे, हे काही केल्या त्याला सुचत नाही.  पत्नीचा मृतदेह तो एका मोठ्या सुटकेसमध्ये भरतो. खरेतर आपण ही सुटकेस घेऊन पोलिसांकडे गेले पाहिजे असं त्याचं एक मन सांगत असतं तर त्याचं दुसरं मन त्याला सांगतं की कदाचित डॉक्टर आपल्या पत्नीचे काय करायचे ते सांगू शकतील! द्विधा मनस्थितीत तो घराबाहेर पडतो.

सोमवार, ३ नोव्हेंबर, २०२५

औरते – रमाशंकर यादव विद्रोही..

A close-up of a person crying

AI-generated content may be incorrect.


काही स्त्रियांनी
स्वेच्छेने विहिरीत उडी मारून जीव दिलाय
असं पोलिसांच्या नोंदींमध्ये लिहिलंय.

आणि काही स्त्रिया
चितेवर जळून मरण पावल्या —
असं धर्मग्रंथांमध्ये लिहिलंय.

मी कवी आहे,
कर्ता आहे,
घाई कशाची?

एके दिवशी मी पोलीस आणि पुरोहित
दोघांनाही एकाचवेळी
स्त्रियांच्या न्यायालयात उभं करेन,

जॉर्ज बर्नार्ड शॉ यांच्याविषयीची एक नोंद..


जॉर्ज बर्नार्ड शॉ यांचं बालपण आयर्लंडमध्ये पांढरपेशी गरिबीत गेलं. त्यांचे वडील पेशाने कारकून होते, मद्याचा अंमल चढला की त्यांना आवरणे कठीण जाई. खेरीज ते काहीसे उदासीन स्वभावाचे होते. घरात रोज भांडणं होत, भांड्यांची आदळआपट चाले. नीरव शांततेच्या जागी किंकाळ्यांचा आवाज भरलेला असे.
या वातावरणातही शॉची आई, ल्युसिंडा गार्नी शॉ हिने आपला छंद लुप्त होऊ दिला नव्हता. ती अत्यंत प्रतिभावान गायिका होती. तिचा आवाज लोकांना भावविभोर करायचा. पण तिचं आयुष्य एका अपयशी लग्नाच्या सावटाखाली हळूहळू कोमेजत चाललं होतं आणि याचं तिला शल्य होतं.

दरम्यानच्या काळात त्यांच्या घरात एक संगीत शिक्षक येत असत; जॉर्ज वँडेल ली हे त्याचे नाव. हळूहळू शॉची आई त्याच्याकडे आकर्षित झाली. दोघांमध्ये आत्मिक जवळीक वाढली. जॉर्जच्या घरी शिसवी पियानो होता. आईची बोटे पियानोच्या कळांवरुन फिरू लागली की त्याचे मन भरुन येई. त्याला विलक्षण आनंद होई.

रविवार, २ नोव्हेंबर, २०२५

हे चाहूर आहे तरी काय?


साठच्या दशकात आईने नर्सची नोकरी प्रामाणिकपणे आणि विलक्षण संवेदनशील पद्धतीने केली. रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील दहागाव या छोट्याशा खेड्यात आरोग्य केंद्रात ती रुजू झाली होती. हा भाग अजूनही निबिड अरण्यासारखा आणि अडगळीचा आहे, साठ वर्षापूर्वी तर हा भाग एखाद्या आदिम मानवी वसाहतीसारखा होता! आई अहमदनगरची, तिने कधी समुद्र पाहिलेला नव्हता, थेट कोकणात तिने काही वर्षे काढली. स्वतःला जुळवून घेण्यासाठी तिला झगडावे लागले!

अतिशय खडतर परिस्थितीतून तिने स्वतःला उभं केलं आणि कमालीच्या सहनशील, संयमी, जिद्दी वृत्तीने पुढचे आयुष्यही कष्टात काढले. विपरीत परिस्थितीतही तिने चारही अपत्ये घडवली! आम्हा चारही भावंडांना शिक्षणाची गोडी लावण्यात आणि लेखन वाचनाची ओढ निर्माण करण्यास सर्वस्वी तिच कारणीभूत होती. ती होती, म्हणून आम्ही सर्व घडलो. माझी भावंडे जितक्या चांगल्या पद्धतीने आईवडिलांच्या कसोटीस उतरली त्या मानाने मी खूपच कमी पडलो आणि नंतरही निखारु शकलो नाही, हे वास्तव मी लिहिले पाहिजे.

शनिवार, १ नोव्हेंबर, २०२५

शेवाळं..



ही गोष्ट फार जुनी नाहीये. अलीकडचीच आहे, अजूनही लख्ख आठवते.
तो पस्तीसेक वर्षांचा होता. मी त्याला गावाबाहेरच्या डोहाकडे वळताना खूपदा पाहिलं होतं. नंतर त्याची कथा कळली..

त्याचा कोवळा किशोरवयीन मुलगा अकाली गेल्यापासून रोज सकाळी तो गावाबाहेरच्या डोहाजवळ यायचा. डोहातल्या माशांना प्रेमाने खाऊ घालायचा. घरून येतानाच कणकेच्या छोट्या गोळ्या घेऊन यायचा.

डोहाच्या काठावर बसून अगदी शांतपणे डोहातल्या हिरवट निळ्या पाण्यात माशांसाठी एकेक गोळी फेकायचा. त्याने कणकेची गोळी फेकताच माशांची झुंबड उडायची. खरे तर या डोहात पूर्वी एकही मासा नव्हता, हे सर्व मासे त्यानेच आणून सोडले होते.

इथे आलं की त्याला खूप शांती लाभायची. त्या डोहापाशी मनुष्यवस्ती नव्हती नि कसली वर्दळही नव्हती. तो डोह, गर्द वनराईत हिरव्या काळ्या सावल्यांच्या दाटीत दडून होता. रात्रीच नव्हे तर दिवसादेखील तिथे विलक्षण नीरव शांतता असे. एकट्याने थांबले तर मनात भीतीचे काहूर उठावे असा तिथला भवताल होता.

ब्लड रिव्हर - टिम बुचर यांची अद्भुत कादंबरी!


नुकतेच आपल्या देशाच्या राजधानीत यमुना नदीच्या अस्वच्छतेवरून मोठा तमाशा झाला, छट पूजेसाठी खोट्या स्वच्छ पाण्याची नौटंकीही करुन झाली. बेसिकली आपल्याकडे, नद्यांना आपण नावाला पवित्र मानतो, त्यापलीकडे आपली त्यांच्याप्रती आस्था नाही हे आपण खुल्या मनाने मान्य केले पाहिजे. अमुक एक नदी पुराणात आहे, तमुक एक नदी इतिहासात आहे, अलाण्या नदीचे पाणी पवित्र आणि फलाण्या नदीचे पाणी मोक्ष देते इत्यादी कल्पनात आपण, आपल्याच स्वार्थासाठी गुंतून पडलो आहोत. जसे की आपले दुष्कर्म कमी व्हावे, आपली पापे कमी व्हावीत, आपल्याला आशीर्वाद लाभावेत, आपलं कल्याण व्हावं, वगैरे वगैरे! म्हणजे आपण नदीला काही देणार नाही, नदीसाठी आपण काही करणार नाही आणि त्या बदल्यात तिच्याकडून आपल्याच कथित भल्याच्या कपोलकल्पित गोष्टी मागणार, पुण्य वाढवून मिळावे म्हणून डुबकी मारणार! आणि नदीला आपण काय देणार, तर ड्रेनेजचे पाणी, गटार नाल्यांचे पाणी, रासायनिक कारखान्यांचे दूषित पाणी आणि आपणच टाकलेला गावभराचा कचरा! नदी गढूळ विषारी घाण होऊन जाते, तरीही आपण तिच्यासाठी झिजत नाही की तिच्यासाठी आपला जीव तीळतीळ तुटत नाही! नद्या आपल्या जीवनदायिन्या आहेत वगैरे ज्ञानकण फुंकायला मोकळे होतो. सरकारेही आपल्यासारखीच कागदावर अब्जावधी रुपयांच्या योजना आणतात, काही कोटी खर्च होतात, नदी कणभरच बदलते पण मणभर पैसा इकडे तिकडे फिरतो! घाण गलिच्छ अवतारात नदी वाहत राहते! नदीविषयी आपल्यात अनास्था आहे हे कटूसत्य आहे.