Monday, September 28, 2015

'बोल्ड अँड ब्यूटिफूल' बाय लता...


....बलदंड देहाच्या काळ्याकभिन्न आझादला साखळदंडाने जखडून पिंजऱ्यात कैद केलंय. "सी ग्रेड'च्या स्टंटपटातून हाणामारीची किरकोळ कामे करणाऱ्या या नगण्य नटाला कधी नव्हे असं सिनेमाच्या श्रेयनामावलीत महत्त्वपूर्ण स्थान देण्यात आलंय - "ऍण्ड आझाद इन गोल्ड केज'. अस्वस्थ मन-स्थितीत तो पिंजऱ्यात येरझाऱ्या घालतोय. मग त्याच्यासमोर अवतरलेली कमनीय बांध्याची अल्पवस्त्रांकित हेलन आपल्या मादक हावभावांनी त्याला खुणावू लागते "आंss जाने जां, sss  मेरा ये हुस्न जवॉं...' गाण्यातले आर्त कामुक भावबंध ऐकून पिसाटलेला आझाद वखवखलेल्या नजरेने तिच्या तारुण्याचा आस्वाद घेऊ लागतो आणि प्रेक्षक मात्र कमालीचे रोमांचित होऊन स्टेजवरचा तो आगळावेगळा नृत्याविष्कार भान हरपून पाहू लागतात. तोंडात साखरपाक घोळवावा तसे इथे शब्द घोळवलेत, त्यांच्याशी जालीम खेळ केलाय. सुरुवातीचा 'आं जाने जा'चा आलाप तर अगदी जीवघेणा झालाय. आझादच नव्हे तर अख्खे पब्लिक यामुळे अवाक होऊन जाते. ..शॉट कट !


Tuesday, September 22, 2015

अनमोल घडीची चिरंतन टिकटिक.....


"संध्याकाळी देव्हारयात लावल्या जाणारया समईचे पावित्र्य या सिनेमात असायचे, सकाळची सडारांगोळी करून तुळशीवृंदावनाला प्रदक्षिणा घालतानाची प्रसन्नता त्यात होती. दुपारच्या शीतल वामकुक्षीचा निवांतपणा त्यात असायचा. शहर झोपी गेल्यानंतर उत्तररात्री खिडकीतून येणारा गार वारा शृंगाराचे हळुवार गुंजन जोडप्यांच्या कानात करायचा तो शृंगार या सिनेमात होता. सप्तरसाचे मर्यादित पण उत्फुल्ल रसरशीत अविष्कार या सिनेमात होते म्हणून ते अधिक जवळचे आणि अधिक सच्चे वाटायचे…………"


Saturday, September 19, 2015

'द ग्रेट गॅम्बलर'ची दो लफ़्ज़ों की है दिल की कहानी....सिनेमा, गाणी आणि नाटक यांचे वेड असलेल्या भारतीय माणसाला व्हेनिस या शहराबद्दल विचारले तर तो लगेच दोन उत्तरे देईल एक म्हणजे शेक्सपिअरचे 'मर्चंट ऑफ व्हेनिस' आणि दुसरे आपले आवडते 'दो लफ़्ज़ों की है दिल की कहानी' हे गाणे ! ४० वर्षांपूर्वी द ग्रेट गॅम्बलर (१९७६) हा सिनेमा मी आमच्या सोलापुरातील भागवत चित्रमंदिरमध्ये पाहिला होता. तेंव्हा यल्ला दासी नावाचे एक जबरदस्त चित्रकारद्वय सोलापुरात होते, ते कोणत्याही सिनेमाचे असे काही पोस्टर्स बनवायचे की नुसते पाहत राहावे असे वाटायचे. मला आठवते की माझे सिनेमा पाहणे कमी होते पण केवळ त्या पोस्टर्सपायी चित्रपट गृहाबाहेर रेंगाळणे जास्त असायचे. आजच्या सारखी रेडीमेड डिजिटल पोस्टर्स तेंव्हा नव्हती पण त्या पोस्टरमध्ये जो जिवंतपणा आणि रसरशीतपणा होता ती बात या छापील पोस्टर्समध्ये नाही. या द ग्रेट गॅम्बलरचे त्यांनी बनवलेले 'दो लफ्जोंकी...' चे पोस्टर आजही डोळ्यापुढे येते. खरे तर महानायक अमिताभचा 'द ग्रेट गॅम्बलर' हा सिनेमा एक तद्दन गल्लाभरू चित्रपट होता. पण शोलेपासून या माणसाने बॉक्स ऑफिसचा एकहाती कचरा केला होता त्याला तोड नाही.त्यामुळे हा सिनेमाही यशस्वी झाला.Friday, September 11, 2015

जिवलग ...भल्या पहाटेच राणूच्या वस्तीत हालचाल चालू होती. रानातला गार वारा अंगावर काटा आणत होता. बांधावरच्या लिंबाच्या पानाची सळसळ चांगलीच ऐकू येत होती. शेजारच्या जालिंदरच्या शेतातला जुनाट वड हेलकावे खातोय असं उगाच वाटत होतं. टिटव्यांचा टीटीविटीटीवचा आवाज दुरून येत होता पण अगदी स्पष्ट होता. लांब अंतराहून पिंगळा देखील त्याचे अस्तित्व जाणवून देत होता. रातकिड्यांचा किर्र आवाज एक तालात कानी येत होता. आठवड्यापासून सुरु असलेल्या पावसाचं पाणी मातीने अधाशासारखा पिऊन टाकलं होतं. ढेकळाच्या चिखलात जागोजागी आलेलं तण पहाटवारयावर डुलत होतं. नांगरट बुजून गेली होती, सगळी जमीन दबून गेली होती. तीनेक एकराच्या त्या शेतात राणूकाकाने अख्खे आयुष्य घालवले होते. आता भल्या पहाटे शेतातल्या वस्तीत दबत्या पावलानं लगबग चालली होती. वस्ती म्हणजे तरी काय होतं ? शाडूने कधीकाळी रंगवलेल्या मातीच्या विटांच्या चार बैठ्या भिंती आणि त्यांच्या आढ्याला लिंबाचे, बाभळीचे जुने वासे. त्यावर चिपाडं आणि झावळ्यांनी शाकारलेलं होतं. डोकं तुटलेल्या दोनचार खुंट्या भिंतीत ठोकलेल्या होत्या अन एक जळमटलेली पिवळट देवळीही घराच्या भिंतीत होती ! एका कोपरयात भेगाळलेली चूल होती तर दुसऱ्या कोपरयात उघडा पडलेला माठ होता ! त्या खोलीच्या बाजूला दगडी कुंबी असलेला गोठा होता. इतकीच काय त्या वस्तीवरची स्थावर होती. गोठ्यात जुनाट दगडांची दावण होती. त्या दावणीला दोन म्हातारे झालेले गलितगात्र बैल बसून होते. हिऱ्या आणि सुभान्या. ते दोघेही ज्या दिवशी वस्तीवर आले होते तो दिवस आजही राणूकाकाच्या ध्यानात आहे.


Saturday, September 5, 2015

संभाजीराजे - वादग्रस्त मुद्द्यांची एक चिकित्सा ....आपल्याकडे स्वतःच्या राजकीय, जातीय फायद्याच्या गणितानुसार इतिहासाच्या चिंधडया उडवण्याचे काम सर्रास केले जाते. छत्रपती संभाजीराजांच्याबद्दल तर तीन शतकापासून हा उद्योग सुरु आहे. त्याचीच एक चिकित्सा...

ऑक्टोबर १६७६ पासून शिवछत्रपतींचा मृत्यू झाला तोपर्यंत संभाजीराजे रायगड परिसरात आले नव्हते. असं ऐतिहासिक साधनं दर्शवतात तरीही मल्हार रामरावाची बखर, इंग्रजी वार्ताहराच्या नोंदी आणि आदिलशाही इतिहासातील बुसातिन-उस-सुलातिन या तीन ऐतिहासिक साधनानुसार संभाजीराजांनी रायगडावर एका महिलेवर बलात्कार केला असे सांगितलं जातं आणि आपण त्यावर विश्वास ठेवतो !


Friday, September 4, 2015

नयनोमे बदरा छाये अन 'मेरा साया' !मेरा साया १९६६ मधला सिनेमा. माझा जन्मही झालेला नव्हता तेंव्हा. पण हा सिनेमा मी बरयाचदा पाहिलाय, त्यातल्या 'नयनो मे बदरा' या गाण्यासाठी आणि अर्थातच साधनासाठी. मदनमोहनजींचे सुमधुर संगीत या सिनेमाला होते.साधना ही ६० च्या दशकात इतकी प्रसिद्ध अभिनेत्री होती की तिची हेअरस्टाईल तेंव्हा मुलींमध्ये साधना कट म्हणून प्रसिद्ध होती. 'मेरा साया' मध्ये सुनील दत्त ठाकुर राकेश सिंहच्या भूमिकेत होते. त्यांचे गाजलेले जे सिनेमे आहेत त्यापैकीच हा एक होय.Thursday, September 3, 2015

आईचे पत्र .....दिनांक ३१ ऑगस्ट २०१५

प्रिय कान्हू उर्फ कन्हैया यास
आईचे अनेक आशीर्वाद.

तुला तर माहितीच आहे की मला लिहिता-वाचता येत नाही. नेहमीप्रमाणं या वेळेसही तुझ्या ल्हान बहिणीकडून आपल्या नन्हूकडून लिहून घेऊन पत्र पाठवत्येय. गावातून नोकरीसाठी तुला पुण्याला गेल्याला आता चार साल झालेत. तुझी खूप आठवण येते. आता काय काय म्हणून सांगू ? तुझे सारखे भास होतात, तू आसपासच आहेस असं वाटत राहतं. तुझी सय आली नाही असा एकही दिवस जात नाही. तुझी आठवण काढून डोळ्यातल्या आडातलं पाणी आटून गेलंय. हे तरी तुला किती वेळा सांगायचं ? पुष्कळदा तुला पत्र पाठवून सुद्धा तू येत नाहीस. तु आपल्या आईवर नाराज आहेस का ? तुला आपल्या ल्हान्या बहिणीची, आपल्या नन्हूची आठवण येत नाही का ?