गुरुवार, २४ सप्टेंबर, २०२०

प्रेमचंदांची फाटकी चप्पल...



तुम्ही कधी फाटकी चप्पल घातलीय का ? 
सर्रास आपली फाटलेली चप्पल कुणाच्या नजरेस पडू नये म्हणून बऱ्याचदा छुपा आटापिटा केला जातो. 
मात्र एखाद्या विख्यात व्यक्तीने आपल्या पत्नीसोबत एक रमणीय आठवण म्हणून फोटो काढून घेताना फाटकी पादत्राणे घातली असतील तर त्यातून आपण कोणते अर्थ लावू शकतो ? 
एख्याद्याच्या पायातली फाटकी चप्पल पाहून आपल्या मनात जे विचार येतात ते आपलं खरं चरित्र असतं जे आपल्या एकट्यालाच ठाऊक असतं. असो.. 

ख्यातनाम साहित्यिक मुन्शी प्रेमचंद यांनी पत्नी शिवरानीदेवीसोबत काढलेला एक फोटो खूप प्रसिद्ध आहे. 
या फोटोत मुन्शीजींच्या एका पायातला बूट फाटलेला आहे आणि त्यातून त्यांच्या पायाची करंगुळी बाहेर आलेली स्पष्ट दिसते. 
वरवर पाहता ही एक सामान्य बाब वाटेल. मात्र याचे अन्वयार्थ काय लावता येतील हे महत्वाचं ठरतं. 
हिंदीतले जानेमाने लेखक हरिशंकर परसाई यांनी यावर एक लेख लिहिला होता ज्यावर हिंदी साहित्य जगतात कधी काळी मोठा उहापोह झाला होता. हा लेख मराठीत अनुवादित करून इथे डकवावा असे वाटत होते मात्र परसाईजींच्या प्रवाही आणि अमीट गोडीच्या हिंदीचा आस्वाद घेता यावा म्हणून हिंदी लेख जसाच्या तसा देतो आहे.

बुधवार, १६ सप्टेंबर, २०२०

गावाकडच्या पाऊसम्हणी...


गावाकडे पावसाच्या नक्षत्रांचं बोलकं वर्णन केलं जातं.
याच शब्दांत सांगायचं झालं तर तरणा पाऊस पडून गेलाय,
त्याच्या पाठोपाठ म्हाताराही येऊन जाईल,
नंतर सासूचा पाऊस पडेल मग सुनेचा पाऊस पडेल...
हे असं का म्हटलं गेलंय याचे बहुतेक निष्कर्ष खुमासदार आहेत.

पुनर्वसू म्हणजे तरुण, पुष्य म्हणजे म्हातारा, मघा म्हणजे सासू आणि पूर्वा म्हणजे सून ही नावं अनेक शतकांपासून गांवगाड्यात लागू आहेत.
मृग आणि आर्द्रा या सुरुवातीच्या दोन नक्षत्रात जो पाऊस पडतो त्या दरम्यान खरीपाचा पेरा केला की उत्तम पीक हाती येतं ही पूर्वापार धारणा होय,
आताशा असं घडताना दिसत नाही ही गोष्ट अलाहिदा.

मृग आणि आर्द्रा ही पर्जन्याची बालरुपे समजली जातात, याच काळात मातीतल्या बीजांना अकुंरांचे रूप बहाल होते. हे कोवळे अंकुर म्हणजे पर्जन्याची बाल्यावस्था ही कल्पनाच मुळात अत्यंत रम्य आहे!
मग या अकुंरांवर ज्याची प्रीत बहरते तो पुनर्वसूचा पाऊस!
म्हणून तो तरणा पाऊस!
आणि पीक जोमात आल्यानंतर त्याचा निरोप घेण्यासाठी येणारा तो म्हातारा पाऊस, म्हणजेच पुष्याचा पाऊस!
किती भारी आहेत ही नावे! अगदी नितांत चपखल!

रविवार, १३ सप्टेंबर, २०२०

रविवारची दुपार आणि तू ...


सुट्टीच्या दिवशीची दुपार जरा खासच असते
अगदी तुझ्यासारखी
बेफिकीर, बेजबाबदार, मुक्त !
मी देखील स्वतःच्या पद्धतीने ती व्यतित करतो.
पण का कुणास ठाऊक
पण मागच्या काही दिवसापासून हा फुरसतीचा वेळ स्वतःसोबत घालवण्याचा प्रयत्न जरी केला
तरी कुठल्या तरी ज्ञात अज्ञात घटिकातून मोकळं होत तू माझ्यासमोर येऊन बसतेस.
माझ्या हातातलं पुस्तक मिटवतेस,
आणि आपले बहारदार किस्से सुनावत बसतेस.
डिसेंबरमधली ती गुलाबी थंडी,
पावसाचे ते टपोरे थेंब,
आणि सुट्टीची ती अमीट दुपार !
तो किस्सा जो तू कधी काळी जगली होतीस
माझ्या सोबत.
कित्येक आठवडे झालेत तू याचीच पुन्हा उजळणी करते आहेस.
आणि तोवर मला जाणवतही नाही की
काही उत्कट प्रेमळ क्षणांच्या बेड्यात मी कायमचा कैद झालोय !

- समीर गायकवाड

ही कविता विख्यात तरुण कवयित्री गीतांजली रॉय यांच्या 'इतवार की दोपहर' या रचनेवर आधारित आहे.

शनिवार, १२ सप्टेंबर, २०२०

माधव कोंडविलकर - माझ्या काटल्या आहेत वाटा उदरातच असताना आईच्या...



एका विलक्षण कवितेची ही गोष्ट आहे. गावकुसाबाहेरच्या बहिष्कृत जगातला एक कोवळा मुलगा आणि त्याला कथित जगरीत समाजावून सांगणारी आई यांच्यातला संवाद कसा असू शकतो याचं हे शब्दचित्र थक्क करून जातं आणि कित्येक दिवसांनी हे पुन्हा वाचलं तरी मनाला एक सल देत राहतं.

माधव कोंडविलकरांना पहिल्यांदा वाचलं तेंव्हा त्यांचा एक शब्द डोक्यात खिळा ठोकावा तसा रुतून बसलेला. 'बोंदरं' हा तो शब्द. फाटायच्या बेतात आलेल्या जुन्या पोत्याच्या चवाळयांचे तुकडे, चिंधड्या उडालेल्या घोंगडीचे तुकडे आणि मायमावशीच्या जुनेर साड्याचे तुकडे एकत्र करून दाभणीने विणलेलं पांघरूण म्हणजे बोंदरं. कोंडविलकर चांभार जातीत जन्माला आलेले. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील मौजे देवाचे गोठणे हे त्यांचं जन्मगाव. सोगमवाडी या नावानेही हे गाव परिचित आहे. कोकणातील खोत आणि कुळवाडी यांच्याकडून दलित, कष्टकऱ्यांचं सर्रास शोषण केलं जायचं. कोंडविलकर याला अपवाद नव्हते. गद्य वाङ्मयावर त्यांनी अधिक लक्ष दिलं. त्यामुळे त्यांच्या पद्य रचनांना फारशी ओळख लाभली नाही. तरीही ही कविता नेहमीच खुणावत राहिली.

रविवार, ६ सप्टेंबर, २०२०

'मंडूवाडीह'च्या आडचे वास्तव ...


अलाहाबादचे प्रयाग नामकरण होऊन आता बरेच दिवस उलटून गेलेत. याच अलाहाबादमध्ये मीरगंज मोहल्ला नावाचा एक छोटासा भाग आहे. इथे वेश्यावस्ती होती आणि अजूनही आहे. याच मीरगंज मोहल्ल्यात पंडीत जवाहरलाल नेहरूंचा जन्म झाला होता. जन्मानंतर नेहरू इथेच दहाच दिवस होते. १९३१ मध्ये त्यांचा जन्म झालेली इमारत पाडली गेली. तरीदेखील या भागातील वेश्या वस्ती हटवण्यासाठी नेहरूंच्या नावाचा सतत आधार घेण्यात येत होता. या बायका बधत नाहीत हे लक्षात आल्यावर इथून शंभर मीटर अंतरावर असणाऱ्या शाळेचा आधार घेऊन अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. आताचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती असणारे धनंजय चंद्रचूड तेंव्हा अलाहाबाद उच्च न्यायालयातले मुख्य न्यायमूर्ती होते. त्यांनी कायद्यावर बोट ठेवत मार्च अखेर पर्यंत ही वस्ती हटवण्यात यावी असा आदेश दिला. मात्र यासोबतच मीरगंजमध्ये चालणाऱ्या सज्ञान नसलेल्या कोवळ्या मुलींच्या विक्री व्यवहाराविषयी तीव्र नापसंती व्यक्त केली होती. तेंव्हा उत्तरप्रदेश सरकारने मीरगंज मोहल्ला ही बेकायदेशीर वेश्यावस्ती असल्याचं शपथपत्र न्यायालयात दाखल केलं. वस्ती थोडीफार हटली. मात्र तिथल्या घरात बायका शोधणारी गिधाडं फिरू लागली. बायका पुन्हा आल्या. त्यांचे पत्ते बदलले मात्र व्यवसाय तोच राहिला. नंतर अलाहाबादचं प्रयाग झालं मात्र शहराचं काय ? शहरांतल्या लोकांचं काय ? लोकांच्या मानसिकतेचं काय ? असो. हे प्रश्न विचारायचे नसतात. हे सर्व आता इतक्या दिवसानंतर उपस्थित करण्याचं कारण म्हणजे मंडूवाडीह!