शनिवार, १२ सप्टेंबर, २०२०

माधव कोंडविलकर - माझ्या काटल्या आहेत वाटा उदरातच असताना आईच्या...



एका विलक्षण कवितेची ही गोष्ट आहे. गावकुसाबाहेरच्या बहिष्कृत जगातला एक कोवळा मुलगा आणि त्याला कथित जगरीत समाजावून सांगणारी आई यांच्यातला संवाद कसा असू शकतो याचं हे शब्दचित्र थक्क करून जातं आणि कित्येक दिवसांनी हे पुन्हा वाचलं तरी मनाला एक सल देत राहतं.

माधव कोंडविलकरांना पहिल्यांदा वाचलं तेंव्हा त्यांचा एक शब्द डोक्यात खिळा ठोकावा तसा रुतून बसलेला. 'बोंदरं' हा तो शब्द. फाटायच्या बेतात आलेल्या जुन्या पोत्याच्या चवाळयांचे तुकडे, चिंधड्या उडालेल्या घोंगडीचे तुकडे आणि मायमावशीच्या जुनेर साड्याचे तुकडे एकत्र करून दाभणीने विणलेलं पांघरूण म्हणजे बोंदरं. कोंडविलकर चांभार जातीत जन्माला आलेले. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील मौजे देवाचे गोठणे हे त्यांचं जन्मगाव. सोगमवाडी या नावानेही हे गाव परिचित आहे. कोकणातील खोत आणि कुळवाडी यांच्याकडून दलित, कष्टकऱ्यांचं सर्रास शोषण केलं जायचं. कोंडविलकर याला अपवाद नव्हते. गद्य वाङ्मयावर त्यांनी अधिक लक्ष दिलं. त्यामुळे त्यांच्या पद्य रचनांना फारशी ओळख लाभली नाही. तरीही ही कविता नेहमीच खुणावत राहिली.

सुरुवातीला लिहिल्याप्रमाणे या कवितेत आई आणि कोवळ्या मुलाचा संवाद आहे. कवितेच्या प्रारंभीच कोंडविलकर लिहितात की आईच्या उदरात असतानाच माझ्या वाटा काटल्या गेल्या. लहानग्या माधवाला त्याची आई सांगायची, 'बाबा आपण गावाच्या तुकड्यावर पोसतो. त्याचं ध्यान ठेवून गावकीची सेवा केली पाहिजे. ते म्हणतील तसं वागलं पाहिजे. कुणाला उलटून बोललं नाही पाहिजे. सगळयांना बाबापुता केलं पाहिजे.'

माधवाची आई आणखी सोशिक होत पुढे म्ह, 'गावाने आपल्याला थारा दिलाय. नाहीतर कधीच आपले बारा वाजले असते. आपणही गावाच्या मर्जीने राहायला हवं. आपली मर्जी चालवून काय होईल. जग नेहमीच हसण्यासाठी असतं. बाकी आपली दुनिया असून तिचा काय फायदा ? हातपाय हलवले तरंच चार घास मिळणार, रडणाराचं या जगात कुणी नसतं. हसणाराचे सगळेच मुके घेतात.'

आपण जसं मान खाली घालून जगलो तसंच आपल्या मुलानेही जगावं अशी माधवच्या आईची इच्छा होती. ती पुढे सांगते की, 'रात्रंदिवस आम्ही मरण काढलं. कधी अरेला कारे केलं नाही. तू देखील असाच वागशील, वाकत राहशील. तुझ्यावर आमचा विश्वास आहे. याशिवाय आपल्याला गत्यंतरही नाही. कारण आपण शिळ्या तुकड्याचे धनी आहोत. कुणाच्याही दारात जायचं आणि मागून खायचं हेच आपलं विश्व, याशिवाय करायचंय तरी काय आपल्याला ?"

कवितेत इतक्या वेळ माधवाची आई संवाद साधताना दिसते. नंतरच्या पंक्तीत माधवाच्या मनातले कढ रिते होऊ लागतात आणि आपण अस्वस्थ होऊ लागतो. कोंडविलकर लिहितात की, "असेच दिवस जात होते आणि आपला निसर्गतःच वाढत होतो जशी वाढतात उकिरड्यावर डुकरं ! दिवसभर डुकरागत जगून रात्रीस भयाण अंधार आ वासायचा तेंव्हा माझा भेदरलेला तान्हा जीव आईच्या कुशीत शिरायचा. मग आई अंगावर बोंदरं पांगरायची. त्यातल्या मायेच्या ऊबेस कशाचीही सर येणार नाही.

चिमुरडा माधव थोडा मोठा होतो आणि त्याचे वडील त्याचं नाव शाळेत घालतात. त्याला तिथं आलेलं पाहून प्रस्थापितांच्या आणि जातीयवाद्यांच्या भुवया वर न झाल्या तर त्यात नवल ते काय ? त्यांचं पित्त खवळतं आणि आपल्या मनातलं हलाहल ओकण्यासाठी त्यांच्या जिभा वळवळू लागतात, आमची शाळा याने बाटवली असा कोलाहल होतो. कावरा बावरा झालेला माधव चुपचाप वर्गातला एक कोनाडा पकडतो. जेवताना शिळ्या घासाचा कडक तुकडा काटा अडकावा तसा घशात टोचतो तसा हा प्रसंग कोंडविलकरांच्या काळजात खोल रुतून बसला.

पुढे कोंडविलकर सांगतात की शाळा तर सुरु झाली होती मात्र शाळेसाठीच्या साधनांचा पत्ता नव्हता. वहयापुस्तकांचा पत्ता नव्हता. अक्षरं गिरवण्यासाठी एक फुटकी पाटी होती आणि एक दगडी पेन्सिलीचा तुकडा होता. कुणीतरी शाळेपुरता दिलेला एक फाटका सदरा होता. शाळा सुटली की तो खुंटीवर टांगलेला असायचा आणि दिवसभर उघड्याने फिरायचं ! शाळेत कुणी दोस्त असण्याचा सवालच नव्हता. माधवला पाहिलं की सारे दुरून चालत. नजरेने धुत्कार टाकत दम देत की वाटेत आडवा आलास तर मार खाशील ! हिरमुसलेला माधव मुकाट होऊन सोसत राही..

कवितेच्या अखेरच्या कडव्यात कोंडविलकर आपल्या काळजाला लागलेला बाभूळकाटा शब्दांत चितारतात तेंव्हा चामडं रापायच्या भोवरीने तळहाताची त्वचा छिलून निघावी तसे आपण ओरबाडून निघतो. कोंडविलकरांच्या शब्दात हे वाचायला हवं. ते लिहितात -
दोस्तांनो चामड्याना चुना लावल्याने हातांना पडलेले
घट्टे आता साफ बुजले आहेत
मात्र हृदयावरच्या खुणा भोवरी कापावी तशा कापल्या
तरी अजून वाढताहेत....

या वेदना एका व्यक्तीच्या, जातीय वर्गवारीत चिणलेल्या एका समाजाच्या समुदायाच्या आहेत म्हणून त्याचा आपल्याला प्रत्यय येणार नाही असं काही नाही. आपण किमान त्याची कल्पना करून तत्कालीन वंचित जगातलं ते विदारक दृश्य आपण डोळ्यापुढे आणू शकतो. कोंडविलकरांच्या वेदना सच्च्या असल्याने त्यातल्या पुर्नअनूभतीचे आपण साक्षीदार होतो.

काही दशकाआधीचे हे चित्र आता बदलले आहे. मात्र आताच्या डिजिटल युगात या भिंती नव्याने आकारास आहेत आणि यांचा धोका अधिक आहे कारण आता यांचं स्वरूप अदृश्य आहे. आता गरज आहे ती सर्वानी यासाठी एकदिलाने नांदण्याची. असो. माधव कोंडविलकर गेले त्या दिवशी वृत्तवाहिन्यांना त्याची फारशी विस्तृत  दखल घ्यावीशी वाटली नाही. काही प्रिंन्टमीडियात छोट्याशा बातम्या आल्या, दुसऱ्या दिवशी आणखी ठिकाणी दिसल्या. मुळात समाजालाच अर्थपूर्ण आणि साधक बाधक विषयात रस राहिलेला नसल्याने एक लेखक कवी मरण पावला तर त्याची दखल घेतली जावी ही अपेक्षाच मुळात अवास्तव ठरते.

माधव कोंडविलकरांनी लिहिलेलं 'मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे' हे आत्मकथन कोकणातील सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक, भौगोलिक परिस्थितीतून आणि परंपरावादी वर्चस्ववादाच्या घुसळणीतून आकाराला आले आहे. प्रथम ते १९७७ मध्ये 'तन्मय'च्या दिवाळी अंकात छापले गेले. चांभार समाजातील चालीरीतीवर त्यांनी बोट ठेवलं आहे. रुढीच्या जोखडावर प्रहार करताना ते सौम्य शब्द योजतात. दारिद्र्य, अशिक्षितता, आपसातले कलगीतुरे यांनी हा समाज कसा पोखरला आहे यावर ते लक्ष वेधतात. एका शिक्षकाच्या दैनंदिनीच्या स्वरूपात हे कथन आहे. मात्र हा सूर नामदेव ढसाळांच्या शब्दकुळीचा नाही, हा विद्रोही नाही. यात अगतिकता, हतबलता आणि औदासिन्य अधिक आहे. मुळात हे माधव कोंडविलकरांच्या शैलीचे प्रतिबिंब आहे. 


आपल्या जातीची त्यांना घृणा वाटते, आपल्या जातीच्या वाट्याला आलेली कामे करायला नकार दिल्यानंतर त्यांची दुतर्फा घुसमट सुरु होते आणि यातून मनाचा कोंडमारा होऊ लागतो. आपल्या मनातला हा सुप्त विद्रोह इतर चांभार लोकांच्या अंतःकरणात असेल का हा प्रश्न त्यांना भंडावून सोडतो. त्यातून ते लिहिते झाले. संथ लयीत शिलगावत गेलेली वात फार मोठा स्फोट करू शकली नाही तर तिचं जळणं हा केवळ नियतीचा खेळ होऊन जातो. तसं मुक्काम पोस्ट देवाचे गोठणेच्या बाबतीत झालं. पुढे जाऊन फ्रेंच भाषेत ते अनुवादित झालं. पुरस्कारही मिळाले. असो.

कोंडविलकरांची ही कविता अधिक बोलकी वाटते कारण तिची मांडणी आई आणि मुलाच्या संवादाची आहे, मनाला थेट भिडणारी आहे. आपण काही दुःखे अनुभवू शकलो नसलो तरी त्यांची अल्पशी अनुभूती आपण घेऊ शकतो त्यासाठी सच्ची इच्छाशक्ती हवी. मग आईच्या उदरात वाटा काटल्या गेल्या नसल्या तरी ज्यांच्या नशिबी त्या वाटा आल्या त्या वाटांवरचे काटे आणि रक्तात माखलेले पाऊलठसे आपण पाहू शकतो. किंबहुना हीच कवितेची उत्तुंगता आहे !

- समीर गायकवाड
_________________________________________

माझ्या काटल्या आहेत वाटा उदरातच असताना आईच्या
पदराखाली घेताना आपल्या म्हणायची
"बाबा आपुन तुकड्यावर पोसलो त्यांच्या
गावकीची सेवा करावी ते म्हंतील तसं वागावं
उचलून बोला नये कोणास सगल्यास्नी बाबापुता करावं

माय म्हणायची, "त्येनीच देलानी ना हा थारा नायतर
वाजलं आस्तं आप्लं बारा,
आपुन पन तसा करुस हवा. जग काय फक्त हसनारा
दुनिया आसून करूचिय काय हातपाय हालवलं तरंच
कोनपन देतात
रडणाराचं कोन नाय हसल्या गालाचं मुकं घेतात !"

माय म्हणायची, "दिवस आमी मरान काढलं - अरेला
कारे म्हटला नाय
असाच वागसील वाकान जासील तुज्यावर आमचा
इस्वास हाय
बाबा सिल्या तुकड्याचे आपुन धनी
दारात जावचा मागान खायचा करुचाय काय
आप्नास आनी ?"

असा आप्ला वाढत होतो - उकिरड्यावर वाढतात
जशी डुकरं
भयाण अंधारात मायच्या कुशीत शिरत होतो
पांघरुण बोंदरं.

आणि कधीतरी असंच शाळेच्या पटावर चुकून नाव पडलं
तेंव्हा झाला एकच कल्लोळ, साऱ्या जिभा वळवळल्या
म्हणाल्या, "आमची शाळा बाटवलं"
आणि शाळेने कोपरा उदारतेने बहाल केला
तेंव्हा शिळा तुकडा घशाला अडकावा तसा एक काटा
खोल कुठंतरी रुतून बसला

वहयापुस्तकांचा पत्ता नव्हता, हातात एक फुटकी पाटी
आणि दगडी पेन्सिलीचा तुकडा
कुणीतरी दिलेला शाळेपुरता एक फाटका सदरा, बाकी
दिवसभर उघडा
दोस्त नव्हते कोणी. दुरून सारे चालत
"आपाडलास तर मार खाशील !" अशी होती हालत.

दोस्तांनो चामड्याना चुना लावल्याने हातांना पडलेले
घट्टे आता साफ बुजले आहेत
मात्र हृदयावरच्या खुणा भोवरी कापावी तशा कापल्या
तरी अजून वाढताहेत.

- माधव कोंडविलकर

६ टिप्पण्या:

  1. आनंद यादव ,यांची ही अशीच काहीशी आत्मकथा

    उत्तर द्याहटवा
  2. निशब्द झालो. काहींच्या व्यथा कथाच बनतात.... अखंड वेदनेच्या

    उत्तर द्याहटवा
  3. मुस्कान पोष्ट देवाचं गोठणे,वाचले होते पुर्वी, पण बोंदरं हा शब्द अन ती कविता सुद्ध एससीच्या माणसाची फर्फासारखी गोठल्याली होती,गवाही गोठल्यालं कसे असेल? एससी घटकात उब अशी नव्हतीच,पण शिक्षणानेच ती आली म्हणायची.

    उत्तर द्याहटवा