नगमाच्या अड्ड्यासमोरून दर शुक्रवारी एक फकीर जायचा, ती त्याला कधीच काही देत नसे. बदनाम गल्लीत फकिराचे काय काम असं ती म्हणायची. त्याच्याकडे पाहताच लक्षात यायचे की त्याची दृष्टी शून्यात हरवलेली आहे. तो बऱ्यापैकी अकाली प्रौढ वाटायचा.
तिने किंमत दिली नाही तरीही तो मात्र तिच्या समोर आशाळभूतागत उभं राहायचा. तिला बरकत यावी म्हणून अल्लाहकडे दुआ करायचा, हातातलं मोरपीस तिच्या मस्तकावरून फिरवायचा.
अत्तराचा फाया देण्याचा प्रयत्न करायचा.
ती त्याला अक्षरशः झिडकारून टाकायची. जिना उतरून खाली जाताना तो हमखास तिच्याकडे वळून पाहायचा. चाळीशीतला असावा तो. तो येण्याची खूण म्हणजे त्याच्या सोबत असणाऱ्या फायाचा मंद दरवळ!
एकदा नगमाने ठरवले की त्याला धक्के मारून हाकलून द्यायचे मात्र त्याआधी त्याला आखरी इशारा द्यायचा.
ठरवल्याप्रमाणे पुढच्या जुम्माबरोजच्या दिवशी तिने त्याला अत्यंत कडव्या भाषेत सुनावले.
तिने इतकं काही भलंबुरं सूनवूनही त्याच्या चेहऱ्यावरची रेषही हलली नाही.
अगदी निर्विकारपणे तो उभा होता, जणू काही त्याचं काही नातं होतं!
बऱ्याच वेळाने तो तिच्या दारासमोरून हलला आणि कधी नव्हे ते त्याने सज्ज्यावरच्या सगळ्या खोल्यात जाऊन सगळ्याच बायकांसाठी इबादत केली,
कुणी काही दिले तरी घेतले नाही.
एरव्हीही तो काही घेत नसे.
फारतर एखाद्या पोरीने आग्रह केला तर तिच्या दारात बसून चार तुकडे जरूर मोडायचा.
तेंव्हा त्याच्या चेहऱ्यावर विलक्षण करुण भाव असत.
गुरुवार, २१ जुलै, २०२२
मंगळवार, १२ जुलै, २०२२
शिंजो आबे यांची हत्या आणि चीन जपान वैमनस्य ..
नुकतेच जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. जगभरात याचे तीव्र पडसाद उमटले. हेच चित्र सर्वत्र दिसले अपवाद होता चीनचा! आबेंच्या हत्येनंतर चीनी सोशल मीडियावर अक्षरशः दिवाळी साजरी केली गेली. 'वन प्लेट मोअर राईस' असं म्हणत चिन्यांनी वाढीव कल्ला केला. चिनी इतक्यावर थांबले नाहीत त्यांनी आबेंचा मारेकरी यामागामीचा गौरव करत त्याला हिरो म्हटलंय. जगभरातल्या माध्यमांनी चिनी विकृतीची दखल घेतली. खुद्द चीनने मात्र याविषयी ठोस भूमिका न घेता लोकभावनांना एकप्रकारे मूक संमतीच दिली. अनेकांनी चिनी मानसिकतेमागची कारणमीमांसा मांडली. त्यांचा सूर असा होता की, शिंजो आबे हे चीनसाठी मोठे आव्हान बनले होते. आबे हे चीनच्या धोरणांचे कट्टर विरोधक मानले जायेच. आबेंच्या पुढाकाराने चीनच्या विस्तारवादी धोरणावर आणि त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी भारत, जपान, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया यांचा क्वाड हा समूह सुरु झाल्यावर चीनचा तिळपापड झाला होता. आबेंनी चीनच्या महत्वाकांक्षी 'ओबोर' या बहुराष्ट्रीय रस्ते प्रकल्पास कडाडून विरोध केला होता. यामूळे आबे चिन्यांच्या डोळ्यात सलत होते. वास्तवात चीन जपानमधलं वैमनस्य अधिक गहिरं, जुनं नि कडवट आहे ज्याबद्दल भारतीय माध्यमे क्वचित लिहितात. अशी मांडणी अप्रत्यक्षपणे चीनची बाजू घेण्यासारखे असले तरी हा इतिहास आहे जो बदलता येणार नाही.
रविवार, १० जुलै, २०२२
बोरिस जॉन्सन यांच्या गच्छंतीचा धांडोळा..
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी नुकताच राजीनामा दिला असला तरी त्यांना पायउतार व्हावे लागेल अशी चिन्हे गतवर्षापासून दिसू लागली होती, किंबहुना मागील महिन्यातच त्यांचे पद गेले असते मात्र त्यावेळी ते कसेबसे तरले होते. ब्रेक्झिटप्रश्नी त्यांनी ठाम भूमिका घेतली होती तेंव्हा ब्रिटिश माध्यमांत त्यांच्या प्रेमाचे जे भरते आले होते त्याला गतवर्षांपासून ओहोटी लागली होती. कोविडकाळात त्यांच्यावर चौतर्फा टीका झाली, कोविडची दुसरी लाट आल्यानंतर मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्यानंतर ब्रिटिश मीडियाचे समर्थन त्यांनी गमावले होते, लोकांचे समर्थन गमावू नये म्हणून त्यांनी कठोर निर्बंध अनेक दिवस टाळले होते मात्र एक वेळ अशी आली की त्यांना नावडते निर्णय घ्यावे लागले आणि तिथूनच ब्रिटिश जनतेच्या मनात त्यांच्या बद्दल नाराजी निर्माण झाली. त्यानंतर अशा काही घटनांचा आलेख घडत गेला कि बोरिस जॉन्सन यांच्याविषयीच्या नाराजीचे रूपांतर बंडखोरीत झाले. हे सर्व घडत असताना ब्रिटिश राजघराण्याने धारण केलेलं मौन बोलकं होतं, याच मौनाने बंडखोरांना बळ मिळत गेले आणि एकेक मोहरा गळत गेला. जॉन्सन कुठे चुकत गेले याचा धांडोळा घेतला तर लक्षात येते की याच कारणांपायी पश्चिमेकडील अनेक सत्ताधीशांना आपली सत्ता गमवावी लागलीय, तिकडील देशांत या मुद्द्यांना असलेले महत्व आणि त्यानुषंगाने होणारी अत्यंत बेबाक चर्चा अशा नेत्यांचे अगदी निष्ठुरपणे वस्त्रहरण करते. ब्रिटन तर खुल्या लोकशाही मूल्यांचा आणि मुक्त अभिव्यक्तीचा उघड पुरस्कर्ता असल्याने तिथे हे घडणं साहजिक होतं. वास्तवात पाहू जाता आपल्या देशात अशा प्रश्नांवर काय प्रतिक्रिया येऊ शकते याचा अंदाज बोरिस जॉन्सन यांना नक्कीच असणार कारण ते मुत्सद्दी राजकारणी होते, असे असले तरी त्यांच्या बेफिकीर वृत्तीने आणि अतिआत्मविश्वासाने त्यांच्यासाठी संकटे निर्माण केली जी बरीचशी अ-राजकीय होती. ही संकटे राजकीय असती तर कदाचित जॉन्सन यांनी त्यावर एखादा तोडगा तरी काढला असता मात्र इथे त्यांचे सर्वच दोर कापले गेले होते. याची परिणती अखेर त्यांच्या राजीनाम्यात झाली, त्याशिवाय त्यांना पर्यायही नव्हता.
गुरुवार, ७ जुलै, २०२२
क्रिप्टो क्वीनचा भूलभुलैय्या
सध्या जगभरात विविध समस्यांनी थैमान मांडले आहे, कोविडची लाटेपासून ते रशिया युक्रेन युद्धाचे परिणाम देखील सामील आहेत. पर्यावरणाच्या ऱ्हासापासून ते आर्थिक मंदीपर्यंतच्या मुद्दयांनी भवताल व्यापलेला आहे. या खेरीज हरेक देशाच्या स्वतःच्या अशा वेगळ्या समस्या आहेत. एव्हढेच नव्हे तर सद्यकाळ हा मानवी जीवनाला एका नव्या डिजिटल व भौतिकवादाच्या अधिकाधिक निकट नेणारा असूनही जगभरातले समाजमन अस्वस्थ आहे, सर्वव्यापी विश्वयुद्ध नसूनही हरेक जीवाला कुठला तरी घोर लागून आहे. आर्थिक अस्थैर्याने ग्रासलेले आहे, रोज कमावून खाणाऱ्या हातांना काम नाहीये आणि जे कमावते आहेत त्यांचे उत्पन्न घटत चालले आहे. नोकरदारांना त्यांच्या नोकरीची शाश्वती नाहीये आणि
महिन्याच्या एक तारखेसच वेतन मिळेल याची हमी राहिली नाही. अशा काळात इझी नि बिग मनीकडे अनेकांचा कल वळणे साहजिक असते. त्यातही तरुण वर्ग ज्याला कुठलेही फिक्स्ड उत्पन्न नाही व येणाऱ्या काळात स्वतःच्या घरापासून ते कौटुंबिक स्थैर्यापर्यंतची ज्याची अनेक स्वप्ने आहेत ते खूप सैरभैर झाल्याचे पाहण्यात येते. याशिवाय ज्यांचे आर्थिक उत्पन्न एका विशिष्ठ पातळीवर जाऊन गोठले आहे, ज्यात वाढ होत नाहीये अशा व्यक्ती आणि ज्यांना अल्पावधीत खूप पैसे कमवायचे आहेत अशा अनेकांना एका सहज सुलभ आर्थिक समृद्धीची ओढ होती, त्यांच्या हव्यासातूनच क्रिप्टो या आभासी चलनाचा जन्म झाला. प्रारंभीच्या काळात क्रिप्टोचा इतका बोलबाला झाला की झटपट श्रीमंत होण्यासाठी तो परवलीचा शद्ब झाला, विशेष म्हणजे उच्च आणि अत्युच्च मध्यमवर्गीयांसह नवश्रीमंतांनी यात अफाट गुंतवणूक केली, यामधून मिळणाऱ्या बेफाम परताव्यांची रसभरीत चर्चा मीडियामधून व्यापक आणि सुनियोजित पद्धतीने पेरली गेली. क्रिप्टो हा डिजिटल जगाचा अर्थमंत्र झाला जणू ! आपल्याहुन श्रीमंत आणि कथित रित्या बुद्धिमान समजला जाणारा उच्चभ्रू वर्ग क्रिप्टोमधून खोऱ्याने पैसे कमावतोय म्हटल्यावर मध्यमवर्गीयांपासून सामान्य व्यक्तींपर्यंत सगळ्यांचेच लक्ष वेधले गेले. मिळेल त्या स्रोतांवर भरवसा ठेवत अनेकांनी क्रिप्टोमध्ये पैसे गुंतवायला सुरुवात केली, सुरुवातीला फुगवला गेलेला क्रिप्टोचा फुगा गतमहिन्यात फुटला आणि भ्रामक अर्थसमृद्धीचे नवे फसवे रूप समोर आले. वास्तवात ही पडझड आताची नाहीये अनेक अर्थतज्ज्ञ याविषयी सावधानतेचा इशारा देत होते मात्र आर्थिक सुबत्तेच्या स्वप्नरंजनात मश्गुल झालेली मंडळी भानावर येत होती. साधारण एप्रिल २०२१ पासून क्रिप्टोच्या कोसळण्याविषयीची भाकिते वर्तवण्यात येत होती. द गार्डियन, न्यूयॉर्क टाईम्स पासून ते अगदी पाकिस्तानमधल्या द डॉनपर्यंत अनेक दैनिकांनी याविषयी जागृतीचा प्रयत्न केला होता. भारतीय प्रिंट मीडियातदेखील व्यापक प्रमाणात याविषयीची दक्षतेची भूमिका मांडणारे लेखन झाले होते मात्र आपल्या देशात मोठ्या प्रमाणात क्रिप्टोमध्ये गुंतवणूक झालेली असल्याने फेक माहितीची भरमार असणाऱ्या कथित अर्थविषयक वेबपोर्टल्सनी ही परिस्थिती लवकरच सुधारेल असा खोटा आशावाद मांडला आणि लोक त्याला बळी पडत राहिले. आता जगभरातल्या गुंतवणूकदारांचे अब्जावधी रुपये बुडाल्यावर सर्वत्र याची ओरड सुरु झालीय. क्रिप्टोच्या भुलभुलैय्याच्या अनेक सुरस गोष्टी आता समोर येताहेत त्यात सर्वाधिक लक्षवेधी गोष्ट रुजा इग्नाटोवा ह्या क्रिप्टोक्वीनची आहे !
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)