सोमवार, ३० एप्रिल, २०१८
राजसत्तेवरचा अंकुश !
हरवलेले राजकीय दिवस ...
आजच्या काळात सर्वोच्च पदावरील राजकीय व्यक्तीपासून ते गल्लीतल्या किरकोळ कार्यकर्त्यापर्यंत भाषेतील असभ्यपणा सातत्याने डोकावताना दिसतो. पूर्वीचे दिवस मात्र काहीसे वेगळे होते. खरं तर तेंव्हाही याच राजकीय विचारधारा होत्या, हेच पक्ष होते. मग फरक कुठे पडलाय ? याचा धांडोळा घेताना एका ऐतिहासिक क्षणाचे दुर्मिळ छायाचित्र हाती लागले आणि चार शब्द लिहावेसे वाटले. अनेक आठवणींचे मोहोळ जागवणारे हे छायाचित्र भारतीय राजनीतीचे अनेक पैलू आपल्या समोर अलगद मांडते. दिवंगत राष्ट्रपती एपीजे कलाम त्यांच्या राष्ट्रपतीपदाचा उमेदवारी अर्ज भरतानाचा हा सोनेरी क्षण आहे. हिमालयाएव्हढ्या उत्तुंग कर्तुत्वाचा शास्त्रज्ञ देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान होतो हे देखील एक विशेषच म्हणावे लागेल. भारतीय लोकशाहीचा हा लोकोत्तर विजयाचा अनोखा अन लोकांप्रती असणाऱ्या सजीवतेचा विलोभनीय दार्शनिक क्षण होता….
पुरुषांच्या लैंगिक शोषणाचे मौन !
आयआयटी दिल्लीचा २१ वर्षीय विद्यार्थी गोपाल मालोने १२ एप्रिल २०१८ च्या दिवशी रात्री उशिरा नीलगिरी होस्टेलच्या आपल्या रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यातील रहिवासी मालो एमएस्सी केमिस्ट्रीचा प्रथम वर्षाचा विद्यार्थी होता. याआधीही त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. १० एप्रिल रोजी झोपेच्या तब्बल ५० गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु मित्रांनी त्याला वेळेवर रुग्णालयात दाखल केल्याने तो वाचला होता. या दरम्यान त्याच्या भावाने त्याला खूप समजावून सांगितले. त्याचे कौन्सेलिंग केले. तो थोडासा सेटल झाला आहे असे वाटताच त्याला पुन्हा होस्टेलवर आणून सोडले. मालो गुरुवारीच होस्टेलमध्ये परतला होता. आल्या दिवसापासून तो पुन्हा अस्वस्थ झाला. त्याचं मन त्याला स्वस्थ बसू देत नव्हतं, त्याचा भूतकाळ त्याच्यापुढे आ वासून उभा राहत होता.
लोककलेची ढासळती कमान ...
पंढरीतल्या एका रंगात आलेल्या फडात ढोलकी कडाडत होती. लोक मनमुराद दाद देत होते. 'ती' मन लावून नाचत होती. मधूनच 'तिच्या' चेहरयावर वेदना स्पष्ट दिसत होत्या. तिचे पोट किंचित फुगल्यासारखे वाटत होते. खरे तर 'तिला' असह्य वेदना होत होत्या तरीही 'ती' देहभान हरपून नाचत होती. तिची लावणी संपताच ती पटामागे गेली, घाईने 'तिने' साडी फेडली अन पोटाचा ताण हलका झाला तसा 'तिने' थोडा श्वास मोकळा सोडला. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळे होते. 'तिला' प्रसूतीच्या वेणा सुरु झाल्या आणि काही मिनिटात 'तिची' प्रसूती झाली देखील. इकडे फडावर दोनेक लावण्या होऊन गेल्या, सोंगाडयाची बतावणी सुरु झाली. 'तिच्या' वेदनांना मात्र अंत नव्हता. सोंगाडयांची बतावणी संपली, पुढच्या लावणीआधी लोकांनी 'तिच्याच' नावाचा धोशा सुरु केला. तिची सहकलाकार एव्हाना पुढच्या लावणीसाठी मंचावर आली होती. लोकांनी त्याआधीच शिट्ट्या फुकायला आणि खुर्च्यांचा आवाज करायला सुरुवात केली. हार्मोनियमवाला बिथरून गेला आणि त्याचे काळीपांढरीचे गणित चुकू लागले. कशीबशी ती लावणी संपली. तोवर 'तिने' दगड हाती घेऊन नाळ तोडून काढली आणि आपल्या बाळाला स्वतःपासून विलग केले, आणि पुन्हा कासोटा आवळून साडी नेसली आणि फडावर जाऊन उभी राहिली. ती जीव तोडून नाचली. त्या लावणीचे बोल होते, 'पोटासाठी नाचते मी पर्वा कुणाची!'
शुक्रवार, २७ एप्रिल, २०१८
खलिल जिब्रान - लेखक ते युगकथानायक एक अनोखा प्रवास....
शुक्रवार, २० एप्रिल, २०१८
शायरीची ताकद..
मंगळवार, १७ एप्रिल, २०१८
रेड लाईट डायरीज - एक पाऊल सावरलं...
आमची आसिफा सुखरुप तिच्या देशी, तिच्या गावी परतली.
मागील वर्षी सप्टेबरमध्ये पुण्यात टाकलेल्या धाडीत काही मुली आणि कुंटणखाण्याच्या मालकिणींना अटक झाली होती. मोठी पोहोच असणाऱ्या आणि नोटा ढिल्या करण्यास तयार असणाऱ्या बायकांना 'रीतसर' जामीन मिळाला. यातील काही मुली अल्पवयीन होत्या. त्यातच एक होती आसिफा. बांग्लादेशाची राजधानी ढाक्यापासून काही अंतरावर तिचे गाव आहे. (तिच्या कुटुंबावर आणि तिच्यावर जे काही गुदरलं आहे ते कुणाच्याही बाबतीत घडू नये) ती कुमारवयीन असतानाच तिला आधी बंगालमध्ये एस्कॉर्ट केलं गेलं.
शनिवार, १४ एप्रिल, २०१८
शूद्रांचा भूतकाळ काय सांगतो ?
पांडवांचा वडील बंधू युधिष्ठिराच्या राज्याभिषेकाचे महाभारतात जे वर्णन आलेले आहे त्यावरून राज्याभिषेक सोहळ्याचे ब्राम्हण, क्षत्रिय व वैश्यांबरोबरच शूद्रांनाही निमंत्रण दिले जात होते हे सिद्ध होते. राजाच्या अभिषेक समारंभात शुद्रसुद्धा सहभागी होत होते. प्राचीन लेखक नीलकंठ यांनी राज्याभिषेक सोहळ्याचे वर्णन करताना म्हटले आहे की, ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य व शुद्र हे चार प्रमुख मंत्री नवीन राजाला अभिषेक करीत. नंतर प्रत्येक वर्णाचा नेता व जातीचा नेता पवित्र नद्यांच्या पाण्याचा अभिषेक राजाला करीत असत. त्या नंतर ब्राम्हण हे त्या राजाचा जयजयकार करत असत. मनूच्या आधी वैदिकपूर्व काळात राज्याभिषेक समारंभात रत्नींचा महत्वपूर्ण सहभाग होता. रत्नी म्हणजे विविध जातींच्या लोकप्रतिनिधींचा समूह होय. त्यांना रत्नी म्हटले जायचे कारण, त्यांच्याजवळ एक रत्न असायचे. हे रत्न सार्वभौमत्वाचे प्रतिक मानले जात होते. रत्नींकडून राजाला हे रत्न दिले जाते व त्यानंतरच त्या राजाला सार्वभौमत्व प्राप्त होई. हे सार्वभौमत्व प्राप्त झाल्यावर राजा प्रत्येक घरी जाऊन त्यांना दान देत असे. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे या रत्नींमध्ये शूद्रांचा समावेश असे.
जनपद आणि पौर या दोन प्राचीन काळच्या राजकीय दरबारचे शुद्र हे मान्यताप्राप्त सदस्य होते, अविभाज्य घटक होते व ते सदस्य असल्याने त्यांचा ब्राम्हणसुद्धा आदर करीत होते.
रविवार, ८ एप्रिल, २०१८
माझा राजकीय दृष्टीकोन
माझा राजकीय दृष्टीकोन जाणून घेणाऱ्यांसाठी...
"माझे म्हणाल तर मी सदसदविवेकबुद्धीला अधिक प्राधान्य देतो न की धर्मजाती द्वेष आधारित राजकीय मूल्यांना ! कॉंग्रेस ही आपल्या विचारांशी सामावून घेणाऱ्या लोकांचे आर्थिक लाभार्थीकरण करणारी राजकीय विचार प्रणाली आहे जिने या करिता भूतकाळात मुस्लीम तुष्टीकरण केले होते.... तर भाजप ही मुसलमान द्वेषी उजवी विचार प्रणाली आहे जी आपल्या समर्थक व्यक्तींना लाभार्थी न बनवता आपल्याला पोषक संघटना आणि व्यक्तीविशेष यांचे सबलीकरण करते आहे ... भारतीय राजकारणात या दोन मुख्य विचारधारा आहेत... कम्युनिस्ट म्हणजे या दोन्हींची खिचडी आहे ... अन्य छोटे छोटे पक्ष याच झाडांची वेगवेगळी कलमे आहेत .... सबब सदसदविवेक बुद्धीने काम करणे मला क्रमप्राप्त वाटते.. "
'विकास' आणि 'प्रगती' हे दाखवायचे दात असतात खायचे प्रत्येकाचे दात वेगवेगळे असतात. तरीही राजकीय पक्षांनी फेकलेल्या बाह्य आवरणाच्या जाळ्यात लोक अलगद अडकत जातात, नंतर त्यात जाम गुरफटून जातात आणि आपली स्वतःची एक स्वतंत्र भूमिका असू शकते याचाही त्यांना विसर पडतो. किंबहुना मतदान केल्यानंतर कोणत्याही राजकीय पक्षाबद्दल आपल्याला वैरभाव वा मित्रभाव न राहता तटस्थभाव अंगीकारता आला पाहिजे याचा लोकांना विसर पडत चालला आहे, यामुळेच गल्ली ते दिल्ली लोक राजकीय अभिनिवेशात जगत राहतात. आपलं रोजचं सामान्य जीवन आणि आपल्या मर्यादा याचा विसर पडून राजकारण्यांनी दिलेल्या अफूच्या गोळीवर आपली उर्जा खर्चत राहतात. असो ज्याची त्याची मर्जी आणि ज्याचे त्याचे विचार ...
"माझे म्हणाल तर मी सदसदविवेकबुद्धीला अधिक प्राधान्य देतो न की धर्मजाती द्वेष आधारित राजकीय मूल्यांना ! कॉंग्रेस ही आपल्या विचारांशी सामावून घेणाऱ्या लोकांचे आर्थिक लाभार्थीकरण करणारी राजकीय विचार प्रणाली आहे जिने या करिता भूतकाळात मुस्लीम तुष्टीकरण केले होते.... तर भाजप ही मुसलमान द्वेषी उजवी विचार प्रणाली आहे जी आपल्या समर्थक व्यक्तींना लाभार्थी न बनवता आपल्याला पोषक संघटना आणि व्यक्तीविशेष यांचे सबलीकरण करते आहे ... भारतीय राजकारणात या दोन मुख्य विचारधारा आहेत... कम्युनिस्ट म्हणजे या दोन्हींची खिचडी आहे ... अन्य छोटे छोटे पक्ष याच झाडांची वेगवेगळी कलमे आहेत .... सबब सदसदविवेक बुद्धीने काम करणे मला क्रमप्राप्त वाटते.. "
'विकास' आणि 'प्रगती' हे दाखवायचे दात असतात खायचे प्रत्येकाचे दात वेगवेगळे असतात. तरीही राजकीय पक्षांनी फेकलेल्या बाह्य आवरणाच्या जाळ्यात लोक अलगद अडकत जातात, नंतर त्यात जाम गुरफटून जातात आणि आपली स्वतःची एक स्वतंत्र भूमिका असू शकते याचाही त्यांना विसर पडतो. किंबहुना मतदान केल्यानंतर कोणत्याही राजकीय पक्षाबद्दल आपल्याला वैरभाव वा मित्रभाव न राहता तटस्थभाव अंगीकारता आला पाहिजे याचा लोकांना विसर पडत चालला आहे, यामुळेच गल्ली ते दिल्ली लोक राजकीय अभिनिवेशात जगत राहतात. आपलं रोजचं सामान्य जीवन आणि आपल्या मर्यादा याचा विसर पडून राजकारण्यांनी दिलेल्या अफूच्या गोळीवर आपली उर्जा खर्चत राहतात. असो ज्याची त्याची मर्जी आणि ज्याचे त्याचे विचार ...
गुरुवार, ५ एप्रिल, २०१८
काकाणी केस सलमान का हरला ?
बिश्नोई म्हणजे बीस आणि नऊ यांचे मिश्रण. वीस आज्ञा आणि नऊ तत्वे. गुरु जांभेश्वर यांनी समाजास ह्या २९ बाबींचे पालन अनिवार्य केले आणि हा समाज बिश्नोई म्हणून ओळखला जाऊ लागला. सलमान खानच्या काळवीट हत्या खटल्यात याच समाजाचे लोक फिर्यादी आणि साक्षीदार होते म्हणूनच तो ही केस हरला असे म्हणणे चुकीचे होणार नाही. कारण हा समाज प्राण्यांना देव मानतो, त्यातही जे गवत, पानं खाऊन जगतात ते यांना पूज्य आहेत. निसर्ग रक्षण आणि पर्यावरण संतुलन ही यांची आद्य कर्तव्ये आहेत. बिश्नोई समाजातील लोक हे प्रामुख्याने राजस्थानच्या थार वाळवंटाच्या परिसरात आढळतात. निसर्गाविषयी असलेल्या प्रेमासाठी त्यांची खास ओळख आहे. झाडे वाचवण्यासाठी काही वर्षापूर्वी आपल्याकडे चिपको आंदोलन झाले होते, नुकतेच गुगलने त्याची दखल घेत डूडलही बनवले होते. बिश्नोई समाजाने चिपको आंदोलनाहून श्रेष्ठ आणि गौरवशाली इतिहास अजमेरजवळील एका गावात घडवला होता. अमृतादेवी बेनिवाल या महिलेने आपल्या तीन मुली आणि पतीसह झाडे तोडायला आलेल्या राजा अभयसिंहाच्या सैन्यास विरोध केला आणि त्याकरिता प्राणाचे बलिदान दिले. ३६३ लोकांनी झाडांची कत्तल अडवण्यासाठी आपला जीव दिला होता. असं जगाच्या पाठीवर कुठंही कधीही घडलं नाही. इतकं कमालीचं निसर्गप्रेम या समाजात होतं, आहे आणि भविष्यातही राहील. इंटरनेटवर हरणाच्या पाडसाला आपलं दुध पाजणाऱ्या एका बिश्नोई स्त्रीचा फोटो व्हायरल झाला होता तेंव्हा समाजाने तिला नावं न ठेवता तिची पाठराखण केली होती. सलमानच्या प्रकरणात त्याने सगळे प्रयत्न करूनही हा समाज बधला नाही की फुटलाही नाही.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)