शुक्रवार, २७ एप्रिल, २०१८

खलिल जिब्रान - लेखक ते युगकथानायक एक अनोखा प्रवास....


एका अशा माणसाची गोष्ट ज्याच्या शवपेटीवर दोन देशाचे राष्ट्रध्वज गुंडाळले होते ! त्यातला एक होता चक्क अमेरिकेचा आणि दुसरा होता लेबेनॉनचा ! एक असा माणूस की ज्याच्या अंत्ययात्रेला विविध धर्माचे लोक एकत्र आले होते जेंव्हा जगभरात सौहार्दाचे वातावरण नव्हते ! एक अवलिया जो प्रतिभावंत कवी होता, शिल्पकार होता, चित्रकार होता आणि परखड भाष्यकार होता. सर्वात महत्वाचे म्हणजे तो एक दार्शनिक होता. एक सहृदयी पुरुष जो आपल्या प्रेमासाठी अविवाहित राहिला. एक असा माणूस ज्याने वयाच्या पंधराव्या वर्षी धर्माची खरमरीत समीक्षा करणारं पुस्तक लिहिलं. ज्याला तत्कालीन चर्चने हद्दपारीची सजा सुनावून देशाबाहेर काढले होते त्याच देशात पुढे त्याच्या नावाचा डंका पिटला गेला, त्याच्या मृत्यूनंतर लोकदर्शनासाठी तब्बल दोन दिवस त्याचे पार्थिव ठेवावे लागले इतकी अलोट गर्दी त्याच्या अंतिम दर्शनासाठी एकवटली होती. ज्या मॅरोनाईट चर्चच्या आदेशाने त्याला पिटाळून लावले होते त्याच चर्चच्या आदेशानुसार त्याच्या स्वतःच्या गावातल्या दफनभूमीत त्याचे शव विधिवत व सन्मानाने दफन केले गेले. आजदेखील त्या माणसाची कबर तिथे आहे अन आजही त्या कबरीवर फुल चढवण्यासाठी मॅरोनाईट कॅथॉलिक, प्रोटेस्टंट शिया, सुन्नी, यहुदी, बौद्ध यांच्यासह अनेक संप्रदायाचे, धर्माचे लोक तिथे येतात !

या माणसाचे नाव खलिल जिब्रान ! त्याच्या नावाचा अर्थ अत्यंत अप्रतिम आहे. 'खलिल' म्हणजे निवडलेला प्रिय मित्र आणि 'जिब्रान'चा अर्थ आहे'आत्म्यांना संतोष देणारा ! खलिलची वाक्ये सुभाषितागत प्रसिद्ध आहेत. तो एक सर्वकालीन श्रेष्ठ रचनाकार म्हणून गणला जातो. त्याने अनेक कष्ट सहन करूनसुद्धा आपल्या नावाप्रमाणेच प्रत्येक संदेश असा दिला की ज्यामुळे संपूर्ण मानवजात सुख,चैन आणि आरामाचे जीवन जगू शकेल.

गेल्या दोन दशकापासून जो देश अंतर्गत यादवी आणि दहशतवाद्यांच्या कारवायांनी जराजर्जर झाला आहे त्या सिरीया देशाचा कधी काळी भाग असणारया तत्कालीन ऑटोमन माऊंटमधील बशरी(पुढे हा भूभाग लेबनॉनच्या ताब्यात आला) या शहरात खलिलचा जन्म ६ जानेवारी १८८३ रोजी झाला. . त्याचे कुटुंब मॅरोनाईट कॅथॉलिक होते. वयाच्या अकराव्या वर्षापर्यंत त्याने घरीच शिक्षण घेतले.तिथल्या सततच्या यादवीमुळे त्यांना परागंदा होण्याशिवाय पर्याय उरला नाही. १८९५ ते १८९७ या दोन वर्षात सुरक्षित निवाऱ्याच्या शोधात त्याचे कुटुंब बेल्जियम, फ्रान्स, अमेरिका या देशातून फिरलं. या काळात त्याला अरेबिक, फ्रेंच आणि इंग्लिश भाषा अवगत झाल्या. अखेर त्याचं कुटुंब अमेरिकेत स्थायिक झालं, पण छोट्या खलिलला आपल्या मायभूमीची आस लागली होती. तो लेबनॉनला बैरुतच्या 'मदसतुल हिकमत'मध्ये परतला. तिथे त्याने दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यने वैद्यकीसह इतिहास, संगीत, साहित्य आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांचा अभ्यास केला.

त्याने वयाच्या पंधराव्या वर्षी लिहिलेल्या 'द प्रॉफेट'ला आजही सर्वश्रेष्ठ आणि अभिजात साहित्यकृतीत गणले जाते. या पुस्तकात सह्व्वीस काव्यात्मक निबंध आहेत. या पुस्तकाबद्दल त्याला विलक्षण आत्मीयता होती. तब्बल चार वर्षे याचं हस्तलिखित तो जवळ बाळगून होता. तो सातत्याने पुनर्वाचन करायचा आणि त्यात सुधारणा करायचा, त्याला सजवायचा. जेंव्हा हे पुस्तक छापलं गेलं तेंव्हा जगाच्या क्षितिजावर त्याचं नाव आपसूक विराजमान झालं. कारण त्यात पिडलेल्या व अन्यायग्रस्त मानवाला त्याच्या अस्तित्वाची जाणीव करून देण्यात आली होती.असे असूनही त्यात जटीलता नव्हती. वयाच्या सोळाव्या वर्षी त्याने 'अल हकीकत' ही पत्रिका काढली होती. यात साहित्य आणि धर्मदर्शनयावर लेख असत. सतराव्या वर्षी वर्तमानपत्रातून गद्यलेखन सूरु करतानाच त्याने अरबी कवींची काल्पनिक चित्रे रेखाटली. इस्लामच्या उदयाच्या आधी या कवींची चित्रे उपलब्ध नव्हती पण खलिलने ती साकारली.खलिलच्या वयाच्या एकोणिसाव्या वर्षी तो जिला संत म्हणत असे त्या लाडक्या बहिणीचे निधन झाले तर वयाच्या विसाव्या वर्षी त्याच्याभावाचे आणि तीन महिन्यांनी त्याच्या आईचे निधन झाले. या घटनांनी खलिल व्यथित झाला आणि त्याने जीवनाकडे समीक्षेच्या दृष्टीकोनातून पाहिले. कदाचित त्यामुळेच खलिलच्या लेखनात कुठेही भोगवाद वा चंगळवाद आढळत नाही !

खलिल एकवीस वर्षाचा असताना लेबनॉनमध्ये यादवी सुरु झाली. अराजक माजले. खलिलने एकाच वेळी चर्च आणि शासकांच्या निरंकुश सत्तेला आव्हान दिले. त्याला खरे तर ख्रिश्चन धर्माप्रती जिव्हाळा होता पण त्यातील दांभिकता त्याला पसंत नव्हती. त्याच वेळी इस्लामच्या विविध अर्थ लावण्याच्या पद्धतीवर तो नाराजी व्यक्त करत असे. त्यातील हिंस्त्रतेवर त्याचे खासे कटाक्ष होते, मात्र मानवतावादी सुफी गूढ छटांची त्याला ओढ होती. त्या काळात तुर्की शासकांनी अत्याचार माजवला होता. चर्चला संरक्षण होते पण लोकांना नव्हते. पादरी लोक चर्चच्या छायेखाली भोळ्या गरीब जनतेचे शोषण करीत होते. बायबल आणि ख्रिस्ताच्या शिकवणी मन मानेल तशा पद्धतीने लोकांवर लादून आपले घर भरत होते. शासक त्यांना उत्तेजन देऊन त्यात वाटा घेत होते. दोन्हीकडून कात्रीत अडकलेली जनता आक्रोश करत असली तरी तिचा आवाज कुणाच्या कानी पोहोचत नव्हता. खलील मात्र यावर अंतर्मुख होऊन विचार करत होता आणि एके दिवशी लोकांच्या उद्रेकास ठिणगी लावण्याचे काम खलिलनेच केले. त्यासाठी त्याला कुठल्या शस्त्राची गरज पडली नाही. हे काम त्याच्या पुस्तकाने केले. 'अल अरवाह अल मूत्ममरिदा' हे खरं तर कथांचे एक पुस्तक होते पण त्यात आगीच्या लसलसत्या जिव्हाच होत्या. त्या पुढची पायरी 'अल अज्नीहा अल मूतकास्सिरा'ने गाठली ! या पुस्तकाने चर्चच्या धर्मसत्तेला जणू आव्हान दिले. त्यात त्याने म्हटले आहे की, "गरीब लोक आपले रक्त- घाम गाळून मेहनतीची भाकरी कमावतात आणि चर्चचे लोक त्यांच्या तोंडाचा घास हिसकावून घेतात. त्यांच्या शेतात पिकलेल्या धन्याआने आपलं भांडार भरतात. तुम्ही धर्माच्या नावावर त्यांना हरतऱ्हेने लुटत आहात. त्यांच्याकडून हिसकावलेलं सर्व त्यांना परत करून त्यांना सुखाने जगू द्यायला हवं. खलिलने आपल्या कथांत हा आवाज इतका बुलंद केला की एका बलाढ्य सत्तेने त्याच्याविरुद्ध मोर्चेबांधणी केली.

तळपायाची आग मस्तकी गेलेल्या सत्ताधीशांनी खलिलच्या पुस्तकांच्या प्रती जप्त केल्या. त्याचे पुस्तक जाळून टाकण्याचे आदेश निघाले. चर्चला हाताशी धरून धर्मद्रोहाचे आरोप लावून त्याला देशातून निष्कासित केले गेले. विशेष म्हणजे हे आदेश निघाले तेंव्हा खालिल आपल्या रोदिन या चित्रकार मित्रास भेटायला पॅरिसमध्ये आला होता. त्याच्या अनुपस्थितीत त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली होती यावरून त्याच्याबद्दल असणाऱ्या भीतीची कल्पना यावी. आपल्याला हद्दपार केले याहून अधिक दुःख त्याला पुस्तक जाळून टाकल्याचे झाले. 'अल अरवाह अल मूत्ममरिदा'या विद्रोही पुस्तकाचे इंग्रजीत पुनर्लेखन केले. हे पुस्तक 'स्पिरीटस रिबेलियस' या नावाने जगात प्रसिद्ध आहे.

या नंतर बराच काळ तो रोदिनसवे पॅरिसमध्येच राहिला. तिथं त्याने लेखनासोबत चित्रकलेवर ध्यान केंद्रित केले. काही काळ तिथे राहून तो अमेरिकेस निघून गेला. न्यूयॉर्कमध्ये त्याने छोटासा स्टुडीओ थाटला. त्याने बनवलेल्या पेंटीग्जची प्रदर्शने अमेरिका, फ्रान्स आणि इंग्लंडमध्ये भरत गेली. मोठमोठ्या समीक्षकांनी त्याच्या कलेची प्रशंसा केली. खलिलने जवळपास पंचवीस पुस्तके लिहिली. 'द सिक्रेट्स ऑफ हार्ट', 'टीयर्स अँड लाफ्टर' ही त्याची सुरुवातीची पुस्तके होती. तारुण्यात लिहीलेल्या या पुस्तकांत मानवता, प्रेम, सौंदर्य आणि निसर्ग यावर केंद्रित चिंतन आहे. 'द ब्रोकन विंग्ज'मध्ये त्याच्या जीवनानुभवाची झलक आहे. तारुण्यात त्याचे सलमा करीमी या तरुणीवर प्रेम होते. पण चर्चच्या एका बिशपने त्या मुलीसोबत आपल्या भाच्याचे लग्न लावून दिले. खलिलचा हृदयभंग झाला. तो तिच्या प्रेमाच्या साक्षीने अविवाहित राहिला, त्याने पुन्हा कुठल्या स्त्रीवर प्रेम देखील केले नाही ! त्याच्या हृदयभंगाच्या व्यथेच्या सावल्या 'द मॅडम', 'द फोर रनर', 'द गार्डन ऑफ द प्रॉफेट' या साहित्यकृतीत पडल्या आहेत. खलिलने ख्रिस्ताला मानवी गुणांनी संपन्न व कल्याणकाराच्या रूपातील करुणेचा अवतार या प्रतिमेत दर्शवले आहे.

इ.स.१९०४ मध्ये बोस्टन इथे भरलेल्या प्रदर्शनात मेरी एलिझाबेथ हेस्केलशी खलिलची भेट झाली. मेरी कलाशाळेत मुख्याध्यापिका होती, खलिलपेक्षा दहा वर्षाने मोठी होती. या दोघांची मैत्री खलिलच्या मृत्यूपर्यंत टिकून होती. काही चरित्रकारांच्या मते या दोहोत आत्मिक प्रेम होते. मेरीच्या सहवासात आलेल्या खलिलने रोमँटीसिझमवर लेखन केले. मेरीने जेकॉब फ्लोरेन्सशी लग्न केले. तत्पश्चातही ती खलिलला विविध स्वरुपात मदत करत राहिली. दोन विजातीय लिंगी व्यक्तीमधील निखळ पारदर्शी आणि सच्च्या मैत्रीचे उदात्त प्रतिक म्हणून या दोघांच्या नात्याकडे पहिले जाते. वयाच्या अठ्ठेचाळीसाव्या वर्षी १० एप्रिल १९३१ रोजी खलिलच्या आयुष्याचे अखेरचे पान लिहिले गेले. तोवर त्याला अमेरिका आणि लेबनॉन या दोन्ही देशांनी नागरिकत्व बहाल केले होते. खालिलचा मृत्यू न्यूयॉर्कमध्ये झाला. त्याची इच्छा होती की मायभूमीत दफन व्हावे, पण त्या साठी त्याच्या पार्थिवाला बरीच प्रतिक्षा करावी लागली. १९३२ मध्ये त्याचे पार्थिव मायदेशात आणले गेले. प्रॉव्हिडन्स नावाच्या जहाजातून त्याचे पार्थिव अमेरिकेतून लेबनॉनमध्ये आणले गेले. तेंव्हा लेबनॉनमधले वातावरण बदलले होते. त्याच्या नावाला सर्वत्र मानसन्मान मिळत गेला आणि त्याची लोकप्रियता वाढत गेली.

आजच्या घडीला खलिलच्या बशरीमधील कबरीचे रुपांतर एका भव्य देखण्या स्मारकात झाले आहे. बोस्टनमध्येही त्याचे शानदार स्मारक आहे. वॉशिंग्टन डीसीत त्याचे शिल्पस्मारक आहे. जगभरात अनेक देशात त्याचे पुतळे उभारले गेलेत. एका साहित्यिकाला मिळालेला हा सर्वोच्च बहुमान असावा. अरब जगतात जिब्रानला साहित्यिक व राजकीय बंडखोर मानले जाते. परंपरागत संप्रदायापासून फारकत घेणारी त्याची रोमांचक लेखन शैली, विशेषतः त्याच्या गद्यात्मक कविता आधुनिक अरब साहित्यातील प्रबोधनाच्या केंद्रस्थानी होत्या. लेबनॉनमध्ये आजही त्याला साहित्यिक युगनायक मानले जाते. शेक्सपिअर आणि लाओ-त्झूनंतर खलिल जिब्रान हा सार्वकालिक सर्वाधिक खप असणारा तिसरा कवी आहे. कथा लिहिणारा खलिल कथानायकही झाला आणि युगनायकही झाला ही गोष्टच खलिलविषयी सारं काही सांगून जाते ....

- समीर गायकवाड.

माहितीसाठी : खलिल जिब्रानचे मराठीत उपलब्ध असणारे अनुवादित व चरित्र साहित्य - 'दि मॅड मॅन' ,'वाँडरर’, 'सॅन्ड ॲन्ड फोम' या तिन्हीचे मराठीतील अनुवाद काका कालेलकर यांनी केले आहेत. तर 'रुपेरी वाळू' या नावाने ’सॅन्ड ॲन्ड फोम’चे अनंत काणेकर यांनी मराठीत रूपांतर केले आहे. 'खलिल जिब्रान जीवन-दर्शन' हा ’दि प्रॉफेट’ या खलिल जिब्रानच्या मूळ इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद रघुनाथ गणेश जोशी यांनी केला आहे. याचे संपादन आचार्य शं.द. जावडेकर आणि आचार्य स.ज. भागवत यांनी केले आहे. खलिल जिब्रानचे मराठीतील चरित्र श्रीपाद जोशी यांनी लिहिले आहे. रघुनाथ गणेश जोशी यांच्या ’जीवन-दर्शन’ या पुस्तकातही जिब्रानचे अल्पचरित्र देण्यात आले आहे.


(टीप - लेखातील माहिती जालावरील विविध लेखातून संकलित केलेली आहे ) 



२ टिप्पण्या:

  1. बापू, तुमच्यामुळे आता त्यांची पुस्तके घेऊन वाचावी लागतील, जागतिक दार्शनिकाची ओळख छान करुन दिलीत, धन्यवाद !

    उत्तर द्याहटवा