शुक्रवार, १९ जानेवारी, २०१८

आई गेल्यानंतरचे वडील – दासू वैद्यांची भावकविता


आई गेल्यानंतरचे वडील
अबोल झाले, पूर्वीसारखेच स्वयंपाकघरातल्या कोपर्या त
देवांना न्हावू-जेवू घालतात
पण आरती करताना
त्यांचा हात थरथरतो,
आईने लावलेल्या बदामाच्या झाडाभोवती
कचरा साफ़ करण्याच्या निमित्ताने रेंगाळतात,
ओट्यावर बसतात
आभाळाकडे पहातात
जुन्या पोथ्या काढून
पुन्हा बांधून ठेवतात,
वर्तमानपत्र डोळ्यांजवळ धरून वाचतात,
जेवणानंतर उदबत्तीच्या काडीने
खुप वेळ दात कोरतात
मळकट आंब्याच्या कोयीतून
हिरवी काडी वर यावी
तशी जुनाट आठवण सांगतात कधीतरी,

अंथरुणावर पडल्यावरही
बराच वेळ जागे असतात,
बोटाच्या पेरावर काही तरी मोजतात
हे नाम्स्मरण तर नक्कीच नव्हे
कारण ती शांतता
तेव्हा त्यांच्या चेहर्याववर ओसंडत नसते

मग ते काय मोजत असतील ?

सोमवार, १५ जानेवारी, २०१८

स्तनदायिनी ...


१९५० च्या दशकात महाश्वेतांच्या 'स्तनदायिनी'ची कहाणी सुरु होते आणि १९७० च्या सुमारास संपते. ही कथा एका स्त्रीची आहे तिची स्त्रीयोनी आणि तिचे स्तन तिच्या मृत्यूस आणि शोषणास कारणीभूत ठरतात. यशोदा तिचं नाव. कांगालीचरण हा तिचा पती. तो दुर्गामातेच्या मंदिरातला पुजारी. कांगालीचरण हा देवभोळा ब्राम्हण. त्याची देवधर्मावर पराकोटीची श्रद्धा. पत्नीच्या गर्भातून जन्माला येणारे अपत्य म्हणजे साक्षात ब्रम्हच अशी त्याची संकल्पना. त्याच्या या नादात त्याची बायको सतत गर्भवती असते. यशोदाची वीस बाळंतपणं झालेली. यातली काही अपत्य जगली तर काही वाचली. यशोदाला तिची आई, मावशी, माहेर कसं होतं हे ही आठवता येत नाही इतकी ती मातृत्वात व्यस्त असते. यशोदाचं गर्भाशय रितं राहिलं असं वर्ष जात नव्हतं. यशोदाचा देह म्हणजे मुलं निपजणारं यंत्र झालेलं. उलट्या झाल्या नाहीत वा चक्कर आली नाही असा दिवस तिला गतदशकात अनुभवास आला नव्हता. रोज कुठल्या तरी कोनाडयात, अंधारात, अडगळीत कांगालीचरण तिच्याशी संभोग करायचाच. त्याला दिवसरात्र वा स्थळकाळ याचे बंधन नसे. तो फक्त तिला अपत्यजननी समजायचा. पतीपरमेश्वर समजणारया यशोदालाही यात काही वावगं वाटत नव्हतं. आपलं हे अतिरेकी आईपण सहन करू शकते की नाही याचादेखील ती कधी विचार करत नाही. पुढे जाऊन तिचं मातृत्व व्यावसायिक होऊन जातं इतकं जीवघेणं आईपण तिच्या नशिबी येतं आणि ते ती स्वीकारते.

शनिवार, १३ जानेवारी, २०१८

पांथस्थांचा विसावा ...


रांजणातले पाणी आणि लिंबाखालची झिलमिल सावली हीच इथली शीतलता असते. पोटातली आग आणि  चुलीतला विस्तव इतकीच काय ती गर्मी असते. तांबूस पिवळ्या गुळाचा खडा आणि पितळी तांब्यातलं थंडगार पाणी कुणाचीही तहानभूक भागवण्यास समर्थ असते. यांच्या ओठावर अगदी रसाळ खडीसाखर नसली तरी कारल्याचा कडवटपणाही निश्चितच नसतो. निवांत गप्पा मारताना मार्क्स ऍरिस्टॉटल यांच्या तत्वज्ञानासम  गाढ्या गहन गप्पा-चर्चा इथे कधी झडत नसतात. भरपेट जेवल्यानंतर करपलेली ढेकर द्यावी तशी गंभीर चर्चाही इथं नसते.

गुरुवार, ११ जानेवारी, २०१८

मन चिंब पावसाळी - ना. धों. महानोरसगळीकडे मेघ नुसते दाटून आलेले आहेत. संततधार धुंद पाऊस एका लयीत शांतपणे पडतो आहे. वातावरण कुंद झालेले आहे. आभाळातून येणाऱ्या प्रत्येक थेंबाचा आस्वाद वसुंधरा घेते आहे. झाडे अगदी चिंब ओली झाली आहेत पण तरीही आकाशाकडे डोळे लावून बसली आहेत आणि गर्द ढगांच्या दाट सावल्यांचे आकाशच आता वाकून झाडांच्या मनात डोकावते आहे. या हवेने या निसर्गाच्या सान्निध्यात राहणाऱ्या भूमिपुत्राचे मन चिंब झाले आहे. ते नुसते चिंब - झिम्माड झालेले नाही तर झाडांच्या नानाविध रंगात न्हाऊन गेले आहे. झाडांच्या पानांफुलांत पालवीत आलेल्या हिरवाईची ओल अंगी झिरपावी. भवतालातले काळेकुट्ट मेघ इतके दाटून आहेत की त्यांच्या सावल्यांनी आकाश खाली आल्याचे भास व्हावा...

पाऊस पाखरांच्या पंखांवर थेंबथेंबाच्या दाटीने बसून आहे, अधून मधून मध्येच येणारा मोठ्या सरींचा शिडकावा आकाशाच्या निळाईत डोकावणाऱ्या झाडांना कुसुंबात मळवून टाकतोय. हा पाऊस काही थांबणारा नाहीये, कारण ही संततधार आहे. हे जाणून असणारे पक्षी आपले ओलेते पंख घेऊन दाट झाडीत असणाऱ्या आपापल्या घरट्यात परत येतायत. मात्र तिथेही पावसाची हवा घेऊन फिरणारा ओलसर गर्द वारा आहे, या वाऱ्यात सगळी गात्रे गोठून जातील असा गारवा आहे त्यामुळे पक्षांच्या पंखांचा ओला पिसारा अजून धुरकट फिकट होत चाललेला आहे. बाहेर थंडी वाढत चालली आहे, आभाळ अजून काळसर होत चालले आहे, अशा वेळेस मन बेचैन होऊन तिची (प्रियेची) आठवण येणे साहजिक आहे. पण ती तर येथे नाहीये, तर मग या श्रावणी धुंद हवेला घट्ट मिठीत कवटाळण्याशिवाय पर्याय राहत नाही. या हवेला कवटाळले की ह्याच ओलेत्या घनगर्द आकाशाचा एक तुकडा बनता येईल आणि हे दाट भरलेले मायेने ओथंबलेले मेघ पांघरोनी तिच्या शोधात दूरदूर जाणे सोपे होणार आहे.

सोमवार, ८ जानेवारी, २०१८

पावसाचा सांगावा.....उन्हाळा जसजसा संपत यायचा तसे कधी कधी आभाळ दाटून येई अन वडिलांची ओढ त्या आभाळाकडे असे. आभाळ थोडे जरी झाकाळून आले तरी ते गावाकडे शेतात असणाऱ्या गडयाला फोन करत. तिकडे काय हालहवाल आहे याची चौकशी करत त्यातूनही त्यांना समाधान मिळत नसे. मग ते गावाकडे असणाऱ्या त्यांच्या लहान भावंडाना म्हणजे सदाशिव काका किंवा नेताजी बाबा नाहीतर क्वचित बापूकाकांकडेही ते विचारणा करत. शेतातला गडी नानू राठोड हा अक्कलकोट तालुक्यातल्या कडबगावचा होता, त्याचं मराठी अगदी तिखट शेंगाचटणी सारखं तरतरीत आणि लवंगी फटाक्यासारखं कुरकुरीत होतं. सोलापुरात थोडा जरी पाऊस झाला तरी वडील त्याला विचारत, "काय नानू पाऊस आहे का रे गावाकडे ?". थोडाफार पाऊस जर झालेला असेल तर त्याचे उत्तर असे - "तात्या ह्यो कसला वो पाऊस ? पाखराची पखं सुद्धा भिजली नाहीत बगा, उगं रडणारयाचे डोळे पुसून गेलाय !", आमचं सारं घरदार, गणगोत अन गाव शिवार माझ्या वडिलांना तात्या या नावानेच हाक मारी. पण नानूचं ‘अवो तात्या’ असं हाक मारणं म्हणजे कानडी बाईने मराठीत मुरके घेतल्यासारखे असे.