गुरुवार, ११ जानेवारी, २०१८

मन चिंब पावसाळी - ना. धों. महानोरसगळीकडे मेघ नुसते दाटून आलेले आहेत. संततधार धुंद पाऊस एका लयीत शांतपणे पडतो आहे. वातावरण कुंद झालेले आहे. आभाळातून येणाऱ्या प्रत्येक थेंबाचा आस्वाद वसुंधरा घेते आहे. झाडे अगदी चिंब ओली झाली आहेत पण तरीही आकाशाकडे डोळे लावून बसली आहेत आणि गर्द ढगांच्या दाट सावल्यांचे आकाशच आता वाकून झाडांच्या मनात डोकावते आहे. या हवेने या निसर्गाच्या सान्निध्यात राहणाऱ्या भूमिपुत्राचे मन चिंब झाले आहे. ते नुसते चिंब - झिम्माड झालेले नाही तर झाडांच्या नानाविध रंगात न्हाऊन गेले आहे. झाडांच्या पानांफुलांत पालवीत आलेल्या हिरवाईची ओल अंगी झिरपावी. भवतालातले काळेकुट्ट मेघ इतके दाटून आहेत की त्यांच्या सावल्यांनी आकाश खाली आल्याचे भास व्हावा...

पाऊस पाखरांच्या पंखांवर थेंबथेंबाच्या दाटीने बसून आहे, अधून मधून मध्येच येणारा मोठ्या सरींचा शिडकावा आकाशाच्या निळाईत डोकावणाऱ्या झाडांना कुसुंबात मळवून टाकतोय. हा पाऊस काही थांबणारा नाहीये, कारण ही संततधार आहे. हे जाणून असणारे पक्षी आपले ओलेते पंख घेऊन दाट झाडीत असणाऱ्या आपापल्या घरट्यात परत येतायत. मात्र तिथेही पावसाची हवा घेऊन फिरणारा ओलसर गर्द वारा आहे, या वाऱ्यात सगळी गात्रे गोठून जातील असा गारवा आहे त्यामुळे पक्षांच्या पंखांचा ओला पिसारा अजून धुरकट फिकट होत चाललेला आहे. बाहेर थंडी वाढत चालली आहे, आभाळ अजून काळसर होत चालले आहे, अशा वेळेस मन बेचैन होऊन तिची (प्रियेची) आठवण येणे साहजिक आहे. पण ती तर येथे नाहीये, तर मग या श्रावणी धुंद हवेला घट्ट मिठीत कवटाळण्याशिवाय पर्याय राहत नाही. या हवेला कवटाळले की ह्याच ओलेत्या घनगर्द आकाशाचा एक तुकडा बनता येईल आणि हे दाट भरलेले मायेने ओथंबलेले मेघ पांघरोनी तिच्या शोधात दूरदूर जाणे सोपे होणार आहे.

तिच्या शोधात जाणारे मन हे आधी कुठे जाणार ? पावसाळी सांजवेळेमुळे सगळा आसमंत हा लवकर रिता होत जातो, गावाकडची मंडळी आपली कामे उरकून आपापल्या घरात लवकर येतात. परिसर निर्मनुष्य होऊन जातो. आपसूकच सगळ्या शिवाराला, रानाला एकसुरी सुनसान शांतता लाभते. तर अशा या भावविभोर धुंद संध्येला रम्य गावातल्या एककल्ली रानात ती मोकळ्या केसांत फुले माळून वाट बघत बसली असणार आहे. फुलांनी देखील पुन्हा नव्याने उमलून यावे अशी ती अल्वार नार रात्र गडद होताना उंबरठ्यापाशी उभे राहून आकाशाकडे डोळे लावून असेल. मनाला तिच्याकडे जाण्यासाठी मेघाचा आसरा घ्यावा लागला तर त्यात नवल ते काय ?

या मनोरम्य पावसाळी सांजवेळी तिची आठवण मनात अशी काही रुंजी घालते की डोळ्यांच्या गलबतात हिरव्या ओल्या मेंदीने मस्त सजवलेले तिचे ते मखमली हात तरळतात. खरं तर असं कुणी अस्तित्वात आहे की नाही हे ठाऊक नाही, पण या चिंब पावसाळी झाडांच्या रंगात ओलं झालेलं, श्रावणी हवेला मिठी मारुन आकाश पांघरून अनामिक भ्रमंतीला निघालेलं मन या धुंद हवेमुळेच की काय एका देखण्या राजकुमारीच्या शोधात कुठे तरी डोळे गुंतवून बसले आहे हे मात्र नक्की !

एका धुंद पावसाळी संध्येचे अप्रतिम वर्णन करताना प्रेमासक्त मनाने घातलेली हळुवार साद या कवितेत आहे. पावसाचं देखणं आरसपानी चित्र रंगवताना महानोर नकळत मुग्ध प्रेमाच्या शोधातल्या सुंदर राजकुमारीच्या डोळ्यांच्या पाऱ्यात अलगद नेऊन ठेवतात हे या कवितेचे अद्भुत यश. यातल्या प्रतिमांचे वर्णन करायला शब्द फिके पडतील इतक्या त्या गहिऱ्या आहेत. झाडात रंग ओले, झाडे निळी कुसुंबी, ओला फिका पिसारा, रानात एककल्ली सुनसान सांजवेळी, मन चिंब पावसाळी मेंदीत माखलेले … शब्दांचे प्रयोजन असं काही आहे की त्या ओळींना एक देखणी लय येते आणि ते चित्र आपल्या डोळ्यापुढे एखाद्या पोर्ट्रेटसारखे उभे राहते.

मन चिंब पावसाळी झाडांत रंग ओले
घनगर्द सावल्यांनी आकाश वाकलेले
पाऊस पाखरांच्या पंखात थेंबथेंबी
शिडकाव संथ येता झाडें निळी कुसुंबी
घरट्यात पंख मिटले झाडात गर्द वारा
गात्रात कापणारा ओला फिका पिसारा
या सावनी हवेला कवळून घट्ट घ्यावे
आकाश पांघरोनी मन दूरदूर जावे
रानात एककल्ली सुनसान सांजवेळी
डोळ्यांत गलबताच्या मनमोर रम्य गावीं
केसांत मोकळ्या या वेटाळुनी फुलांना
राजा पुन्हा नव्याने उमलून आज यावे
मन चिंब पावसाळी मेंदीत माखलेले
त्या राजवंशी कोण्या डोळ्यांत गुंतलेले......

निसर्गाचे वर्णन ज्यांच्या कवितांमधून नदीच्या प्रवाहाप्रमाणे बारोमास येत राहते तेही अगदी सहजतेने ओसंडून वाहत रहावे अशा पद्धतीने, असे काही मोजकेच कवी आपल्या मराठी मातीत आहेत. त्यात कविवर्य ना.धों.महानोरांचे नाव अग्रस्थानी आहे. वाट्याला आलेले आयुष्य आणि ते जगताना लाभलेले अनुभव यांच्या जोडीने संवेदनशील मनाने भवतालच्या चराचरातून वेचलेली आभाळमाया माणसाचं जिणं समृद्ध करत असते. हे भावविश्व ज्याचे त्याचे भिन्न असते. यातूनच आकाराला येते निर्मितीक्षम साहित्यिकाची जडण घडण. संवेदनांनी समृद्ध, घाटदार बांधीव अनुभूती व अलौकिक प्रतिभाशक्ती याचा अत्यंतिक प्रत्यय महानोरांच्या कवितेत येतो. औरंगाबाद जिल्ह्यातील पळसखेडे या गावी जन्म झालेल्या महानोरांना त्यांच्या सभोवतालच्या आसमंताचे अपार वेड आहे. हे निसर्गप्रेम त्यांच्या कवितेतुन आपल्या जगण्याला नवीन अर्थ देत एक अखंड चेतनास्त्रोत बनून राहिले आहे.

मन चिंब पावसाळी ही कविता ते अजिंठ्याच्या परीसरात भटकंती करायला गेले होते तेंव्हाची आहे. त्या देखण्या निसर्गरम्य परिसरात अशी चिंब पावसाळी संध्याकाळ घालवताना त्यांच्या मनात दाटून आलेल्या या सुंदर पंक्तींच्या निर्मितीसमयी तिथल्या कोरीव लेणी साक्षीला होत्या म्हणून तर ही कविता इतकी कसदार, आशयघन आणि रसरशीत झाली नसेल ? 'मुक्ता' या चित्रपटातील एका प्रसंगात ही कविता गुणगुणली गेली आहे. त्यातली चाल रसाळ आहे. मनाच्या एका कोपऱ्यात ही ओलीचिंब सांजवेळा आणि तिच्या नाजूक आठवणी खुणावत राहतात. दोनेक वर्षांपूर्वी आलेल्या अजिंठा या सिनेमात या कवितेचे रुपांतर गाण्यात केलं गेलं. आजही कधी असं कोसळतं आभाळ कवेत घेणारा एखादा उनाड दिवस आला तर महानोरांच्या या कवितेची आठवण होऊन मन चिंब पावसाळी होऊन जाते....

अंतरंगीच्या लेण्यात कोरून रहावा अशा अनेक देखण्या कवितांमधून मेघमल्हाराचा अक्षर ठेवा रसिक वाचकांच्या ओंजळीत देऊन महानोरांनी निसर्गगीतांचे एक अप्रतिम शब्दशिल्प मराठी साहित्यात निर्मिले आहे. महानोरांच्या कवितांचे गारुड रसिक मनावर नेहमीच राहील. समीक्षकांनी देखील त्यांच्या कवितेस मानाचे पान नेहमीच दिले आहे. महानोरांच्या कवितेस प्रकाशमान होण्यासाठी कुठल्याही क्लृप्त्या वापराव्या लागल्या नाहीत तिच्या अंगभूत गुणांमुळे मायमराठीने तिला हृदयी स्थान दिले. महानोरांच्या कवितेची जडणघडण नेमकी कशी झाली याचा शोध आणि बोध दोन्ही रंजक आहेत. १९६७ साली ‘पॉप्युलर प्रकाशन’ने ‘नवे कवी… नवी कविता’ ही काव्यमाला सुरू केली होती. कवी ग्रेस यांचा ‘संध्याकाळच्या कविता’ हा या मालेतील पहिला कवितासंग्रह. याचं दुसरं पुष्प म्हणून ना. धों. महानोर यांच्या ‘रानातल्या कविता’ या कवितासंग्रहास सन्मान लाभला. रान-शिवाराची चैतन्याने ओथंबलेली कविता म्हणून तिचा सर्वत्र बोलबाला झाला. बालकवी, बा. भ. बोरकर, ना. घ. देशपांडे, मंगेश पाडगावकर आणि भालचंद्र लोवलेकर यांच्या निसर्गकवितेशी नाते सांगणारी महानोरांची कविता सर्वांना खुणावून गेली. मराठवाड्याच्या मौखिक आणि लिखित परंपरेचे सत्त्व या कवितेत ओतप्रोत भरले होते. कृषकसंस्कृतीमधील कष्टाळू हातांनी जमिनीची निगुतीने मशागत केली आणि दुसरीकडे मराठी कवितेच्या प्रांतात अक्षरसंपन्न क्षितिज तिने निर्माण केले. समकाळातील कवी-कवयित्रींनी तिच्याकडे अवाक् होऊन पाहिले. एवढेच नव्हे, कविश्रेष्ठ बा. भ. बोरकर आणि कुसुमाग्रज यांसारख्या कवींनी तिचे भरभरून कौतुक केले. बा. भ. बोरकर यांनी ‘सत्यकथा’मधून ‘रानातल्या कविते’ला मुक्त मनाने दाद दिली. तिची बलस्थाने अधोरेखित केली. प्रारंभीच्या काळात असा पाठीवरचा हात उमलत्या प्रतिभेला कसा आवश्यक असतो, तो किती पोषक ठरतो हे या महानोरांनी सिद्ध करून दाखवलं. त्यांची कविता शुक्लेन्दुवत् वर्धिष्णू राहिली. ‘ऐसी कळवळ्याची जाती’मधून आपल्या जीवनप्रवासात आणि काव्यप्रवासात भेटलेल्या ‘माणसां’ची व्यक्तिचित्रे महानोरांनी तन्मयतेने रेखाटली आहेत. रसिकांच्या दृष्टीने अर्धशतकाहून अधिक काळ मराठी कवितेला महानोरांनी गर्भश्रीमंत कसे बनविले याचे अवलोकन करण्यासाठी त्यांच्याच मनोगताचा आधार घेतला तर त्यांच्या कवितेची वीण उमगते आणि महानोरांची जडणघडणही कळून येते.

मराठवाडय़ाच्या टोकाला अजिंठा लेण्यांच्या पायथ्याशी पळसखेडे या आदिवासी परिसरात, जिथे गावात शाळा नाही, कोणी शिकलेलं नाही, आईवडील निरक्षर मजूर, मागेपुढे कुठे फारसा आधार नाही, अशा ठिकाणाहून तिथेच आयुष्यभर राहून अशी कविता व साहित्य तुम्ही कसं निर्माण केलं?’ हा प्रश्न महानोरांना नेहमी विचारला जातो. कुठेतरी परंपरा, साहित्याचा संस्कार असावा लागतो. ते काहीच नाही. असे अनेक प्रश्न. १९४०-५० हा त्यांच्या जन्माचा काळ. त्या काळी खेडं हे भजन-कीर्तन-भारूड-प्रवचन-नामस्मरण, सण-उत्सव, पालखी-उत्सव अशा अनेक चांगल्या मौखिक साहित्याने समृद्ध असं होतं. तमाशा, लोककला, जलसा, लोकनृत्य, पोवाडा व अनेक लोककलांनी खेडी, जत्रा छान व्यापलेल्या होत्या. रात्ररात्र हे उत्सव चालायचे. सूर्योदयाला जात्यावरली प्रसन्न ओवी. संसाराचं सुखदुख गाणारी जात्याची घरघर, लय, हलकं संगीत आणि अस्सल भाव असलेली कविता म्हणजे ओवी. झोपाळ्यावरली झिम्मा- फुगडीची गाणी, गपसप गोष्टी हे सगळं लोकसंस्कृतीचं लेणं थेट लहानपणापासून त्यांनी ऐकलं, त्यात त्यांचा सहभागही असायचा. या सगळ्या सांस्कृतिक जगताचं उत्तम गीत-संगीत आणि शब्दकळा त्यांच्यावर संस्कार करून होती. लिखित साहित्याच्या आधी हे मौखिक समृद्ध असं साहित्य, कला त्यांच्या मनात बीज रोवून होती.

लहानसं खेडं - झाडांनी दाटलेलं, झुळझुळ झऱ्यांनी गाणारं, अनेक पक्ष्यांच्या कंठातून किलबिल गाणारं होतं. शेतीमध्ये जीव ओतून काम करणारे, त्या माऊलीवर निस्सीम प्रेम करणारे, अन्नाचा घास अवघ्या जगाला देणारे शेतकरी होते-आहेत. दरवर्षी सुंदर पावसाळा, भुईतून पिकांचा, झाडांचा नवा सतेज स्वर्ग निर्माण होतो आहे आणि शेतकरी समाजाचं खेडं आनंदाने नांदतं आहे. सुख-दुखात गाणं गात आहे. लोकसंगीत हा खेडय़ांचा प्राण. अशा काळात ज्वारी, बाजरी, कापूस, चवळी, तुरीसारख्या पिकांमध्ये, मोसंबी, सीताफळी, केळी, डाळिंब, कडुनिंब आणि इतर वनश्री यांत महानोर संपूर्ण एकजीव झालेले. चराचराचं सुख - दुख तेच महानोरांचं सुख-दुख, आनंद असा एकरूप संसार. जवळच्या अजिंठा डोंगराच्या घनदाट झाडीत, नदीनाल्यांत, पक्ष्यांमध्ये अजिंठय़ातल्या चित्रशिल्पांप्रमाणेच ते एकरूप होऊन जगले. आदिवासी तांडे आणि गावकूस या सगळ्यांचं ते गणगोत झाले. हे अगदी लहानपणापासून होत गेलं. हे निस्सीम सौंदर्य एक दुसऱ्यात मिसळून गेलेलं.

डोंगरझाडी-झरे-लदबदलेली शेती आणि स्वर्गासारखी दरवर्षीची पिकांची बदलती रूपं. शेतीत पेरताना, झाडा-पिकांशी बोलताना, पाखरांशी सलगी करताना, झोपडीतल्या कंदिलाच्या मंद उजेडात रात्र रात्र पुस्तकं वाचताना, अनेक मराठी कवींच्या कविता गाताना महानोरांचे दिवस बहरत गेले. दुष्काळ होते; पण कधीतरी, म्हणून आनंदाचे दिवस अधिक. दिवसभर शेतीचं कष्टाचं काम, रात्री पुस्तकांचं वाचन. नव्या कथा, कविता, कादंबऱ्या, ललित सगळं वाचलं. राजकीय, सामाजिक, वैचारिकही खूप वाचलं. संतसाहित्यही खूप वाचलं. सबंध आधुनिक मराठी कविता पुन्हा पुन्हा वाचली. रविकिरण मंडळाच्या कवितेनंतर मर्ढेकर, करंदीकर यांच्या समृद्ध अशा नव्या कवितेने त्यांना पछाडलं.

त्याच वेळी कात टाकून नव्याने आलेल्या कुसुमाग्रज, बोरकर, अनिल, ना. घ. देशपांडे, इंदिरा संत यांच्या १९५५-६० नंतरच्या कवितेने महानोरांना नवचतन्य मिळालं. दिलीप चित्रे, आरती प्रभू, म. म. देशपांडे, तुळशीराम काजे, सुरेश भट, मधुकर केचे, आनंद यादव, नारायण सुर्वे यांची सशक्त नवी कविता १९५८-६० मध्ये प्रसिद्ध झाली. भालचंद्र नेमाडे, अरुण कोलटकर, ग्रेस, चंद्रकांत पाटील यांचीही नवी कविता वाङ्मयीन नियतकालिकांतून, लघुनियतकालिकांतून येत होती. कवितेवर निस्सीम प्रेम म्हणून महानोरांनी पुन्हा पुन्हा कविता वाचल्या. कवितेचं नेमकं सत्त्व, ‘कवितेचं असतेपण’ काय असतं हे त्यांच्या नीट लक्षात आलं. रानात मग केळी, ऊस, ज्वार, कपाशी, झाडं- पिकं यांतलं सौंदर्य जे डोळ्यांत घट्ट होतं ते एकदोन ओळींत लिहिता येईल का, म्हणून धाडस केलं. कुणी वाचणार न वाचणार, पण आपला आनंद त्यात यावा एवढंच. शब्दकळा, लय, गीत, संगीत याचे व या वाचनाचे संस्कार घेऊन शब्द उतरत गेले. या आधीही सुंदर निसर्ग मराठी कवितेत होता. पण त्यांच्या निसर्गात शेती व भवतालाची सृष्टी, शेतकरी, तिथल्या प्रतिमा ठळक होऊन आल्या. कदाचित हे वेगळेपण रसिकांना भावलं.

‘या शेताने लळा लाविला असा की
सुख दुखाला परस्परांशी हसलो रडलो
आता तर हा जीवच अवघा असा जखडला
मी त्याच्या हिरव्या बोलीचा शब्द जाहलो’

‘गारठय़ाची रात्र थंडाई हवेला’, ‘नितळ तळ्याच्या काठावरती हिरवे झाड’, ‘डोळे थकून थकून गेले’ अशा अनेक लहान लहान कविता त्यांच्या ओठांवर रुंजी घालून आल्या. त्या चार चार ओळींत लिहिल्या होत्या. अजिंठय़ाची चित्रशिल्पं आणि त्यांचा आकृतिबंध त्यांनी पाहिलेला होता. ‘गाहा सत्तसई’मधल्या लहान लहान गाहा त्यांच्या मनावर राज्य करून होत्या. बदलत्या नव्या कवितेच्या काळात शब्दांचा मितव्यय व आशयाचा घट्टपणा नेमका असावा, हे ते ओळखून होते. नव्या प्रतिमा व ग्रामीण शब्दकळेला स्वतचा सरताज देत ते लिहित गेले. जात्यावरल्या ओव्या दोन-चार ओळींतच सगळा आशय मांडतात. तेही उत्तम कवितेइतकंच छान. आपणही तसंच करावं म्हणून त्यांनी सुरुवात केली. १९६०-६१च्या काळात आठ-दहा कविता लिहून झाल्या. या कविता त्यांनी अतिशय उत्साहात नियतकालिकांकडे पाठवल्या. परत येत गेल्या. त्याचं त्यांना वाईट वाटलं नाही. आपण कुठेतरी कमी आहोत हेच त्यांनी बघितलं. कविता अकारण पसरट न करता नेमकी कशी करता येईल त्याचा विचार ते करत गेले. शब्दांचा मितव्यय, नवनवे शब्द, नव्या प्रतिमा, लोकगीतांची लय, बऱ्याचदा त्यांची स्वतःची बांधणी करून रानातलं कवितेत टिपत गेले. निसर्ग व शेतीतली इथली सृष्टी ही एकरूप असल्याने हा नवा शेतीचा, पिकांचा, झाडांचा तिथल्या जीवनाचा त्यांचा एकसंध असा भाव कवितेत आला. तोही सचेतन. बोलघेवडा. त्यांचं आणि हिरवाईचं असं नातं कवितेत सजीव होऊन उतरत गेलं. रसिकांना आवडलं.

‘गुंतलेले प्राण ह्य रानात माझे
फाटकी ही झोपडी काळीज माझे
मी असा आनंदुनी बेहोष होता
शब्दगंधे तू मला बाहूत घ्यावे’

हे ऋणानुबंध अधिक घट्ट होते म्हणूनच त्यांची तशी कविता झाली. ती शब्दबंबाळ, अवास्तव वर्णनाची होणार नाही याची काळजी घेतली. अभंग, रुबाई, गझल, भावगीत, सामाजिक वगरे नव्या मराठी कवितेत चांगलं आलेलं होतं, ते त्यांनी त्यांच्या कवितेत टाकलं. प्रयोग वगैरे म्हणून नाही तर सरळ कविता म्हणजे कविता. तिच्या नव्या प्रतिमांना, आशयाच्या जाणिवांना थोडं घेरल्याप्रमाणे ते लिहित गेले. दोन-तीन महिने घरात ठेवून पुन्हा वाचून एकेका शब्दासाठी तोडमोड करून खूप काही सांगणारी व काहीच न सांगताही मनात घर करणारी कविता उतरत गेली. शेतीमध्ये आंतरपीकपद्धतीमुळे अधिक उत्पन्न येतं. पीक सुंदर दिसलं. दहा-वीस एकरांच्या शेतीत कापूस, तुरी, ज्वारी, बाजरी अशी अनेक पिकं एकमेकांच्या जोडीने पेरलेली, बहरलेली असतात. एक दुसऱ्यांना वाऱ्याच्या हेलकाव्याने भेटतात. सरमिसळ होतात. चांगला संकर होतो. हे वास्तवातलं विलोभनीय चित्र पिकांचं. तसंच काहीसं त्यांच्या बऱ्याच कवितांमध्ये आहे. तेही गीत-कवितेत. छंदोमयी. अस्सल कविता व अस्सल गीत यांत भेद नसावा.

‘शेत गव्हाचे पिवळे जरा नशेत झुलते
आणि साळीचे उगाच अंग शहारून येते
पोटऱ्यातल्या गव्हाचे हसू ओंब्यात दाटते
केळ कांतीव रूपाची छाया पाण्यात शोधते’

किंवा 

‘आंब्याच्या झाडाला मोहोराचा वास झेपता झेपेना
गाभुळ्या चिंचेला नवतीचा भर पोटी धरवेना’

हे वास्तवातलं पिकांचं, झाडांचं निसर्गचित्र. ही निसर्गकविता म्हणून शिकवतात किंवा समजून घेतात तशीच ती प्रेमकविता म्हणूनही शिकवतात. महानोरांना हा शृंगारच दिसतो का असा प्रश्नही त्यांना विचारला जातो. मानसिक-शारीरिक अनुबंधच दिसतात का ? अशी विचारणाही होते. यावर महानोरांचं उत्तर होय असंच आहे. त्यांच्या मते त्यात काहीही वाईट नाही. प्रेम आणि निसर्ग यांच्याइतकं सुंदर, पवित्र, दुख पुसून टाकणारं जगात काहीच नाही अशी त्यांची समजूत आहे. एक सुंदर पोर्ट्रेट, रेखाचित्र किंवा लावण्यमयी असं रूप जे दिसलं ते नीट मांडणी करून, ‘फॉर्म’ निर्माण करून- दोन ओळी, दोन ओळीमध्ये अंतर, पुन्हा बाजूला एखादी ओळ. बाकी त्यानंतरची कविता आपल्या मनात घोळणारी. आणि काही न सांगताच अनेक गोष्टींची चेतावणी देणारी. ‘रान ओले’, ‘झाड’, ‘रातझडीचा पाऊस’ यांसारख्या दहा-बारा कवितांमध्ये शब्दांची, छंदांची नवी वीण त्यांनी प्रसवून पाहिली. हलकं गीत त्यात आहे. कुमार गंधर्वानी लोक कवितांमधून चिजा निर्माण केल्या. आपणही कवितेपुरतं काही करू असा विचार त्यांनी केला तोही गांभीर्याने. यातून त्यांनी जे निर्माण केलं ते अनेक क्षेत्रांतल्या रसिकांनी, साहित्यिक कवींनी मनापासून स्वीकारलं. त्यातल्या कृषिसंस्कृतीतल्या यापूर्वी कवितेत न आलेल्या नवेपणामुळे. कवितेच्या असतेपणामुळे. याचं एवढं स्वागत होईल, आणि मोहोळासारखी माणसं त्यामुळे आयुष्यभर बिलगून राहतील असं त्यांना कधी वाटलं नव्हतं. सगळंच नवलाईचं, आनंददायी झालं, स्वप्नातल्या कवितांनी आयुष्य हिरवं केलं सर्वार्थाने असं महानोरांना वाटतं.

दुष्काळ, शेतीची उद्ध्वस्तता यातला तोच तोपणा महानोरांनी टाळला. घट्टपणाने आल्या त्याच कविता ठेवल्या. दुष्काळाची ‘ग्रीष्माची कविता’ आणि अशाच शेती दुष्काळाच्या कविता, व्यक्तिगत दुखाच्या कविता पाच-सात संग्रहांत ठेवल्या. त्यांचे मित्र चंद्रकांत पाटील यांनी ‘प्रतिष्ठान’मध्ये ‘आठ कविता रानातल्या’ छापून आणल्या. त्याच वेळी ‘सत्यकथे’तही. सगळे नवे, त्या आधीचे साहित्यिक पळसखेडला येत गेले. राजकीय, सामाजिक, कला साहित्यातले दिग्गज येत राहिले. चार प्रकाशकांनी कवितासंग्रह मागितला. पहिलाच संग्रह म्हणून ‘रानातल्या कवितां’ची निवड, क्रम चंद्रकांत व महानोरांनी मिळून अतिशय काळजीपूर्वक ठरवला. रामदास भटकळ यांनी ‘नवे कवी, नवी कविता’ या योजनेत तो प्रकाशित केला. (१९६७) त्याच वेळी त्याला राज्य शासनाचा पहिला मानाचा ‘केशवसुत पुरस्कार’ मिळाला. दुसऱ्या दिवशी भटकळांनी मुंबईत ग्रेस, सुर्वे आणि महानोर असा कविता वाचनाचा छान कार्यक्रम घडवून आणला आणि महाराष्ट्रभर महानोर एक महाराष्ट्राच्या रानातले कवी म्हणून सुपरिचित झाले. शंभर तरी कमीत कमी नावं घ्यावी लागतील असे रसिक साहित्यिक महानोरांच्या पळसखेडला आले. सतत येत गेले. खेडं नामवंत झालं. कवी बा. भ. बोरकर, श्रीमती विजया राजाध्यक्ष यांनी १९६८ मध्ये ‘सत्यकथे’मध्ये दीर्घ लेख लिहिले. मराठी भाषा जिथे असेल तिथे जगभर महानोरांना हा गोतावळा लाभला. खेडय़ातलं दुःख – दुष्काळ - कौटुंबिक व गावकीची धुळवड आयुष्याला वेटाळून असली तरी कवितांनी ती हलकी केली.

महानोर कविता जगले आणि त्यांच्या कवितेतून शेतशिवारं, वेस, शीव, गावकूसा, पाणंदा, आड विहिरी, पिकं, जित्राबं आणि सरते शेवटी काळी आई सगळं मराठी माणसाच्या घरादारात अंगणात पडवीत पाझरत राहिलं. मराठी माणूस समृद्ध होत गेला.

- समीर गायकवाड

महानोरांच्या काही निवडक कवितांचे अंश नजरेखालून घातले तर त्यांचे म्हणणे अंतःकरणापासून पटते.

‘जन्मापासूनचे दुख, जन्मभर असे
जन्मभर राहो, मला त्याचे न फारसे

साऱ्यांसाठी झाले, उभ्या देहाचे सरण
सगे सोयरेहि कधी जातात दुरून

फुले वेचतानासुद्धा ओथंबते मन
जन्माचेच ओझे पोटी घट्ट लपेटून 

डोळे गच्च अंधारून, तेव्हा माझे रान
रानातली झाडे मला फुले अंथरून’
_______________________________________

झाकड पडली, थांबू नकोस
ओझं होईस्तोवर कवळाचा भारा बांधू नकोस
आधीच तर तू सकवार फ़ार
चिटपाखराच्याही नजरेत भरशील अशी
त्यात,
या जांभळ्या लुगड्याने तू अशी दिसतेस
मोहाच्याही झाडाला मोह व्हावा. आणि या पांदीत
तुला लुबाडावं . अगदी तुझ्या सर्वस्वासकट.
बघ ना, काळोख कसा झिंगत येतोय,
तुला या काळोखात कवळून घ्यायला
थांबू नकोस!
_____________________________________

मी रात टाकली, मी कात टाकली
मी मुडक्या संसाराची बाई लाज टाकली

हिरव्या पानांत, हिरव्या पानांत
चावंळ चावंळ चालती
भर ज्वानीतली नार
अंग मोडीत चालती

ह्या पंखांवरती, मी नभ पांघरती
मी मुक्त मोरनी बाई, चांदन्यात न्हाती

अंगात माझिया भिनलाय ढोलिया
मी भिंगरभिवरी त्याची गो माल्हन झाली
मी बाजिंदी, मनमानी, बाई फुलांत न्हाली
___________________________________

नभं उतरू आलं, चिंब थरथर वलं
अंग झिम्माड झालं, हिरव्या बहरात

अशा वलंस राती, गळा शपथा येती
साता जल्मांची प्रीती, सरंल दिनरात

वल्या पान्यात पारा, एक गगन धरा
तसा तुझा उबारा, सोडून रीतभात

नगं लागंट बोलू, उभं आभाळ झेलू
गाठ बांधला शालू, तुझ्याच पदरा
____________________________________

आज उदास उदास दूर पांगल्या साउल्या
एकांताच्या पारावर हिरमुसल्या डहाळ्या

काही केल्या करमनां, कसा जीवच लागंना
बोलघेवडी साळुंकी, कसा शब्द ही बोलंना
असा रुतला पुढ्यात भाव मुका जीवघेणा
________________________________

गोऱ्या देहावरती कांति, नागीणीची कात

येडे झालो आम्ही ज्यावी, एक दिसं रात
तुझ्या रूपाचं बाशिंग डोल्यात
तुझ्यावाचून सुन्नाट दिनरात

असा बोल बोलती जग पंखात घेती
असं एखादं पाखरू वेल्हाळ
ज्याच्या भांगात बिंदिचा गुल्लाल

काल्या एकल्या राती मन मोडून जाती
असं एखादं पाखरू वेल्हळ
ज्याला सामोरं येतया आभाळ

याला काय लेवू लणं, मोतीपवळ्याचं रान ?
राती चांदण्या रानात शिणगार
सारी दौलत जरीच्या पदरात
______________________________

राजसा…

जवळी जरा बसा
जीव हा पिसा
तुम्हावीण बाई
कोणता करू शिणगार
सांगा तरी काही.
त्या दिशी करुन दिला विडा
टिचला माझा चुडा
कहर भलताच
भलताच रंगला कात
लाल ओठात.
राजसा
जवळी जरा बसा….
ह्या तुम्ही शिकविल्या खुणा
_____________________________

अवेळीच केव्हा दाटला अंधार
तिच्या गळा जड झाले काळे सर
एकद मी तिच्या डोळ्यात पाहिले
हासताना नभ कलून गेलेले

पुन्हा मी पाहिले तिला अंगभर
तिच्या काचोळीला चांदण्याचा जर
आणि माझा मला पडला विसर
मिठीत थरके भरातील ज्वार

कितीक दिसांनी पुन्हा ती भेटली
तिच्या ओटी कुण्या राव्याची साऊली
तिच्या डोळियात जरा मी पाहिले
काजळात चंद्र बुडून गेले
_________________________________

चिंब पावसानं रानं झालं आबादानी
झाकू कशी पाठीवरली, चांदण गोंदणी…
झाकू नको कमळनबाई, एकांताच्या कोनी
रुपखनी अंगावरली, सखे लावण्याची खाणी…

राया तुझे हात माझ्या हातात गुंफूनी
उन्हात चांदणं आलं लाज पांघरुनी…
तुझ्या डोळ्यांच्या सांदीत, सावल्यांची राणी
पान्यामंदी झिम्मा धरं, आभाळ अस्मानी…

अंगावरी थरथर उठली झिम्मड भिजल्यावानी
सांगता न येई काही साजणा बोलांनी…
_______________________________

घन ओथंबून येती, बनांत राघू भिरती
पंखा वरती सर ओघळती, झाडांतून झडझडती

घन ओथंबून झरती, नदीस सागर भरती
डोंगर लाटा वेढित वाटा, वेढित मजला नेती

घन ओथंबून आले, पिकांत केसर ओले
आडोशाला जरा बाजूला, साजन छैल छबिला घन होऊन बिलगला
__________________________________________________


साभार लेख नोंद -‘रानातल्या कवितां’ची कुळकथा - ना. धों. महानोर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा