मंगळवार, २४ मे, २०२२

फिलिपिन्समधील निवडणुकांचे धक्कादायक वास्तव..

#sameerbapu, sameergaikwad, sameerbapu, समीर गायकवाड
मार्कोस ज्युनियर यांच्या विजयाचे अन्वयार्थ काय लावायचे ? 

नुकत्याच पार पडलेल्या फिलिपिन्सच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत फर्डिनांड मार्कोस ज्युनियर यांचा विराट विजय होताच चीनी प्रसारमाध्यमांना आनंदाचे भरते आले. चीनची सरकारी वृत्तसंस्था असणाऱ्या झिन्हुआचा खुनशी उन्माद बातम्यांच्या शीर्षकांतून ओसंडून वाहत होता तर ग्लोबल टाईम्स या अन्य एका सरकारी नियंत्रित दैनिकात देखील याचे वार्तांकन करताना जो बिडेन यांच्या नावाने मल्लिनाथी करण्यात आली होती. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने काहीशी सौम्य भूमिका घेत झिन्हुआची री ओढली होती. ग्लोबल टाईम्समध्ये हर्मन टीयू लॉरेल यांनी लिहिलं की मार्कोस ज्युनिअर हे आपल्या पूर्वसुरींच्या मार्गावरून वाटचाल करताना चीनशी असलेले संबंध बळकट करतील आणि आपल्या पद्धतीने फिलिपिन्सला आकार देतील ! लॉरेल हे सामान्य लेखक नाहीत, ते फिलिपिनो थिंक टॅंक म्हणून विख्यात आहेत, फिलिपिनो ब्रिक्स स्ट्रॅटेजीचे ते संस्थापक आहेत, फिलिपिन्सच्या सरकारी मीडियामध्ये ते माध्यमकर्मी आहेत, त्यांना तिथल्या राजकारणाचे बारकावे उत्तम ठाऊक आहेत. हे पाहू जाता त्यांच्या भाष्याकडे गांभीर्याने पाहायला हवे. फिलिपिन्स हा बेटांचा समूह असणारा देश जगाच्या नकाशाच्या दृष्टीने छोटासा असला तरी त्याचे भौगोलिक स्थान महत्वाचे आहे. तिथली बदलती राजकीय गणिते कोणत्या नव्या समीकरणांना जन्म देऊ शकतात हे जाणून घेण्यासाठी मार्कोस ज्युनियर यांचा पूर्वेतिहास धुंडाळणे क्रमप्राप्त आहे.