रविवार, ३० सप्टेंबर, २०१८

बदनाम गल्ल्यांचा अक्षर'फरिश्ता' - मंटो !


सआदत हसन मंटो यांच्या जीवनावरचा नवाजुद्दिन सिद्दिकी अभिनित 'मंटो' हा चित्रपट २१ सप्टेबर रोजी रिलीज झालाय. नंदिता दास यांनी त्याचं दिग्दर्शन केलंय. मंटोच्या कथांवर आधारलेले 'काली सलवार', 'मिर्जा- गालिब', 'शिकारी', 'बदनाम', 'अपनीनगरियां' हे सिनेमे येऊन गेलेत. शिवाय पाकिस्तानमध्येच त्यांच्यावर जिओ फिल्म्सने बनवलेला याच नावाचा बायोपिक येऊन गेलाय. या चित्रपटात मंटोच्या काही प्रसिद्ध कथा समोर येतात, कथेतली पात्रे येतात, मंटोच्या आयुष्यातील काही महत्वाच्याघटनांचा पट रंगत असताना या कथातील पात्रे मध्ये येतात त्यामुळे रसभंग होतो. मंटो दाखवायचे म्हणजे त्यांच्या आयुष्यातल्या घटनांचा पट उलगडताना त्यांच्या कथांवर भाष्य होणं अनिवार्यच आहे. मात्र चित्रपट संपल्यानंतर मंटो जितके लक्षात राहतात तितक्याच त्यांच्या कथाही लक्षात राहतात. मात्र एकूण परिणाम साधण्यात चित्रपट कमी पडतो. असं का होतं ? हा या चित्रपटाच्या रसग्रहणाचा भाग होऊ शकतो. इस्मत चुगताई कोण होत्या, मंटोच्या जीवनात वेश्यांचं काय स्थान होतं आणि मुख्य म्हणजे मंटोनी तत्कालीन साहित्याच्या तथाकथित मापदंडांना सुरुंग लावत कोणतं साहित्य लिहिलं होतं हे विस्ताराने समोर न आल्याने ज्यांना या विषयी काहीच माहिती नाही वा अल्पशी माहिती आहे त्यांच्या पदरी फारसं काही पडत नाही. मंटो समजून घेण्याआधी त्यांचं साहित्य समजून घ्यायला हवं मग ते पानागणिक उलगडत जातात !

शनिवार, २९ सप्टेंबर, २०१८

'चलो ज़िंदगी को मोहब्बत बना दें' : जगजीत आणि चित्रा सिंग - एका अनोख्या प्रेमाची कथा ...


रात्र गडद होत गेल्यावर चित्रासिंग आपल्या शयनकक्षातले दिवे मालवतात. म्लान उजेडाच्या साथीने तिथे अंधार वसतीस येतो. चित्रांना आता वेध असतात रात्रीतून तिथे सुरु होणाऱ्या मैफलीचे. आस्ते कदम तिथे मंच उभा राहतो, प्रेक्षक जमा होतात, पुढ्यात हार्मोनियम घेऊन बसलेले जगजीतसिंग अवतीर्ण होतात. रात्र जशी सरत जाते तसतशा गझलांच्या एकामागून एक मैफली सजतात. लोक आनंद घेत राहतात. टाळ्यांचा गजर होत राहतो. 'वन्समोअर'चे पुकारे होत राहतात, वीणा झंकारत राहते. मधूनच भानावर येणाऱ्या चित्रा आपल्या डोळ्यांच्या कडा पुसत दीर्घ निश्वास सोडतात. उत्तररात्रीच्या अखेरच्या प्रहरी थकलेल्या चित्रा त्यांच्या नकळत डोळे मिटून शांतपणे झोपी जातात. तेंव्हा फुलांनी सजलेला मंच अदृश्य होतो, टाळ्या वाजवणारे रसिक श्रोते लुप्त होतात. एक नीरव शांतता पसरते आणि खांद्यावर मखमली किरमिजी रंगाची शाल पांघरलेले, पांढऱ्या शुभ्र वस्त्रातले जगजीतजी त्यांच्या जवळ जाऊन त्यांच्या कोमल म्लान चेहऱ्यावरून आपला थरथरता हात फिरवतात. त्यांच्या डोळ्यातून ओघळणारा उष्म अश्रूंचा थेंब चित्रांच्या गाली पडायच्या आधी अदृश्य होतात. शीतल वाऱ्याच्या झुळुकेने जाग यावी तद्वत चित्रा जाग्या होतात. एकवार डोळे उघडतात आणि किंचित मंद स्मित करत पुन्हा झोपी जातात.

बुधवार, २६ सप्टेंबर, २०१८

मंटो, भाऊ पाध्ये, 'वासूनाका' आणि आचार्य अत्रे ...
भाऊ उर्फ प्रभाकर नारायण पाध्ये यांचा जन्म २६ नोव्हेंबर १९२६चा. ते दादरचे. त्यांच्या कथा कादंबऱ्यांनी तथाकथित लेखन सभ्यतेच्या अक्षरशः चिंधडया उडवल्या. सआदत हसन मंटोंनी जे काम हिंदीत केलं होतं तेच थोड्या फार फरकाने भाऊंनी मराठीत केलं होतं. मंटोंना निदान मृत्यूपश्चात अफाट लोकप्रियता मिळाली, लोकांनी त्यांना डोक्यावर घेतलं, त्यांच्यावर कवने रचली. त्या मानाने भाऊ कमनशिबी ठरले. त्या काळात साधनांची वानवा असूनही भाऊंचे शिक्षण चांगलेच झाले होते. १९४८ साली मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात त्यांनी पदवी संपादन केलेली. पदवी संपादनानंतर काही काळ (१९४९-५१) त्यांनी कामगार चळवळीत कार्यकर्ता म्हणून काम केलं. त्यानंतर तीन वर्षँ ते माध्यमिक शाळेत शिक्षकाचे काम केलं. नंतर वडाळ्यातील स्प्रिंग मिल येथे चार वर्षँ व एलआयसीत चार महिने त्यांनी कारकुनी केली. १९५६ मध्ये शोशन्ना माझगांवकर या कामगार चळवळीतील कार्यकर्तीशी त्यांचा विवाह झाला. काही काळ त्यांनी 'हिंद मझदूर', 'नवाकाळ'(१ वर्ष) व 'नवशक्ती'(१० वर्षं) या वृत्तपत्रांमधून पत्रकारिता केली. 'नवशक्ती' सोडल्यावर काही काळ त्यांनी 'झूम' या सिने-साप्ताहिकाचे संपादन केलं. 'रहस्यरंजन', 'अभिरुची', 'माणूस', 'सोबत', 'दिनांक', 'क्रीडांगण', 'चंद्रयुग' या नियतकालिकांतून स्तंभलेखन केलं.१९८९पासून अर्धांगाच्या आघाताने त्यांना लेखन अशक्य झालं. ३० ऑक्टोबर १९९६ रोजी त्यांचं निधन झालं.

शनिवार, २२ सप्टेंबर, २०१८

तपस्वी कर्मयोगी - भाऊराव पाटील


आपल्या मुलास दरमहा दहा रूपये कोल्हापूर दरबाराची स्कॉलरशिप मिळत असे हे कळल्यानंतर तातडीने कोल्हापूरला येऊन त्या रकमेतील फ्क्त दोन रूपये त्याला खर्चासाठी ठेवायला सांगून उर्वरित आठ रूपये आपल्या सार्वजनिक संस्थेमध्ये जमा करायला सांगणारे ते एकमेव संस्थाचालक वडील असावेत. आपली स्वतःची इतकी मोठी शिक्षणसंस्था असूनही मुलाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उद्भवला तेंव्हा त्यांनी मुलाला पाठविलेल्या पत्रात ते म्हणतात,"तु संस्थेमध्ये नोकरी करू नये अशी माझी पहिल्यापासून इच्छा होती व आजही आहे . ज्या संस्थेच्या स्टोअर्समध्ये तु काम करीत आहेस त्या स्टोअर्सला चालू साली फारसा नफा झालेला नाही. व यापुढेही मुळीच होणार नाही. त्यामुळे स्टोअर्सला नोकर कमी करावे लागतील त्यात तुला कमी न करता दुस-यास कमी करावे लागेल हे स्वभाविक आहे. अशावेळी तू होऊन नोकरी सोडावी व विमा कंपनीचा अगर इतर धंदा तु करावा अशी माझी तुला प्रेमाची सूचना आहे." यातून त्यांची तत्त्वनिष्ठा आणि त्याग यांचे दर्शन घडते.

सोमवार, १७ सप्टेंबर, २०१८

कैफ...ती एकदोन दिवसात निघून जाणार होती.
कसाबसा तिचा निरोप मिळाला, 'भेटायला ये.'
नेहमीप्रमाणे वेळेवर पोहोचण्याचा निश्चय करूनही बऱ्याच उशिरा पोहोचलो.
ठरवलेल्या जागी जाईपर्यंत काळजात धाकधूक होत होती.
काय झालं असेल, का बोलवलं असेल, पुढं काय होणार एक ना अनेक प्रश्न.
सिद्धेश्वर मंदिरालगतच्या तलावालगत असलेल्या वनराईत तिने बोलावलेलं.
मला जायला बहुधा खूपच विलंब झालेला.
वाट बघून ती निघून गेली होती...
खूप वेळ थांबलो, पाण्याचा सपसप आवाज कानात साठवत राहिलो,
ती जिथं बसायची तिथं बसून राहिलो,
तिच्या देहाचा चिरपरिचित गंध वाऱ्याने पुरता लुटून नेण्याआधी रोम रोमात साठवत राहिलो.

शनिवार, १५ सप्टेंबर, २०१८

डिजिटल साहित्यातून नवी वाचन चळवळ..जगभरात मागील काही दिवसांत कोलाहलाच्या, विद्वेषाच्या आणि आपत्तींच्या अप्रिय घटनांच्या बातम्या सातत्याने समोर येताहेत त्यामुळे वातावरणास एक नैराश्याची झालर प्राप्त झालीय. या गदारोळात भिन्न परिप्रेक्ष्यातल्या दोन वेगवेगळ्या वृत्तांनी हे मळभ काहीसे दूर होईल. यातली एक घटना वाचनचळवळीच्या पुनरुत्थानाशी निगडीत आहे जी स्थलसापेक्ष नाही, ती एकाच वेळी जगाच्या पूर्वेस आणि पश्चिमेसही घडलीय. तर दुसरी घटना आशियाई देशातल्या विरंगुळयाच्या बदलत्या व्याख्यांशी संदर्भित आहे. या दोन्ही घटना म्हणजे गेल्या काही वर्षातील आधुनिक मानवी जीवनशैलीच्या अतिरेकी डिजिटलवर्तनाचा परिपाक असणाऱ्या कालानुगतिक प्रक्रिया आहेत, ज्याचा दृश्य परिणाम आता दिसून येतोय. त्याचा हा आढावा.

शनिवार, १ सप्टेंबर, २०१८

जैविक इंधनावरील विमान उड्डाणाची तथ्ये


२८ ऑगस्टला 'स्पाईसजेट' या खाजगी विमान वाहतूक कंपनीने विमानाचे इंधन एव्हिएशन टर्बाईन फ्युएल’ (ए.टी.एफ.) व बायोफ्युएल (जैवइंधन) एकत्रित वापरून (मिश्रण प्रमाण ७५/२५) डेहराडून ते दिल्ली हा वीस मिनिटांचा प्रवास केला. हे उड्डाण सफल होताच अनेक हौशा-गवशांनी आपले 'पुष्पक विमान' काल्पनिक हवेत उडवत कल्पनास्वातंत्र्याची ‘कोटीच्या कोटी उड्डाणां'च्या 'गगनभराऱ्या' केल्याचे पहावयास मिळाले. आर्थिक व पर्यावरणाच्या अंगाने आणि भविष्याच्या दृष्टीने बायोफ्युएलच्या वापराचा प्रयोग उपयुक्त आहेच याबाबत दुमत असण्याचे काहीच कारण नाही. पण या विमानोड्डाणानंतर अनेकांनी ज्या पुड्या सोडल्या त्या पाहू जाता रमर पिल्लेची आठवण झाली. आपल्या देशात जडीबुटी वापरून कोणताही आणि कुठल्याही अवस्थेतला जुनाट आजार बरा करता येतो असा एक गैरसमज दृढ आहे. परंतु केवळ रोगोपचारच नव्हे तर आपली इंधन समस्यासुद्धा वनस्पती इंधनाच्या अभूतपूर्व शोधातून जादूच्या कांडीसारखी सुटू शकते यावर ९०च्या दशकात कैकांनी विश्वास ठेवला होता. या जैवइंधनाचा संशोधक केवळ हायस्कूलपर्यंत शिक्षण झालेला, रमर पिल्ले हा तमिळ युवक होता हे विसरण्याजोगं नाही. लाथ मारीन तिथं इंधन काढीन या अविर्भावात बायोफ्युएलचे सोनं गवसलल्याचा दावा त्याने केला होता. अवघ्या काही रुपयात पाचेक लिटर पेट्रोलएवढी ऊर्जा त्याचे हर्बलफ्युएल देऊ शकते या त्याच्या दाव्यावर भारतीय वैज्ञानिक, आयआयटी सारख्या तंत्रज्ञान संस्थेतील काही अभियंते, सरकारच्या विज्ञान - तंत्रज्ञान खात्यातील टेक्नोक्रॅट्स आणि एतद्देशिय अस्मितागौरवगायक मंडळींना या संशोधनाने भंजाळून सोडले होते. पिल्लेचा दावा खोटा होता, तो जे बायोफ्युएल वापरायचा त्यात गुप्तपणे पेट्रोल मिसळले जात होते. याचा सुगावा लागताच सगळ्यांचे मुखभंजन झाले. आतादेखील संमिश्र बायोफ्युएलवर उडवलेल्या विमान उड्डाणानंतर अनेकांना रमर पिल्लेची बाधा झाली की काय असे वाटावे असे चित्र दिसते.