Thursday, March 30, 2017

'शोले', आरडी आणि जिना लोलोब्रिजीड - एक अनटोल्ड स्टोरी...खाली दिलेल्या लिंकमधील कृष्णधवल फोटोची गोष्ट 'शोले'शी संबंधित आहे आणि यातील उजव्या बाजूच्या स्त्रीविषयीची माहिती अत्यंत रम्य आहे. पण त्या आधी हा सर्व काय प्रकार होता याची थोडीशी माहिती घेतली तरच सर्व नीट उमजेल..... १९७५ ला 'शोले' रिलीज झाला आणि त्याने बॉक्स ऑफिसला अशी आग लावली की ऑलटाईम ब्लॉकबस्टर मुव्ही लिस्टमध्ये अजूनही तो अग्रस्थानी आहे. 'शोले'बद्दल अनेकांनी अनेकवेळा लिहिलंय कारण त्यात प्रचंड कंटेंट ठासून भरलेलं आहे. 'शोले'तलं हेलनवर चित्रित केलेलं 'मेहबूबा मेहबूबा' हे अप्रतिम गाणं अफाट गाजलं होतं. आरडींना हे गाणं आधी आशाजींकडून प्लेबॅक करून हवं होतं.Tuesday, March 28, 2017

रेड लाईट डायरीज - पांढऱ्यावरती काळे ....सांगलीच्या काळ्या खाणीनजीक असणार्‍या सुंदरनगर वेश्या वस्तीत झडलेला संवाद...

"काय चंद्रा (चंद्रकला - आडनाव लिहित नाही, नाहींतर आपल्या अनेक पुण्यवान लोकांना तिचा जातधर्म हुंगावासा वाटतो ) कशी आहेस ? खूप दिवसांनी तुला भेटतोय म्हणून विचारतोय .... " पहिल्या प्रश्नापासून वातावरण रिलॅक्स करण्याचा माझा प्रयत्न.
"कशी असणार ?" तिचा अत्यंत तिरकस सवाल. "कशी असायला पाहिजे ? आणि कशी जरी असली तरी काय फरक पडणार ?"
साडीच्या निरया दोन्ही हाताने आवळत मधोमध त्याचा झोळणा करून ती वाकून खुर्चीत बसते....
"ते ही खरं आहे !" मी थोडासा सावध झालेलो.

इकडच्या तिकडच्या बऱ्याच गप्पा झाल्या. काही माहिती तिने पुरवली. तो दिवस गुढी पाडव्याचा होता, त्यामुळे एका क्षणासाठी डोक्यात एक प्रश्न घोंघावला.
आणि चुकून तो प्रश्न तोंडून बाहेर पडला.
"तू सणवार करत नाहीस का ?" आता प्रश्नाची खिंड लढवायचीच या हेतूने माझी तयारी सुरु झालेली..

"मला काय जातधर्म आहे का ?... हे बघ इथे येणारा जातधर्म बघत नाही. तो विचारत नाही की बाई तुझं नाव काय ? मग मी काय सणवार करू ?" कंबरेला लावलेले कानकोरणं बाजूला काढून तिनं साडीच्या एका चिमटीत खसकन पुसलं आणि दंडावरील ब्लाऊजला घासून त्यावर फुंकर मारून ते थेट दातांच्या फटीत घातलेलं.

"माझा प्रश्न वेगळा आहे... मी ते नाही विचारलं" माझी पोपटपंची सुरूच.
"मी त्येचंच तर उत्तर देत्यी ना !" गालांचा चंबू करून कानाची पाळी जोरात पिरगाळून तिनं तिचं घोडं पुढं दामटलं.

"हे बघ. ज्युगार, शराबखाना आणि रंडीखाना या तीन जागी लोक आपल्या बाजूला बसलेला आपल्या पेहचानचा नसावा याची फिकीर करतात. पण त्यांना कोणत्याही जातीचा धर्माचा पार्टनर चालतो. बस्स चीज पसंद आनी चाहिये, ये एकच तो उसूल है.." खुर्चीवरून तिचा भरभक्कम देह उठला. मागच्या बाजूने साडी झटकत ती पुढे गेली. तोंडात साठलेलं गबाळ थुंकून परत जागेवर आलेली.

चंद्रा घरात थुंकत नाही. गिऱ्हाईकाला पण थुकू देत नाही. कधी कधी थुकणाऱ्याला ठोकून काढते.
छद्मीपणे हसत हसत तिने विचारलं, "हां, तर तू इच्यारत होतास की, मी सणवार करते का नाही ? होय ना ?" मी खुश.

तिचा चेहरा इतका गोल गरगरीत होता की नाकावर कर्कटक ठेऊन वर्तुळ काढले असते तर ते तिच्या चेहऱ्याच्या आकाराचेच झाले असते. तिच्या गालावर जीवघेणी खळी पडायची. आताही तशी खळी पडली होती.


डोक्याच्या मागच्या बाजूला हात नेत तिने मोकळे लांबसडक केस जोरात झटकले आणि माझ्याकडे विजयी मुद्रेने पाहिले.
मी ओळखले, हिच्या डोक्यात काही तरी खतरनाक उत्तर पैदा झालेलं असावं.

एव्हढ्यात बऱ्याच वेळापासून तिच्याकडे छुप्या नजरेने पाहणारया एका पंचविशीतल्या पोराला तिने हाक मारून बोलावलं.
पुढचा सीन मला ठाऊक असल्याने मी तिच्या आतल्या खोलीतल्या फ्रीजमधील थंडगार पाणी प्यालो. हिरव्या काळ्या निसरडया टाईल्सने माखलेल्या बाथरूमपाशी जाऊन तोंडावर पाणी मारलं. तोंड पुसत बाहेर आलो.
त्या पोराला तिनं डाव्या बाजूच्या खोलीत पाठवलेलं.

"मी कशासाठी सण करू ? मी सणवार केले तर माझ्या गिऱ्हाईकला माझी नको असलेली जातधर्माची बात मालुमात होईल ना ! नस्ते वांदे कोणी करायला सांगितलेत ?"

निमुळत्या हनुवटीवरून सापाने अलगद सरकत जावे तसा तळहात फिरवत तिने थेट कानामागे नेला आणि बोलली, "आज समदीकडं गुढी आसंल ना ? माझ्या गावी मी ल्हान असताना हुबी करायचे... आता करतात की नाही माहिती नाही... पण इथं मी कधी केली नाही..."

ओठांचा धनुष्यबाण करत खालचा ओठ हलकेच पुसून घेत तिने पितळी तबकातलं पान बाहेर काढलं. माझ्याकडे हात केला. मी नाही असं खुणावताच पानविडा अलगद तोंडात घालत ती बोलती झाली.
"अरे रंडीला मजहब नसतो... तिला त्यौहार नसतो.... तिचा एकच धरम - बदन सेकने का !" अत्यंत खुनशी हसली ती.

"तिचा त्यौहार कपड्यात लपेटलेला... साडी निकाल दी तो त्यौहार खतम !" डोळ्यातलं नशीलंपण पुरतं एकत्र करून माझ्यावर डोळे रोखत तिचा रोकडा सवाल येतो.

"तू सांग माझी कोणची साडी गुढीत बांधू ? पहिल्या रात्रीची की आजच्या रात्रीची ?... नई साडी आणली तरी पुन्हा ती साडीदेखील कोणी तरी फेडणार ना ? मग कशाची रे गुढी हुबी करू ?" एखाद्या झुरळाकडे बघावं अशा तुच्छतेनं ती आता बघत होती.
माझे तोंड उतरलेले पाहून ती बोलली "जाऊ दे, तू दिल कशाला छोटा करतोस ? माझी राखी येते ना तुला ?"
"मी होळीला रंग खेळते... गांजा पिते... नशा करते आणि ऐश करून झोपी जाते... त्या दिवशी कोणाला हात लावू देत नाही... "

गळ्यातल्या सोन्याच्या सरीवरून हात फिरवत किंचित उतरलेल्या आवाजाने ती बोलते, "हे बघ, ज्या दिवशी कोणी अंगाला हात लावत नाही ना तोच आमचा सण... पण मी जर रोज रोज सण साजरा करू लागली तर पोटाला काय खाणार ? म्हणून रंडीने सण करायचा नसतो...."

"ये सब छोड दे... तुला एकदम पक्की इन्फर्मेशन देते ... तेव्हढाच मला आशीर्वाद... " मी निरुत्तर झालोय हे ओळखताच तिने कामाची गोष्ट काढली आणि माझ्या डोक्यातले एक मळभ दूर झाले. मात्र तिने सण साजरा करावा, न करावा किंवा त्याऐवजी तिला काय करता येईल या प्रश्नांचे भूत तसेच राहिले....

- समीर गायकवाड.

(सूचना - लेख वाचून कोणत्याही जातीधर्माचे किंवा सणांचे तत्वज्ञान शिकवण्याचा प्रयत्न करू नये. कोणत्याही समुदायाच्या भावना दुखावणे हा लेखाचा हेतू नाही. सभ्य पांढऱ्यावरती असणारे काही लसलसते काळे जगापुढे मांडणे हा लेखनहेतू आहे )


नवविचारांची गुढी ...

चैत्र शुक्ल प्रतिपदेस 'सालाबादप्रमाणे यंदाही'च्या धर्तीवर महाराष्ट्रात गुढीपाडवा साजरा केला जातो. त्या निमित्ताने राज्यभर विविध आक्षेप साक्षेपांच्या फैरी झडतात. त्यातील काही मुद्द्यांचा हा परामर्श..गुढीपाडवा साजरा करताना त्यामागे असणारी धार्मिक पार्श्वभूमी सांगितली जाते. यानुसार गुढीपाडव्याच्या परंपरेस मुख्यत्वे तीन घटना कारणीभूत आहेत.Saturday, March 25, 2017

वीज....


अन्याबाचं शेत शिवार लई तालेवार नव्हतं. दहा एकराचं रान असंल. पण अन्याबाचा सगळा जीव तिथंच गुंतलेला असायचा. गावातनं वेशीबाहेर येऊन वरल्या अंगाने गावदेवाच्या भोवताली वळसा घालून गेलं की अन्याबाच्या शेताकडं नेणारी गाडीवाट लागायची. वाटंनं कुणा कुणाची शेतं लागायची. पवाराचं रान लांबलचक होतं. सगळी जमीन मशागत करून एक नंबरमध्ये आणलेली आणि पिकांनी नुसती टरारून गेलेली असायची. तिथून पुढं भोसल्यांची बरडपट्टी लागायची अन त्याच्याही पुढं गणू पाटलाचं ओसाड पडलेलं शेत लागायचं. त्यांचा खंडकरी देखील शेत सोडून गेलेला. असंच मजल दरमजल करत पांढरा फुफुटा तुडवत पुढं गेलं की बेड्ग्याचा निर्मनुष्य माळ लागायचा. सगळीकडे खुरटी झुडपं, अधून मधून वाढलेल्या वेड्या बाभळी अन पिवळं पडलेलं गवत. मध्येच लागणारे दगडधोंड्यांचे बेचके, पायी चालत जाणाऱ्या लोकांनी बनवलेल्या दोन तीन जुनाट पाऊलवाटा एकमेकींना छेद देत माळाच्या चारी अंगाला जाऊन भिडायच्या. या रानात बेडगं चालवलं तरी त्याचे बैल मरतात अशी वदंता असल्याने रान तसंच पडीक पडलेलं आणि त्याचं रुपांतर पडीक माळात झालेलं. अन नाव देखील बेड्ग्याचा माळ पडलेलं. अन्याबाच्या शेतात जाण्यासाठी हा मधला मार्ग होता पण इथं गाडीवाट नव्हती, शिवाय गाडी आत घातली तर बैलाच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर काय घ्या !


Thursday, March 23, 2017

घाल घाल पिंगा वाऱ्या … मधुर काव्यस्मृती.. कवी निकुंब ...एक काळ होता जेंव्हा दळणवळणाची साधने अत्यंत अपुरी होती. नवदांपत्याचे विवाह हे बहुतांश करून भारतीय पद्धतीने होत असत. मुलगा मुलीला बघायला तिच्या घरी येई अन मुलीला पाहून झाल्यावर तो त्याची पसंती कळवत असे. यात बऱ्याचदा मुलींचे मत विचारात घेतले जात नसे. मग हीच लगीनघाई पुढे जाऊन मुलाच्या वा मुलीच्या रहिवासी भागात विवाह सोहळा संपन्न होई. पूर्वी ग्रामीण भागात लग्नाचे वऱ्हाड बैलगाडयातून जाई, निमशहरी भागातले वऱ्हाड बंदिस्त ट्रकमधून तर शहरी भागातील वऱ्हाड एसटीबस मधून जाई.


Sunday, March 19, 2017

नव्या दमाचा इराणी सिनेमा ...सद्यकाळात जगभरातील सिनेमा कात टाकतो आहे. अनेक स्थित्यंतरे त्यात येताहेत. छोटेसे कथाबीज असणारे नानाविध विषय असणारे चित्रपट केले जाताहेत. अनेक आशय जे चित्रपटाचा कथाविषय समजले गेले नाहीत त्यावरही चित्रपट निर्मिती केली जाते आहे. हा बदल सुखावहही आहे आणि विचारप्रवण आहे. क्रियाशीलतेवर जास्त लक्ष असणारे कमी बजेटचे चित्रपट बनवून आपलं म्हणणं जगापुढे मांडणं हा नवा फंडा मागच्या वर्षात जगभरातील चित्रपटसृष्टीने अवलंबला होता.Wednesday, March 15, 2017

आम्ही सोलापूरी ....सोलापूरातल्या अनेक बोळ वजा गल्ल्या आणि आडव्या उभ्या चाळीमध्ये काही अभूतपूर्व वाणाची माणसे राहतात, ही म्हटली तर देवमाणसे आहेत नाहीतर सीधी-साधी महापुरुष वजा सोलापूरी माणसे ! विश्वनिहंत्याने ही माणसे घडवताना एक वेगळीच आगळ्या धाटणीची मूस वापरलेली असणार आहे, त्यामुळे यांची जडणघडण जगावेगळी अगम्य आहे. या माणसांत सोलापूरच्या लाल चटणीचे, मऊ इडलीचे, आंबुस ताडीचे, कडू बाजरीचे, गोड हुरडयाचे, उजनीच्या खारटतुरट पाण्याचे, खरमुडया वाणाचे, गोडतिखट सांबाराचे, हलवाई गल्लीतल्या घमघमाटाचे, आबे काबे म्हणणारया एकेरीपणाचे अन डोळे वटारून उग्रट वाटणारया पण हळव्या मनाच्या माणसाचे सगळे गुण अगदी ठासून भरलेले आहेत.


रेड लाईट डायरीज - 'काशी'ची होळी....
तो दिवस होळीचाच होता.
"अरे आज नही पिऊंगी तो कब पिऊ ? सालभर पडून असते कधी काही बोलते का ?"
जळता प्रश्न विचारणारया काशीच्या हातात होळीची 'विशेष' सिगारेट असते. नशेने भरलेल्या डोळ्यांनी आणि किंचित कंप भरलेल्या आवाजात तिचे लेक्चर सुरु झालेलं..
"हे बघ, मी कधी अशी नशा करते का ? नसीमा अम्माने पिने दी तोच मै पिती ना ... अम्मा नाही बोलली की माझं नरडं बंद.
आणि बाकी टाईमला कस्टंबरने दारू आणली तर एखादा घोट प्यावा लागतो. नाही पिली तर तो परत जातो."
"आज त्याच्या दारूचा मान राखावा लागतो. वैसे तो उसकी दी हुयी बिडीसिगारेटभी पीनी पडती है. तसं तर माझ्या चमडीने माझ्याहून जास्ती सिगारेट पिलेली आहे."


Monday, March 13, 2017

८९व्या ऑस्कर सोहळ्यातील चित्रपटांचा आस्वाद - 'ऑस्करायण'...

जगभरातील चित्रपटसृष्टीशी निगडीत असलेल्या प्रत्येक व्यक्तीचे उत्तुंग स्वप्न असणारा 'ऑस्कर' वितरण सोहळा २७ फेब्रुवारीस पार पडला आणि शिगेला पोहोचलेल्या उत्सुकतेची सांगता झाली. लॉस एँजिलिसच्या डॉल्बी थिएटरमध्ये हा भव्यदिव्य सोहळा रंगला होता. कोणाला किती नामांकने मिळाली, कोण बाजी मारणार आणि 'अॅण्ड दी ऑस्कर गोज टू ...' या प्रश्नांना पूर्णविराम देण्याचे काम ८९ व्या ऑस्कर सोहळ्याने चोख पार पाडले.


'ऑस्कर'च्या रेड कार्पेटवर हॉलिवूड स्टार्ससह जगभरातील फिल्मी हस्तींची मांदियाळी पाहायला मिळाली. आजवरच्या निवेदकांपैकी सर्वात कमी मानधन घेतलेला ऑस्कर निवेदक म्हणून गाजलेल्या जिमी केमिलने 'ऑस्कर'मध्ये रंग भरण्याची जीवतोड मेहनत केली पण कभी ख़ुशी कभी गम असेच या सोहळ्याचे एकंदर स्वरूप राहिले. जिमी केमिल आणि मॅट डेमन यांच्यातली रस्सीखेच सभागृहातही अनुभवास आली.


Wednesday, March 8, 2017

अजरामर ग़ालिब .....ग़ालिबच्या पत्नीने अनेक अपत्यांना जन्म दिला. मात्र त्याचं एकही अपत्य जगत नव्हतं. तेव्हा माणसाच्या काही सगळ्याच इच्छा पूर्ण होत नाहीत हे उमजून असलेला ग़ालिब लिहितो…'हजारों ख्वाहिशे ऐसी कि हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले…' या पातळीचं सत्य लिहिल्यानंतरही गालिब स्वतःच्या आयुष्यातून पुत्राच्या इच्छेला बाहेर काढत नाही आणि तो सतत मूल जगण्याची वाट पाहत राहतो. पाचवीला पूजलेली आर्थिक चणचण, एकही अपत्य न जगणं, प्रेयसीचं निधन अशा नैराश्याच्या फेरयात अडकलेला गालिब लिहितो …
'कैदे हयात, बन्देगम, अस्ल में दोनों एक हैं
मौत से पहले आदमी गम से नजात पाए क्यों?…'
असं जेंव्हा तो मन व्यक्तवतो तेव्हा मनातल्या भावना मांडणारे अचूक शब्द आणि त्या शब्दांत भरून राहिलेला अर्थ जाणवून ऐकणारा स्तिमित होतो.Wednesday, March 1, 2017

रेड लाईट डायरीज - 'पवित्र' गंगा-जमुना ...पवित्र काय आणि अपवित्र काय याच्या व्याख्या व्यक्तीपरत्वे भिन्न असू शकतात, पण रेड लाईट एरियात त्या जितक्या तीक्ष्ण आणि कटू असतात तितक्या अन्यत्र असू शकत नाहीत....

जमुनाबाईचे ओठ सदा न कदा पान खाऊन लाल झालेले असत.
वरवर साधी वाटणारी पण एकदम फाटक्या तोंडाची, पक्की जहांबाज !
तिच्या तोंडाचा पट्टा सुरु झाला की भल्याभल्यांना घाम फुटे.
आवाज एकदम मधाळ, ओठातून साखरपाक ओघळावा इतका.
तारसप्तकात चढला तरी त्यातही एक गोडवा वाटे.
हापूस आंब्यासारखी रसरसलेली काया अन मुखडयावर कत्लवाली नजाकत.
एका नजरंत पुरुषाचं पाणी जोखणारी, डोक्यात त्याची कुंडली बनवणारी.
कुणाला कुठवर घोळवायचं, कुणाला खेळवायचं अन कुणापुढं नांगी टाकायची हे तिला चांगले ठाऊक.
कुठल्याही विषयावर बोलताना बागेतून फिरवून आणून अखेरीस आपल्याला हवं तसं धोपटून काढण्यात तिचा हातखंडा.
बोलताना विषय पुरत नसत. तिचे पदराचे चाळे सुरु असत. अंगठा जमिनीवर मुडपून पाय हलवत खुर्चीत रेलून बसे आणि केसांचं विस्कटणं सुरु होई.
आपण काहीही बोललो नसलो तरी ती म्हणे, “हां तो क्या कह रहा था तू ?”
तिनं टाकलेला तो फास असे, सावज त्यात अलगद अडके. मग ती त्याला आपल्या साच्यात घुसळून काढे.
जमुनाचं रसायनच वेगळं होतं, ती या लाईनमध्ये फिटही होती आणि अनफिटही होती.
एका उन्हाळ्यातल्या संध्याकाळी चाईल्डसेक्सवर्कर्सची नवी रसद आल्याचे कळल्यामुळे खबरबात मिळवण्यासाठी तिच्याकडे गेल्यावर तिने आधी हजेरी घेतली.
कदाचित त्या दिवशी माझ्या आधी कुणी तरी तिचा भेजाफ्राय करून गेलं असावं.
नया बच्ची लोग का मालुमात हैं क्या असं म्हणायचा अवकाश तिने विचारलं, “तुला कशाला हवी रे ही जानकारी ?”
तिथेच मी चुकलो, चुकून बोलून गेलो – “ये ऐसाच ग्यान बटोरने के लिये !”
झालं. उत्तर ऐकताच तिच्या डोळ्यात चमक दाटून आली.
“कसलं ग्यान ?” – हातभर पुढे सरकत जमुना बोलली.
माझी तंतरली होती, ऐन वेळेस काय बोलावं ते सुचलं नाही. गडबडीत बोलून गेलो - “तेच ज्ञान, आपलं कर्म आणि कर्माच फळ, त्या शिवाय का कुणी इथं येतं ?”
"बापू तू रंडीखान्यात गीतेचं ग्यान शोधतोस का ! पागल आदमी...
अरे, इथे चमडीचा धंदा होतो, जिस्मफरोशी ! दहा मिनिटात काम तमाम...
वाटल्यास अर्धा एक तास ज्यादा. जास्तीचा कंड असेल तर बारा घंटे नाहीतर फुल नाईट. ..