बुधवार, १५ मार्च, २०१७

आम्ही सोलापूरी ....



सोलापूरातल्या अनेक बोळ वजा गल्ल्या आणि आडव्या उभ्या चाळीमध्ये काही अभूतपूर्व वाणाची माणसे राहतात, ही म्हटली तर देवमाणसे आहेत नाहीतर सीधी-साधी महापुरुष वजा सोलापूरी माणसे ! विश्वनिहंत्याने ही माणसे घडवताना एक वेगळीच आगळ्या धाटणीची मूस वापरलेली असणार आहे, त्यामुळे यांची जडणघडण जगावेगळी अगम्य आहे. या माणसांत सोलापूरच्या लाल चटणीचे, मऊ इडलीचे, आंबुस ताडीचे, कडू बाजरीचे, गोड हुरडयाचे, उजनीच्या खारटतुरट पाण्याचे, खरमुडया वाणाचे, गोडतिखट सांबाराचे, हलवाई गल्लीतल्या घमघमाटाचे, आबे काबे म्हणणारया एकेरीपणाचे अन डोळे वटारून उग्रट वाटणारया पण हळव्या मनाच्या माणसाचे सगळे गुण अगदी ठासून भरलेले आहेत.

सोलापूरी माणूस जन्मतःच असाच असतो, त्याला इथल्या मातीतच हे जीवघेणे आणि जीव वेडावणारे अशा दोन्ही बाळकडूचे कडूगोड संस्कार एकत्रित रित्या मिळालेले असावेत. त्याचे चालणे बोलणे बघणे सगळेच कसं अगदी अंगावर आल्यासारख वाटणारं असं आहे. कसब्यापासून ते कुंभारीपर्यंत आणि मरीआई चौकापासून ते मार्कंडेयनगर पर्यंत सगळे असेच सापडतील ! या मातीतच हा गुण आहे की इथल्या धुळकट हवेत हे जीन्स आहेत हे इथल्या सिद्धरामेश्वरालाच ठाऊक असेल यातमात्र कोणती शंका नसावी.

इथली सर्व माणसे याच मातीत उगवून डोक्यावरचे केस जरी पिकले वा ती कंबरेत जरी वाकली असली तरी ती अखेरपर्यंत ताठ कण्याची सोलापूरी माणसेच बनून राहतात. ती लहानपणी जशी असतात तशीच मोठेपणीही दिसतात, किंबहुना तशीच राहतात. फक्त त्यांच्या गुणात काहीशी वाढ होत जाते. इथली माणसेच तशी आहेत बहुगुणी अन बहुमोली ! वास्तविक इथल्या प्रत्येकाला कागदोपत्री एक नाव असते, त्यांच्या मायबापाने अख्ख्या गल्लीला बोलवून पाहुण्यारावळ्याच्या देखता पाळण्यात घालून नाव ठेवलेले असते. पण ते कमी असते की काय म्हणून गल्लीतल्या गल्लीत अन कामाच्या ठिकाणी त्या प्रत्येकाचे वेगळे नाव असते. अन त्याही पलीकडे प्रत्येकाला एका खास सोलापूरी नावाने हाक मारली जाते. या हाका मारण्याचा अधिकार जवळच्या खास सोलापुरी लोकांनाच असतो. ढापण्या, पिपाणी, शेंवकांडी, खबुतर, उचकी, चिल्लर, फुटकळ, पेढा, दगड, चाबूक, बैल, मेंटल, हुकुम, खिल्वर, डोळस, कंदील, तुराट, भाय, चम्पक, भंपक, शाणा, ढोल, डब्बा, हाडूक वगैरे वगैरे ..असं काहीबाहीचे हे संबोधन असतं. याची एक स्वतंत्र डिक्शनरी होऊ शकते आणि त्यावर चाऊस नामक इसम जगभरात अनोखी लोकप्रियता मिळवू शकतो. सोलापूरी माणसाच्या नावामागचा किस्सा भन्नाट असतो. हा किस्सा कसा आणि काहीही असो मात्र माणसे 'त्या' नावानुरूप असतात हे नक्की ! उदाहरणार्थ एखादा व्यक्ती 'हाडूक' या नावाने (?) विख्यात असेल तो इतका मरतुकडा असणार की वारयाने उडून जावा अन हवेने दचकून जावा ! प्रत्येक टोपणनावाचा असा रंजक इतिहास इथे असतो. साक्षात परमेश्वराला देखील हेवा वाटेल अशी इथल्या प्रत्येक नामाभिधानाची कथा आहे...

बरं नुसते नावापुरतेच किस्से इथे नाहीत, इथे रोज नवे नवे भाषेचे - उच्चाराचे नानाविध किस्से पहावयास मिळतात. सोलापूरी माणसाची भाषा ही अगदी हेवा वाटावी अशी अन अगदी मनमिळाऊ अशी आहे याला कारणही तसेच आहे. इथल्या मायमराठी माऊलीला तीन-चार जीवाभावाच्या बहिणी ज्या इथेच नांदत आहेत, कसब्यातली त्यातही म्हसरे गल्लीतली हेल काढून बोलली जाणारी रसदार कानडी, पूर्व भागातली मधाळ तेलुगु, विजापूरवेस-बेगमपेठची नजाकतदार उर्दू, बाराइमाम चौकापासून ते कोंतम चौकातली सरमिसळ असणरी हिंदी अशा या सर्व बहिणींचे एकमेकीवरचे प्रेम इतके अफाट आहे की यांची भेळ होऊन इथली भाषा प्रत्येक गल्लीत आपला टोन बदलते, तिचा हेल बदलतो आणि लेहजा वेगळा येतो. खांद्याला कांदा म्हणणारी अन कबुतराला खबूतर म्हणणारी माणसे इथेच पाहायला मिळतील ! मी जेंव्हा माझ्या इथल्या कोणत्याही बालमित्राला भेटतो तेंव्हा भले त्याचे केस पिकले असले तरी त्याच्या आवाजाचा अन हाका पिटण्याचा अजब लेहजा कायम असतो. "मग काय, कसा आहेस ?" हा नेहमीचा प्रश्न अन "काय नाही, मस्त निवांत आहे !" हे ठोकळेबाज उत्तर हा इथल्या बेसिक संवादाचा गाभा असतो. रात्र दाटून आल्यावर गल्लीतल्या कोपऱ्यावर सोडियम व्हेपर स्ट्रीटलाईटच्या फिकट पिवळसर उजेडाखाली हाताची घडी घालून पोट किंवा डोके खाजवत ओशाळलेल्या चेहरयाने लुंगी बनियनच्या वेशात उभ्या असणारया कोणत्याही सोलापूरी महापुरुषाला तुम्ही उपरोक्त यक्षप्रश्नच केंव्हाही विचारा तो अगदी आरामात पोटावरून वा खरमुडया गालावरून वा दाढीच्या वाढलेल्या खुंटावरून हात फिरवीत हेच 'निवांत' उत्तर देईल !!

एकमेकाची बारसे जेवलेली ही मनमिळाऊ माणसे प्राचीन गुफातल्या आदिमानवापासून ते होऊ घातलेल्या जगबुडीपर्यंत सर्व विषयावर अधिकारवाणीने बोलत असतात.आटपाट नगरीच्या कहाणीपासून ते आर्किमिडीजच्या युरेकापर्यंत काहीही बोलायला तयार ! गप्पाष्टक सुरु असताना घड्याळात कितीही वाजलेले असले तरी हे चहा पिऊन गप्पांचा फड तेवता ठेवतात. गप्पिष्ट सोलापूरी माणसे अमृततुल्य चहावर अंमळ जास्त जीव ठेवून जगतात आणि सुट्टीचा दिवस इथला कष्टकरी माणूस तीन तास सिनेमाच्या थेटरात घालवतो. शहरातील कष्टकरी वर्गाची सुट्टीच्या दिवशीची संध्याकाळ अर्थातच पेगदार असते ! बुधवारच्या दिवशी याची अनुभूती जास्ती येते.

भौगोलिक दृष्ट्या काही नतद्रष्ट लोकांनी शहराचे पूर्व आणि पश्चिम भाग केलेत. यातील पूर्व भागात मनमिळाऊ आणि कष्टाळू स्वभावाची तेलुगु भाषिक लोकं जास्त वसली आहेत. उत्तर कसबा आणि दक्षिण कसबा असे टिपिकल पोस्टखात्याचे आवडते शिक्केबाज नाव असणारा दाट आणि मिश्र लोकवस्तीचा भाग पश्चिम भागात आहे. घराबाहेर लटकत असणारे सुताचे रंगवलेले तागे आणि घराघरात सुरु असणारा बिडी बनवण्याचा उद्योग ही पूर्वभागाची लक्षणे ! त्यामुळेच इथल्या उकिरडयावर तेंदूपत्त्याचा ढीग आढळतो. सोलापूरातले रस्ते म्हणजे एक स्वर्गीय अनुभवच. म्हणूनच की काय सोलापूर महापालिकेच्या इमारतीचे नाव इंद्रभुवन आहे; खरे तर इंद्रभुवनाची देखणी इमारत म्हणजे अप्पासाहेब वारद या दानशूर व्यक्तीची शहरासाठीची एक देण आहे. तर ह्या दिव्य रस्त्यांवर सोलापुरी माणूस आपल्या एकमेवाद्वीतीय शैलीत वाहन चालवत असतात. कोणी बागेत रमत गमत विहार करावा अशी वाहने चालवतात तर कुणी रॉकेटमध्ये जन्माला आल्यासारखे ! राँग साईडने येऊन आपल्यावरच डोळे वटारणारा सोलापुरी तरुण हा कुठल्या तरी अप्पा, दादा, बॉस, भाईजी, अण्णा, नाना, भाऊ, साहेब, गुरु यांचा डावा किंवा उजवा हात असतो. अशा सोलापुरी रस्त्यात अनेक ठिकाणी भटकी कुत्री आणि भटकी जनावरे भर रस्त्यात ठिय्या मांडून बसलेली असतात. त्यातून मार्ग काढत पुढे जाताना खैबरखिंडीची आठवण होते..

सोलापूर ऐतिहासिक शहर आहे म्हणूनच इथली माणसे इतिहासात जास्त रमत असावीत. त्यामुळेच विविध महापुरुषांच्या जयंत्या साजरया करताना इथल्या लोकांना अद्भुत स्फुरण चढत असावे. वर्षभरात सोलापुरात कोणता ना कोणता उत्सव सुरूच असतो, शहराचा विकास झाला नाही तरी चालेल पण जयंत्या पुण्यतिथ्या जोरात साजऱ्या झाल्या पाहिजेत असा इथल्या सर्वपक्षीय नेत्यांचा स्वर असतो. बारमाही मंडप आणि मिरवणुका यामुळे रस्त्यात चंद्रावर असतात तसे देखणे खड्डे पडलेले असतात. कुंभारी, बाळेगाव, विजापूर, तुळजापूर अशी जुन्या सोलापूरच्या चार दिशेस चार गावे होती त्यामुळे कुंभारवेस, बाळीवेस, विजापूरवेस आणि तुळजापूरवेस अशा चार दिशेला चार वेशी आहेत. आता शहर अस्ताव्यस्त वाढलेय पण नावाला वेशी तशाच आहेत. नाक गेले पण भोकं नाही बुजली त्यातला हा प्रकार. शहरातला देखणा भुईकोट किल्ला पुरातत्व खात्याच्या ताब्यात असल्यापासून सुस्तावून गेलाय तर सिद्धरामेश्वराच्या तलावाभोवतीचे हिरवे पाणी श्वास गुदमरत असल्याने विनातरंग पडून असते. कधी काळच्या औद्योगिक वैभवाची साक्ष देणाऱ्या बंद पडलेल्या भकास गिरण्यांच्या उदास चिमण्यांकडे आता पाहवत नाही. सोलापूरी माणूस मात्र आपण या गावचे नसल्यागत राहत असतो. बंद पडलेल्या जुन्या गिरणीच्या भग्न अवशेषातील विहिरीत उगाच डोकावून बघत असतो. खिशातलं पाकीट कोमेजून गेलं की रद्दी विकून येतो अन येताना मंगळवार बाजारात नजर फिरवून येतो. पोरंबाळे रुसली की त्यांना हुतात्मा बागेत फिरवून आणतो. सोलापूरी माणसाचे खाण्यापिण्याचे फारसे चोचले नाहीत, त्याची आवडती डिश म्हणजे तिखटजाळ लालबुंद शेंगाचटणी अन ज्वारीची पांढरीशुभ्र भाकरी ! मोकळ्या मनाचा अन हळव्या काळजाचा हा माणूस जेंव्हा भडकतो तेंव्हा ज्वालामुखीतला धगधगता लाव्हा असतो. कदाचित त्यामुळेच तो बव्हंशी शांत असतो...

इथला माणूस कायम बाल्यावस्थेतच असतो की काय अशी कधी कधी शंका येते.. मुलगा वयात आला तरी बाप हिरवा कच्चा असतो, उदाहरणार्थ वरातीत वा मिरवणुकीत एकाच गाण्यावर देहभान हरपून नाचणारे बापलेक केवळ आणि केवळ इथे दिसतील. गल्लीत एखाद्याची मयत झाली असेल तर घरातलं माणूस गेल्यागत पोरगं पुढे हमसून रडत असेल तर बाप मागे गर्दीत उभा राहून फाटलेल्या सदरयाच्या बाहीने डोळे पुसत असेल. कोणी हाणामारी करत असेल तर पोराच्या बरोबरीने बाप देखील त्या समरांगणात समोरच्याची गच्ची धरून सुरुवात करेल ! एकंदर काय तर इथे बाप आणि पोरगा यांच्यात फारसा जनरेशन गॅप नसतो. इथला हिरवट म्हातारा देखील मनगटात रग अन ओठात जरब ठेवून असतो पण वेळप्रसंगी सगळी आयुधे गुंडाळून ठेवून पांढरे निशाण देखील फडकावतो !

सोलापुरी माणूस हा पुणेरी माणसासारखा बेरकी असत नाही, मुंबईकरासारखा घड्याळाच्या काट्यावर चालत नाही, कोल्हापुरी माणसासारखा रांगडा असत नाही, सातारी माणसासारखा तोरयात राहत नाही, खानदेशी माणसासारखा रसाळ नसतो, वैदर्भीय माणसासारखा गोष्टीवेल्हाळ नसतो, माणदेशी माणसासारखा शीघ्रसंतुष्ट देखील नसतो ! तो नेमका कसा असतो हे सांगणे म्हणजे झाडावरची पाने अन उडणारया पक्षांची संख्या मोजण्यासारखे क्लिष्ट काम आहे..

वरवर भोळसट वाटणारा हा माणूस अनेकदा हिशोबी लोकांप्रमाणे व्यवहारचातुर्य दाखवतो. तो राजकीयदृष्ट्याही चलाख आहे. शहरात सेनाभाजपचे आमदार निवडून आणतो आणि महापालिकेत काँग्रेस राष्ट्रवादीला साथ देतो. सुशीलकुमार शिंदेंवर जीव लावतो अन त्यांच्या सुविद्य पत्नीचा पराभव करतो. तर त्यांच्या कन्येस सदा विजयी राखतो. कामगार नेते आडम मास्तरांचा आधार होतो पण त्यांना निवडून देताना विचार करतो. सोलापूरात सर्व जाती धर्माची विविध भाषांची माणसं जशी एकोप्याने नांदतात तसेच इथे सर्व राजकीय पक्षाचे लोक एकमेकांप्रति सौहार्द राखतात. सोलापूरी माणूस हा जसा चतुर तसाच धाडसी शूरदेखील आहे. अतिशयोक्ती वाटते ना ! पण तो आहेच मुळी तसा. देश स्वतंत्र झाला नव्हता तेंव्हा सोलापूरने स्वातंत्र्य अनुभवले ! इंग्रजांना इथे मार्शल लॉ लागू करावा लागला होता. या समरप्रसंगातून फासावर चढलेले चार हुतात्मे ही सोलापूरची शान आहे. मनात आणलं की काहीही करू शकतो तो सोलापूरी ! पण तो मनात आणत नाही आणि 'ठेविले अनंते तैसेची राहावे'वर जास्त भिस्त ठेवतो. जगात मल्टीप्लेक्स कधी सुरु झाले माहिती नाही पन्नास वर्षापूर्वी एका परिसरात आठ चित्रपटगृह इथे होती.

रिकामटेकडयांपासून ते परगावच्या प्रवाशापर्यंत सर्वाना इथल्या नव्यापेठेचे आकर्षण आहे. जुन्या शाळा अजून टिकून आहेत, मैदाने पोराठोरांनी गच्च फुलून आहेत. अपवाद वगळला तर बागा मात्र सुकून आहेत. 'धरण उशाला अन कोरड घशाला' असं असूनही इथला सोलापूरी माणूस विनातक्रार मिळेल तसं आणि मिळेल तेंव्हा पाणी भरत असतो. हेच चंद्रभागेचं, भीमेचं पाणी पिऊन तो भल्या भल्यांना पाणी पाजतही असतो !

इथली सर्व मध्यमवर्गीय तरुण मुले म्हणजे पांढरपेशा घरातले दैवदुतच ! हे सर्व सोलापूरी देवदूत आपल्या आईबापावर जीव लावणारे, बायकोचे ऐकणारे, पोरांचेही जमेल ते लाडकोड करणारे, गल्लीत उभं राहून गप्पांचे टोळके जमवणारे, चहा तंबाखू सारखं एखादं तरी व्यसन जीव लावून जोपासणारे, संक्रांतीतला गड्डायात्रेचा उत्सव आला की बालवयात रममाण होणारे, सिद्धेश्वर एक्सप्रेसने मुंबईला जाताना जीव घरी माघारी ठेवून जाणारे पण सोबत एक वेळची शिदोरी नेणारे, खड्डयाखुड्डयातून मुकाट गाडी चालवणारे, अनोळखी माणसाची मदत करणारे, शेजारयाला उसनवारी देणारे, गावाला जाताना भावकीऐवजी शेजारयाला घराकडे लक्ष दे म्हणून सांगणारे, मोहरमचे रंगवलेले वाघ बघून चेहरा उजळवणारे, सिद्धेश्वर महाराजांच्या मंदिरात जाऊन भक्तीभावाने डोळे मिटणारे, नवरात्रात रूपाभवानीच्या दर्शनासाठी पहाटे उठून अनवाणी पायाने चालत जाणारे, स्वतःपेक्षा जगाचीच काळजी करणारे, समोरच्या देखण्या शेजारीणीशी बोलताना लाजणारे, एसटीत बसल्यावर चार वर्षाचे पोर अडीच वर्षाचे आहे असं सांगणारे, बायकोने काही आवाक्याबाहेरचे मागितले तर हुतात्मा बागेजवळ नेऊन भेळ पाणीपुरी खाऊ घालणारे, शेजारी पाजारी कुठेही मयत झाली तरी आपल्याच घरातले कोणी गेले आहे या भावनेने ओले डोळे पुसणारे, दिवसभर संसारात - गल्लीत -ऑफिसात -अख्ख्या जगात कितीही कुरबुर झाली तरी रात्री झोपताना जुनीच झालेली सोलापूरी चादर मोठ्या मायेने डोक्यावर ओढून सुखाची स्वप्नं बघणारे सुखी, समाधानी, मायाळू, प्रसंगी वज्राहून कठीण होणारे तर कधी मेणाहून मऊ होणारे हे बहुआयामी सोलापूरी !

सोलापूरी माणूस हा फणसाच्या गरयासारखा असतो, तो बाह्यांगी थोडासा ओबड धोबड काहीसा काटेरी वाटतो पण आतून एकदम मधाळ, अवीट गोडीचा, तोंडात घातले की विरघळणारा, स्वतःची वेगळी चव जिभेवर रेंगाळत ठेवणारा, हवाबंद बरणीत ठेवला तर कित्येक दिवस टिकणारा, पोटभर खाण्याजोगा अन पुरवून पुरवूनही खाण्याजोगा असा हा रसाळ फणस ! स्वतः आयुष्यभर उन्हात राहून आपल्या देहाचा गुलमोहर फुलवून त्याची शांत शीतल छाया भोवताली धरणारे हे सोलापूरकर म्हणजे इतरांच्या जीवन - प्रांगणात आनंदी चांदण्यांच्या तारांगणातले समाधानाचे घनःश्याम मेघ असतात. ते घरोघरच्या अंगणातल्या तुळशीपाशी मान वेळावून येतात अन भरभरून पावतात.ओलेत्या डोळ्यांनी अन गदगदणारया मनाने एकमेकाच्या खांद्यावर हात टाकून चालणारी माणसे पाहून कृष्ण - सुदामा देखील यांचा हेवा करत असतील. सोलापूरी माणूस जगात कुठे जरी जाऊन राहिला, कुठल्या दूर देशाचा नागरिक बनला वा कुठे दौरयावर अखंड भटकत राहिला तरी त्याची एकच इच्छा असते की, 'इथल्या मातीतच शेवटचा दिस गोड व्हावा' !

मातीवर प्रेम करणारा अन मातीचेच पाय असणारा तरीही आकाशाला गवसणी घालण्याचे लक्ष्य ठेवणारा माझा सोलापूरी माणूस माझ्यासाठी नेहमीच आयडॉल राहिला आहे. बाहेरगावचा कुणी माणूस इथं आला की तो शहरापेक्षा इथल्या माणसांच्या प्रेमात पडतो. कारण आम्ही सोलापुरी आहोतच तसे अविस्मरणीय अन अद्भुत !

- समीर गायकवाड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा