Thursday, March 23, 2017

घाल घाल पिंगा वाऱ्या - कवी निकुंब


एक काळ होता जेंव्हा दळणवळणाची साधने अत्यंत पुरी होती. विवाह हे बहुतांश करून पारंपारिक भारतीय पद्धतीने होत असत. विवाहेच्छुक मुलगा नवऱ्या मुलीला बघायला तिच्या घरी येई. यथासांग मुलीला पाहून झाल्यावर तो त्याची पसंती वा नापसंती कळवत असे. या प्रक्रियेत बऱ्याचदा मुलींचे मत विचारात घेतले जात नसे. पसंती कळवल्यानंतर लगीनघाई होई. पुढे जाऊन मुलाच्या वा मुलीच्या निवासी भागात किंवा एखाद्या तीर्थक्षेत्री विवाह सोहळा संपन्न होई. पूर्वी ग्रामीण भागातले लग्नाचे वऱ्हाड बैलगाडयातून जाई, निमशहरी भागातले वऱ्हाड बंदिस्त ट्रकमधून तर शहरी भागातील वऱ्हाड एसटीबस मधून जाई.

एखादयाचा आर्थिक स्तर थोडा चांगला असला की याहून थोडीशी वरच्या स्तरावरची व्यवस्था याकामी ठरलेली असे. लग्न लागले की सासरला निघालेली नवरीमुलगी काहीशी धास्तावूनही जायची आणि तिला नवजीवनाचा आनंदही वाटायचा. मनाच्या द्विधा मनःस्थितीत अडकलेली ती नवविवाहिता तिच्या निरोपसमयी आईवडिलांच्या गळ्यात पडून धाय मोकलून रडत असे. तिची भावंडे तिला मिठया मारून रडत. सारे वातावरण शोकाकुल होऊन जाई, मग जमलेल्या बायाबापड्यादेखील डोळ्याला पदर लावत. कुणाला नुकत्याच निवर्तलेल्या एखाद्या नातलगाची आठवण निघाली मग सारेचजण शोकसागरात बुडून जात.

असं करता करत नवरीमुलगी थोरामोठ्यांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेत पुढे पुढे सरकत राही. तिच्या नातलगांचा जत्था तिच्या मागे मागे आणि ती पुढे पुढे अशा रीतीने हा सारा लवाजमा विवाहस्थळाच्या दरवाजापाशी आला की ती नवरी मुलगी अधिक भेदरून जायची. मग पुन्हा एकदा ती मागे वळून आपल्या मात्यापित्याच्या गळयात पडून हमसून रडायची. मग एखादा जुनाजाणता करता सावरता माणूस पुढे होई. नवऱ्यामुलाकडच्या म्होरक्या माणसांना पुढे घालून त्यांच्या तोंडून मुलीच्या भावी खुशालीचे चार शब्द वदवून घेई. "भाऊसाहेब तुमची मुलगी काय आणि आमची मुलगी काय एकच. तुम्ही काही काळजी करू नका आम्ही आमच्या मुलीसारखं तिला जपू !"
दुसरा कुणी तरी म्हणे, "तिला माहेरची आठवण देखील होणार नाही हो, पोर सुखात राहील. तुम्ही चिंता करू नका."
तेव्हढ्यात एखादी केस पिकलेली थोराड महिला पुढे होऊन म्हणे,"अगं पोरी, इतकं रडू नयेस बाळा ! तुझ्या रडण्याने आईबापाच्या जीवाला घोर लागतो. त्यांचं काळीज जड होतं. सोन्यासारखा नवरा मिळालाय तुला. कशाला बरं रडून समद्यांच्या जीवाला काटं लावतीस, गप हो बरं आता !"
या सर्व मात्रा नववधूस बरोबर लागू पडत. मग आपल्या आईवडिलांकडे, भावंडाकडे एकदा डोळे भरून बघून झाले की भावी संसाराच्या दिशेने ती पहिले पाऊल टाके. हा तिच्या नवजीवनाचा पहिला प्रवास असे. या क्षणापासून तिच्या साठी दोन नवीन जगातलं जीवन सुरु होई. त्यातलं एक तिच्या जन्मापासूनचं परिचयाचं तर दुसरं पूर्णतः अनभिज्ञ असं विश्व तिच्या समोर असे. जिथं ती जन्मली, जिथं ती वाढली, ज्या अंगणात ती खेळली जिथं तिचं बालपण गेलं, जिथं तिने भावंडांसोबत सागरगोटे वेचले, जिथे तिची आणि पुस्तकांशी पहिली तोंडओळख झाली, जिथे तिने तारुण्यात पदार्पण केले, जिथे तिने आईवडिलांच्या कामात मदत केली, जिथे घरातली सर्व कामे शिकली, जिथे तिच्या जमतील तशा हौसमौजा आध्याअधुरया रुपात पूर्ण झाल्या, जिथे तिच्या आजारपणात आईने आपल्या डोळ्याच्या पापण्या न लवता आपल्या हाताचा पाळणा केला आणि जिथे तिच्या वडिलांनी प्रसंगी स्वतः उपाशी राहून तिच्या सुखासाठी आपले आयुष्य वेचले ती जागा, ते घर, ती गल्ली, तो परिसर आणि ते शहर आता तिच्यासाठी 'माहेर' होई.

जन्मतःच सोबती असलेल्या घरादाराची, नात्यागोत्यांची ओळख तिला आता नव्याने इथे होते ती माहेर या नावाने. इथून पुढे ती आपल्या माहेरची पाहुणी होते. तिचे पहिले विश्व जे जन्मापासून ते विवाहापर्यंतच्या जीवनप्रवासात विविध भावभावनांनी ओथंबलेले असायचे, ज्यात नवरसांचे अनेक कुंभ भरून वाहिलेले असत, तिथे आता मायेच्या अनेक जादुई क्षणांच्या हळव्या आठवणी वसत असत.


नववधू वराच्या घरी जाई तेंव्हा तिचे जंगी स्वागत होई. . नववधूवरून भाकरीचा तुकडा ओवाळून टाकला जाई, तिचे मेंदी लागलेले पाय पाण्याने धुतले जात. मग उंबऱ्यावर ठेवलेले धान्याने भरलेले माप ओलांडून नववधू भरल्या लक्ष्मीसारखी घरात प्रवेश करी. तिने टाकलेले हे पहिले पाऊल तिला दुसऱ्या विश्वात घेऊन जाई, हे विश्व म्हणजे तिचे नवे घर, तिच्या नवऱ्याचे घर, तिचे सासर !

मग आजूबाजूच्या, शेजारच्या, नव्या नात्यातल्या बायका गोळा होत. मग मोठ्या कुतूहलाने नवरीचा चेहरा निरखीत असत. काहींच्या नजरेत हे कुतूहल इतके असे की त्यातून त्यांच्या विवाहाच्या आठवणींची झलक दिसे. तिथेच कुजबुज सुरु होई आणि जो तो आपलं मत हळूच सांगू लागे - 'सून मोठी देखणी मिळाली बरं का !' 'मुलगी जरा नाजूकच दिसते', 'आपल्या पोराने नशीब काढले बघा काय बायको मिळालीय !', 'नजर वर नाही हो पोरीची एकदम सुलक्षणी वाटते बघा', 'शिकलेली पोरगी आहे. वरतून खानदानी घरचं तेज आहे बघा पोरीच्या तोंडावर', तर एखादी खऊट बाई म्हणे, 'लई कौतुक करू नकासा. आपली ती ही दिकून आदी अशीच व्हती. आता बगताय नव्हं कसा टेगार मिरवती ते !' ही मुक्ताफळे उधळणाऱ्या बाईकडे कुण्या कर्त्या बाईने डोळे वटारले की साऱ्याच गप होत.

नवरीसंगे तिच्या नव्या घरचा कानोसा घ्यायला आलेल्या आणि तिच्या सुरुवातीच्या काही दिवसात तिला सोबत करायला आलेल्या पाठराखीणीचे या साऱ्याकडे बारकाईने लक्ष असे, लग्नघरात कोणकोण काय काय बोलते याकडेही तिचे लक्ष असे. त्यावरून त्या संबंधित व्यक्तीबद्दल आपले मत बनवणे सोपे जाई. अशा तऱ्हेने लग्नानंतर हरेक विवाहित स्त्रीचे भावविश्व दोन विश्वात तिचे वाटले जाई, एक माहेर आणि दुसरे सासर ! सासरी असली की ती सासूरवाशिण होई तर माहेरी आल्यावर ती माहेरवाशिण होऊन जाई. आपल्या मायपित्यांनी शिकवलेल्या संस्कारशिदोरीवर नववधूचा निभाव लागत असे. हळूहळू ती सासरी रुळून जाई मात्र तिचा एकही दिवस असा नसे की तिला आपल्या माहेरच्या लोकांची आठवण झाली नाही.

त्या काळात दळणवळणाची साधने अत्यंत त्रोटक होती, आठवण झाली म्हणून लगेच माहेरी जाऊन यावे अशी व्यवस्था नव्हती. वाहने अगदी कमी असत. गावाकडच्या भागात तर त्यांची वानवा असे. मग या सासूरवाशिणीचा जीव टांगणीला लागून राही एखादया दिवशी जास्त आठवण झाली की पातेल्यात ठेवलेले दुध तिच्या डोळ्यादेखता उतू जाई आणि तिच्या डोळ्याला पाण्याची धार लागून राही. तिची सासू, सासरा, नवरा, नणंद चांगल्या स्वभावाचे असले की तिच्या मनातली ओढ लक्षात घेत. कामावर गेलेला तिचा नवरा संध्याकाळी घरी येताच घडला प्रकार कानी घालत. मग तो तिला एखादे पोस्टकार्ड देई, त्या टिचभर कागदावर ती आपल्या मनातले अवघे आकाश असं काही रिते करून टाकत असे की ते पत्र तिच्या माहेरी पोहोचताच साऱ्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागत ! तिची खुशाली कळवणारे ते पहिले पत्र तिच्या माहेरी अनेक भावनांचा कल्लोळ निर्माण करून जाई. त्या काळी आजच्या सारखे मोबाईल नव्हते, एखादया तालेवार माणसाच्या घरी टेलिफोन असायचा ज्याच्यावर ट्रंककॉलची सुविधा असायची. पण संपर्क साधण्यासाठी केवळ एकाच बाजूलाच फोन असून चालते कुठे ? त्याकाळी यावर उपाय एकच होता. तो म्हणजे पत्र लिहून आपले मनामनातले भावबंध गुंफत राहणे. पण पत्रे तरी किती लिहिणार ? शेवटी त्याला सुद्धा मर्यादा असायच्या. कारण टपालपेटी एखादीच असायची, तिच्यासाठी पोस्टमन देखील तोकडेच असत. शिवाय सासरच्या लोकांना आपलं हे सारखं पत्र पाठवणे आवडले नाही तर उगाच का त्यांची नाराजी ओढावून घ्यायची या कारणाने पत्रांचा ओघ हळूहळू कमी होई. मात्र मनातला आठवणींचा आवेग कधीकधी संयमाचा बांध फोडून बाहेर पडे तेंव्हा या नवविवाहितेच्या काळजात चर्र होऊन जाई. ती सैरभैर होई, तिचा ठाव लागत नसे, तिचे चित्त उदास होऊन जाई. तिच्या मनाला भासांचे खेळ सुरु होत. अशा वेळी ती निसर्गाला आपला निरोप्या बनवी आणि माहेरसाठीचा आपला सांगावा त्याच्याकडे मोठ्या जड मनाने सोपवत असे.

किती वेगवेगळ्या आठवणींचे काहूर तिच्या मनात माजलेले असेल नाही का ? मनातलं हे सारं मळभ हलकेच निवळून गेलं की तिच्या चेहऱ्यावर हलके स्मित येई. मग अंगणातल्या वेलींशी चाळा करत एखादी मोगऱ्याची कळी नाकापाशी धरत हळूच लाजत ती माजघरात पसार होऊन जाई ! अद्भुत होता तो काळ आणि त्या काळाच्या साक्षीदार असणाऱ्या आपल्या मायभगिनी. या नववधूच्या भावविश्वाची ओढ कवीमनास भुरळ पडली तर त्यात नवल ते काय ? अनेक कवींनी सासूरवाशिणीच्या मनातील तगमगीस व्यक्तवण्यासाठी आपल्या प्रतिभेचे भांडार खुले केले आणि एकाहून एक सरस कविता लिहिल्या. अशा आशयाच्या कवितांनी मराठी कवितेला समृद्ध केले. 'मेंदीच्या पानावर' ही शांताबाईंची कविता असो वा बहिणाई चौधरी यांची ‘माहेर’ ही कविता असो ज्यात त्या लिहितात की,

'बापाजीच्या हायलींत येती शेट शेतकरी,

दारी खेटराची रास घरीं भरली कचेरी..'

वा

'समाधानाची ढेकर माहेरच्या वाटेवर !

उचक्यांनी का बेजार सासरच्या वाटेवर ?

माया आईची वाटते लोण्यामधली साखर..'

ही कविता असो. अशा अनेक कविता वानगीदाखल देता येतील. मात्र या साऱ्या कवितांत कवी कृ.ब.निकुंब यांची 'घाल घाल पिंगा वाऱ्या' ही कविता तिच्या वेगळेपणामुळे, रसाळ शैलीमुळे आणि कसदार आशयामुळे उठून दिसते.

'घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात
माहेरी जा,सुवासाची कर बरसात।
सुखी आहे पोर सांग आईच्या कानात
आई भाऊ साठी परी मन खंतावत।
विसरली का गं, भादव्यात वर्ष झालं,
माहेरच्या सुखाला गं,मन आंचवलं.
फिरून फिरून सय येई,जीव वेडावतो
चंद्रकळेचा गं,शेव ओलाचिंब होतो.
काळ्या कपिलेची नंदा खोडकर फार,
हुंग हुंगुनिया करी कशी गं, बेजार।
परसात पारिजातकाचा सडा पडे,
कधी फुलं वेचायला नेशील तू गडे?
कपिलेच्या दुधावर मऊ दाट साय
माया माझ्यावर दाट जशी तुझी माय।
आले भरून डोळे पुन्हा गळांनी दाटला
माउलीच्या भेटीसाठी जीव व्याकुळला.'

पूर्वीच्या काळी पिंगा हा स्त्रियांचा आवडीचा खेळ होता, या पिंग्यावर आधारित गीते आजही गायली जातात. त्यावर पिंगा खेळला जातो. श्वासाचे हुंकार भरत गोलाकार कडे करून अंगाभोवती घुमत घुमत हा पिंगा खेळला जातो.

कवितेत नववधू वाऱ्याला पिंगा घालायला सांगते कारण पिंगा, हादगा, भोंडला, भुलाबाई हे सारे स्त्रियांचे खेळ त्यांच्यातल्या उत्कट आनंदाचे अन स्फूर्तीचे दर्शन घडवणारे खेळ आहेत. ती वाऱ्याला विनवते, 'तू माझ्या परसात आनंदाचा पिंगा घाल आणि मग माझ्या माहेरी जाऊन माझा सांगावा माझ्या जन्मदात्यांना सांग.' वाऱ्याने आपल्या परसात पिंगा घालून माहेरच्या अंगणात जावे आणि इथल्या आनंदाच्या सुगंधाचे अणुरेणु तिथल्या आसमंतात विखरावेत. आईच्या कानात आपल्या सुखाचे हितगुज सांगण्याची विनंती करून ती पुढे म्हणते की, 'त्यांच्यासाठी माझ्या मनात अजूनही खंत आहे !'.

'भाद्रपदात माझ्या लग्नाला वर्ष होईल, आता मला साहवत नाही कारण माहेरच्या सुखाला माझे मन अधीर झालेय. केंव्हा एकदा तुमच्या सर्वांच्या गळ्यात पडेन असे झालेय. मला फिरून फिरून माहेरची आठवण येते. माझ्या चंद्रकळेचा पदर अश्रूंनी ओलाचिंब होऊन जातो. माहेरी असताना परसातल्या काळ्या कपिला गायीचे खोडकर वासरू देखील मला अगदी मनापासून हुंगायचे, त्याचे ते हुंगणे आणि गायीचे माया लावणे देखील मला आठवते आहे. गच्च फुलांनी डवरलेल्या प्राजक्ताचा सडा अंगणात अजूनही तसाच पडत असेल, ती फुले वेचायला तू मला कधी नेशील असा सवालही ती पुढे करते.
आपल्या कपिलेच्या दुधावर जशी घट्ट नैसर्गिक साय येते अगदी तशीच दाट माया आपल्या आईची आपल्यावर आहे असं ती भरल्या डोळ्यांनी सांगते. हे सांगताना पुन्हा माझे डोळे टच्च भरून आले आहेत, माझा कंठ दाटून आला आहे आणि आईच्या भेटीसाठी माझा जीव आत्यंतिक व्याकूळ होऊन गेला आहे.

मनाला भिडणारे हे वर्णन केवळ स्त्रियांच्याच नव्हे तर कोणाही सृजन व्यक्तीच्या डोळा पाणी आणल्याशिवाय राहत नाही. कवितेतील शब्द थेट काळजाला हात घालतात. भावविभोर झालेल्या सासूरवाशिणीचे हृदयंगम प्रकटन आपण जणू प्रत्यक्ष अनुभवत आहोत असा भास होतो. या कवितेला कमलाकर भागवत यांनी अत्यंत करुण चाल लावली आणि त्यांच्या संगीतदिग्दर्शनाखाली सुमन कल्याणपूर यांनी आर्त स्वरात हे गाणं असं काही गायलं की गतकाळात रेडीओवर हे गाणं लागताच सर्व वयाच्या सासूरवाशिणी हमसून हमसून रडत असत !!

आजही या गीताची अवीट गोडी टिकून आहे कारण यातील साधीसोपी प्रवाही बोलीभाषेतली संवादी शैली. अलंकारिकता टाळून, शब्दजडत्व सारून मायाममतेने ओथंबलेले सोज्वळ भाव व्यक्त होतील असे नेमके, नेटके शब्द व त्यांची एकमेकात केलेली गुंफण अत्यंत भावते. नवविवाहितेच्या अंतःकरणात डोकवून तिचे मनोविश्व टिपण्याचा मोह कवी निकुंबांना झाला आणि त्यांनी त्याला यथार्थ शब्दरूप देऊन एक अजरामर गीत मराठी रसिकांच्या ओंजळीत टाकले.

`मृगावर्त’ या नावीन्यपूर्ण खंडकाव्याचे निर्माते आणि एक भावकवी म्हणून कृष्णाजी बळवंत निकुंब उर्फ कृ. ब. निकुंब परिचित आहेत. `पारख’ हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणखी एक पैलू. निर्मळ, आस्वादक दृष्टी, निर्णयातील सूक्ष्मता आणि निश्चितता, शैलीचे ललित्य आणि संयम या विशेषांचा समन्वय तर ह्या समीक्षालेखांत झालाच आहे, पण महत्त्वाची गोष्ट अशी की, `केकावली’त संज्ञाप्रवाहाचे दर्शन घडते किंवा बालकवींच्या कवितेत जोडाक्षराचे दाठरपण मोडून त्याला सुकुमार रूप प्राप्त होते, यांसारखी लहानमोठी अपरिचित सौंदर्यस्थळे निकुंबांना अचूक गवसली आहेत. मराठी समीक्षाविषयक लेखनात या संग्रहाची भर मोलाची ठरावी. बेळगावच्या लिंगराज कॉलेजमध्ये प्रा. कृ. ब. निकुंब मराठीचे विभागप्रमुख होते. ते एक उत्कृष्ट प्राध्यापक होते, काव्यशास्त्र हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. कोल्हापूर वाड्मय चर्चा मंडळ, बेळगाव यांच्यावतीने त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी कृ.ब.निकुंब पुरस्कार दिला जातो.

कवी कृ.ब.निकुंब यांच्या आणखी दोन निवडक कविता खाली दिल्या आहेत त्यावरून त्यांचे शब्दप्रभुत्व अन जीवनाकडे बघण्याचा उदात्त दृष्टीकोन लक्षात यावा.
'तुझी वाट चुकणार नाही या माझ्या मयसभेत
थबकणार नाहीस तू भव्य महाद्वाराशी
सप्तरंगी उन्हात झळको खुशाल त्याचे गोपुर!
तुला माहीत आहे कुजबुजणारी अंधुक वाट
वळणावळणाने जाणारी, श्वासाने उबदार होणारी
महाद्वारातून जाणारे फसव्या प्रपाताचे कौतुक करीत
नसत्या हिरवळीवर कोसळतील
त्यावेळी तू पोहोंचलेली असशील, अचूक
कमळाच्या तळ्यावर, धुंद धुक्यात लपलेल्या...
राजरस्ता, महाद्वाराकडून येणारा
कित्येक योजने दूर आहे या तळ्यापासून
कधीमधी-म्हणतात-भांबावून जातो
त्यातून वावरणा~याना
ह्या गूढ कमळांचा मुग्ध सुवास!
महाद्वारांनी जाणारांसाठी महाद्वारे आहेत-
तुझ्यासाठी
आहे ती श्वासांची वाट या माझ्या मयसभेत!!.....'
या दोन्ही कवितांना ऐतिहासिक संदर्भ आहेत मात्र निकुंबांनी त्यांना जीवनाच्या मतितार्थात असे काही गुंफले आहे की वाचणाऱ्याचे भान हरपून जावे ..


अथ अरण्यकांड -
ये! कोणत्या कांडापासून वाचणार आहोत आपण आज?
बालकांड संपले आहे. त्यातले स्वर उजळत होते' वेल्हाळ
थेट लखलखत्या कडकडाटापर्यंत शिवधनुर्भंगाच्या!
आता आत्ताच तर समोर उभी होती
अवनम्र जानकी सलज्ज कटाक्षांच्या कळ्या ढाळी
-दृष्टी चुकवू नकोस्-कांडे संपतात तरी कशी अलगद!
ते नवे दारपरिग्रहाचे दिवस्-
एखादी मावळती केशरकाडी तरी उरायची होती!
आणि तो सोहळा युवराज्याभिषेकाचा?
-पण हेही वाचून झालेच आहे, नाही?
बरोबर! अरण्याकांडाला प्रारंभ झालेला आहे.
आता मन नि:शंक करायला हवे,
निर्धाराची पावले टाकायला हवीत
दंडकारण्याच्या दिशेने...
अजून पुष्कळच पाने पुढे जायचे आहे!

२२ नोव्हेंबर १९१९ ला जन्मलेल्या कवी निकुंब यांच्या कविता मोजक्याच मात्र आशयघन आहेत. मृगावर्त, पंखपल्लवी, ऊर्मिला, उज्वला, अनुबंध हे त्यांचे लेखन होय. ३० जून १९९९ रोजी या भाववेड्या कवीने जगाचा निरोप घेतला अन ते अनंतात विलीन झाले. कवी निकुंब यांचे इतर लेखन कालौघात जरी विस्मृतीत गेले असले तरी त्यांची 'घाल घाल पिंगा' ही कविता मात्र रसिक वाचकांच्या मनात कायम पिंगा घालत राहील...

- समीर गायकवाड


No comments:

Post a Comment