Monday, December 26, 2016

महाकवी सावरकर


१३ जुलै १६६० च्या रात्री सिद्दी जोहरच्या वेढ्यातून निसटून जाण्यासाठी शिवाजीराजे बाजीप्रभू, बाजींचे बंधू फुलाजीप्रभू आणि सहाशे मावळयांच्या साथीने बाहेर पडले. वीर शिवा काशिद यांनी दिलेले बलिदान बाजींनी आपल्या प्राणाची बाजी लावून व्यर्थ जाऊ दिले नाही. आपल्या रक्ताने बाजींनी घोडखिंड पावन केली आणि आपल्या राजाला या संकटातून बाहेर काढताना स्वतःचे प्राण त्यागीले. त्या अभूतपूर्व रणसंग्रामाला, बाजीप्रभू देशपांडे यांनी स्वराज्य रक्षणासाठी पावनखिंडीत देह ठेवला त्याला ३७० वर्षे पूर्ण झाली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी या ऐतिहासिक घटनेवर लिहिलेला पोवाडा १९१०च्या दशकात स्वराज्याच्या चळवळीला खूप स्फुर्तीदायी ठरला होता. आजही हा पोवाडा नुसता वाचला तरी मनगटे आवळतात, मुठी वळतात, धमन्यातले रक्त सळसळून उठते, छाती फुलून येते. स्फुल्लिंग पेटून उठतात.


Friday, December 16, 2016

शब्दसूर्य - नारायण सुर्वे !‘ना घर होते, ना गणगोत, चालेन तेवढी पायाखालची जमीन होती.’ फुटपाथवरच्या खुल्या आकाशाखाली जगाच्या खुल्या विद्यापीठात शिकलेल्या नारायण सुर्वेंनी झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले. मागे वळून पाहताना त्याच आयुष्यावर, 'एकटाच आलो नाही, युगाची ही साथ आहे' असं रसरशीत भाष्यही केले.
नदी आणि ऋषी यांचे कुळ आणि मूळ शोधू नये असे म्हटले जाते. नारायण सुर्वे हे लाक्षणिक अर्थाने आणि आशयघन निर्मितीच्या दृष्टीने मराठी साहित्यातले कबीर होते असं म्हणणे संयुक्तिक ठरेल. कारण १९२६-२७ मध्ये मुंबईतील चिंचपोकळीमध्ये एका कापडगिरणीसमोर गंगाराम गुरुजी सुर्वे या गिरणी कामगाराने रस्त्यावरील एक अनाथ जीवास उचलून घरात आणले. त्यांची पत्नी काशीबाई सुर्वे यांनी या अश्राप जीवाला पोटच्या मुलासारखे प्रेम दिले.

सुर्वे दांपत्याने या जीवाला नुसते प्रेमच नव्हे तर आपले नावही त्याला दिले. तोच हा नारायण ! नारायण गंगाराम सुर्वे ! मराठी साहित्यात आपले स्वतंत्र स्थान संघर्षमय वाटचालीतून निर्माण करणारे आणि आशयाच्या नव्या वाटा चोखाळणारे सुर्वे मास्तर !! अक्षरवाटेवरील पांथस्थासाठी अंधाऱ्या भवतालात आपल्या आयुष्याचा दिवा करून उभे राहिलेल्या सुर्व्यांच्या आयुष्याची सुरुवातच नाट्यमय आणि संघर्षमय अशी होती. ‘कामगार आहे मी, तळपती तलवार आहे. ‘सारस्वतांनो, थोडासा गुन्हा करणार आहे’ या निर्भीड वृत्तीने तब्बल सहा दशके सुर्व्यांनी मराठी सारस्वताच्या दरबारात शब्दरूपी तळपती तलवार परजत ठेवली.


Tuesday, December 6, 2016

जयललितांचे आयुष्य - सापशिडीचा पट !"जयांच्या आयुष्यात सातत्याने उतार चढाव येत गेले. पण त्या फिरून फिरून नशिबाची व कर्तुत्वाची साथ लाभून वर येत राहिल्या. त्यांचे आयुष्य म्हणजे जणू काही सापशिडीचा पट ! सापशिडीत देखील सुटकेच्या ९९ क्रमाकाच्या शेवटच्या घरापाशी साप असतो तसे त्या त्यांच्या आयुष्यातील सर्वोच्च स्थानी पोहोचल्या असताना मृत्यूकडून त्यांना कायमची मात खावी लागली. पण त्यातही त्यांनी ७३ दिवस झुंजार बाण्याने लढा दिला मग हार पत्करली. सावज आलं आणि सहजपणे सापाने गिळलं असं त्यांच्या आयुष्यात कुठंच घडलं नाही. खडतर बालपण, यशस्वी रुपेरी कारकीर्द, राजकारणातले शह काटशह, मुख्यमंत्री ते कैदी नंबर ७४०२ आणि पुन्हा मुख्यमंत्री असा रंजक राजकीय प्रवास अशा अनेक घटनांनी हा सापशिडीचा आयुष्यपट रंगलेला आहे......" 


Friday, December 2, 2016

रेड लाईट डायरीज - शिल्लकगिलटाचे वाळे, चांदीचे पाणी दिलेलं काळपट पैंजण
आणि बेन्टेक्सचे खोटे दागिने.
छिद्रे पडलेल्या, झिरून गेलेल्या, फॉल निसटलेल्या
पदरावरची नक्षी उडालेल्या दोन साड्या.
डागांचे ओघळ दाटून घट्ट झालेले, रंग विटून गेलेले
नाडी तुटायच्या बेतात आलेले परकर.
समोरील बाजूची काही बटनं तुटलेले, काजी फाटून गेलेले,
वीण उसवलेले दोन ब्लाऊज.
एका कॅरीबॅगमधली कधी न घातलेली नवी कोरी पण
ठेवून ठेवून घडीवर झिरून गेलेली अनवट साडी.
गंधाचे जुने डाग असलेला, टवके उडालेला,
पिवळट पडलेला यल्लम्माचा फोटो.
कुठली तरी जुन्या जमान्यातली
बहुधा कुण्या मायलेकींची फिक्कट झालेली धुरकट तसबीर.
हातात बांधायचे काही लाल काळे दोरे, एक अंगारयाची पुडी.
स्पंज निघालेली बेरंग झालेली राखी.
ब्लाउजपीसच्या पुरचुंडीत बांधून ठेवलेल्या कचकडयाच्या हिरव्या बांगडया,
मणीमंगळसूत्र आणि न वापरलेली घडीव जोडवी.
काचेला तडा असलेली एक रिकामी फोटो फ्रेम,
बोरमाळीच्या सरीला असणारया लेसचे घट्ट झालेले लाल गोंडे.
कुठल्या तरी देवाची चेमटून गेलेली पितळेची मूर्ती.
वरचे अस्तर खरवडून गेलेली,
पैसे ठेवण्याची जुन्या पद्धतीची एक रिकामी छोटीशी पर्स.
फाटलेल्या जुन्या नोटांचे दुमडून गेलेले घड्या पडलेले तुकडे, काही जुनी नाणी.
मखमली कापडांचे काही वेडेवाकडे कापलेले तुकडे.
इतकं सारं सामावून घेणारी कडी कोयंडा मोडलेली, गंजून गेलेली, फुलांचे चित्र धुरकट झालेली पत्र्याची संदूक.
देशी दारूच्या गुत्त्यातलं देणं, चहा कँटीनची किरकोळ उसनवारी.
करपून गेलेल्या इच्छा, चक्काचूर झालेली स्वप्ने,
मरून गेलेल्या वासना, घुसमटुन गेलेलं मन,
खंगलेलं कलेवर.

बुधवारातली शांताबाई
वार्धक्याने पहिल्या पावसाच्या दमट हवेत
तडफडून मरून पडली तेंव्हा तिची शिल्लक इतकीच होती...

- समीर गायकवाड.


Tuesday, November 29, 2016

'ब्लॉग माझा' - एक धक्का सुखाचा ...ब्लॉग'माझा' नव्हे ब्लॉग 'तुम्हा सर्वांचा' - गोष्टीवेल्हाळाची बाराखडी...

तुम्हा सर्वांना सांगायला आनंद होतो की, 'एबीपीमाझा' या वृत्तवाहिनीतर्फे मराठीतील सर्वोत्कृष्ट वाचनीय ब्लॉग निवडीसाठी घेतलेल्या 'ब्लॉगमाझा' ह्या स्पर्धेसाठी माझ्या ब्लॉगची निवड प्रथम क्रमांकासाठी करण्यात आलेली आहे.पोळा- मुक्या जीवाचे ऋण...

पोळ्याचं आवतण बैलाना कालच दिलंय. कालच खांदमळणी अगदी दमात झालीय. पळसाच्या द्रोणात कढी घेऊन ती बैलाच्या खांदयावर लावलीय आणि हळद तेल-तुपाने त्यांचे दमलेले खांदे मस्त पैकी मळून झालेत. सगळ्यांची शिंगे साळून झाली आहेत. त्याला आता केशरी लाल हुंगुळ लावला की शिंगे चमकदार दिसतील अन बैल उठून दिसतील..आंबाडीचे सुत काढून तयार केलेली नवी वेसण दुरडीत तयार आहे. नवा कोरा पांढरा शुभ्र कासरा लावून लाल लोकरीचे गोंडे, नविन घुंगर माळा, कवड्यांचे हार, नविन रंगीबेरेंगी चित्रांच्या झुली दुपारी यांच्या अंगावर चढतील. पैंजण, पट्टे,झेंडूचे हार अशी सामग्री तयार आहे.


Saturday, November 26, 2016

गावाकडची रम्य सकाळ ....

वर्षभरातला कोणताही ऋतू असला तरी गावाकडच्या दिनमानात फारसे बदल होत नसतात. त्यातही सकाळचे दृश्य कधी बदलत नाही. राज्यातील कोणत्याही खेड्यात कोणत्याही ऋतूमानात गेलं तरी एक सुखद प्रभातचित्र सृष्टीने साकारलेले असते. हे प्रभातचित्र ज्याला बघायला मिळते तो व्यक्ती नशीबवानच. आणि ज्या लोकांना हे सुख प्रत्यक्ष अनुभवायला मिळते ते खरे भाग्यवंत होत. गावाकडची सकाळ खरं तर नेमक्या शब्दात चितारणे अशक्य आहे कारण तिला अनेक पैलू आहेत, अनेक रंगढंग आहेत. नानाविध पदर आहेत. मातीवर जीव असणाऱ्या प्रत्येक सृजनास वाटते की आपण आपल्या परीने हे चित्र रंगवावे, ते पूर्णत्वास जात नाही याची माहिती असूनही हा प्रयत्न अनेकांनी केला आहे. Friday, November 25, 2016

बिनकामाचे शहाणे...


पेशवाईत साडेतीन शहाणे होते. त्यातला एक 'पूर्ण शहाणामाणूस इतका पाताळयंत्री आणि छद्मी होता की कुणी त्याला मारूही शकले नाही अन टाळूही शकले नाही. काही माणसं असून अडचण नसून खोळंबा असतात. तर काहींची नुसती अडचण असते असे नव्हे तर त्यांचा प्रचंड उपद्व्यापही असूनही त्यांच्याविरुद्ध कारवाई करता येत नाही. पेशवाईत असाच एक मुत्सद्दी होऊन गेलासखाराम बापू बोकील त्यांचं नाव. बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशव्यांपासून ते माधवराव अन अखेरीस नारायणराव पेशवे या सर्वांच्या काळात खऱ्या अर्थाने खलपुरुष जर कोण असतील तर ते सखाराम बापू होत. रामायणात जी भूमिका मंथरेने निभावली तशा आशयाची भूमिका सखारामबापूंनी पेशवाईत बजावली. 
एक उचापतखोरकुरापतखोरकपट कारस्थानी आणि भ्रष्ट माणूस अशी त्यांची इतिहासात प्रतिमा आहेच पण या जोडीला असणारी पराकोटीची छद्म बुद्धीकुशाग्र कूटनीती आणि तल्लख बुद्धिमत्ता ही त्यांची गुणवैशिष्टये होती. त्यांचे पूर्ण नांव सखाराम भगवंत बोकील. हे हिंवर्‍याचा कुलकर्णी होते. त्यांचे पूर्वज पणतोजी गोपीनाथ कुलकर्णी यांना १६५९ मध्ये शिवरायांकडून हिंवरें गांव इनाम मिळालेले होते.


Thursday, November 24, 2016

सच्च्या प्रेमाची अदुभूत गाथा - अमृता - इमरोजची लव्ह स्टोरी !


शारीरिक ओढीच्या पलीकडचे प्रेम कसे असते ? जाणून घ्यायचंय ?
मग अवश्य वाचा सच्च्या प्रेमाची मधुर गाथा ....
ती एक हळव्या मनाची किशोरी ; वयाच्या १६ व्या वर्षी असंवेदनशील, व्यसनी आणि थोराड पुरुषाबरोबर तिचं लग्न झालं तर ?
ती त्याच्याशी विवाह करते, मात्र त्याला पूर्णतः स्वीकारत नाही, ती त्याला तन देऊ शकते पण मन देऊ शकत नाही.
एकमेकाचे विचार भिन्न असूनही एकत्र राहणे योग्य की अयोग्य ?
मग 'तिला'च याची जाणीव होते अन ती स्वतःची सारी कुचंबणा त्याच्या गळी उतरवते. पुढे ते विभक्त होतात, पण तोवर तिच्या पोटी त्याचं बीज वाढतं.
या दरम्यान तिच्या आयुष्यात तिच्या सारखाच हळव्या मनाचा,प्रतिभाशाली, संवेदनशील व उमदा कवीमनाचा पुरुष येतो.
ती त्याच्यात पूर्ण गुंतून जाते आणि एके दिवशी आपल्या कवितेच्या इप्सिताच्या शोधात तो तिला अर्ध्यात निरोप देऊन आपलं राहतं शहर सोडून मुंबईला निघून जातो.


Saturday, November 12, 2016

रंग 'हरवलेली' रंगपंचमी ...

'बालपण देगा देवा’ असं सर्वचजण म्हणत असतात पण बालपण काही केल्या परत मिळत नसतेमात्र आयुष्यात काही क्षण असे येतात की आपल्याला बालपणाचा आनंद पुन्हा लुटता येतोहे क्षण आपल्याला पुन्हा त्या वयातील आठवणींचा पुनर्प्रत्यय देतातत्या आनंदाची तशीच पुनरावृत्ती होतेआपणही त्या क्षणांत हरखून जातोप्रत्येकाच्या जीवनात काही प्रसंगकाही घटना आणि काही आठवणी अशा असतात की मनाच्या गाभाऱ्यात त्या चिरंतन टिकून असतातत्यातही शैशवाच्या गोड स्मृतींना उजाळा देण्याचं काम हे क्षण करत राहतातअशा चैतन्यदायी क्षणांची अख्खी शृंखला आपल्यासमोर साकारण्याचे काम रंगपंचमी करायची.


Monday, November 7, 2016

सवाल...एका प्रश्नाचे उत्तर शोधित निघालो होतो तेंव्हाची ही कथा.....
उत्तराच्या शोधात हातोडयाने राजकारणी लोकांच्या डोक्यात खिळे ठोकले तेंव्हा सर्वांचेच रक्त लाल निघाले,
भगवे, हिरवे वा निळे अन्य कुठल्या रंगाचे रक्त कुठेच दिसले नाही.
देशाच्या नकाशात कुठे भाषा, प्रांत, जात, धर्माची कुंपणे दिसतात का बघावीत म्हणून दुर्बीण घेऊन बसलो,
पण कोण्या राज्यांच्या सीमांवर कसलीही कुंपणे दिसली नाहीत.
सर्व महापुरुषांची पुस्तके वाचून काढली, त्यांचे विचार अभ्यासले, त्यांना अनुभवले,
पण एकानेही एकमेकाविरुद्ध लिहिल्याचे कुठे वाचनात आले नाही.
वरपासून खालपर्यंत वाहणारया नदयांचे काही बोडके तर काही समृद्ध खोऱ्यांचे का धुंडाळले,
नदयांचा प्रवाह कुठे भेद करत नव्हता, मार्ग मिळेल तिकडे आरामात वळत होता.Friday, October 28, 2016

कवितेचे बंड - ज्योती लांजेवार


‘घर काळोखात उभे
आत तान्हुला रडतो
देह सजवी माऊली
पान्हा चोळीत गळतो’
स्त्रियांचे नेहमीच शोषण होत गेले पण स्त्रियांनी त्यामुळे आपला स्त्रीत्वाचा धर्म कधीही सोडला नाही. स्त्रियांनी आपल्या अंगभूत कर्तव्यांशी कधी बेईमानी केली नाही, प्रसंगी शील विकले पण आपल्या कर्तव्यांना त्या सन्मुख राहिल्या. मनाला स्पर्श करणाऱ्या मोजक्याच पण हळव्या शब्दात स्त्रीत्वाचे दुःख आणि स्त्रीची कर्तव्य सापेक्षता या कवितेत समोर येते. कवयित्री प्रा. डॉं.ज्योती लांजेवार यांची ही कविता.

"स्त्रियांना संरक्षण तीस टक्के आरक्षण
एक क्रांतिकारी पाऊल आहे-
भ्रष्टाचाराच्या जंगलात चोरांची चाहूल आहे. .... "
आपलं म्हणणं मांडताना ते थेट लक्ष्यावर घाव घालणारे मर्मभेदी असलं पाहिजे याची पुरेपूर जाणीव कवयित्री लांजेवार यांना आहे. दलितांच्या आरक्षणाबद्दल आणि हक्काबद्दल तर अगदी आक्रमक व अभ्यासू पद्धतीने त्या आपले म्हणणे मांडतातच. खेरीज महिलांच्या हक्काबद्दलही त्या सजग आहेत. स्त्रीत्वाचा हुंकार त्या गर्जनेच्या स्वरुपात देतात, त्यात उपेक्षित भिक्षुकीच्या छटा न येऊ देता आपला मुलभूत हक्काचा रेटा उतरवतात. स्त्रियांच्या आरक्षणाची जी काही टक्केवारी आहे त्यावर भाष्य करताना या तरतुदीतून निर्माण झालेल्या समस्येवर त्या अचूक बोट ठेवतात. स्त्रियांच्या आरक्षणाची ही योजना निश्चितच क्रांतिकारी आहे हे मान्य करून त्यातली उणीव पुढच्याच पंक्तीत अधोरेखित करतात. कारण या स्त्री आरक्षणाच्या आडून पुरुषच पत्ते पिसतात आणि त्यातून सोयीस्कर लोकांची वर्णी हव्या त्या जागी लावून भ्रष्टाचाराची नवी कुरणे निर्माण करतात.


Tuesday, October 25, 2016

विद्रोही 'फिर्याद' - हिरा बनसोडेसखी, आज प्रथमच तु माझ्याकडे जेवायला आलीस,
नुसतीच आली नाहीस तर तुझी जात विसरून आलीस.
सहसा बायका परंपरेची विषमता विसरत नाहीत
परंतु तु आभाळाचे मन घेऊन आलीस,
माझ्या वीतभर झोपडीत,
वाटले, जातीयतेचा तु कंठच छेदला आहेस,
माणसाला दुभंगणाऱ्या दऱ्या तु जोडत आली आहेस.
खरेच सखे, फार फार आनंदले मी,
शबरीच्या भोळ्या भक्तीनेच मी तुझे ताट सजविलं,
किती धन्य वाटलं मला !
पण ....पण ताट पाहताच तुझा चेहरा वेडावाकडा झाला,
कुत्सित हसून तु म्हणालीस,
" इश्श ! चटण्या, कोशिंबिरी अशा वाढतात का ?
अजून पान वाढायला तुला येत नाही
खरच, तुमची जात कधीच का सुधारणार नाही ?"
माझा जीव शरमून गेला ....
मघाशी आभाळाला टेकलेले माझे हात
खटकन कुणीतरी छाटल्यासारखे वाटले,
मी गप्प झाले ...
जेवण संपता संपता तु मला पुन्हा विचारलेस,
" हे गं काय ? मागच्या भातावर दही, ताक काहीच कसं नाही ?
बाई गं, त्याशिवाय आमचं नाही हो चालत.......?"
माझं उरलंसुरलं अवसानही गळालं
तुटलेल्या उल्केसारख,
मन खिन्न झालं,सुन्न झालं पण ....
पण दुसऱ्याच क्षणी मन पुन्हा उसळून आलं
पाण्यात दगड मारल्यावर जसा तळाचा गाळ वर येतो,
तसं सारं पुर्वायुष्य हिंदकळून समोर आलं,
" सखे, दही- ताकाच विचारतेस मला ! कसं सांगू गं तुला ?
अगं लहानपणी आम्हाला चहाला सुद्धा दुध मिळत नव्हतं,
तिथं कुठलं दही अन कुठलं ताक ?
लाकडाच्या वखारीतून आणलेल्या टोपलीभर भुश्श्यावर
माझी आई डोळ्यातला धूर सारीत स्वैपाक करायची
मक्याच्या भाकरीवर लसणाची चटणी असायची कधीमधी,
नाहीतर भाकरी कालवणाच्या पाण्यात चुरून खायचो आम्ही,
सखी, श्रीखंड हा शब्द आमच्या डिक्शनरीत नव्हता तेंव्हा,
लोणकढी तुपाचा सुगंध घेतला नव्हता कधी माझ्या नाकाने,
हलवा, बासुंदी चाखली नव्हती कधी या जिभेने,
सखी, तुझी परंपरा तु सोडली नाहीस,
तर तिची पाळेमुळे तुझ्या मनात रुजलेली आहेत
हेच त्रिवार सत्य आहे ....
मैत्रिणी, मागच्या भातावर दही नाही
म्हणून रागावू नको गं .....!
तुला वाढलेल्या ताटात आज पदार्थांचा क्रम चुकला
यात माझा काय दोष, हे मला सांगशील का ?
माझा काय दोष मला सांगशील का ?'
कवयित्री हिरा बनसोडे यांची 'फिर्याद' या काव्यसंग्रहातली ही कविता.


Saturday, October 1, 2016

दोन पावले मागे सरलेला 'वाघ' ...


आज उद्धव ठाकरेंनी केलेले काम संजय राऊत यांनी सामनामधून वेळीच केले असते तर आज ही वेळ शिवसेना पक्षप्रमुखांवर आली नसती..
संजय राऊत यांनी वादग्रस्त व्यंगचित्र छापून आल्यानंतरच्या दुसऱ्या दिवशीची प्रसिध्द केलेली बातमी मराठा समाजाला त्या व्यंगचित्रापेक्षाही क्लेशदायक वाटल्याचे अनेक जणांच्या विचारांतून जाणवले.
सामना / संजय राऊत यांनी माफी मागून जे काम सहज शक्य होते ते त्यांनी केले नाही.Thursday, September 29, 2016

'अनसोशल' मीडियावरवरचा 'भगवा' मुळचा आहे तरी कसा ?मागील काही दिवसांपासून कोण कुठल्या जातीचा आहे किंवा कोण आपला आहे वा परका आहे यावरून सोशल मिडियावर मोठे रणकंदन पहावयास मिळते आहे. विशेष गोष्ट म्हणजे हा सोशल मिडिया वापरण्याचा उद्योग शिक्षित लोक व ज्यांच्याकडे वारेमाप इंटरनेट वापरण्या इतका पैसा खिशात खुळखुळतो तेच मोठ्या प्रमाणात दिवसभर अगदी रोजंदारीने कामावर असल्यागत नित्यनेमाने करत असतात. ज्याला दोन वेळची खाण्याची भ्रांत असते, ज्याला अन्न वस्त्र निवारा यांची ददात असते त्याच्या गावी या भानगडी नसतात. ज्यांचे आर्थिक उत्पन्न अगदी तुटपुंजे आहे आणि ज्यांच्याकडे मोबाईल नाही किंवा मोबाईल असूनही इंटरनेट नाही असे लोकही या भानगडीत पडत नाहीत.Friday, September 23, 2016

गावाकडचे दिवस ....भावार्थ रामायण .गावात भावार्थ रामायणाचे पारायण सुरु असले की अजूनही काही दृश्ये हमखास जशीच्या तशी नजरेस पडतातच. गावातले वातावरण या काळात संपूर्णतः भारलेले असे असते. रोज संध्याकाळी शेतातली कामे करून थकून भागून आल्यानंतर वेशीतल्या मारुतीरायाच्या देवळात रामायण ऐकायला जाणे हे एक स्वर्गस्थ सुखच असे. बत्तीच्या उजेडात थोड्याशा उशीरपर्यंत चालणारया या श्रवण सोहळ्याचे अनेक क्षण मनावर कोरलेले अगदी जसेच्या तसे आहेत.
पारायणात रामाचा जन्म झाल्यावर आया बायांना आपल्याच घरात पाळणा हलल्यागत वाटायचे. राम लक्ष्मण जसजसे मोठे होत जायचे तसतसे याना स्फुरण चढायचे.Wednesday, September 21, 2016

मला उमगलेला 'मराठयांचा मूकमोर्चा'....


शिवरायांना बाह्य शत्रूंनी जितका त्रास दिला तितकाच त्रास अंतर्गत शत्रूंनी दिला. भाऊबंदकीच्या शापाने शिवरायांनाही त्रास झाला आणि संभाजीराजांना त्याची अधिक झळ पोहोचली. इतिहासावर चिंतन करताना हा मुद्दा अनेक वेळा माझ्यासारख्या अनेक शिवप्रेमींचा मानसिक छळ करतो. शिवछत्रपतींनी अनेक वेळा आपल्या नातलगांना, आप्तेष्टांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. भाऊबंदकी मिटावी म्हणून प्रयत्न केला, पण वैरभाव संपला नाही. सर्वच शिवप्रेमींना या गोष्टीची खंत वाटते की आपला समाज राजांच्या हाकेस ओ देऊन एकीने का सामोरा गेला नाही. आज हे परिवर्तन घडत्येय. निमित्त कोपर्डीच्या चिमुरडीवरील अत्याचाराचे झाले आहे. त्यातून लाखोंच्या मनात खदखदणारा असंतोष म्हणा वा माझ्यासारख्या सामान्य माणसासारख्यांची ही जुनी नासूर होऊन छळणारी खंत बाहेर पडते आहे. जे काम शिवरायांच्या काळात होऊ शकले नाही ते आज होतेय असे होत असताना निव्वळ बघ्याची भूमिका घेऊन बसणे योग्य वाटत नाही. कारण एकीकडे खंत व्यक्त करायची की मराठे कधीच एकत्र येत नाहीत, मराठे एकमेकाला सदैव पाण्यात बघतात, मराठे म्हणजे एकमेकाच्या अंगावर चढणारे खेकडे आहेत म्हणून हिणवायचे आणि प्रत्यक्ष अशी एकत्रित होण्याची पहिलीच ऐतिहासिक वेळ आल्यानंतर त्यातील दोष शोधत बसणे हा दुटप्पीपणा ठरतो.Tuesday, September 20, 2016

अखिल बिरादरीचा बापवृक्ष .....

माती आणि आई ही प्रेमाची सर्वोच्च रूपे आहेत. प्रत्येक जण प्रेम व्यक्त करताना यांचा दाखला देतोच. ममता, माया, स्नेह आणि आपुलकीने ओथंबलेलं नातं दर्शवताना आई किंवा मातीचं रूपक वापरलं जातंच. जो तो आपल्या परीने हे ममत्व जोपासतो. आपण आपल्या आईवर किती प्रेम करतो किंवा आपली काळी आई आपल्यासाठी किती प्राणप्रिय आहे हा सर्वांचा जिव्हाळयाचा विषय असतो. आईवरचं प्रेम कुणीही व्यक्त करू शकतो, अगदी वन्य वा पाळीव प्राण्यातही पिलांचा आपल्या मातेप्रती स्नेहभाव असतो. ज्या प्रमाणे गाय आपल्या वासराला चाटते त्याच मायेने वाघीण देखील आपल्या बछडयाला तितक्याच मायेने चाटत असते. हे सर्व आपले प्रेम व्यक्त करू शकतात कारण ते सचेतन सजीव आहेत. चालू बोलू शकतात. मात्र मातीवर प्रेम व्यक्त करणाऱ्या जीवात अचल सजीवही असतात ! फक्त माणूसच ह्या काळ्या आईवर प्रेम करतोय असं काही नाही. माणूस बोलून दाखवतो पण वृक्षवल्ली आपलं प्रेम कसं व्यक्त करत असतील याचं नेमकं उत्तर देता येणार नाही. म्हणूनच मातीवर प्रेम करणाऱ्यांचा धांडोळा घ्यायचा झाला तर केवळ माणसांचाच विचार करून चालणार नाही. मातीवरील अस्सल प्रेमाचे जगातील सर्वात श्रेष्ठ प्रतिक काय असेल तर तो वटवृक्ष ! एका अंकुराच्या रूपाने उगवलेलं इवलंसं रोप मातीत खोल रुजत जातं आणि त्याची देहयष्टी फुलत जाते. बघता बघता त्याचा बुंधा भरत जातो अन त्याच्या फांदया वाऱ्याला कवेत घेऊ पाहतात. कधी काळी हातांच्या मिठीत मावणारे त्याचे खोड काही वर्षात भले मोठे होऊन जाते. चार जणांनी फेर धरला तरी त्याचा बुंधा हातात मावत नाही इतका प्रचंड पसारा वाढतो. 


Friday, September 16, 2016

शुक्रतारा - मंगेश पाडगावकर


'एक जिप्सी आहे माझ्या खोल मनात दडून
आठवते बालपण जेव्हां होतो मी खेळत
होतो बांधीत मी घर सवंगड्यांच्या संगत
कौले पानांची घराला आणि झावळ्यांच्या भिंती
आठवते अजूनहि होतो रंगत मी किती !
पण अकस्मात होतो जात सारे उधळून
एक जिप्सी आहे माझ्या खोल मनांत दडून.........

घर असूनहि आता घर उरलेले नाही
चार भिंतींची जिप्सीला ओढ राहिलेली नाही
कुणीं सांगावे ? असेल पूर्वज्मींच्या हा शाप
घडी सुस्थिरपणाची विसकटे आपोआप …
कुणी तरी साद घाली दूर अनंतामधून …
एक जिप्सी आहे माझ्या खोल मनांत दडून...'

सर्वांच्या मनामनात एक अवखळ, निष्पाप निरागस असं शैशव दडून बसलेलं असतं, प्रत्येकाला अखेरपर्यंत ते जाणवतं मात्र ते कधी व्यक्त करता येत नाही. जनमानसाच्या मनातील भावनांच्या प्रकटीकरणाचं हे काम कवी मंडळी करतात. सर्वच कवींना हे जमतं असं नाही. काही कवी ते वैयक्तिक अनुभव म्हणून मांडतात मग तो त्यांच्यापुरता मर्यादित होऊन जातो. मात्र अद्वितीय प्रतिभा लाभलेला एखादा कवी अगदी सहजतेने, उत्कटतेने अशा काही शैलीत हा अक्षरगंध रेखाटतो की त्या भावना वैयक्तिक कवीपुरत्या सीमित न राहता सर्वंकष स्वरूप धारण करतात. ते काव्य वाचताच रसिक उद्गारतात की नेमके माझ्या मनातले भावच कवींनी मांडले आहेत. ही किमया करतानाच जर त्या कवींनी बालकवितांपासून प्रेमकविता, गूढकविता, निसर्गकविता, सामाजिक आशयाच्या कविता, बडबडगीते, विरहगीते, चित्रपटगीते, भावगीते अशा सर्व प्रकारचे विपुल काव्यलेखनातून एक अलौकिक श्रेष्ठ दर्जाची साहित्यनिर्मिती केली असेल तर त्या कवीला कविश्रेष्ठच म्हटले पाहिजे. कवी मंगेश पाडगावकर यांचे नाव यामुळेच मराठी साहित्यात सुवर्णाक्षराने लिहिले गेले आहे.


Friday, August 12, 2016

चित्रकवी - वसंत आबाजी डहाके ....आता डोक्यात चंद्र घेऊन उभं राहायचं विठ्ठलासारखं,
कमरेवर हात ठेवून.
नाही तर विष्णूसारखं पडून
राहायचं पाण्यावर तरंगत.
चांदणं पाझरत राहील आत आत
सगळ्या नळ्यांमधून सावकाश.
आपलं शरीर इथं सापडतं
संतांना विठ्ठल सापडल्यासारखं.

‘टाटा मेमोरिअल हॉस्पिटल'मधून वावरताना कवी वसंत आबाजी डहाके यांना सुचेलेली ही कविता 'चित्रलपी' या काव्यसंग्रहातील आहे. या काव्यसंग्रहास साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता...


Wednesday, August 10, 2016

नावाची 'जन्म'कथा.....घटना फार जुनी नाही. माझ्या एका मित्राला मुलगी झाली अन त्याने विचारले की माझ्या चिमुकल्या डिअर डॉटरसाठी काही नाव सुचवशील का ?
मी काहीच बोललो नाही मात्र थोडा विचारात पडलो. थोडा मागे भूतकाळात गेलो ….
खरे तर आजकालची नावे काहीशी क्लिष्ट, अगम्य, दुर्बोध तर असतातच पण त्यातलं मराठीपण हरवत चालले आहे. शिवाय भावंडांना हाक मारण्यासाठी दादा, ताई, अक्का, जिजी, माई, भाऊ अशी संबोधनेही वेगाने लोप पावताना दिसताहेत. आईबाबांच्या ऐवजी मॉम डयाडची ब्याद कमी होती की काय म्हणून ड्यूड, ब्रो, सिस, बेबी याचं फॅड सगळीकडे वाढलंय ! या आंग्लाळलेल्या संबोधनात भर घालण्याचे काम प्रेमीयुगुलंही नेटाने करताहेत. वानगीदाखल बोलायचे झाले तर काही मुली दिवसभरातून (चार वेगवेगळ्या) मित्रांना माझं पिलू, माझं कोकरू असल्या नावाने आळवत असतात. तर मुलंही मागे नसतात तेही अनेकींना एकाच वेळी सनम, जानम, जानू, पाखरू अशा नावांनी आळवत असतात. सखी आणि मित्रही हरवले आहेत. तिथे रुक्ष फ्रेंड आलेय.Tuesday, August 2, 2016

पुरुषी वासना आणि सखाराम बाईंडर......

पुरुषी विकार-वासना ह्या कधी प्रकट तर कधी अप्रकट स्वरुपात असतात. ह्या वासना कधीकधी पुरुषाचा कब्जा घेतात अन त्याच्या जीवनात रोज नवे नाट्य घडू लागते.
इतर लोकांना कधी बलात्कार वा अन्य अनैतिक बाबीतून हे नाट्य जाणवत राहतं. एखाद्या पुरुषाच्या मनात किती व कोणते वासना विकृती विकार असू शकतात किंवा तो वासनांचे शमन राजरोसपणे बायका ठेवून कसे करतो या बाबी समाजाच्या दृष्टीने नेहमीच औत्सुक्य विषय झाल्या आहेत !
मराठी रंगभूमीवर या अंतहीन पुरुषी वासनांचा वेध एका नाटकाने घेतला होता ते नाटक म्हणजे 'सखाराम बाईंडर'....त्या नाटकाच्या अनुषंगाने या विकाराचा एक छोटासा धांडोळा...


Tuesday, July 26, 2016

मराठी साहित्यातला 'नाम'महिमा .....आयुष्यात सर्वप्रथम अक्षरं डोक्यात शिरली ती बाराखडीतून. आज बाराखडी क्रमानुसार कितीजणांना म्हणता येते ते सांगता येणार नाही मात्र त्यातील काही अक्षरांनी केलेली जादू दिगंतापर्यंत टिकून राहणारी असेल हे निश्चित. तर या बाराखडीतील अक्षरे कित्येक लेखक - कवींच्या नावात प्रवेशकर्ती झाली अन त्या अक्षरांची एक जोडीच बनून गेली. मराठी साहित्यातील काही नावं त्यांच्या अद्याक्षरातच इतकी सवयीची होऊन जातात की त्यांच्या उच्चारणात एक गोडी निर्माण होते अन त्या नावाशी आपसूक भावनिक नाते तयार होते. अशी अनेक नावं वानगीदाखल सांगता येतील. ग.दि.माडगुळकर (आपण तर थेट गदिमाच म्हणतो की नै !) , पु.ल.देशपांडे (हे असं इतकं मोठ्ठ नाव घेण्याऐवजी आपल्याला पुलं जास्त जवळचं वाटतं होय ना ?), वि. स.खांडेकर (यांना तर आपण विसं या नावानेच आणखी शॉर्ट केलं आहे) , व.पु.काळे (पूर्ण नावाचा इथं पुन्हा कंटाळा वर भरीस आणखी लघु रूप - फक्त वपु !), गोविंद विनायक उर्फ विंदा करंदीकर (इथंही विंदा असं सहजरूपच जास्त रसिकप्रिय),

ह.ना.आपटे, बा.सी.मर्ढेकर, ह. मो. मराठे, य. दि.फडके, म.गो.रानडे, भा.रा.तांबे, बा.भ.बोरकर, वि. वा.शिरवाडकर, प्र.के.अत्रे, चि.त्र्यं.
बालभारती

उजळणी 
खानोलकर, ना.धों.महानोर, श्री.ना.पेंडसे, श्री.म.माटे, जी.ए.कुलकर्णी (जीएंच्या नावातलं कुलकर्णी उच्चारले नाही तरी नुसत्या जीएवर सहज काम भागते, होय ना ?), फ.मुं.शिंदे (यांच्या नावाचे तर अनुस्वार आपण उडवले अन ते फक्त 'फमु'च झाले) , शं.ना.नवरे ( नुसतं शन्ना हे देखील किती भारी वाटतं ना ?), पु.शि.रेगे, दि.पु.चित्रे, द.मा.मिरासदार ( फक्त दमामि इतकं म्हटलं तरी कुणाची मिरासदारी आहे हे कळायचं) आ. ह.साळुंखे, गं. बा.सरदार, न.चिं.केळकर, गो.नी. दांडेकर (गोनीदा असं आपण याला आणखी लाघवी केलं आहे), वा.रा.कांत, ना. सी.फडके, य. गो.जोशी, रा.रं.बोराडे, चिं. वि.जोशी, भा.रा.भागवत, वि. सं.वाळिंबे, रा.ग.जाधव, वि. का.राजवाडे, पु.भा.भावे, वि. स.पागे, ग.ल.ठोकळ, ना.सं.इनामदार, पी.सावळाराम, वि.म.कुलकर्णी, रा.ग.जाधव, न.र.फाटक, गो.पु.देशपांडे, गो.ना.दातार, ना. घ.देशपांडे, दि.बा. मोकाशी, गो.म.कुलकर्णी, वि.म.दांडेकर,द.भि.कुलकर्णी, शि.म.परांजपे, शि. द.फडणीस (शब्दांऐवजी रेषातून बोलणारे) , ग.प्र.प्रधान, गो.ब.देवल, व.बा.बोधे, ग.ह.पाटील, म.वा.धोंड, त्र्यं. श्री. शेजवलकर, रा. चिं. ढेरे, प्र.ल. मयेकर आणि शेवटी एकाक्षरी कवी 'बी' (मुरलीधर गुप्ते) ! नेमके या उलट असलेले म.द. हातकणंगलेकर हे श्रेष्ठ विचारवंतच असणार याची ख्याती नामभिधानातून येते ! तर वि.दा.सावरकर नाव उच्चारले तरी आपोआप 'जयोस्तुते' ऐकू येतं !

आ.रा.देशपांडे मात्र अनिल या नावानेच जास्त जवळचे वाटतात. तर शांता ज. शेळके यांच्यातल्या 'ज'शिवाय
कुमारभारती  
काहीतरी हरवल्यासारखे वाटते. याचा मतितार्थ असा नाही की ज्यांची नावे सरळ सरधोपट होती वा कलाकुसरीची वा प्रज्ञावंत, शोभिवंत होती ते मनात ठाण मांडून नव्हते ! त्यांनाही सर्व रसिकांच्या मनात मानाचे स्थान आहेच ! जसे की नरहर कुरुंदकर, मंगेश पाडगावकर, सुरेश भट, नारायण सुर्वे, रंगनाथ पठारे, इंदिरा संत, नामदेव ढसाळ, दया पवार, जयवंत दळवी, केशव मेश्राम, सरोजिनी बाबर, ज्योती लांजेवार, यशवंत देव, माधव मनोहर, अशोक नायगावकर, मधुसूदन कालेलकर, जगदीश खेबुडकर, रॉय किणीकर, सदानंद रेगे, अनिल अवचट, गंगाधर महांबरे, पद्मा गोळे, वंदना विटणकर, शंकर वैद्य, रमेश मंत्री, इंद्रजीत भालेराव, अनिल कांबळे, इलाही जमादार, प्रवीण बर्दापूरकर, गौरी देशपांडे, अरुणा ढेरे, अनुराधा पोतदार, विभावरी शिरुरकर, प्रभा गणोरकर, सुनिता देशपांडे, स्नेहलता दसनूरकर, दुर्गा भागवत, सुमती क्षेत्रमाडे, वासंती मुजुमदार, हिरा बनसोडे, गोडावरी परुळेकर ही सर्व नावे वाचली तरी मन हरखून जाते अन ऊर मायमराठीच्या अभिमानाने फुलून येतो ! सेतू माधवराव पगडी, शिवाजी सावंत, रणजीत देसाई, संजय सोनवणी,विश्वास पाटील ही नावे जरी घेतली तरी शिवकालात गेल्यासारखं वाटतं ! मारुती चितमपल्ली हे नाव उच्चारलं तरी जंगलाची सैर करून आल्यासारखं वाटतं तर जयंत नारळीकर व निरंजन घाटे म्हटल्याबरोबर विज्ञानकथेत कुठे तरी भेटलेल्या माणसाची आठवण होते. महेश एलकुंचवार कसं 'चिरेबंदी' नाव आहे ना ! बाबुराव बागुल- अर्जुन डांगळे - भुजंग मेश्राम ही नावे एकत्र वाचली तरी विद्रोहाचा बिगुल वाजतो. शंकर पाटील नावासरशी गालावर हसू येतं.

यातही काही नावे अनोखी होती, शरच्चंद्र मुक्तिबोध आणि नंदिनी आत्मसिद्ध ही भारदस्त नावं मला अजूनही
युवकभारती 
खुणावतात तर साधी सोपी 'बहिणाई' देखील काळजात ठाण मांडून बसते. 'ग्रेस'मधला ग्रेस कधीच संपत नाही. 'सौमित्र' हा तर काव्यमित्र वाटतो. आरती प्रभू म्हणजेच चि.त्र्यं.खानोलकर असतील यावर अजूनही विश्वास बसत नाही. तर विभावरी शिरुरकर आणि मालती बेडेकर ह्या दोघी भिन्न व्यक्ती असाव्यात असंच वाटते. त्याच बरोबर शिरीष पै ही एखादी शोडषाच असावी असंच अजूनही वाटते. नाट्यछटावाले 'दिवाकर' हे कुणी तरी गूढ वयस्क व्यक्तीच असावेत असं भासतं. माधव ज्युलियन या नावाचा कुणी इंडोइटालियन देखणा रोमन असावा असं वाटते. राम गणेश गडकरी हेच 'गोविंदाग्रज' हे पटत नसायचे वर अजून हाच माणूस बाळकराम कसा काय बुवा असा विचार येतो. तर 'कुसुमाग्रज' म्हणजेच वि.वा.शिरवाडकर नसून ते कुणी तरी स्वर्गीय जादुई कवीच असं भासतं ! वसंत आबाजी डहाके या नावाचा माणूस अक्षरेच चित्रलिपीतून जन्मास घालत असणार असं मनात येतं. विजय तेंडुलकर या नावातच रंगभूमीचा अर्थही सामावला असावा असं वाटत राहतं. भालचंद्र नेमाडे या नावानिशी हेमाडपंती खमकी शैली असणारा माणूस अक्षरबाह्य जगातही भेटतो. बाळ गाडगीळ - गंगाधर गाडगीळ या द्वयीने अन केशवसुत आणि केशवकुमार या दोन दिग्गज नावांनी बालपणात अनेक वेळा गोंधळवलं आता मात्र हेच जीवनाचे आधारविचार वाटतात. तर्कतीर्थ म्हटलं आपोआप लक्ष्मणशास्त्री पुढ उच्चारलं जातंच ! मालिका अमरशेख या नावाचंही असच गारुड तर बाबा भांड नाव जरी घेतलं तरी 'तंट्या'बखेडा सुटल्यासारखं वाटतं. बाबा कदम, रत्नाकर मतकरी, सुहास शिरवळकर ही नावच रहस्यमय वाटतात. राजन खान आपल्या नावातूनच प्रश्नचिन्ह लावायला सुरुवात करतात.
मुळाक्षरे 
बाळकृष्ण कोल्हटकर, वसंत कानेटकर, श्रीपादकृष्ण कोल्हटकर या तीन नावात अनकेदा सारखेपणा वाटायचा. त्याचबरोबर मधु मंगेश कर्णिक हे नावातले तीन शब्द आहेत पण ते एकजीव असल्यासारखेच वाटतात. अण्णा भाऊ साठे, अनंत विठ्ठल कीर, कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, हरी नारायण आपटे, पांडुरंग सदाशिव साने, उत्तम बंडू तुपे ह्या त्रिदेही नावातील शब्ददेखील अशीच ब्रम्हा विष्णू महेश या धर्तीची एकमेकाशी तादात्म्य पावलेले ! ह्या सर्व नावांत एक अनामिक ओढ आहे आणि मराठीची गोडी आहे…

अक्षरधारा  
नावात काय आहे असं जरी शेक्सपिअरने म्हटलं असलं तरी ही नावं मला फार आपलीशी वाटतात याचं एक कारण असं असू शकतं की माझ्या जडणघडणीत या सर्वांचा वाटा असला पाहिजे. आधी बाराखडी, मग बालभारती, पुढे कुमारभारती नंतर युवकभारती आणि आता आयुष्याच्या प्रत्येक पायरीवरती या नावांची एक शिडी कामाला येते जी अडीअडचणीतून मार्ग काढते अन आनंदी जीवन जगण्याच्या सुबक अक्षय अक्षरी प्रेरणा देते. ज्याने जीवन सुफळ संपूर्ण होते !

- समीर गायकवाड