शुक्रवार, १३ मे, २०१६

वढू तुळापूरची गाथा .....



राजे, इथल्या पाण्यात अजूनही तुमचे प्रतिबिंब दिसते,
हताश झालेला औरंग्या दिसतो, त्या दिवशी अबोल झालेली इथली सृष्टी अजूनही तशीच थबकून आहे !
राजे इथे तुमच्या किंकाळ्या कुठेच ऐकायला येत नाहीत वा ना हुंदके ऐकायला येतात !
कवीराज कलश यांचे थोडेसे उमाळे मात्र इथल्या हवेत अजूनही ऐकता येतात ! ज्यांनी तुमचा छळ केला ते रात्र रात्र झोपू शकत नसत त्यांच्या कन्हण्याचा आवाज मात्र इथल्या मातीला कान लावला की ऐकायला येतो !
राजे तुमची जिव्हा जेंव्हा कापली त्या दिवशीपासून इंद्रायणी जी अबोल झाली ती आजतागायत मूक बनून राहिलीय !
भीमेची तर दृष्टी गेली अन तिचा प्रवाह कूस बदलत गेला, का माहिती आहे का राजे ? कारण ज्या दिवशी तुमचे डोळे लालबुंद तापवलेल्या सळया घालून काढण्यात आले, त्या दिवशी याच संगमावर ती इंद्रायणीच्या गळ्यात पडून ओक्साबोक्शी रडली राजे ! राजे ती धाय मोकलून रडली ! नेत्र तुमचे काढले अन दृष्टी तिची गेली, ती अजूनही तुमच्या शोधात वाहते आहे. तुळापुरच्या संगमावर येऊन आपले डोके टेकतेच आहे !

राजे, ज्या दिवशी तुमच्या कानात उकळते तप्त शिसे ओतले त्या दिवशी इथल्या पाखरांनी, पक्षांनी गगनभेदी गलका केला. जणू त्यांना मुघली सत्तेच्या कानीकपाळी ओरडून सांगायचे होते," आमच्या राजाचे कान बधीर होणार नाहीत, त्यांची श्रवणेंद्रिये आम्हीच आहोत ! त्या दिवशी इथल्या पानांनी अखेरची सळसळ ऐकून घेतली त्यानंतर त्यांनी आजतागायत आपले कान आपल्याच देठी मिटून टाकले आहेत !

कवीराज तुमच्या आधी गेले आणि त्रिवेणी संगमावरची प्राणपाखरे हिरमुसून गेली, कुंद मेघ दाटून आले त्यांनी ओघळत्या डोळ्यांनी कविराजांना अश्रूंच्या पंक्ती अर्पित केल्या. कविराज गेले तेंव्हाही तुम्ही निश्चल होतात, तुमचा निडरपणा अन तुमची दृढता बघून हाताच्या मुठी आवळून चरफडणारा मुघल बादशहा डोळ्यात साठवण्यासाठी भीमाशंकराच्या जटेतून निघणारी भीमा वेगात पुढे यायची ! इथली माती मुघलांना हसायची आणि म्हणायची, "इथल्या मातीतच तुला एक दिवशी गाडायचे आहे रे औरंग्या, बेईमाना, हरामी बुझदिल मनाच्या पाताळयंत्री माणसा ! तू जाऊन जाऊन कुठे जाणार आहेस ?" असं म्हणणारी माती तुमच्या अंगाकडून येणाऱ्या वाऱ्यावरचे धुलीकण आपल्या काळजात साठवत जायची ! राजे, तुम्ही सोसत गेलात आणि ही साठवत गेली हो राजे !

ज्या दिवशी त्यांनी तुमच्या जखमांनी छिन्नविच्छिन्न झालेल्या गोऱ्यापान कायेला हात लावला त्यादिवशी इथली भूमी थरारून उठली, त्या दिवशी इथल्या पाण्यावर उठलेले तरंग अजूनही तसेच आहेत, राजे ! त्यांनी तुमची चामडी सोलून काढायला सुरुवात केली आणि मग मात्र सगळ्यांच्या अश्रुंचा बांध फुटला! अखेर हे सारे चराचरही सजीवच, त्यालाही भावना आहेत त्यालाही मन आहे. त्या दिवसापासून वढूतल्या झाडांनी माना खाली केल्या त्या अजून उचलल्याच नाहीत...

चंद्रतारयांनी तुम्च्या अखेरच्या श्वासाचा साक्षीदार होण्यास नकार दिला इथपर्यंत नौबत आली अन फाल्गुन अमावस्येने पुढाकार घेतला ! तुमचे प्राण मोकळे करण्यासाठी तिने स्वतःचा दिवस पुढे केला, जड पावलांनी ती सकाळ आली, रणरणत्या उन्हात सूर्याने तुम्हाला अखेरचे डोळेभरून पाहून घेतले. त्याला लाज वाटत होती त्याच्या अस्तित्वाची म्हणून त्या दिवशी अधून मधून शिरवळ पडत राहिली, सूर्याची किरणे साखळदंडात बंदिस्त असलेल्या रक्ताने माखलेल्या तुमच्या देहाच्या सावलीला शिवून रडत होती. राजे काय सांगू तुम्हाला, त्या दिवशी सारेच पंचतत्व आधीन झाले होते तुम्हाला कवेत घ्यायला आणि तुम्ही तरीही हार मानत नव्हतात, तुमचे श्वास चालूच होते पण त्याचा वेग मंदावत होता. तुमच्या देहाभोवती वारा रुंजी घालत होता जणू आपल्या धन्याची अखेरची सेवा तो बजावत होता. तुमच्या पावलांपाशी धरणीमातेने आपली कूस आता गच्च केली होती तिलाही तुम्हाला कवेत घ्यायचे होते !

पश्चिमेला नदीच्या पाण्यात थकलेला दमछाक झालेला लालकेशरी सूर्य हळूहळू पाण्यात जाऊ लागला आणि नदीने एकच हंबरडा फोडला,"राजे,राजे !"
सगळा आसमंत वेदनेच्या कल्लोळात बुडून गेला, सगळीकडे गहिवरून आले, चारीदिशा मलूल झाल्या, पत्थराला पाझर फुटले, आकाशाने आपले तोंड अंधाररात्रीच्या पदरात लपवले, अमावस्या तुम्हाला आपल्या कवेत घेऊन जोजवत राहिली, तिला तर रडताही येत नव्हते, राजे ! ती अबोलपणे तुमच्या तेजस्वी देहाला आपल्या उराशी कवटाळून ओघळत्या डोळ्यांनी निर्वाणाच्या तयारीस लागली होती...

आजही तुळापुरचा संगम ही गाथा भरल्या उराने मोठ्या अभिमानाने अन ताठ मानेने मात्र गहिवरल्या स्वराने तुमची ही शौर्य गाथा ऐकवत असतो ! ऐकून डोळ्यात पाणी येते अन ओठावर प्रश्न येतो, " माझ्या राजाने हे सारं कसं सोसलं असेल ?"

असा राजा इथल्या कुशीत जन्मून गेला याचा इथल्या मातीला चिरंतन काळासाठी अभिमान असेल, आमची तुम्हाला श्रद्धासुमने अर्पित करावी इतकीही लायकी नाही त्यामुळे आमच्याविषयी मी मुद्दामच लिहिले नाही राजे, माफी असावी..

'रक्ताच्या थेंबाने भिजलेली ही माती आजही गाते गाथा,
शिवपुत्र शंभूंच्या चरणधुळीने आजही पावन होतो माथा ....'

- समीर गायकवाड.

( सूचना - या पोस्टवर जातीय वा धार्मिक टिप्पणी करू नये हे सांगावे लागते हे माझे दुर्दैव म्हणावे लागेल )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा