Tuesday, May 17, 2016

अजून याद येते गावाची - एक आठवण नामदेव ढसाळांची .....दिवस असे अधून-मधून मला शहरातून गावाकडे घेऊन जातात. आता तिथं सावलीचा विटाळ धरत नाहीत, आता महारवाडय़ाचं रुपांतर राजवाडय़ात झालं आहे. सुगीसराई-अलुत्या बलुत्याचे मोसम संपले आहेत. मर्तिकाच्या चिठ्ठय़ा पोहोचवणं, फाटय़ा फोडणं, महसुलाचा भरणा करणं, वीर नाचवणं शिमग्याची सोंगं घेणं, महाराच्या होळीच्या विस्तवानं गावाची होळी पेटवणं.. आता सर्वच गेलं आहे बदलून. गाववस्ती, नदी-नाले पूर्वीचे राहिले नाहीत गावात गेलो की, महाराचं पोर आलं, असं आता म्हणत नाहीत. गाव किती बदलतं? पण बदलत नाहीत आठवणी.


म्हणूनच वाडी-वस्ती किंवापरिसर म्हटला की, मला माझ्या कनेरसरपूर गावची आठवण होते. या गाव-परिसराची मुळं माझ्या रक्तात खोलवर रुजलीत. वडाच्या पारंबीमधूनच नवीन झाड जन्माला येतं, तसं कनेरसरपूरच्या पारंबीला मी फुटलोय, असं मला सतत वाटत आलंय. इतकं कनेरसरपूर माझ्या ध्यानीमनी सतत जागं असतं आणि म्हणूनच कधीही वाडी-वस्तीचा विषय निघाला की, मला सगळ्यात आधी कनेरसरपूरच आठवतं. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील कनेरसरपूर हे एक गाव नाही. कनेरसर आणि पूर या दोन गावांच्या अद्वैतातून कनेरसरपूर नाव तयार झालं आहे. कारण गावं वेगवेगळी असली तरी त्यांचे व्यवहार, त्यांच्या रीतीभाती, त्यांचेसण-वार सारंच एकत्रितपणे चालायचं. गावंही एकमेकांना खेटल्यासारखीच. एकमेकांच्या सावल्या जणू. त्यामुळे कनेरसरच्या किंवा पूरच्या कुणालाही गावाचं नाव विचारलं तरी तो कनेरसरपूरच सांगतो. त्यामुळे मीही माझ्या गावाचं नाव कनेरसरपूरच सांगतो. पणआमचं घर होतं, पूर गावात. वेळ नदीच्या काठावर. नदी ओलांडली की, तिच्या डाव्या हाताला गच्च आमराई लागायची. या आमराईतच आमचं घर दडलेलं होतं. याच घरात नि कनेरसरपूर गावात मवयाची १२-१३ वर्ष घालवली. फक्त घराचा नाही, माझ्या कनेरसरपूर गावाचाच परिसर देखणा होता. मुळात गावच अभिजात. हिरव्यागार डोंगरांनी वेढलेलं गाव, गावातून वाहणारी नदी आणि नदीच्या काठावरच्या आमराईत गुडूप झालेलं माझं घर.. सारा माहौल थेट बालकवींच्या औदुंबर कवितेतला.

निसर्गाने आणि गूढरम्य वातावरणाने भारलेला नि भारावलेला. या भारावलेपणात गावाची ग्रामदेवता यमाई भर घालायची. दगडी मंदिरातल्या काळोख्या गाभा-यातील तिची उग्रसुंदर मूर्ती अप्रतिम होती. तिच्या गाभा-याच्या बरोबर समोर मंदिराच्या प्रांगणात यज्ञवेदी होती. या यज्ञवेदीत तेव्हा चैत्रपौर्णिमेला भरणा-या जत्रेच्या वेळी बोकडाचा बळी दिला जायचा. गावाचं हे रूपडं भुरळ घालणारं होतं. एकदम ट्रेडिशनल. गावाची खासियत म्हणजे एरवी महारांची वस्ती गावकुसाबाहेर असायची. पण आमच्या कनेरसरपुरात महारांची वस्ती आधी लागायची. नंतर सवर्णाची. त्यामुळे आपण गावकुसाबाहेर आहोत, असं आम्हाला कधी वाटलंच नाही. पण गावाच्या वेशीने गावकुसाबाहेर टाकलेलं नसलं तरी माणसांनी मात्र टाकलेलं होतं. जातीपातीची ती उतरंड माझ्या कोवळ्या मनावर तेव्हाही डागण्या द्यायची. विशेषत: आम्हाला बलुत्याच्या घरी भाकर मागायला जावं लागायचं; तेव्हा अगदी नको नको व्हायचं. भाकर मागायला जायचं म्हणजे हातात बलुत्याची घुंगरं बांधलेली काठी घेऊन जावं लागायचं. आमच्या वाटय़ाचं घरं आलं की तिथे काठी वाजवून हाळी द्यावी लागायची- भाकरी वाढ गं माय.. ही हाळी दिली की, ती पूर्ण होण्याआधीच घरातल्या सासुरवाशिणीच्या शिव्या ऐकू यायच्या- लॉथ उलथली याची. मुर्दा भल्या सकाळी आलाय भाकर मागायला..हे एवढय़ावरच थांबायचं नाही. शिव्यांची लाखोली सुरू असतानाच भॉ-भॉ करीत आतली माजलेली कुत्री अंगावर धावून यायची. त्या कुत्र्यांपासून बचाव करताना जीव मेटाकुटीला यायचा. धावता धावता पडायला व्हायचं. अंगावरच्या कपडय़ांचं नुसतं मातेरं होऊन जायचं. सकाळी घरातून निघताना सजून निघालेलो असायचो.

बापानं मुंबईच्या चोर बाजारातनं खरीदून पाठवलेले बूट आणि कपडे अंगात असायचे. पण बलुत्याच्या भाक-या घेऊन परत यायचो तेव्हा पार ध्यान झालेलं असायचं. असंच सवर्णाचं बाराव्या-तेराव्याचं किंवा लग्नाचं चूलबंद आवतनही नकोसं वाटायचं. आवतन म्हणून जेवायला गेलं, तर तिथे जातीनिहाय पंक्ती बसलेल्या असायच्या. ब्राह्मणापासून चांभारापर्यंत सा-यांची जेवणं झाली की, महारांच्या वाटय़ाला उरलंसुरलेलं यायचं. तिथेही वाढपी आगळीक करायचे. वाढता- वाढता शिव्या द्यायचे. कुणी चुकून ताट वर उचललंच तर शिवाशिवीच्या भीतीने त्यांची आधी गांड जमिनीवर ठेवही शिवी ठरलेलीच असायची. या शिव्या ऐकून जेवण घशाखाली उतरायचं नाही. माझा बाप तेव्हा मुंबईत कत्तलखान्यात नोकरीला होता. त्यामुळे आमची परिस्थिती इतर महारांपेक्षा बरी होती. माझ्या आईला तर कुणाच्या बाराव्या-तेराव्याच्या जेवणाला जायला आवडायचंच नाही. त्यामुळे ती शक्यतो जाणं टाळायची. पण अशा वेळी ज्याच्या घरचं आवतन असायचं तो राग धरायचा. दुस-या दिवशी घरी येऊन म्हणायचा, ‘काल आली नाहीस जेवायला. बाकीचे सगळे जेवून गेले. पण आमचं बलुतं असलेला महारच नाही आला तर लोक काय म्हणतील!माझा बाप मुंबईला नोकरीला असल्यामुळे मला-आईला असं वागून चालायचं. पण इतरांसाठी बाराव्या-तेराव्याच्या जेवणावळी हीच मेजवानी असल्यामुळे त्यांना जावंच लागायचं. या जेवणावळीत महार कुणाकुणाचं नाव सांगून त्यांच्या वाटणीच्या तेलच्या(तेलात तळलेल्या गव्हाच्या पिठाच्या जाडसर पु-या) मागायच्या. तेलात तळलेल्या या तेलच्या दोन-तीन दिवस चांगल्या राहायच्या. पण कधी कधी तर उरलेल्या तेलच्या मागून आणून त्यांचे तुकडे करून ते वाळवून वर्षभरही खाल्ले जायचे. महारकीतलं हे भीषण वास्तव तेव्हा नको वाटायचं. होळीलाही तीच गत. सवर्णाची होळी उकरायचे महार, ती पेटायची महारांच्या होळीतल्या विस्तवाने, त्यांच्या टिपरी नाचासाठी लाकूड तोडून टिप-या बनवायचे महार. एवढंच नाही, तर त्यांच्या नाचण्यासाठी गाणं-बजावणंही महारच करायचे. पण एवढं करूनही गाणं-बजावणं करताना त्याची झिंग चढून एखादा महार नाचला, तर मात्र त्याचा लगेच बाट लागायचा. कनेरसरपूरच्या वाडी-वस्तीतलं हे वास्तवही जीवघेणं होतं.

..
तरीही आमची आमची म्हणून मजा असायचीच. आम्ही महार असलो तरी नाथपंथी होतो. त्यामुळे घरात नाथांचा देव्हारा होता. त्यात नाथांच्या खडावा खापर आणि चिमटा होता. बाप मुंबईला असल्यामुळे या देव्हा-याची पूजाअर्चा मलाच करायला लागायची. मला या सा-याचा प्रचंड कंटाळा यायचा. पण आई माझ्यावर नजर ठेवून असायची. त्यामुळे नाथांची पूजाअर्चा नीट करावी लागायची. नाथांची ही रोजची पूजा परवडायची. पण पौर्णिमा-अमावास्येची पूजा नकोशी वाटायची. कारण त्या दिवशी साग्रसंगीत पूजा असायची. त्यासाठी खापर, खडावा, चिमटा देव्हा-यातून काढून धुवावा लागायचा. त्याचबरोबर त्या दिवशी नाथांना चिलीमही दाखवावी लागायची. चिलीम दाखवण्याचा हा प्रकार फारच त्रासदायक असायचा.

चिलमीच्या तळाशी खडा टाकून वर तंबाखू-गांजा टाकला जायचा. मग त्यावर निखारा ठेवून फुंकर घालूननाथांना चिलीम दाखवली जायची. पण बराच वेळ फुंकर मारूनही चिलीम पेटायची नाही आणि नाथांची चिलीम असल्यामुळे ती तोंडाने झुरका घेत ओढताही यायची नाही. पण फुंकर मारून मारून मी एवढा त्रासलेलो असायचो की, आईचं लक्ष नाहीसं बघून चिलमीचा एक मस्तपैकी झुरका मारायचो. त्याबरोबर चिलीम पेटायची आणि माझी पूजा संपायची. खेळातही आम्ही सवर्णाच्या पोरांना असाच वस्तादपणा दाखवायचो. पोरं पोरं असल्यामुळे खेळताना आम्ही एकत्र यायचो. पण आटय़ापाटय़ा असो, नाही तर हुतुतू आम्हीच जिंकायचो. आम्ही जिंकायला लागल्यावर सवर्णाच्या पोरांना आमची जात आठवायची. मग म्हारडे म्हारडेम्हणत ते मारामारीला सुरुवात करायचे. त्यांनी मारामारी सुरू केली की, आम्ही घरातून पटकन सुरे लावलेल्या काठय़ा आणायचो. त्या बघितल्या बरोबरसवर्णाची पोरं गांडीला पाय लावून पळत सुटायची.

..
असं बरंच काही कनेरसरपूरच्या वाडी-वस्तीत माझ्या लहानपणी घडलं. त्यानंतर १२-१३ वर्षाचा असतानाच माझा बाप मला व आईला घेऊन मुंबईला आला. मुंबईत सुरुवातीला कामाठीपु-याजवळच्या अरबगल्लीत राहिलो. ही गल्ली तेव्हा ढोर चाळम्हणून प्रसिद्ध होती. त्यानंतर ताडदेवला आलो. लहानाचा मोठा याच परिसरात झालो. तिथल्या समाजवाद्यांच्या चळवळी, कामाठीपु-यातलं भयानक वास्तव जवळून पाहिलं. याच काळात आंबेडकरांच्या विचारांशीही नाळ जोडली गेली आणि बघता बघता कनेरसरपूरचा छोटा नाम्या, नामदेव ढसाळ झाला. तो कविता लिहू लागला; तो नेता झाला. माणुसकीची लक्तरं काढणा-या सा-या दुनियेला त्याने फाटय़ावर मारलं. पण या उत्क्रांतीतही त्याच्या, म्हणजेच माझ्या मनातलं कनेरसरपूर मात्र हरवलं नाही. कारण कनेरसरच्या वाडी-वस्तीनेच मला घडवलं, असं मला वाटतं. माझ्या त्या अभिजात गावाची, आमराईतल्या घराची, त्या घरात परंपरेने चालत आलेल्या तमाशातल्या नाच-गाण्याची आणि गाव परिसरातल्या अनुभवांची शिदोरीच तर माझ्याबरोबर आहे. ती शिदोरी आजही मला पुरून उरलेली आहे. आज त्या गावात मलामान-सन्मान आहे. पद्मश्रीमिळाली, तसंच साहित्य अकादमीचा पुरस्कारमिळाला. प्रत्येक वेळी गावाने माझा सत्कार केला. गावातले लोक आता स्थानिक आमदार-खासदारापेक्षा माझ्याकडे त्यांची गा-हाणी घेऊन येतात. तेव्हा वाडी-वस्तीचमाझ्या भेटीला आल्यासारखी वाटते. मग सांगा, या वाडी-वस्तीला मी कसा विसरू?

~~~~~~~~~~~

'
अजून याद येते गावाची' ही विद्रोही महाकवी नामदेव ढसाळांनी व्यक्त केलेली एक ओघवती साठवण आहे. यात गावकीचे कंगोरे आहेत अन मानवी मनाची त्यात उमटलेली प्रतिबिंबे आहेत. नाम्याचा नामदेव कसा झाला अन त्याने माणुसकीची लक्तरे काढणाऱ्या दुनियेला कसे फाट्यावर मारले याचे टोकदार वर्णन मनाला छिलून काढते. म्हारकीतलं भीषण वास्तव ते सहजगत्या मांडतात. पूजेअर्चेकडे त्यांचे बालमन कसे पाहत होते याचे रंजक वर्णन यात आहे. महारकी करताना अन्नान्नदशेसाठी कसं वंचितांचं जिणं जगावं लागलं याचं भीषण वास्तव आजही मनाला भेदून जाते. माणूस कोणीही असो. कसलाही असो, कुठल्याही जाती धर्माचा असो त्याचा आपल्या गावाकडे अगदी नैसर्गिक ओढा असतो त्यात औपचारिकता नसते याचा प्रत्यय या लेखातून येतो. ढसाळांनाही हा गावाकडचा ओढा आहे अन तो त्यांनी अगदी भावनात्मक शब्दात व्यक्त केलाय. त्यांच्याच शब्दात सांगायचे झाले तर - "वडाच्या पारंबीमधूनच नवीन झाड जन्माला येतं, तसं कनेरसरपूरच्या पारंबीला मी फुटलोय, असं मला सतत वाटत आलंय."

महाकवी नामदेव ढसाळांच्या या लेखाच्या माध्यमातून तत्कालीन सामाजिक, आर्थिक अन जातीय परिस्थितीची जी जाणीव होते ती मात्र उद्वेगजनक अन क्लेशदायक अशी आहे. गद्य असो वा पद्य, ढसाळ आपल्याला हवा तो परिणाम आपल्या लेखनातून वेधक रितीने मार्मिक शब्दात करतात ही ढसाळांची लेखनवैशिष्ट्ये या वेगळ्या विषयाच्या छोट्याशा लेखातही ठळकपणे जाणवतात. याला प्रमुख कारण म्हणजे ढसाळांनी जगलेल्या विश्वातील दाहक अनुभव विश्वाचे सच्चे प्रकटीकरण. ढसाळांच्या गावाकडच्या आठवणी ग्रामीण मातीशी नाळ जुळलेल्या सर्व व्यक्तींना आपल्याशा वाटतात हेही तितकेच खरे. यातच ढसाळांच्या लेखनाचे यश सामावले आहे. 

-
समीर गायकवाड.