शनिवार, १६ सप्टेंबर, २०१७

'ट्रोलभैरवां'चे समर्थक...


सध्याच्या काळात सोशल मिडीया हे अनेकार्थाने एक प्रभावी अस्त्र झाले आहे. सहज सोप्या पद्धतीने हवे तसे व्यक्त होण्याची संधी विनासायास मिळत असल्याने दिवसेंदिवस सोशल मिडिया वापरणाऱ्या युजर्सची संख्या वाढतेच आहे. राजकीय हेतूने यात सामील झालेल्यांनी आपापल्या पक्षांची, लाडक्या नेत्यांची भलावण करताना आपल्याच विचारांचा उदोउदो करत विरोधी विचारधारांची निंदानालस्तीही सुरु केली. नावडत्या नेत्यांचेचरित्रहनन करत त्यांची मॉर्फ केलेली, प्रतिमोध्वस्त चित्रे वापरणे, मनगढंत कहाण्यातून खोटा मजकूर लिहिणे, बोगस डाटा देणे, अश्लील भाषा वापरून महिलांची मानहानी करणे, इतरांच्या नावाने पोस्ट लिहून व्हायरल करणे अशी नितीभ्रष्ट प्रकटने अहोरात्र होत आहेत. यासाठी ट्विटर, फेसबुक आणि व्हॉटसऍप यांचा वापर प्रामुख्याने होतोय.
आपल्या मतांच्या पुष्ट्यर्थ काहीच द्यायचे नाही व आपल्या विरोधी विचारांच्या लोकांच्या पोस्टवर जाऊन त्यांना आडवं लावणे, मुद्द्यापासून पोस्ट भरकटवणे, पोस्टकर्त्यावर हीन दर्जाची टीकाटिप्पणी करणे, कॉमेंट करणारया लोकांशी अकारण वाद घालणे यांना ऊत आलाय. असे उद्योग करणारे लोक सोशल मिडीयात ‘ट्रोल’ म्हणून कुख्यात आहेत. कहर म्हणजे अनेक राजकीय पक्षांनी, नेत्यांनी पगारी (पेड) ट्रोल आता आपल्या पदरी बाळगलेत. परिणामी याला अधिक बीभत्स, ओंगळवाणे, हिंस्त्र स्वरूप आलेय. यामुळे दंगली घडल्यात, जातधर्मीय सलोखा धोक्यात येऊ लागलाय. हे सर्व घडत असताना काही ठिकाणी पोलिसात तक्रारी दाखल झाल्यात तर काही प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. काही ट्रोल फेक अकाउंटद्वारे कार्यरत असतात. वाईट बाब अशी की ट्रोल्सना आवर घालून त्यांच्या मुसक्या आवळण्याचे काम राजकारणी करताना दिसत नाहीत, यात नाव घ्यावे असा अपवादही नाही ही शरमेची बाब आहे.

रविवार, १० सप्टेंबर, २०१७

मला उमजलेला 'शोले'चा क्लायमॅक्स....


'शोले' जेंव्हा जेंव्हा पाहतो तेंव्हा तेंव्हा काही तरी नवीन गवसते. 'शोले'च्या क्लायमॅक्सला गब्बरच्या गोळीबारात एकट्याने खिंड लढवत असलेला जय घायाळ होऊन पडतो तो सीन खूप काही शिकवून जातो. जखमांनी विद्ध झालेला जय रक्तबंबाळ झालेल्या अवस्थेत एका मोठ्या शिळेला टेकून बसलेला आहे. त्याचे श्वास वेगाने होताहेत, त्याला बोलण्यात प्राणांतिक कष्ट होताहेत, तो अगदी कासावीस होऊन गेलेला आहे जणू त्याचे प्राण अक्षरशः कंठाशी आलेले आहेत. त्याचा मित्र वीरू त्याच्या शेजारी बसून त्याला धीर देतोय, "तू मुझे छोड के नही जा सकता .." असं सांगताना त्याचं उसनं अवसान स्पष्ट जाणवतं. आता काहीच क्षण उरलेले आहेत हे त्याने ताडलेले आहे पण आपला जिवलग दोस्त आपल्याला सोडून जाणार ही कल्पना त्याला सहन होत नाहीये. दरम्यान जयच्या गंभीर जखमी होण्याची खबर ठाकूर बलदेवसिंगच्या हवेलीपर्यंत गेलेली असते. तो सारा लवाजमा घेऊन गब्बरच्या अड्ड्याकडे जाणाऱ्या लाकडी पूलाच्या रस्त्याजवळ येतो. वीरूने आता आपल्या मित्राचा लहूलुहान देह आपल्या कुशीत घेतलेला आहे, त्याच्या समोरच ठाकूर दाखल होतो.

रेड लाईट एरिया आणि मुंबईतल्या एनजीओ...

रेड लाईट एरियावरील पोस्टस वाचून अनेकजण भारावून जातात. 'यासाठी आम्ही काय करू शकतो ?' अशी विचारणा करतात. सर्वांनीच प्रत्यक्ष ठोस कृती करावी म्हणून मी हे लेखन करत नाही. या उपेक्षित आणि शोषित घटकाकडे बघण्याचा लोकांचा दृष्टीकोन बदलावा यावर मुख्य फोकस आहे. ज्यांना प्रत्यक्ष मदत करावी वाटते त्यांनी शक्यतो एनजीओजच्या कार्यालयांना थेट भेट दिल्याशिवाय आर्थिक मदत देऊ नये असे माझे मत आहे. पेक्षा आपल्या भागातील एखाद्या सामाजिक कार्यकर्त्यास सोबत घेऊन अशा वस्त्यांत आपली मदत वस्तूस्वरूपात देणं योग्य.

सोमवार, ४ सप्टेंबर, २०१७

रेड लाईट डायरीज - गणेशोत्सवातल्या आम्ही (उत्तरार्ध)


कोणताही उत्सव आला की कुठल्याही भागातील रेड लाईट एरियातील स्त्रियांना थोडीशी धास्तीही वाटते अन काहीसे हायसेही वाटते. कारण येणारा दिवस कशाचे तोंड बघायला लावतो, काय घडवतो याची त्यांना धास्ती असते अन उत्सवामुळे गर्दीत, गिऱ्हाईकात वाढ होऊन कमाईत चार पैशांची वाढ होणार या जाणीवेने हायसे वाटत असते. खरे तर सण, उत्सव कोणत्याही धर्माचा असो जातीचा असो वा पोटजातीचा असो त्याच्या कामांचा जास्त ताण त्या त्या वर्गातील स्त्रियांना पडतो. मग त्या स्त्रिया गरीब वर्गातल्या असोत वा उच्चभ्रू वर्गातील्या असोत, त्यांना ताण हा पडतोच. बहुतांश पुरुष मंडळी त्या त्या सण उत्सवासाठी लागणारं साहित्य आणून दिलं की आपलं काम संपलं अशा अविर्भावात असतात, सणासुदी दरम्यान लहान मुलांचा वा वृद्ध व्यक्तींचा सहयोग कमी अन त्रास जास्त असतो. पण बायका त्याबद्दल कधीही तक्रार करत नाहीत. या सणाउत्सवातला खरा आनंद त्या मिळवतात कारण, त्या आनंद वाटत असतात ! याला रेड लाईट एरियातील स्त्रिया देखील अपवाद नसतात.