Friday, July 29, 2016

चिंगारी 'अमरप्रेम'मधली ....काळोख्या रात्री हेलकावे खात चाललेली नाव. नावेवर प्रत्येक क्षणाला आदळणारया लाटा अन त्यांचा सपासप आवाज. नावेच्या पुढच्या टोकाला धूसर दिसणारा नावाडी आहे जो एका संथ लयीत वल्ही मारतोय. नावेवरच्या शाकारलेल्या झोपडीत पाठमोरी बसलेली आहे, ती पुष्पा ! डोईजवळच्या हलत्या कंदीलाच्या फिकट पिवळसर उजेडात ती अगदी दिलखुलास सुरेख दिसतेय, अगदी मन लट्टू व्हावे अशी दिसत्येय ती. आनंदी रंगाची निळ्या झाकेतली साडी तिला खूपच खुलून दिसत्येय. फिकट निळ्या रंगाचे किंचित आवळ पोलके घालून बसलेल्या पुष्पाने हातात गच्च भरलेल्या जर्दनिळ्या बांगड्या, गळ्यात सोन्याचे सर अन कानात हलणारे गोलाकार झुबे घातलेत ! कपाळावर ठळक मोठा गोलाकार गंध अन नाकात सोन्याची मोरणी...खरे तर तिच्या गालावर पडणारया खळ्यानीच माणूस घायाळ व्हावा अन तिच्या मासोळी डोळ्यात सदा पाझरणारे स्नेहाचे भाव बघून पुन्हा जीवित व्हावा !...


Thursday, July 28, 2016

वो शाम कुछ अजीब थी ....'वो शाम कुछ अजीब थी' हे अवीट गोडीचं गाणं होतं गुलजारच्या 'खामोशी'मधलं. पुन्हा पुन्हा पहावा आणि स्वतःशीच पडताळून घ्यावा असा सिनेमा म्हणजे 'खामोशी'. मागे एका प्रसिद्ध क्रिटीक्सने लिहिलं होतं की मरण्याआधी पुन्हा एकदा 'खामोशी' बघेन आणि मग प्राण सोडेन. इतकं काय होतं त्या सिनेमात ? आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो ती दुसऱ्यावर प्रेम करते हे कळले की कोणतीही संवदेनशील स्त्री उन्मळून पडते. त्यातून सावरण्यासाठी एका समदुखी जीवाला अशाच वेदनेतून बाहेर पडण्यास मदत करते. तिला वाटते की तो आता आपल्यावर प्रेम करू लागलाय. प्रत्यक्षात त्याच्या मानसिक आजारातून बाहेर पडावा यासाठीची ती एक क्रिया होती. हे कळल्यावर तिचं भावविश्व हरवून बसते. तिने बऱ्या केलेल्या प्रेमवेडयाला आता तिच्या बरया होण्याची आस लागून राहते.


रेड लाईट डायरीज - कामाठीपुऱ्यातला दर्द - हिराबाई ....
कामाठीपुरयाच्या ११व्या गल्लीत अरुंद बोळ आणि खेटून उभ्या असलेल्या कळकटलेल्या इमारतींच्या भाऊगर्दीत उभी आहे 'आशियाना' ही आता पडायला झालेली इमारत. या इमारतीच्या आठवणी हिराबाईशी अन तिच्या मुलीशी ताजेश्वरीशी निगडीत आहेत. आजही 'आशियाना' हिराबाईच्या मधुर आवाजाला आसुसलेला असेल असं वाटते. 'बच्चुची वाडी' पासून उजव्या हाताला वळून पुढे आले की गल्लीतली सर्वात जुनी इमारत म्हणजे 'आशियाना'. जागोजागी भितींच्या गिलाव्याचे पोपडे निघालेले, आतल्या विटांचे लाल काळे आतडे बाहेर डोकावणारे अवशेष पहिल्या नजरेत तिरस्करणीय वाटतात.
Wednesday, July 27, 2016

दो नैना एक कहानी ....१९८३ मध्ये आला होता 'मासुम'. शेखर कपूरने दिग्दर्शित केलेला पहिलाच पण अप्रतिम सिनेमा. मी तेंव्हा किशोरवयीन होतो. माझ्या आईवडिलांसमवेत सोलापुरातील भागवत छायामंदिरात हा सिनेमा पाहिला होता. आता तिथे निर्जीव मल्टीप्लेक्स आहे, त्यातल्या बेचव कॉर्नप्लेक्ससारखेच.....


Tuesday, July 26, 2016

मराठी साहित्यातला 'नाम'महिमा .....आयुष्यात सर्वप्रथम अक्षरं डोक्यात शिरली ती बाराखडीतून. आज बाराखडी क्रमानुसार कितीजणांना म्हणता येते ते सांगता येणार नाही मात्र त्यातील काही अक्षरांनी केलेली जादू दिगंतापर्यंत टिकून राहणारी असेल हे निश्चित. तर या बाराखडीतील अक्षरे कित्येक लेखक - कवींच्या नावात प्रवेशकर्ती झाली अन त्या अक्षरांची एक जोडीच बनून गेली. मराठी साहित्यातील काही नावं त्यांच्या अद्याक्षरातच इतकी सवयीची होऊन जातात की त्यांच्या उच्चारणात एक गोडी निर्माण होते अन त्या नावाशी आपसूक भावनिक नाते तयार होते. अशी अनेक नावं वानगीदाखल सांगता येतील. ग.दि.माडगुळकर (आपण तर थेट गदिमाच म्हणतो की नै !) , पु.ल.देशपांडे (हे असं इतकं मोठ्ठ नाव घेण्याऐवजी आपल्याला पुलं जास्त जवळचं वाटतं होय ना ?), वि. स.खांडेकर (यांना तर आपण विसं या नावानेच आणखी शॉर्ट केलं आहे) , व.पु.काळे (पूर्ण नावाचा इथं पुन्हा कंटाळा वर भरीस आणखी लघु रूप - फक्त वपु !), गोविंद विनायक उर्फ विंदा करंदीकर (इथंही विंदा असं सहजरूपच जास्त रसिकप्रिय),

ह.ना.आपटे, बा.सी.मर्ढेकर, ह. मो. मराठे, य. दि.फडके, म.गो.रानडे, भा.रा.तांबे, बा.भ.बोरकर, वि. वा.शिरवाडकर, प्र.के.अत्रे, चि.त्र्यं.
बालभारती

उजळणी 
खानोलकर, ना.धों.महानोर, श्री.ना.पेंडसे, श्री.म.माटे, जी.ए.कुलकर्णी (जीएंच्या नावातलं कुलकर्णी उच्चारले नाही तरी नुसत्या जीएवर सहज काम भागते, होय ना ?), फ.मुं.शिंदे (यांच्या नावाचे तर अनुस्वार आपण उडवले अन ते फक्त 'फमु'च झाले) , शं.ना.नवरे ( नुसतं शन्ना हे देखील किती भारी वाटतं ना ?), पु.शि.रेगे, दि.पु.चित्रे, द.मा.मिरासदार ( फक्त दमामि इतकं म्हटलं तरी कुणाची मिरासदारी आहे हे कळायचं) आ. ह.साळुंखे, गं. बा.सरदार, न.चिं.केळकर, गो.नी. दांडेकर (गोनीदा असं आपण याला आणखी लाघवी केलं आहे), वा.रा.कांत, ना. सी.फडके, य. गो.जोशी, रा.रं.बोराडे, चिं. वि.जोशी, भा.रा.भागवत, वि. सं.वाळिंबे, रा.ग.जाधव, वि. का.राजवाडे, पु.भा.भावे, वि. स.पागे, ग.ल.ठोकळ, ना.सं.इनामदार, पी.सावळाराम, वि.म.कुलकर्णी, रा.ग.जाधव, न.र.फाटक, गो.पु.देशपांडे, गो.ना.दातार, ना. घ.देशपांडे, दि.बा. मोकाशी, गो.म.कुलकर्णी, वि.म.दांडेकर,द.भि.कुलकर्णी, शि.म.परांजपे, शि. द.फडणीस (शब्दांऐवजी रेषातून बोलणारे) , ग.प्र.प्रधान, गो.ब.देवल, व.बा.बोधे, ग.ह.पाटील, म.वा.धोंड, त्र्यं. श्री. शेजवलकर, रा. चिं. ढेरे, प्र.ल. मयेकर आणि शेवटी एकाक्षरी कवी 'बी' (मुरलीधर गुप्ते) ! नेमके या उलट असलेले म.द. हातकणंगलेकर हे श्रेष्ठ विचारवंतच असणार याची ख्याती नामभिधानातून येते ! तर वि.दा.सावरकर नाव उच्चारले तरी आपोआप 'जयोस्तुते' ऐकू येतं !

आ.रा.देशपांडे मात्र अनिल या नावानेच जास्त जवळचे वाटतात. तर शांता ज. शेळके यांच्यातल्या 'ज'शिवाय
कुमारभारती  
काहीतरी हरवल्यासारखे वाटते. याचा मतितार्थ असा नाही की ज्यांची नावे सरळ सरधोपट होती वा कलाकुसरीची वा प्रज्ञावंत, शोभिवंत होती ते मनात ठाण मांडून नव्हते ! त्यांनाही सर्व रसिकांच्या मनात मानाचे स्थान आहेच ! जसे की नरहर कुरुंदकर, मंगेश पाडगावकर, सुरेश भट, नारायण सुर्वे, रंगनाथ पठारे, इंदिरा संत, नामदेव ढसाळ, दया पवार, जयवंत दळवी, केशव मेश्राम, सरोजिनी बाबर, ज्योती लांजेवार, यशवंत देव, माधव मनोहर, अशोक नायगावकर, मधुसूदन कालेलकर, जगदीश खेबुडकर, रॉय किणीकर, सदानंद रेगे, अनिल अवचट, गंगाधर महांबरे, पद्मा गोळे, वंदना विटणकर, शंकर वैद्य, रमेश मंत्री, इंद्रजीत भालेराव, अनिल कांबळे, इलाही जमादार, प्रवीण बर्दापूरकर, गौरी देशपांडे, अरुणा ढेरे, अनुराधा पोतदार, विभावरी शिरुरकर, प्रभा गणोरकर, सुनिता देशपांडे, स्नेहलता दसनूरकर, दुर्गा भागवत, सुमती क्षेत्रमाडे, वासंती मुजुमदार, हिरा बनसोडे, गोडावरी परुळेकर ही सर्व नावे वाचली तरी मन हरखून जाते अन ऊर मायमराठीच्या अभिमानाने फुलून येतो ! सेतू माधवराव पगडी, शिवाजी सावंत, रणजीत देसाई, संजय सोनवणी,विश्वास पाटील ही नावे जरी घेतली तरी शिवकालात गेल्यासारखं वाटतं ! मारुती चितमपल्ली हे नाव उच्चारलं तरी जंगलाची सैर करून आल्यासारखं वाटतं तर जयंत नारळीकर व निरंजन घाटे म्हटल्याबरोबर विज्ञानकथेत कुठे तरी भेटलेल्या माणसाची आठवण होते. महेश एलकुंचवार कसं 'चिरेबंदी' नाव आहे ना ! बाबुराव बागुल- अर्जुन डांगळे - भुजंग मेश्राम ही नावे एकत्र वाचली तरी विद्रोहाचा बिगुल वाजतो. शंकर पाटील नावासरशी गालावर हसू येतं.

यातही काही नावे अनोखी होती, शरच्चंद्र मुक्तिबोध आणि नंदिनी आत्मसिद्ध ही भारदस्त नावं मला अजूनही
युवकभारती 
खुणावतात तर साधी सोपी 'बहिणाई' देखील काळजात ठाण मांडून बसते. 'ग्रेस'मधला ग्रेस कधीच संपत नाही. 'सौमित्र' हा तर काव्यमित्र वाटतो. आरती प्रभू म्हणजेच चि.त्र्यं.खानोलकर असतील यावर अजूनही विश्वास बसत नाही. तर विभावरी शिरुरकर आणि मालती बेडेकर ह्या दोघी भिन्न व्यक्ती असाव्यात असंच वाटते. त्याच बरोबर शिरीष पै ही एखादी शोडषाच असावी असंच अजूनही वाटते. नाट्यछटावाले 'दिवाकर' हे कुणी तरी गूढ वयस्क व्यक्तीच असावेत असं भासतं. माधव ज्युलियन या नावाचा कुणी इंडोइटालियन देखणा रोमन असावा असं वाटते. राम गणेश गडकरी हेच 'गोविंदाग्रज' हे पटत नसायचे वर अजून हाच माणूस बाळकराम कसा काय बुवा असा विचार येतो. तर 'कुसुमाग्रज' म्हणजेच वि.वा.शिरवाडकर नसून ते कुणी तरी स्वर्गीय जादुई कवीच असं भासतं ! वसंत आबाजी डहाके या नावाचा माणूस अक्षरेच चित्रलिपीतून जन्मास घालत असणार असं मनात येतं. विजय तेंडुलकर या नावातच रंगभूमीचा अर्थही सामावला असावा असं वाटत राहतं. भालचंद्र नेमाडे या नावानिशी हेमाडपंती खमकी शैली असणारा माणूस अक्षरबाह्य जगातही भेटतो. बाळ गाडगीळ - गंगाधर गाडगीळ या द्वयीने अन केशवसुत आणि केशवकुमार या दोन दिग्गज नावांनी बालपणात अनेक वेळा गोंधळवलं आता मात्र हेच जीवनाचे आधारविचार वाटतात. तर्कतीर्थ म्हटलं आपोआप लक्ष्मणशास्त्री पुढ उच्चारलं जातंच ! मालिका अमरशेख या नावाचंही असच गारुड तर बाबा भांड नाव जरी घेतलं तरी 'तंट्या'बखेडा सुटल्यासारखं वाटतं. बाबा कदम, रत्नाकर मतकरी, सुहास शिरवळकर ही नावच रहस्यमय वाटतात. राजन खान आपल्या नावातूनच प्रश्नचिन्ह लावायला सुरुवात करतात.
मुळाक्षरे 
बाळकृष्ण कोल्हटकर, वसंत कानेटकर, श्रीपादकृष्ण कोल्हटकर या तीन नावात अनकेदा सारखेपणा वाटायचा. त्याचबरोबर मधु मंगेश कर्णिक हे नावातले तीन शब्द आहेत पण ते एकजीव असल्यासारखेच वाटतात. अण्णा भाऊ साठे, अनंत विठ्ठल कीर, कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, हरी नारायण आपटे, पांडुरंग सदाशिव साने, उत्तम बंडू तुपे ह्या त्रिदेही नावातील शब्ददेखील अशीच ब्रम्हा विष्णू महेश या धर्तीची एकमेकाशी तादात्म्य पावलेले ! ह्या सर्व नावांत एक अनामिक ओढ आहे आणि मराठीची गोडी आहे…

अक्षरधारा  
नावात काय आहे असं जरी शेक्सपिअरने म्हटलं असलं तरी ही नावं मला फार आपलीशी वाटतात याचं एक कारण असं असू शकतं की माझ्या जडणघडणीत या सर्वांचा वाटा असला पाहिजे. आधी बाराखडी, मग बालभारती, पुढे कुमारभारती नंतर युवकभारती आणि आता आयुष्याच्या प्रत्येक पायरीवरती या नावांची एक शिडी कामाला येते जी अडीअडचणीतून मार्ग काढते अन आनंदी जीवन जगण्याच्या सुबक अक्षय अक्षरी प्रेरणा देते. ज्याने जीवन सुफळ संपूर्ण होते !

- समीर गायकवाड


Tuesday, July 19, 2016

निरभ्र ......बिगारी कामगाराने जशी ठराविक वेळेची ड्युटी करावी, वेळेवर यावे वेळेवर निघून जावे तसे मान्सूनचे असते. तो ठराविक वेळेस येतो, मर्जीनुसार पडतो आणि निघूनही जातो. त्यानंतर बऱ्याच काळाने कावराबावरा झालेला एक अवकाळी पाऊस मान्सून घरी सुखरूप पोहोचल्याची वार्ता घेऊन येतो, पोस्टमनने घरोघरी पत्रे वाटावीत तसा सगळीकडे हा पाऊसनिरोप तो पोहोच करतो. कधी कधी या निरोप्या पावसासोबत अंगात वारं भरलेली चहाटळ वावटळही येते. लोक म्हणतत अवकाळी पाऊसवारं आलं. मला तसं वाटत नाही. यात माणसाचा थेंबमात्र संबंध नसतो, ही सगळी निसर्गाची भाषा असते. ज्याची त्याला कळते. माणूस उगाच लुडबुड करतो, नाक खुपसतो. खरंतर इतर कुठलाही प्राणी निसर्गाशी खेळत नाही पण माणसाला भारी खोड. असो....


Saturday, July 16, 2016

बैलगाडीच्या रम्य वाटा .......बैलगाडीच्या वाटा म्हणजे गाडीवानाच्या मनावरचे एक गारुड असते, या वाटा म्हणजे बैल आणि माती यांच्या अबोल नात्याचे अस्सल प्रतिक असतात. फुफुटयाने भरलेल्या मातकट रस्त्यावरून जाताना बैल माती हुंगत चालतात अन त्यांच्या तोंडातून गळणारी लाळेची तार मातीत विरघळत जाते. बैलांच्या गळ्यात बांधलेल्या घुंगराच्या आवाजावर वाटेच्या दुतर्फा असणारी पिवळी रानफुले मस्त डुलत असतात तर गाडीच्या एका लयीत येणारया आवाजावर आजूबाजूची दगडफुले अन मातकट झालेली पाने धुंद होऊन जातात. सारया रस्त्याने बैल खाली वाकून मातीशी हितगुज करत असतात अन माती मुक्याने त्यांच्याशी बोलत बोलत बैलांच्या दमलेल्या थकलेल्या खुरांना मातीने न्हाऊ घालते, मातीनेच मालिश करते, बैलांचे पाय जितके मातकट होतात तितके त्यांचे श्रम हलके होतात . रस्त्याने जाताना ओझे ओढणारे बैल त्यांच्या वाड वडलांचे क्षेम कुशल तर मातीला विचारत नसावेत ना ? हा प्रश्न माझ्या डोळ्यात हलकेच पाणी आणून जातो....Tuesday, July 12, 2016

मेंदूला ताण न देणारा - 'सुलतान'....एका झपाटयात लागोपाठ कॉमनवेल्थ गेम्स २०१०, इस्तंबुलमध्ये २०११ FILA विश्व कुस्ती चॅम्पियनशिप आणि लंडन ऑलंपिक्स २०१२.. या स्पर्धांमध्ये सुल्तान भारताला विजय मिळवून देतो हे पचनी पडत नाही, कारण या गोष्टी खजूर खाल्ल्यासारख्या अन विटांचे ढिगारे उचलण्याइतक्या सोप्या नसतात. आपल्याकडे पब्लिकला 'च्यु' समजून काहीही दाखवायची दिग्दर्शकांना खोड आहे. उदाहरणार्थ - 'बागबान'मधल्या अमिताभला पहिल्याच पुस्तकासाठी थेट बुकर मिळते असं दाखवलं होतं. 'स्वदेस'मधला शाहरुख थेट नासात 'इमाणाचे राकेट' उडवतो. 'हॉलो मेन'वरून उचललेला इम्रान हाश्मीचा मिस्टर एक्स हा अजूनही अजूनही अनिल कपूरच्या 'मिस्टर इंडिया'च्या तांत्रिक स्तराची पातळी गाठतो. 'क्रिश'मधला 'जादू' हे आणखी एक केविलवाणे उदाहरण. आपले लोक मेंदू घरी ठेवून सिनेमे बघतात हे त्यांना माहिती असते. एकंदर पब्लिकचा आयक्यू मायनस गृहीत धरूनच आपल्याकडे बहुतांश सिनेमे निघत असतात. असे अनेक किस्से देता येतील, असो.


Thursday, July 7, 2016

रेड लाईट डायरीज - वेश्यांची मुले - एक कैफियत ; 'बॉर्न इनटू ब्रॉथेल्स'..जगभरात हे एक असे ठिकाण आहे, जिथे तरुणींना, अल्पवयीन मुलींना जबरदस्ताने ढकलले जाते. ते ठिकाण वेश्यालय. मात्र याच परिसरात जन्म घेणा-या आणि तिथेच लहानच्या मोठ्या झालेल्या मुलींना लहानपणापासूनच या गोष्टी शिकवल्या जातात.तिथल्या मुलांचे कोमेजलेले विश्व कसे असते ? पश्चिम बंगालच्या कोलकाताच्या सोनागाछी परिसरात एक डॉक्युमेंट्री चित्रित झाली होती. तिला त्यावर्षीचे ऑस्कर देखील मिळाले होते. हा परिसर वेश्यालयासाठी ओळखला जातो. अशा परिसराला 'बदनाम गली' असे सामान्य भाषेत म्हटले जाते. या परिसरात राहणा-या महिलांची आणि मुलांची छायाचित्रे लंडनच्या सॉविद दत्ता या फोटोग्राफरनेही काढली होती ज्याला पाश्चात्त्य जगात गौरवले गेले. या परिसरात जाणे आणि राहणे खूप कठिण असते, तरीदेखील येथील महिलांचे -मुलांचे चित्रण समर्थपणे केले गेले आहे ...Sunday, July 3, 2016

रमण राघव - मनोविकृतीचा अपुरा थरार...हडकुळा, घामटलेला, करपलेल्या चेहऱ्याचा 'तो' रात्र रस्त्यात वितळताच गुहेतून श्वापद बाहेर पडावा तसा पडतो. 'तो' हिशोबात कमजोर आहे, त्याचे हिशोब वेगळे आहेत. मात्र त्याची नजर एकाच वेळी दया यावी अशी अन भीतीही वाटावी अशी आहे. तो देवाशी बोलतो, कुत्र्यांच्या अंगावर धावून जातो, भिंतींवर ओरखडे काढतो, खिडकीच्या गजांत डोळे भिनवतो, वटवाघळासारखा झोंबाडत राहतो. त्याला चालताना सगळीकडे बुद्धीबळातले पट अंथरावे तसे दोनच रंग दिसतात. काळा आणि पांढरा रंग.


Friday, July 1, 2016

अनुवादित कविता - जेहरा निगाह : पाकिस्तान, उर्दू कविता

 आई तू मला वाचवू शकली
असतीस, आई तू मला वाचवू शकली असतीस.
तुझ्या रक्ताच्या मेंदीने माझ्या अस्तित्वाचा प्रत्येक अणूरेणू रंगलेला होता गं !

मला पूर्णत्वास येऊ द्यायला पाहिजे होतं, प्रत्येक अंग रक्ताने अजूनही भरलं गेलं असतं.
माझ्या डोळ्यांना प्रकाशकिरणांनी शिवण्याआधी काजळाने रेखांकीत केलं असतं.
सट्टा बट्टा करावा तसं मला दिलं घेतलं असतं, वा हॉनर किलिंगसाठी मी कामी आले असते !


रेड लाईट डायरीज - 'रेड लाईट एरिया'तल्या मातीमोल मौती ....काही महिन्यांपूर्वी कामाठीपुरयातील एका प्रौढ वेश्येच्या करुण मृत्यूवर एक पोस्ट लिहिली होती. कालपरवा तिच्या मुलींबद्दलची माहिती मिळाली..

ती माहिती ऐकून वाटले की हे पहायला वा ऐकायला 'ती' आज हयात नाही हे बरे झाले कारण या घटनेने ती रोज तीळतीळ तुटत राहिली असती अन खंगून खंगून मेली असती...

ही सत्यघटना आहे मुमताजची..
एका अभागी आईची, एका दुर्दैवी बहिणीची अन भारतमातेच्या एका निष्पाप मुलीची, कस्पटासमान जगून कुत्र्याच्या मौतीने मेलेल्या एका संवेदनशील स्त्रीची..

आपल्या देशात रोज लाखोने माणसे मारतात त्यामुळे कोण कुणासाठी मेले याचा विचार सर्वांनी करावा असं म्हणणे वस्तुस्थितीला धरून होणार नाही. मात्र काहींच्या जीवनाला जशी झळाळी असते तसाच त्यांच्या मृत्यूलाही उजाळा असतो तर काहींच्या जन्मभरातला अंधार मृत्यूपश्चात देखील त्यांचा पाठलाग करत राहतो.

मरणारी व्यक्ती वर गेल्यावरदेखील कधी कधी तिचे कवित्व दिर्घकाळ सुरु असते तर काही अभागी असेही असतात की मृत व्यक्तीच्या आसपासचे लोक त्याच वेळी शय्यासोबतीत मश्गुल असतात !

न राहवून याचा खोलात जाऊन जेंव्हा विचार करतो तेंव्हा स्त्री कुठल्याही वर्गवारीतली असो बहुतांशी तिला उपेक्षाच मिळते असे वाटते. जसे की कामाठीपुऱ्यातली ही मुमताज मेली तेंव्हा कुणाला काही फरक पडायचे कारण नव्हते, तशीच परिस्थिती सुनंदा पुष्कर गेल्यावर होती. दोघींचा मृत्यू सहा महिन्यांच्या अंतराने झाला होता, दोघींचे मृत्यू संशयास्पद होते. एकीची दखल गल्लीतल्या कुत्र्या मांजराने देखील घेतली नाही तर एकीच्या मौतीचं कवन अजून सुरूच आहे.

संशयास्पद मृत्यू झालेल्या सेलिब्रिटी कम सुपरवूमन सुनंदा पुष्कर यांचा व्हिसेरा किती वेळा पोलिसांनी फोरेन्सिककडे तपासणी साठी दिला आणि त्यातून सत्य किती वेळा नागडे झाले माहिती नाही.., याबाबत मध्यंतरी काढलेला निष्कर्षदेखील खरा की खोटा हेही कळायला मार्ग नाही...मात्र मोठ्यांचे एक बरे असते ; मिडीया किंवा पैसा मागे उभा राहतो अन खरी वा खोटी सुनवाई तरी होते. अशाच प्रकारच्या घटना ज्यांच्या आयुष्यात घडून जातात त्या अतिसामान्यांचे अन त्यातही शोषितांचे पुढे काय होत असेल ? ही पोस्ट आहे
मुमताजबद्दलची....


मुमताज दक्षिण मुंबईच्या घाटकोपर रेल्वे लाईनला लागून असलेल्या हनुमान गल्ली मधली अभागी स्त्री. ती इथे कशी आणि का आली हा एका वेगळ्या पोस्टचा विषय आहे... ३६ वर्षीय मुमताजला दोन मुली होत्या. मुमताजला जेंव्हा दवाखान्यात दाखल केले तेंव्हा ती अत्यवस्थ होती आणि तिच्या धाकट्या मुलीचं त्या दिवशी 'लगन' होतं. ८५ टक्के भाजलेल्या मुमताजच्या सर्वांगाला रॉकेलचा वास येत होता. तिची बहिण आणि तिच्या मुली इस्पितळात येण्याआधी आपण तिचे स्टेटमेंट घेतले असा पोलिसांचा दावा होता.

मुमताजचे सर्वांग लाल काळे झाले होते. मुमताज हिंदू पण तिचा दल्ला मुस्लीम, त्यानेच तिचे नाव मुमताज ठेवलेले. तिला पहिली मुलगी 'दुर्गा' जेंव्हा जन्मली तेंव्हा मुमताज फक्त १४ वर्षांची होती. इतक्या कमी वयात या धंद्यात मुलें जन्माला घालू दिली जात नाहीत पण आपल्या प्रेमाची निशाणी म्हणून तिने सगळ्यांचा विरोध झुगारून पोरगी जन्मास घातली अन ती तिच्या आयुष्याची सर्वात मोठी भूल ठरली. त्या पोरीच्या आडून तिला तिचा दल्ला छळू लागला आणि मुलीसाठी ती वेड्यासारखा त्याचा सारा छळ सहन करू लागली. वयाच्या १९ व्या वर्षी ती पुन्हा आई झाली. पण यावेळेस त्याच्या इच्छेखातर ती आई झाली.

दोन मुली घेऊन मुमताज त्या नराधमाच्या सगळ्या यातना सहन करत करत रोज चुरगळली जाऊ लागली, तिचे अनन्वित शोषण होत राहिले अन केवळ मुलींकडे बघत ती त्याला मेलेल्या मनाने सामोरं जात राहिली. काळ पुढे जात राहिला, तिच्या मोठ्या मुलीचे दुर्गाचे लग्न झाले. ती या दुष्टचक्रातून बाहेर पडली खरी पण लग्नानंतर दोन मुले पदरात टाकून तिचा आयुष्याचा साथीदार डाव अर्ध्यात टाकून देवाकडे गेला. एकवीस वर्षाच्या असहाय दुर्गाला तिचा भूतकाळ आणि तिचे प्रारब्ध पुन्हा इथे घेऊन आले. काही महिने असेच गेले...

इकडे मुमताजला आता रोज मारहाण होऊ लागली, तिने तक्रार करावी तरी कुठे हा तिच्यापुढे सवाल होता. 'अशा वेळी पोलिसात गाऱ्हाणे घेऊन गेलं तरी फारसा उपयोग होत नाही हे मुमताजला ठाऊक होते, त्याचबरोबर यामुळे आपल्या पाठी आपल्या धाकट्या मुलीच्या आयुष्याचे वाटोळे होईल' याची खुणगाठ तिने मनाशी बांधलेली होती. आपल्या एका मुलीच्या जीवनाचा इस्कोट झाला आहे आता किमान धाकटीला तरी वाचवायचेच हा तिचा दृढ निश्चय होता. त्यासाठी ती काहीही अन कितीही सहन करत होती. तिच्यावरील जुलूम मी इथे लिहू शकत नाही अन तुम्ही वाचू शकणार नाही.

अखेर मुलीच्या लग्नासाठी लागणारया पैशाची सगळी जुळवाजुळव झाली, पोरीचे 'लगन' ठरले. तीन दिवसांवर तारीख जवळ आली होती. अन एकाएकी मार्चच्या धगधगत्या उन्हात मुमताजच्या खोलीत ज्वाळांचे तांडव झाले. सगळ्या खोलीत रॉकेलचा घमघमाट होता फक्त एफआयआरच्या कागदावरच तो आला नाही कारण मुमताज ही एक 'रंडी' होती जिला कुणी नवरा नव्हता मात्र दोन मुली आणि दोन नातवंडे होती. पण ती देखील या देहविक्रीच्या उकीरड्यातलीच असल्याने पोलीस, प्रशासन आणि इतर पांढरपेशी माणसांच्या लेखी त्यांचे जीवनमूल्य आणि उपद्रवमूल्य दोन्ही शून्य असल्याने त्याची फारशी दखल कोणी घेत नसते. मुमताजचेही तसेच झाले. ...

शेवटी मुमताज दवाखान्यात असतानाच तिच्या धाकट्या पोरीचे लग्न झाले, ती कावरीबावरी होऊन 'आई लग्नात का बरे आली नाही?' असं विचारत राहीली आणि सगळे तिला खोटं सांगत गेले. दुसऱ्या दुपारी भाजलेल्या जखमांचे सेप्टिक होऊन मुमताज देवाघरी गेली. गेली म्हणजे या नरकयातनेतून सुटली. तिच्या दोन्ही मुलींना कळवले गेले, दुर्गाने तर आपल्या आईच्या पार्थिवावर उडी मारायचे बाकी ठेवले होते. मुमताजची बहिण कमला आणि तिच्या मुलींचे आर्त टाहो काळीज चिरून जात होते. असा काळीज विदीर्ण करणारा प्रसंग घडूनही तिथे आलेले बघे वखवखल्या नजरेने रडणारया बायकांना न्याहाळात होते...

'सुहागन'प्रमाणे मुमताजची तिरडी बांधली गेली अन तिचा अंत्यविधी हिंदू रिवाजाप्रमाणे करण्यात आला. तिच्या मुली आणि बहिणींनी पोलिसांना खूप विनवून पाहिले की तिला विष पाजून जाळून मारण्यात आले आहे पण पोलीस आपल्या स्टेटमेंटवर ठाम होते. इथे नोटा ढिल्या करायला समोरची पार्टी अगदीच कफल्लक असल्याने इतर काही सत्य बाहेर येण्याची सुतराम शक्यता नव्हती. मुमताज गेली तरी तिच्यासाठी रडणारया या तिघींचे अश्रू काही थांबत नव्हते अन डोळे सुकून गेले तरी आतली ओल कायम होती...

मरण्याच्या काही काळ आधी सोशल एक्टीव्हीटी इंटिग्रीटी (SAI) या NGO साठी मुमताजने काम सुरु केले होते. दीदी (sister) मॉड्यूल नुसार चालणारया या एनजीओसाठी मुमताज मुंबईबाहेर थेट आमच्या सोलापूरात देखील येऊन गेली होती. तेंव्हा तिच्या सोबत हजरा आणि शेनाज या याच क्षेत्रातल्या अभागी महिला हजर होत्या. हजराला देखील मागे जाळण्याचा प्रयत्न झाला होता पण तिच्या भाजण्याचे प्रमाण कमी होते अन तिला उपचार लवकर मिळाले. त्यामुळे तिचा जीव वाचला.मात्र तिच्या देहावर भाजल्याचे अन मनावर अत्याचाराचे व्रण कायमचे कोरले गेले. कामाठीपुरयात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचा अभ्यास करण्यासाठी हेलेनने फोटो प्रोजेक्ट सुरु केला होता. त्याच काळात मुमताजची तिची ओळख झाली अन काही दिवसातच ही घटना घडली. हेलेनला या घटनेचा मोठा धक्का बसला होता.

'सिस्टर्स फॉर कामाठीपुरा'कडून आणि SAIकडूनही या घटनेसाठी भरपूर प्रयत्न करून पाहिले पण ही घटना आत्महत्त्या म्हणूनच नोंदली गेली. मुमताजला न्याय मिळाला नाही. कदाचित तिने एनजीओसाठी काम सुरु केल्याने तिच्या मुली ह्या 'लाईन'मधून बाहेर पडल्या तर आपल्या पोटापाण्याचे कसे होईल या विचाराने धास्तावलेल्या तिच्या लिव्हइन मधल्या दल्ल्याने तिला मारले असावे असा संशय होता. पण पोलिसांना असं सांगणारा एकही 'परिस्थितीजन्य पुरावा आढळला नाही. आपल्या देशात पोलीस त्यांना पाहिजे तसे कागद रंगवत असतात हे शेंबडे पोर देखील सांगते, त्यामुळे परिस्थितीजन्य पेक्षा पाकीटजन्य परिस्थितीचा पुरावा देण्यात मुमताज कमी पडली असेच म्हणावे लागेल..

ज्या मुलींच्या भवितव्यासाठी मुमताजने आयुष्याचा बाजार मांडला त्यांचे भविष्य अनिश्चिततेच्या खुंटीला टांगले गेले, पोलिसांनी मुमताजच्या आत्महत्येची केस तिच्या अंत्यविधीनंतर काही दिवसातच बंद केली. इथे कुठली मिडिया वा कुठला पैसा इथे तिच्यासाठी भांडायला येणार नाही त्यामुळे आजघडीला तिची फाईल कायमसाठी दफ्तरदाखल नक्की झाली असेल. एकट्या मुंबईत अशा लाखभर मुमताज सडण्यासाठी जगत आहेत आणि त्यांच्या न्यायाच्या यंत्रणा इतक्या तोकड्या आहेत की इथे एनजीओनी काम बंद केले तर मरणारयांची नावे देखील कळणार नाहीत.

सुनंदा पुष्कर आणि मुमताज ह्यां जमीन अस्मान फरक असणारया दोन अतिभिन्न स्तरावरील आहेत. अशा कित्येक स्त्रिया न्यायाविना आपला जीव सोडत असतील कोण जाणे ? वेश्यांच्या मौती ह्या कुत्र्याच्या मौती व्हाव्यात इतक्या का त्या वाईट आहेत ? त्याचे समाजाला काहीच वाटू नये इतके का आपण बधीर झालो आहोत ? मार्च २०१३ मध्ये ही घटना घडली, मुमताज यातून सुटली पण पुढे काय झाले ? दुर्दैवाचे फेरे सुरुच राहिले, काल परवा कळाले की आता मुमताजच्या दोन्ही मुली याच लाईनमध्ये आहेत. राजरोसपणे त्या चुरगळल्या जाताहेत.

आपल्या सभोवताली इतके काही अक्राळ विक्राळ घडत असते तरीही आपण समानतेच्या, न्यायाच्या, मानवी हक्काच्या आणि महासत्तेच्या गप्पा मारतो याचा आपल्याला जराही विषाद नसतो ही बाब अत्यंत अस्वस्थ करून जाते.....

- समीर गायकवाड.

( पोस्टसोबतची सर्व छायाचित्रे हेलेन रीमेल यांनी काढलेली आहेत, त्या कामाठीपुरयासाठी काम करत होत्या तेंव्हा मुमताजच्या कुटुंबियांच्या विनंतीवरून त्यांनी ही छायाचित्रे काढली होती. मुमताजच्या मुलींची शेवटची भोळी आशा होती की या फोटोंचा त्यांना कायदेशीर लढाईत काहीतरी आधार होईल. पण पोलिसांच्या 'कर्तव्यदक्षते'मुळे ती वेळच आली नाही. या पोस्टवर अनावश्यक द्वेषमूलक कॉमेंटस करू नयेत. पोस्ट शेअर करावी वाटली तर त्यातील मजकुरात - फोटोत बदल करू नये वा अश्लील - बीभत्स मजकूर टाकू नये.)