प्रिय महानोर,
रानामळ्यातली हातातोंडाशी आलेली तेजतर्रार पिकं मलूल झाली.
गोठ्यातल्या गायी मौन झाल्या,
माना तुकवून उभी असलेली कुसुंबी झाडं थिजली
उजाड माळांवरुन भिरभिरणारं वारं सुन्न झालं!
हिरव्याकंच घनदाट आमराईने शांततेचं काळीज चिरणारी किंकाळी फोडली!
विहिरींच्या कडाकपारीत घुमणारे पारवे स्तब्ध झाले
गावाकडच्या वाटेवरल्या पाऊलखुणा गहिवरल्या
घरट्यांतल्या पाखरांचा किलबिलाट निमाला
उंच गगनात विहरणारे पक्षांचे थवे एकाएकी विखुरले
पाऊसओल्या मातीस गलबलून आले
तुम्ही गेलात अन् वसुंधरेची हिरवाईही रुसली
अजिंठ्यातली चित्रे गदगदली,
वेरूळच्या लेण्यांचे हुंदके दाटले
पाऊसधाराही गहिवरल्या