गुरुवार, १ फेब्रुवारी, २०२४

हे विधात्या इतके तर तू करू शकतोस!



दोनेक वर्षांपूर्वीच्या कडक उन्हाळ्यातली गोष्ट. बरड रानातल्या बांधालगत असणाऱ्या भल्याथोरल्या उंच पिंपळावर वरच्या बाजूला धनेश (हॉर्नबिल) पक्षाने घरटे केले होते. जाडजूड फांदीच्या ढोलीत खचका पाहून घरटं बांधलेलं. एरव्ही भयंकर एकजीव असणारी नर मादीची जोडी घरटं बांधताना नर खाली साठलेले चिखल मातीचे गोळे वर घेऊन जायचा. झाडाच्या बुंध्यापाशी जुनी डोबी होती, त्यातलं पाणी झिरपून तिथं ओल तयार झाली होती. त्याच चिखलाचे गोळे नराने वर नेलेले. मादीने बहुतके तीन अंडी घातली होती, ती आतच बसून होती. अंडी उबवून पिले जन्माला यायच्या काळात घरट्याचे तोंड जवळपास पूर्णतः बंद झालेलं. फक्त मादीची चोच बाहेर राहील इतकीच सांद त्याने ठेवली होती. पिले जन्मली. मादी पिलांसोबत आत घरट्यात आणि नर सकाळ संध्याकाळ घरट्यापाशी! दिवसातून दोनतीन वेळा तरी तो त्यांचं खाद्य घेऊन तिथं यायचा. मादीच्या तोंडात घास घालायचा, ती आपल्या चोचीतून पिलांच्या चोचीत घालायची. पिले दोन तीन आठवड्याची झाली असतील. एव्हाना मे महिन्याचे कडक उन्हाचे तडाखे बसू लागले होते. एके दिवशी हवेतला उष्मा अतिशय टोकाला पोहोचला. वाऱ्याचे नामोनिशाण नव्हते. जीवाची नुसती काहिली होत होती. रणरणत्या उन्हात सारं चराचर म्लान होऊन निपचित पडलं होतं. त्या जीवघेण्या उन्हातही नर बाहेर पडला होता. मात्र त्यादिवशी अघटित घडलं. अवकाळी पाऊस बरसला. विजेच्या कडकडाटासह नि मेघगर्जनेसह पाऊस कोसळत होता. जवळपास तासभर पाऊस पडत होता. दोन तीनदा तरी वीज कोसळल्याचा आवाज आला. काळजात धस्स झालं. संध्याकाळ सरून गेली. गडद रात्र आली. नर परतला नव्हता. पिले व्याकुळ होऊन गेली होती. त्यांचा आवाज कुंठला होता, दोनच दिवसांनी मादीने जीव सोडला. धनेश पक्षाच्या जोडीतला नर मरण पावला तर मादी पिलांसकट जीव सोडते! किती हे प्रेम, किती उत्कट या संवेदना! कुठले विधी न करता नि कुठले प्रस्थ न माजवता हे पक्षी मुक्याने आपली प्रेमकथा निसर्गाच्या पटावर लिहून जातात. ही संवेदनशीलता अफाट आहे.

काही वर्षांपूर्वी थायलंडमधील काओयेई राष्ट्रीय अभयारण्यामध्ये एका कळपातील आठ हत्तींनी रस्ता अडवून धरल्याने तिथला वनअधिकारी ताठकळून गेला, थोड्या वेळाने हत्ती आपण होऊन एकाच दिशेने उदासपणे निघून गेले. त्या हत्तींच्या मागे गेल्यावर एका धबधब्याजवळ त्याला दोन हत्ती अगदी टोकाच्या कडेवर उभे असल्याचे दिसले. अधिकाऱ्यास राहवले नाही त्याने जवळ जाऊन पाहिलं. तर अत्यंत हृदयद्रावक दृश्य त्याला दिसलं. तळाशी तीन वर्षांच्या एका छोट्या हत्तीचा मृतदेह त्याला दिसला. बेचैन होऊन त्यानं तळापाशी उतरून जाऊन पाहिलं तर आणखी पाच हत्तीचे मृतदेह आढळून आले. कदाचित हत्तीच्या त्या पिलाचे ते आई वडील असतील, भाऊबंद असतील, मित्र असतील! घटना घडून दोनतीन दिवस झाले तरी ते दोन हत्ती तिथेच उभे होते, काय विचार करत असतील ते? कळपातले ते दोन हत्ती अत्यंत कठीण अवस्थेत उभे होते कारण तिथे जेमतेम दोन माणसं उभी राहू शकतील इतकीच जागा होती! पिल्लाला वाचवण्याच्या नादात कळप खाली कोसळल्यानंतर कळपातील ते दोघेजण त्या धबधब्याच्या बाजूने निम्मा डोंगर उतरून अर्ध्यात आले आणि धबधब्याच्या दिशेने तोंड करून उभे राहिले. कदाचित त्यांना वेडी आशा असावी की आपले प्रियजन आता तरी आपल्या नजरेस पडतील ! पण तसे होणे नव्हते. नात्यांची ही दास्तान अत्यंत आर्त करुण अशीच आहे. मृत हत्तींच्या शोकाने गहिवरून गेलेल्या दुसऱ्या हत्तींना ही घटना उघडकीस येण्यासाठी रस्ता अडवण्याची कल्पना कशी सुचली असेल हा प्रश्नही काळीज पोखरून टाकणारा आहे. हत्ती हा सर्वात हुशार प्राण्यांपैकी एक असल्याचे म्हटले जाते. हत्ती आपल्या कळपाची आणि कळपातील प्रत्येक सदस्याची काळजी घेताना दिसतात. अनेकदा यासंदर्भातील वेगवेगळे किस्से व्हिडिओ आणि फोटोंच्या माध्यमातून समोर येत असतात. अगदी कळपामधील प्रत्येक सदस्य सोबत घेऊन प्रवास करण्यापासून शिकाऱ्यांपासून आपल्या लहान बाळाला वाचवण्यासाठी हत्तीणीने दिलेली झुंज असतो हत्तींमध्ये एकोप्याची भावना दिसून येते. मात्र याच एकोप्याच्या भावनेमुळे या सहा हत्तींना प्राण गमावावा लागला.

धबधब्यावरुन खाली पडणाऱ्या पिलाला वाचवायला जाऊन कळपातील इतर हत्तीही खाली पडल्याने सर्व सहा हत्तीचा जागीच मृत्यू झाला. वाचवण्यात आलेले दोन्ही हत्ती अधिक काळ जिवंत राहण्याची शक्यता कमी असल्याचे प्राणी तज्ञांनी म्हटलं नि जग हळहळून गेलं. हत्ती हे अन्न शोधण्यासाठी एकमेकांवर अवलंबून असतात. तसेच मानसिकदृष्ट्या एकमेकांवर निर्भर असतात त्यामुळेच वाचलेल्या हत्तींना मानसिक धक्क्यातून सावरणे कठीण होते. त्यामुळे ते आणखी खूप दिवस राहणं अशक्य होतं. प्राण्यांचे बरे असते आपला साथीदार मरून गेला की जास्त आशाअपेक्षा न करता लवकरात लवकर आपणही मरून जायचं! स्वार्थी मनुष्य प्राण्याचे तसे नसते, त्याचे लचांड काही केल्या संपतच नाही.

काही आठवड्यांपूर्वी घरानजिकच्या रस्त्यावर कुत्री व्याली होती. अर्धा डझन गोजिरवाण्या पिलांना तिने जन्म दिलेला. नंतर अपघातात तिची दोन पिलं दगावली तेव्हा ती दिवसभर रस्त्याच्या कडेला बसून होती. तिची बाकीची पिलं तिला घट्ट बिलगून बसली होती. तिचा रडवेला चेहरा काही केल्या नजरेसमोरून जात नाही.

घराशेजारी कारवारी वृध्द जोडप्याचा बंगला आहे. कंपाऊंडला लागून त्यांनी छानपैकी नारळाची झाडे लावलीत. ती आता बरीच जुनी आणि उंचच उंच झालीत. यातल्याच एका झाडावर घारीने घरटे केलेलं. खरं तर याच झाडावर दोनेक वर्षांपूर्वीही घारीनं घरटं बांधलं होतं. नोव्हेंबरमध्ये घरटं बांधलेलं आणि मार्चमध्ये तर पिलू जन्मास आलेलं. त्याला स्वतंत्र उडता येईपर्यंत नर मादी दोघेही अतोनात दक्षता नि काळजी घेत होते. यंदा मात्र लवकर घरटं बांधलं असावं. निसर्गाचं चक्र बदलतंय हे पक्षांनाही कळले असेल का? तर यंदाच्या हंगामीही त्यांच्या घरट्यात इवलुशी चोच उगवून आली होती. तिचे त्यांना कोण अप्रूप होते. दोघेही पाळीपाळीने तिची काळजी घेताना दिसत.
मात्र आज सकाळपासून काहीतरी बिनसले होते. मादी घरट्यापासून हललीच नाही आणि नर सारखा घिरट्या घालत होता. अधून मधून तो खाली झाडाच्या शेंड्यापाशी यायचा नि पुन्हा उडून जायचा.  त्यावेळी मादीचा काहीच प्रतिसाद नव्हता. ती जणू थिजून गेली होती. वरती जाताना नर अशा काही वळणा वळणाच्या झेपा घ्यायचा की काही क्षणात तो जमिनीवर कोसळेल की काय असे वाटायचे. दिवसभर त्यांचे हेच चालले होते. अखेर दिवस मावळला. सूर्यबिम्ब पश्चिमेला दुखऱ्या मनाने विरून गेले. मनी शंका येऊन गेली, पंख थकल्याने नर कोठे कोसळून गेला असेल का? काही आक्रीत घडलेय का?  शंका खरी ठरली. घरट्यातली चोच अकाली अनंताच्या प्रवासाला गेली होती. घरटे मुके झाले होते! मादी तिथेच बसून होती!

आता अंधार काळा कभिन्न झालाय. या मौन घारीला पाहून मला लता आणि तिचा नवरा नरसू आठवले! बाळंतपणानंतर अल्पावधीतच मूल दगावलं नि लतीच्या डोक्यावर परिणाम झाला. लोक म्हणू लागले लती मेंटल झाली. कुणी काही म्हटलं तरी नरसूने तिला अंतर दिले नाही. लतीपासूनची पहिली पोरगी आठ वर्षांची होती. त्यांना अजून एक अपत्य हवे होते, मात्र काही केल्या दिवस जात नव्हते. डॉक्टर, दवाखाने, उपास तपास सारे उपाय झाले होते. अखेरीस गोड बातमी पक्की झाली. लतीचे पाय जड झाले होते. कथित नवसा सायासाने पोर जन्मले अशी त्यांची धारणा झाली होती. दिवस भरताच गोंडस गोजिरे पोर जन्मले.
आईबाप खुश झाले. मात्र आनंद फार काळ टिकला नाही. दोनेक महिन्यात लतीचे बाळ अकाली गेले! लतीला हा धक्का सहन झाला नाही. तिच्या मेंदूवर परिणाम झाला. भावकीने नरसूला खूप समजावून सांगितले तरी त्याने दुसरे लग्न केले नाही. लोक असंवेदनशील होत म्हणाले, नरशा भाड्या अक्कल हुकलेला बाईलभाड्या आहे!  तरीही तो खचला नाही. काही वर्षांनी लती माणसात आली. पण ती सुन्न शांत बसून असायची. तिची नजर शून्यात असायची. सारी कामे यंत्रवत करायची.  दरम्यान मुलगी थोर झाली, नरसूने तिचे लग्न लावून दिले.

आता नरसूच्या घरी त्याचे म्हातारे आईबा आणि लता असे चौघेच असतात. रोज संध्याकाळ होताच तुळशीला दिवा लावून लती उंबरठ्यापाशी बसून राहते. ती काहीच बोलत नाही मात्र तिचे गोठलेले डोळे बोलत असतात! अस्ताला जाणारा सूर्य रोज सांजेला तिच्या डोळ्यांचा निरोप घेऊन जातो मात्र तिच्या डोळ्याला डोळा भिडवायची ताकद कुणाच्यातच नसते! गेलेल्या जिवासाठी शोक करणारे खूप असतात मात्र त्यातच जीव गुंतून पडलेले लवकर सावरत नाहीत, अशांना सावरण्यासाठी काळ सरसावतो. मात्र हा काळ जाता जात नाही, तोवर हळव्या झालेल्या जिवाने कुणाकडे बघून दिवस काढायचे? कदाचित आकाशात उडणाऱ्या नराला मादीच्या डोळ्यात पाहवले नसेल. त्याने स्वतःला संपवले असेल का? मला बऱ्याचदा वाटते की नरसूच्या पोरीला जे अपत्य होईल त्याचा तोंडवळा लतीच्या अकाली मरण पावलेल्या बाळासारखा असेल! रस्त्याच्या कडेला व्यालेल्या कुत्रीला नि घारीलाही पुढच्या हंगामात तसेच पिलू लाभावे!
हे विधात्या इतके तर तू करू शकतोस!

- समीर गायकवाड 

#प्राणीप्रेम #मुकेजीव #doghelp #animal #saveplanet #love #life #आयुष्य #जीवन #पशूपक्षी  #मरण #जन्म #सुख #विधाता #आई #पिलू 
      

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा