शुक्रवार, २३ फेब्रुवारी, २०२४

मनोहर जोशींचा महत्वाचा पण दुर्लक्षित पैलू!

MANOHAR JOSHI मनोहर जोशी


मनोहर जोशींच्या आयुष्यात डोकावताना त्यांच्या राजकीय भूमिकांचा खल अनेकजण पाडतील; मात्र त्यात सर्वांना स्वारस्य असेल असे नाही.चाळीसच्या दशकात जन्मलेल्या जोशींचे वडील भिक्षुकी करायचे. त्यानंतर मनोहर जोशीही माध्यमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत भिक्षुकी करत असत.त्यांच्या बालपणीचा एक काळ असाही होता की ते माधुकरी मागून जेवत असत. हा स्वातंत्र्यपूर्व काळ होता जिथे अनेक तऱ्हेच्या जीवनदायी साधनांची कमतरता होती. अशी प्रतिकूल स्थिती असूनही त्यांच्या अंगी शिकण्याची जिद्द प्रचंड होती. त्यामुळेच विपरीत काळावरही त्यांना मात करता आली.

रायगड जिल्ह्यातील नांदवी हे त्यांचे गाव. त्या काळात कोकण किनारपट्टी पूर्णतः सर्वंकष साधनांच्या अभावाने ग्रासलेली होती. तरीही त्यांनी आशा सोडली नव्हती.
दहावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर १९५४ साली मनोहर जोशी अकरावीला शिकण्यासाठी मुंबईत त्यांच्या बहिणीकडे आले. बहीण खूप सधन अवस्थेत होती अशातली गोष्ट नव्हती. तिच्यापाशी आल्याने त्यांना शिक्षणाचे सक्षम पर्याय गवसले जे त्यांच्या गावात त्यांना कधीच मिळाले नसते.
मोठ्या शहरांचा हा फायदा असतो, जो तरुण मनोहर जोशींनी अचूक घेतला.
मात्र हे शिक्षण त्यांना सहजी घेता आले नाही.
त्यासाठीचा आर्थिक स्रोत त्यांच्यापाशी नव्हता. त्यांनी सहस्त्रबुद्धे क्लासेस या ठिकाणी शिपायाची नोकरी करुन त्या आधारे शिक्षण घेतलं.
किर्ती महाविद्यालयातून त्यांनी पदवीपर्यंतचं शिक्षण झालं.

स्वतंत्र भारतातले ते पहिले दशक होते. उच्चशिक्षण घेणाऱ्या हातांना तेव्हा नोकरी बऱ्यापैकी सत्वर मिळत असे. जोशींना फारशी खटपट न करता मुंबई महापालिकेत लिपिकाची नोकरीही मिळाली. मात्र या दरम्यानही त्यांचे शिक्षण सुरु होते ही एक महत्वाची गोष्ट होय.
मात्र एमएचे शिक्षण पूर्ण होताच डिसेंबर १९६१ मध्ये त्यांनी पालिकेची नोकरी सोडली होती.

शक्यतो नोकरी पेशात रमणारा वर्ग म्हणून ज्या जातवर्गाची गणना होते त्या वर्गवारीतुन येणारा एक तरुण चक्क सरकारी नोकरी सोडतो हे जरा वेगळेच चित्र होते. कारण अत्यंत विषम परिस्थितीत शालेय शिक्षण घेऊन, शहरातही स्वकमाईने उच्च शिक्षण पूर्ण करून कुणाला जर सरकारी नोकरी मिळाली तर त्याच्यासाठी जणू स्वर्गप्राप्ती असते! मात्र जोशींनी तो मोह तिथेच दूर लोटला आणि एक भव्योदात्त स्वप्न पाहिले, जे पुढे जाऊन पुरेही केले!

पालिकेतील नोकरी सोडल्यानंतर त्यांनी आवडीचा शिक्षकी पेशा स्वीकारला होता. शिवाय त्यांना एलएलबीचे पूर्णवेळ शिक्षण घ्यायचे होते. १९६४ मध्ये वयाच्या २७ व्या वर्षी मनोहर जोशींचे एमए. एलएलबीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले.
इथे त्यांनी एक अभूतपूर्व निर्णय घेतला तो म्हणजे स्वतःचे क्लासेस सुरु करण्याचा!
आता ते केवळ मनोहर जोशी उरले नव्हते तर प्रिन्सिपॉल मनोहर जोशी झाले होते. त्यांच्या नावाचे साइनबोर्ड असणारे कोहिनूर क्लासेस आधी मुंबईत सुरु झाले. त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिले नाही.

सुरुवातीला चौकटबंद साच्यात असणारे हे क्लासेस त्याच दशकात तांत्रिक शिक्षण देणाऱ्या संस्थेच्या रूपात पुढे आले. 'कोहिनूर टेक्निकल इन्स्टीट्यूट'चे नाव साऱ्या महाराष्ट्राला परिचित झाले.
जवळपास महत्वाच्या सर्व छोट्या मोठ्या शहरात एसटी स्टॅन्ड अथवा स्टेशन परिसरात जोशी सरांचे कोहिनूर क्लासेस दिसू लागले.
ज्यांना आयटीआयला प्रवेश मिळत नव्हता ते सर्रास कोहिनूरमध्ये प्रवेश घेत असत. फिटरपासून इलेक्ट्रिशियनपर्यंत आणि मेकॅनिकपासून ते एसी रिपेअरिंगपर्यंत अनेक कोर्सेस तिथे उपलब्ध झाले.

दरम्यान सरांची राजकीय पत वाढल्याचा नेमका फायदा त्यांनी या संस्थेला करून दिला. नोकरीची हमी देणारी शिक्षणसंस्था म्हणून ही संस्था नावरूपाला आली. राज्याच्या ग्रामीण भागातून मुले मोठ्या संख्येने प्रवेश घेऊ लागली, त्यांना त्या अनुषंगाने रोजगारही मिळत गेला हे वास्तव होते.
मात्र सर राजकारणातून फेकले जाण्याचा कालखंड आणि कोहिनूरचे साचेबद्ध झालेले शिक्षण एकाच काळात झाल्याने कोहिनूरचे नाव मागे पडत गेले. वेळेवर अपडेट न केले गेल्याने ही संस्था मागे पडली ती कायमचीच!

इतकी चांगली शैक्षणिक सूत्रे जुळवून आणूनही गणपती दूध पितो याचे ऑनलाईन रेकॉर्डिंग करून तशी अफवा पसरवण्याचा बाष्कळ मूर्खपणा त्यांनी केला होता हेही नमूद केले पाहिजे!

मनोहर जोशी शिवसेनेला काही अंशी ओझे वाटू लागले आणि त्यांचे रूपांतर अडगळीत झाले हे वास्तव होते मात्र याची कारणे शोधली तर या कृतीचे उत्तरही सापडते. असो.
मनोहर जोशींचे जाणे राजकीय दृष्ट्या विविध संदर्भाचे असेल मात्र त्याला शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक आणि भौगोलिक संदर्भही आहेत हे महत्वाचे आहे.
कारण खूप कमी राजकारण्यांच्या वाट्याला हे संदर्भ येतात.
मरण पावलेल्या व्यक्तीला चांगलेच म्हटले पाहिजे याचे बंधन नाही मात्र त्याची चिकित्सा अगदी तटस्थपणे निर्विकारपणे करायची झाल्यास त्याच्या अन्य बिंदुंचा आढावाही घेतला जाणे अनिवार्य आहे.

आरंभीच्या काळातील शिवसेनेतील कोणत्याही नेत्याकडे सहकार वा शैक्षणिक चळवळींचा वारसा नव्हता कारण या संघटनेची / पक्षाची स्थापनाच मुळी भावनेच्या आधारावरील मुद्द्यांना धरून होती.
यामुळेच मनोहर जोशींचे वेगळेपण लक्षात येते.
त्यांचा वैयक्तिक इतिहास पाहिला की मग भिन्नतेचा हा परीघ आणखी थोडा मोठा वाटू लागतो.
मात्र त्यांच्या या बिंदुची चर्चा फारशी झाली नाही याची कारणे राज्याच्या जातीय, सामाजिक आणि राजकीय समीकरणात दडून होती.

मनोहर जोशींच्या जाण्याने ऐंशी नव्वदच्या दशकातील ग्रामीण व निमशहरी तरुणांना नेहमीच्या महाविद्यालयीन शिक्षणाकडे न वळता पोटापाण्याचे शिक्षण सहज उपलब्ध करून देणारा एक वेगळा संदर्भ लयास गेला आहे.

- समीर गायकवाड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा