त्या अपघातग्रस्त डोंगराळ रस्त्यावरून नॅथन आणि डॅनियल पुढे रवाना होतात, काही वेळात त्यांना दोन विस्कळीत गेटवे लागतात एक आकाशीय निळया रंगाचे फोर्सफील्ड असते तर दुसरा गेटवे म्हणजे अवाढव्य लाल दुहेरी दरवाजे असतात. दिग्दर्शकाने इथे विलक्षण कल्पनाशक्ती वापरत आधिभौतिक घटकांची कुशलतेने ओळख करून दिलीय. स्वर्गाच्या गेटवेवरून गाणे ऐकण्याची सफर डॅनियलच्या वाट्यास येते, तर भयंकर हाल अपेष्टांच्या नरकयातना नि दुःख भय वेदना यांच्या एकाकी जाणिवा नॅथनच्या वाट्याला येतात. त्यांच्या वाट्याला आलेल्या जगातहि तणाव निर्माण होतात मात्र दोघे पुढे जात राहतात. चित्रपटाच्या शेवटी नॅथनसोबत जे प्रसंग घडतात त्यातून नैतिकतेचे अप्रत्यक्ष भाष्य समोर येते. अपराधीपणाची समज येते. नॅथनने जे दुष्कृत्य केलेलं असतं त्याच्या परिणामांशी त्याचा सामना होतो! दीर्घकाळ आजारी असलेल्या पत्नीला दया दाखवून मारल्याचा कबुलीजबाबही त्यातच सामील असतो. आपल्या हातून चुका घडतात तेव्हा त्याचे नैतिक अर्थ लावण्यात आपण कसे सोयीस्कर दुविधेत पडतो याचे मार्मिक भाष्य चित्रपटात आहे. 'पँडेमोनियम' हे मानवी अपराध स्थितीवरचे एक चिंतन आहे, जे जीवन, मृत्यू आणि त्या दरम्यान आपण करत असलेल्या नैतिकतेच्या निवडींच्या मार्मिक शोधाचे उत्तर बहाल करते.
जॉली एलएलबी या चित्रपटात अरशद वारसीचा लीड रोल होता. यात हीट अँड रनचं प्रकरण कोर्टासमोर असतं. एका बड्या उद्योगपतीचा मुलगा मद्यधुंद अवस्थेत फुटपाथवर गाडी चढवतो. त्यामध्ये पाच जणांचा मृत्यू होतो, पण प्रशासन आणि राजकीय हस्तक्षेपामुळे तो अवघ्या काही मिनिटांमध्ये सुटतो. वकीलाच्या भूमिकेत असलेला अर्शद वारसी जीवाची बाजी लावून पुरावे जमा करतो, ते कोर्टासमोर ठेवतो आणि शेवटचा युक्तिवाद करतो. त्या सिनेमातील तो युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीशाच्या भूमिकेत असलेले सौरभ शुक्ला आरोपीवर गुन्ह्याची निश्चिती करतात आणि शिक्षाही सुनावतात. यात काही तपशील महत्वाचे ठरतात. एक साक्षीदार जिवंत असूनही मृत दाखवलेला असतो. मरणाच्या दारात असलेल्या विकलांग व्यक्तीसदेखील पोलीस पैसे मागतात. अपघाताचे स्वरूप बदलण्याचे प्रयत्न करतात. साक्षीदार फोडतात, विकत घेतात. तपास यंत्रणा कमजोर विकाऊ करतात. प्रसंगी सरकारी वकीलास जीवे मारण्यासाठी माणसं पाठवली जातात. पुरावे नष्ट केले जातात. तरीही सरकारी वकील मागे हटत नाही. एका युक्तिवादात तो म्हणतो की, "बचाव पक्षाचे आणि तपास यंत्रणेद्वारे इथे हे ही सिद्ध केले जाईल की ज्या गाडीने टक्कर दिली ती कार नसून ट्रक होता! पुढील सुनावणी वेळी ते ट्रकऐवजी रेल्वेने टक्कर दिली असे सिद्ध करतील आणि शेवटी रेल्वे नसून विमानानेच टक्कर दिल्याने हा अपघात झाला असेही सिद्ध केले जाईल." शरमेने मान खाली जाईल अशी पोलीस यंत्रणा आणि ती विकत घेऊन सामान्य माणसास न्याय नाकारणारे धनाढ्य हे सारं अंगावर येतं!
हे सर्व इथे लिहिण्याचे कारण म्हणजे एकोणीस मे रोजी पुण्यात घडलेला अपघात होय! विशाल अगरवाल या धनाढ्य बिल्डरच्या साडेसतरा वर्षीय मुलाने दारूच्या नशेत बेदरकारपणे वाहन चालवून दोन तरुण अभियंत्याचा बळी घेतला. काही कोटी रुपये किंमतीची पोर्श ही अलिशान कार तो चालवत होता. या गाडीचे रजिस्ट्रेशन झालेले नव्हते, तिला नंबरप्लेट नव्हती. मागील तीन महिन्यापासून ती पुण्यातील रस्त्यावर धावत होती. मुलगा अल्पवयीन असूनही बारचालकाने त्याला मद्य सर्व्ह केले होते. कल्याणीनगर भागात अनेक पब्ज आहेत, जे अपरात्री उशीरपर्यंत सुरू असतात, जिथे दारू पिऊन धिंगाणा घातला जातो. तिथल्या धांगडधिंगाण्याने परिसरातील नागरिकांना प्रचंड त्रास होतो. त्याविषयीच्या अनेक तक्रारी अनेक जणांनी केल्या होत्या. उत्पादन शुल्क खाते इथे काय करते? पोलिसांनी या पब्जवर वेळेवर कारवाई का केली नाही? कारची नोंदणी न करता ती कशी काय रस्त्यावर धावत होती? सामान्य नागरिकांना दंडुक्याचा धाक दाखवणारे वर्दीतले वाघ इथे का शेपूट घालत होते याचे उत्तर त्यांच्या गरम झालेल्या खिशांत दडून होते. न्याय देण्याच्या नावाखाली अत्यंत क्लेशदायक थट्टा केली गेली. या दरम्यान प्रशासन, तपास यंत्रणा आणि स्थानिक लोकप्रतिनिधी या सर्वांचे वर्तन संशयाला बळ देणारे होते हे दुःखद चित्र होय!
'पँडेमोनियम'मध्ये दाखवल्याप्रमाणे या घटनेतील ड्रायव्हिंग करणारा पोरगाही मरण पावला असता तर चित्र कसे असले असते? मरण पावल्यानंतर कुणाला अक्कल येऊन काय फायदा? स्वर्ग नरक या गोष्टी काल्पनिक असल्या तरी माणसाने आपल्या वाईट कर्मांची भीती बाळगावी आणि त्याने नैतिकतेने वागावे या अपेक्षेने हे समज रूढ केले असल्याची शक्यता अधिक! आता अनेकांना आपल्या दुष्कर्मांची भीती वाटेनाशी झालीय. अशा वेळी 'जॉली एलएलबी'मध्ये दाखवल्याप्रमाणे सच्चाईसाठी सर्वांना आग्रही राहावे लागेल, तत्वासाठी न्यायासाठी लढावे लागेल. ही लढाई केवळ चित्रपटात दाखवतात त्याप्रमाणे केवळ नायकास लढून चालणार नाही! प्रत्येक सामान्य माणूस हाच डॅनियल आहे आणि तोच जॉलीही आहे, त्याला लढावेच लागेल! त्यासाठी आधी अन्याय अत्याचाराविरोधात आवाज उठवावा लागेल. त्याकरिता आधी तोंडावर आपणहून चिकटवलेली पट्टी काढली पाहिजे! नाहीतर न्याय विकला जाईल आणि आपण मौनी हतबल तमाशबिन बनून राहू! चॉईस आपल्याला करायचा आहे!
- समीर गायकवाड
पूर्वप्रसिद्धी दैनिक पुण्यनगरी - 25 मे 2024.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा