गुरुवार, १३ ऑगस्ट, २०१५

क्रांतिकारी भीमगीतांचे रचेते – वामनदादा कर्डक


आंबेडकरी चळवळीतला माणूस वा सर्वसामान्य माणूस असो ज्याचे बाबासाहेबांवर अपार प्रेम, निस्सीम श्रद्धा आहे अशा मराठी माणसाला महाकवी वामनदादा कर्डक यांचे नाव माहिती नाही असे होत नाही. याचे कारण वामनदादांनी लिहिलेली अवीट गोडीची आवेशकारक भीमगीते आणि आंबेडकरी चळवळीची गीते ! वामनदादा कर्डर्कांची भीमगीते आंबेडकर जयंतीचा अविभाज्य घटक झालीत. ही गीते सामान्य माणसाच्या मनाला भावलीत. नुकतेच मिसरूड फुटलेल्या मुलांपासून ते संघर्षमय जीवनाचा अखेरचा काळ व्यतित करणारे वृद्ध असोत, सर्वांना ही गाणी तोंडपाठ आहेत. वामनदादांनी लिहिलेल्या गाण्यात असे कोणते रसायन आहे की ज्याने माणसाचे रुपांतर भीमसैनिकात होते हे पाहण्यासाठी त्यांच्या गीतांवरून नुसती नजर फिरवली तरी ध्यानी येते की ही लोकांची बोली आहे, हा लोकांचा आवाज आहे, हा लोकांच्या डोळ्यातला तप्त अंगार आहे, हा निळ्या क्रांतीचा एल्गार आहे, हा जल्लोषही आहे अन वेदनेचा हुंकारही आहे, हा मनामनात दफन केलेल्या उपेक्षेचा आक्रोश आहे, हा धगधगत्या अग्नीकुंडाचा निखारा आहे आणि हा आंबेडकरी जनतेचा बुलंद नारा आहे !

जरी संकटाची काळरात होती...
जरी संकटाची काळरात होती
तरी भीमराया तुझी साथ होती.
तुझी तेवण्याची सुरूवात होती,
प्रकाशात माझी पिढी न्हात होती....
पालवीत होते प्रकाशाचे गोळे,
चालवीत होते तुझे दोन डोळे,
प्रकाशाचे गाणे मनी गात होती....
अशी फौज माझी पुढे जात होती.
काळ्या काळजाची काळी काळदाती,
दात खात होती, पुढे येत होती,
तिचे काळे काळे, सुळे पाडण्याची
तुझी रग माझ्या मनगटात होती....
गणतीच माझी गुलामात होती
जिँदगीच माझी सलामात होती
तोडलीस माझी गुलामीची बेडी
अशी झुंजणारी तुझी जात होती.
मला दावलेली तुझी पायवाट झाली
अता ती विकासाची वाट
वदे आज "वामन" कालची
तुझी ती पेरणी उद्याच्या विकासात होती.

'जरी संकटाची काळरात होती तरी भीमराया तुझी साथ होती !' (त्यामुळेच आयुष्याची सकळ वाटचाल सुसह्य झाली) यानंतरच्या ओळीत त्यांनी कवितेचा प्राण गुंफला आहे. ते लिहितात, ' तुझी तेवण्याची सुरूवात होती, प्रकाशात माझी पिढी न्हात होती !'
महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले आयुष्य पददलित जनतेच्या उद्धारासाठी वेचले. त्यांचा सारा जीवनप्रवास त्यांनी दलितांच्या व वंचितांच्यासाठी केलेल्या संघर्षाची साक्ष देतो. उपेक्षितांच्या हक्कासाठी त्यांनी आपलं आयुष्य एका लढ्यात परावर्तित केलं. त्यांच्या संघर्षाला यश आलं म्हणून गावकुसाबाहेर अडगळीत पडलेल्या अस्पृश्य म्हणून हिणवल्या गेलेल्या लोकांत त्यांनी आत्मविश्वास जागवला. हजारो वर्षे जातीयतेच्या गाळात आणि दारिद्र्यांत खितपत पडलेल्या समाजाला स्वतःचे अस्तित्व आणि अस्मिता याची प्रथमच जाणीव झाली. बाबासाहेबांच्या प्रेरणेतून पिचलेल्या मनगटात ताकद कशी येत गेली हे काळाला देखील कळले नाही. कणाहीन समाज कधी ताठ उभा राहिला आणि आपल्या वेदनेचे हुंकार मागे टाकून आपल्या हक्काचा टणत्कार कधी बुलंद करू लागला हे लक्षात देखील आले नाही. अशा रितीने आंबेडकरांनी मृतवत जिणं जगणारया आपल्या कोटी कोटी समाजबांधवांच्या अंगणात ज्ञानप्रकाशाचे तारांगण उतरवले. म्हणून कर्डक लिहितात की. 'प्रकाशात माझी पिढी न्हात होती !' मात्र समाजबांधवांच्या ठायी हा प्रकाश निर्माण व्हावा म्हणून त्यांनी स्वतःला पेटते ठेवले होते, याचे हळुवार वर्णन 'तुझी तेवण्याची सुरूवात होती' अशा ओजस्वी शब्दांत वामनदादा कर्डक करतात.

समाजबांधवाच्या मनी ज्ञानप्रकाश तेवता राहावा यासाठी बाबासाहेब झटत राहिले याचे वर्णन करताना कर्डक लिहितात की, 'पालवीत होते प्रकाशाचे गोळे, चालवीत होते तुझे दोन डोळे !' साध्यासुध्या शब्दात परिचयातील उपमा वापरून वामनदादा मोठा अर्थ व्यक्त करतात. यांमुळे सामान्य माणसाला देखील हे गीत त्यातल्या भावार्थासह समजते अन आपलेसे वाटते. या प्रकाशाचे गाणे गात पिढ्यामागून पिढया पुढे जात राहिल्या. हे घडत असताना प्रस्थापित शांत बसणे शक्य नव्हते, त्यांनी जमेल त्या मार्गाने या प्रकाशवाटांना अडवण्याचा फोल प्रयत्न करून पाहिला मात्र त्यांना आंबेडकरी चळवळ पुरून उरली, याच अगदी जोशिले वर्णन कर्डकांनी केले आहे. काळ्या काळजाची ही 'काळ'दाती नुसते दात खात होती असं शेलक्या शब्दांत प्रस्थापितांचे रखरखीत उल्लेख ते करतात. अन पुढे लिहितात की, ' तिचे काळे काळे सुळे पाडण्याची तुझी रग मनगटात होती!'

गेयता हे वामनदादांच्या कवितेचे नैसर्गिक आणि रसाळ अंग होते. त्यांच्या क्रांतिकारी कवितांना नादमाधुर्याची अद्भुत देणगी लाभली होती. मग ही कविता त्याला कशी अपवाद असू शकेल बरे ? वामनदादा सर्वसामान्य दलितांची कैफियत मांडताना सर्वांना एकाच पंक्तीत मांडतात, 'आपली मोजदादच मुळी गुलामात होती अन 'आहे रे' वर्गाला सलाम ठोकण्यात सारी हयात गेली होती !' मात्र केवळ आपल्या पायात असणाऱ्याच नव्हे तर मनामनात वास करून असणारया गुलामगिरीच्या बेडया तोडणे केवळ बाबासाहेबांच्यामुळे शक्य झाले असं ते सहजतेने लिहून जातात. या गुलामगिरीच्या बेड्या तोडण्याचे काम करणारे बाबासाहेब हे झुंजणारया जमातीचे अग्रदूत होते असं कर्डक लिहितात.
बाबासाहेबांच्या रूपाने हजारो वर्षांपासून विषमतेच्या अंधारात खितपत पडलेल्या दिनदलितांच्या आयुष्यात नवी पहाट उगवली आणि विकासाची वाट या उपेक्षित जनतेच्या दृष्टीपथात आली. आंबेडकरांनी आपल्या करंगळीला धरून अख्खा समाज ह्या पायवाटेवर आणला अन बघता बघता ह्या पायवाटेचे रुपांतर विकासाच्या विशाल महामार्गात झाले. याचा काव्यमय उल्लेख वामनदादा इथे करतात.


वामनदादांनी लिहिलेल्या भीमगीतांत कोणते गाणे अधिक लोकप्रिय आहे हे निश्चित करणे कठीण आहे, कारण जवळपास सर्वच गीते रसिकांच्या ओठी असतात. अनेकदा ही गाणी आपल्या कानी पडतात. बाबासाहेबांचे अनुयायी नेमके आहेत तरी कसे याची कुणाला यथार्थ माहिती हवी असेल तर त्याने सोबतची कविता वाचावी त्याला सर्वच प्रश्नाची उत्तरे मिळतील, शिवाय बाबासाहेबांबद्दल त्यांच्या समर्थकांत कोणते भाव मनी दाटून आहेत हेही उमजेल !
'तुफानातले दिवे आम्ही तुफानातले दिवे
तुफान वारा पाऊस धारा मुळी न आम्हा शिवे.
हल्ल्यावरती होती हल्ले अभंग अमुचे बाले किल्ले
असाच ताठर माथा अमुचा जरा न खाली लवे
हाय बिचारा दुबळा वारा निर्दयतेने करीतो मारा
ह्या वाऱ्यादने मावळणारी जात आमुची नव्हे.
तथागताच्या चिरंतनातून मानवतेच्या कणाकणातून
भीमयुगाच्या निरांजनातून तेल मिळाले नवे.
काळ्या धरणीवरचे काळे, काळाने विणलेले जाळे
करील काळे आपुले अता काळ्या करणीसवे.
एक दिव्याने पेटवलेले,चरितेसाठी पाठविलेले
काळ्या रानी अखंड येथे फिरती आमुचे थवे.
जळू परंतू धरती उजळू ,प्रकाश येथे असाच उधळू
सदा चांदणे सुखी नांदणे हेच अम्हाला हवे.

बाबासाहेब आणि त्यांना प्राणाहून प्रिय मानणाऱ्या आंबेडकरी जनतेचे नाते कसे आहे, त्यांचे हळुवार भावनाप्रधान असं वर्णन या कवितेत आहे.
चांदण्याची छाया कापराची काया
चांदण्याची छाया कापराची काया
माऊलीची माया होता माझा भीमराया....
चोचीतला चारा देत होता सारा
आईचा उबारा देत होता सारा
भीमाईपरी चिल्यापिल्यावरी
पंख पांघराया होता माझा भीमराया....
बोलतात सारे विकासाची भाषा;
लोपली निराशा आता...लोपली निराशा ;
सात कोटीमधी विकासाच्या आधी
विकासाचा पाया होता माझा भीमराया....
झाले नवे नेते मलाईचे धनी ;
वामनाच्या मनी येती जुन्या आठवणी;
झुंज दिली खरी रामकुंडावरी;
दगडगोटे खाया होता माझा भीमराया..... .'

याशिवाय आपला हक्क मागणारी 'आमचा वाटा' या कविता त्यांनी लिहिली. तिला चळवळीत गायले जाऊं लागले. 'आमचा वाटा' ह्या कवितेला ठेका आहे ताल आहे आणि त्यातलं मागणं हे आर्जवाचं नसून हक्काचं आहे त्यामुळे गाणाऱ्याच्या आवाजात रग आणि मनात त्वेष साहजिकच उत्पन्न होतो.
'सांगा आम्हाला बिर्ला बाटा टाटा कुठाय हो?
सांगा धनाचा साठा आमचा वाटा कुठाय हो?
घाम शेतात आमचा गळे, चोर ऐतच घेऊन पळे
धन चोरांचा हा पळण्याचा फाटा कुठाय हो?
न्याय वेशीला टांगा सदा, माल त्याचा की आमचा वदा
करा निवाडा आणा तराजु , काटा कुठाय हो?
लोणी सारं तिकडं पळं, इथं भुकेनं जिवडा जळं
दुकानवालेदादा आमचा आटा कुठाय हो?
इथ बिऱ्हादड उघड्यावर, तिथं लुगडी लुगड्यावर
या दुबळीचं धुडकं-फडकं धाटा कुठाय हो?
इथं मीठ मिरची अन् तुरी, तिथं मुरगी काटा सुरी
सांगा आम्हाला मुरगी कटलेट काटा कुठाय हो?
शोधा सारे साठे चला, आज पाडा वाडे चला
वामनदादा आमचा घुगरी घाटा कुठाय हो?'

आंबेडकरी चळवळीत देखील मतभेद होऊ लागले तेंव्हा वामनदादांना राहवले नाही आणि त्यांनी एक अत्यंत तेजस्वी कविता लिहिली. त्यात ते म्हणतात की बाबासाहेबांच्या मताचे मोजके लोक जरी सोबत असते तरी इतिहास बदलला असता ..
'भीमा तुझ्या मताचे
भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते
तलवारीचे तयाचे न्यारेच टोक असते.
वाणीत भीम आहे, करणीत भीम असता
वर्तन तुझ्या पिलांचे सारेच चोख असते.
गोळी खुशाल घाला फाशी खुशाल द्यारे
खोटे इथे खऱ्यााचे दुसरेच टोक असते.
तत्वाची जाण असती, बिनडोक लोक नसते
सारे चलन तयांचे ते रोखठोक असते.
सदभाव एकतेचे जर अंतरात असते
चुकले कुणीही नसते सारेच एक असते.
वामन समान सारे स्वार्थाने अंध नसते
तुझिया क्रुतिप्रमाणे सारेच नेक असते.'

वामन कर्डकांना समाजमनाची गरज नेमकी जाण होती, त्यामुळेच ‘दिनांच्या चाकरीसाठी’ या कवितेत त्यांनी लिहिले आहे - बाबासाहेबांकडे काय मागितले तर उद्धार होऊ शकतो याचे मार्मिक वर्णन या कवितेत आहे -
'भिकारी होऊनी दारी तुझ्या मी दान मागावे
दीनांच्या चाकरीसाठी तुझे इमान मागावे.
उपाशी जीव हे कोटी तयांची भूक भागावी
कशासाठी तुझ्याकडचे भीमाचे ज्ञान मागावे.
निवारा ना कुठे थारा अशांच्या आसऱ्याासाठी
मनाच्या मंदिरी थोडे तयांना स्थान मागावे.
भूमी ती भीमरायाची तुझ्या हाती अता आली,
मलाही पेरणीसाठी जरासे रान मागावे.
तुझी निष्ठा, तुझे जीवन, तुझी श्रद्धा भीमावरची
नसावी नाटकी “वामन” खरे बलिदान मागावे..'

बाबासाहेबांना उद्देशून वामनदादा लिहितात - ही कविता वेगळ्या धाटणीची आहे, बाबासाहेबांवर प्रेम करणाऱ्या व्यक्तीच्या डोळ्यात पाणी आणण्याचे सामर्थ्य ह्या कवितेत आहे, यावरून बाबासाहेबांचे जनमनातील अढळ स्थान लक्षात येण्यास मदत होते.
'समाधीकडे त्या वाट हि वळावी
तिथे आसवांची फुले हि गळावी
जिथे माउलीचे चिता हि जळाली
धूळ त्या स्थळाची मस्तकी मळावी
लाविता समाधी समाधी समोरी
दशा या जीवाची आईला कळावी
पाहण्या सदा त्या मुख माउलिचे
तिथे थोडी जागा मला हि मिळावी
वामन मला तू जाळशील जेव्हा
माधी पुढे त्या चिता हि जळावी....'

प्रत्येक आंबेडकरी अनुयायाचे स्वप्न असते की बाबासाहेबांचा जन्म जिथे झाला,वास्तव्य झाले, महानिर्वाण झाले तिथे एकदातरी जाऊन यावे. कर्डकदेखील त्याला अपवाद नव्हते, ते महूला जाऊन आले खरे मात्र तिथे गेल्यावर त्यांच्या मनात भावनांचा काय कल्लोळ माजला तो त्यांनी अप्रतिम शब्दांत काव्यबद्ध केलाय -
'भीमा तुझ्या महूला जाऊन काल आलो
तू जन्मल्या ठिकाणी, राहून काल आलो
तू रांग्लास जेथे, तेथेच मान झुकली
ती धूळ मी कपाळी, लावून काल आलो
आई तुझी भिमाई, सातारालाच गेली
तेथेही दोन अश्रू , वाहून काल आलो
जाऊन दूर देशी, तू आणली शिदोरी
तेथे तुझेच पाणी, दावून काल आलो
दीक्षा भूमी सभोती, हर्षाने दाटलेली
नागाची नाग नगरी, पाहून काल आलो
देह जाळणार होते, मी टाळणार होतो
वामन सवेच तेथे, धावून काल आलो '

आपल्या मातेनंतर भिमाई हीच आपली आई झाली असं मायेचं नातं ते कवितेत सहजतने लिहितात. ज्ञानेश्वर हे जसे संतसंप्रदायात माऊली म्हणून संबोधले जातात तसे बाबासाहेब हे त्यांच्या कोट्यावधी अनुयायांसाठी माऊली बनले आहेत. याची महती सांगणारी ही कविता भावनात्मक दृष्टीतून लिहिलेली आहे.
'गेली आई भिमाई , झालीस तूच आई
आई तुला कसा गं, पान्हाच येत नाही|| धृ ||
आई तुझ्या दुधाने ,हि भूक जायीन गं
हि भूक , माझ्या पोटात मायीना गं || १ ||
ज्या थोरल्या पिलांच्या , पंखात जोम आला
तो आज येथे , घरट्यात राहीना गं || २ ||
वाहवायाची भिमाई , चिंता चील्यापिल्यांची
कोणी मुळीच आता , ढुंकून पाहीना गं|| ३ ||
जो काळ गात होता , अश्रूत न्हात होता
वामन तुझा तुझी ती, गाणीच गायींना गं|| ४ ||'

बाबासाहेबांनी इतकं सारं सांगूनही शिकवूनही बधीर समाजमन भानावर येत नाही या भावनेने चिडलेले वामनदादा आपल्या कवितेतून आंबेडकरी चळवळीत अद्भुत जोश भरतात. अन्याय नष्ट करा अन त्याच्या चिंधड्या उडवा असं आवाहन ते करतात. नराधमांच्या तंगड्या तोडा असं त्वेषाचं बळ ते देतात.
'अन्यायाची चिरा चाम्बडी,चिरा करा चिंधड्या
चिरा करा चिंधड्या नाही तर भर हाती बांगड्या
गावामधले पिसाडलेले गुंड गीधालापारी
तुटून पडती तुमच्या माझ्या माता-बहिणीवरी
चल चल त्या नराधमांच्या तोडू चला तंगड्या
बहाद्दरांची फौज फाकडी गाव कुसाला भिडून
छ्लनाराला चिरीत जावी वाघावानी चिडून
जयभिमवाल्या अशाच अपुल्या करा पलटणी खड्या
आहे का रे वामन असले तरुण इथे कोणी
सामाजक्रांतीमधून झाली पिढी ज्यांची ऋणी
नकोत नुसत्या शब्द -सुरांच्या भाषणआतल्या उड्या...'

वामन कर्डक नित्य वापराच्या शब्दांतून अर्थवाही कविता लिहितात. शब्दलालित्य, छंद वा कृत्रिम काव्यसौंदर्य यावर अजिबात भर न देता दैनंदिन जीवनातील शब्द ते कवितेत वापरत. त्यामुळे त्यांची कविता शब्दबंबाळ वा केवळ शब्दप्रचुर न होता एका जीवनानुभावाचे स्वरूप घेते.. आपल्याला जाण कधी आली अन आपल्याला जीवन कधी - कसे कळू लागले याचे रसाळ वर्णन त्यांनी केले आहे-
केस माझे हे....
'केस माझे हे जेव्हा गळू लागले
तेव्हा जीवन मला हे कळू लागले...
जात होतो पुढे जात होतो पुढे
ह्यात होतो पुढे त्यात होतो पुढे
पाय त्यांचेच मागे वळू लागले
तेव्हा जीवन मला हे कळू लागले...
बाग मागे आणि आग होती पुढे
पंख पसरीत गेलो मी ज्योती पुढे
पंख सारेच तेथे जळू लागले
तेव्हा जीवन मला हे कळू लागले...
एक सेवक होऊन सेवा दिली
लोक उलटून म्हणतात केव्हा दिली
बोल उलटे हे जेव्हां मिळू लागले
तेव्हा जीवन मला हे कळू लागले...
गोडी होती मधाची मला जोवरी
लाख लटकून होते मोहोळा परी
संपता अर्क सारे पळू लागले
तेव्हा जीवन मला हे कळू लागले...
काल वामन परी पेरण्या ही कला
येत होते आणि नेत होते मला
जाणे माझे हे तेथे टळू लागले
तेव्हा जीवन मला हे कळू लागले...'

एक काळ होता जेंव्हा समाजात पराकोटीची विषमता होती, अस्पृश्यता पाळली जात होती. दारिद्र्य अन दास्यत्वाच्या अंधःकारात दलित समाज हजारो वर्षे खितपत पडला होता. काळीज पिळवटून टाकणाऱ्या या सामाजिक विषमतेचं तितकंच टोकदार वर्णन कर्डकांनी या कवितेत केले आहे -
'पाणी वाढ गं
लयी नाही मागत भर माझं
इवलंसं गाडगं,
पाणी वाढ गं,
काळानं केलं काळं
जातीचं विणलं जाळं
पाण्याच्या घोटासाठी
तळमळतंय माझं बाळ
पाज आम्हाला पाणी
अन मग डोळे फाडं गं ......
गाईला हिरवा चारा
जळणाचा लाकूडफाटा
मी आणून देईन सारा
करील सारं काम तुझं मी
झाडील वाडगं ......
साऱ्यांच्या पडल्या पाया
आली ना कुणाला माया
पाण्याच्या थेंबासाठी
तळमळते माझी काया
कर्माचा ना धर्माचा
एक पोहरा वाढ गं ...........'

या गीतांतून त्यानी आपली व्यथा अशी मांडली आहे की वाचणाऱ्याच्या डोळा पाणी यावे !
समाजात एकी न ठेवता आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी दुही वाजवून आंबेडकरी विचारांची प्रतारणा करणाऱ्या लोकांवर ते सर्वशक्तिनिशी शब्दांचा आसूड चालवतात. बाबासाहेबांनी दिन दलितांच्या उद्धारासाठी आपले आयुष्य वेचले मात्र त्यांच्या विचारांचे वारसदार म्हणवून घेणाऱ्यांनी स्वतःच्या स्वार्थापायी या आंबेडकरी क्रांतीच्या तटबंदीस सुरुंग लावला. अत्यंतिक वेदनेतून ही कविता प्रसवली आहे त्यामुळे तिचा आशय अर्थातच अणकुचीदार झाला आहे.
'काल भीमाच्या क्रांतीचे
तुम्हीच बारा वाजविले || धृ ||
काल आम्ही लढनारांनी
कडे कडे चढनारांनी
बंड भीमाचे गाजविले || १ ||
अशाच साऱ्या बाळांनी
बाळांनी चांडाळांनी
नपुसकांनी लाजविले || २ ||
वामन वाणी लुटनार्यांनी
गली गलीच्या कुत्रांनी
भांडण सारे माजविले || ३ ||'

इतकं झाल्यावर मग ते सवाल करतात की आणि जणू चळवळीत सामील होण्यासाठी ते आवाहनच करतात. बधीर झालेल्या मनाला हलवून टाकण्याचे सामर्थ्य या कवितेत आहे. क्रांतीसाठी काय काय करावे लागणार आहे याचे अप्रत्यक्ष कथन त्यांनी इथे केलेय -
'आज तरी क्रांती साठी वाट भीमाची तू धरशील का?
उठून सारा देश तुझा आज उभा तू करशील का?
उकिरड्यावर चारणारा,तिथेच राहून मारणारा
झाली आजादी तरी हिरव्या राणी चारशील का ?
आज तरी क्रांतीसाठी........
तो धनी तू चाकर का
तुलाच थोडी भाकर का?
सांग अश्या लाचारीने पोट तरी तू भरशील का?
आज तरी क्रांतीसाठी........
धन्वन्ताची जात पहा
बसली लाडू खात पहा
कसा उपाशी तूच असा
सांग अश्याने तरशील का ?
आज तरी क्रांतीसाठी........
तू वनवासी आदिवासी
कंद मुले का रे खासी
तुझा लढा तू लड्ताना
सांग तू मागे फिरशील का ?
आज तरी क्रांती साठी......
वामनाच्या भटक्या जाती
वाट फुटे तिकडे जाती
आतातरी या साऱ्याची उभी वसाहत तू करशील का ?
आज तरी क्रांतीसाठी वाट भीमाची तू धरशील का ?'

आंबेडकरी क्रांती घडण्यासाठी सगळ्यांनी मिळून लढा उभारणे गरजेचे आहे त्यात सर्वस्व झोकून काम करावे लागणार आहे , तर ती क्रांती शक्य होणार आहे. सारेच जण असं वागले अन ही क्रांती यशस्वी झाली तर समाजात काय चित्र तयार होईल याचे खुमासदार पण स्वाभिमान जागृत करणारे शब्दांकन त्यांनी या कवितेत केलेय. मात्र जातीयतेचा फणा काढणाऱ्यास कसे ठेचायचे हे देखील ही कविता सांगते -
काल मुजरेच केले रे माझ्या मेलेल्या बापाने
आज मुजरे मला करती भीमाच्या प्रतापाने ....
गेली सारीच लाचारी आज दिल्लीच्या दरबारी
मला नेउन बसविले सात कोटीच्या बापाने....
मला चांभार बनविले एका काळ्या कसाबाने
का न कापावे मी त्याला एका रापीच्या कापाने.....
होतो मातीत दडलेला होतो मातीत पडलेला
माझे सोनेच केले रे एका मोठ्या सराफाने.....
काल जातीच्या सापाला ठेचले मी जरी
वामन काढला काढला रे फणा येथे त्याच जातीच्या सापाने..'

गावाकडच्या जीवनात अनेक साध्यासुध्या समस्या येत राहतात मात्र या आयुष्याला सामोऱ्या जाणाऱ्या लहानग्यांपासून ते महिलांपर्यंत प्रत्येकाला कसा संघर्ष करावा लागतो याचं वेधक चित्रण त्यांनी आपल्या कवितेत केले आहे -
नदीच्या वाट चून चून काट
चून चून करती पायी | पोर चालत राही || धृ ||
काडीला तान्ह डोहीवर दुडी | थरथर करी कवळी कुडी |
सांगायचा गुन्हा सांगाव कुन्हा | तशीच पाणी वाहि ...|| १ ||
शेताच्यावट दोयीवर पाटी | पाटीत दही दुधाची वाटी |
सांडेल बाई वाकायचं नाही होई उन्हात ल्हायी ....|| २ ||
सांजच्या पारी गवताच्या भारा | ढवळ्या गायीला आणावा चारा |
ओझ्यानं राही वाकून जाई | तशीच ओझी वाहि || ३ ||
पहाटी उठ जात्याशी झठ | लगी निघावं नदीच्या वाट |
वामनच्या घरी कष्टच करी | गाडीची सुटका नाही || ४ ||

सासुरवाशिणीने केलेलं आपल्या माहेराचे वर्णन आपल्या अंतःकरणाला स्पर्श करून जाते. या कवितेतून वेगळेच वामनदादा आपल्या भेटीस येतात जे निसर्गावर प्रेम करतात. आपल्या अनोख्या प्रवाही रंगतदार शैलीत या निसर्गाला चितारत जातात. या निसर्ग कवितेस त्यांनी सासरी असलेल्या नववधूच्या आठवणीत गुंफून त्यास भावनात्मकतेची जोड दिली आहे.
'नदीच्या पल्हाड बाई , झाडी लई दाट
तिथूनच जाई माझ्या माहेरची वाट
ओलांडता झाडी , लागे रामाची टेकडी
दिसते तिथून माझ्या मामाची झोपडी
झोपडीपासून वाहे झुळझुळ पाट
राही बारमाही मळा मामाचा हिरवा
तापल्या जीवाला तिथ मिळतो गारवा
पुरवितो पाणी उभ्या पिकला रहाट
उतरतो शीण मुल मामाची पाहून
मामीच्या मायेत रात्र एखादी राहून
माहेरची ओढी लागे होताच पाहत
जाता जरा पुढे लागे भीमाचा शिवार
कसलेली शेती पीक देई दाणेदार
धान्यापारी ताठ उभी जोन्धाल्याची ताट .....'

प्रत्येक स्त्रीला माहेराची ओढ असणे जितके साहजिक असते तद्वतच तिला आपल्या सासरी आपल्या पतीचा सर्वात जास्त आधार वाटणे हे स्वाभाविक असते. मात्र तिच्या सासरी सारे काही आलबेल नसेल तर मात्र तिची अवस्था अत्यंत बिकट होते. तिच्या कष्टाला पारावार राहत नाही अन तिच्या दुर्दैवाचे दशावतार सुरु राहतात. अशा स्त्रीमनाचं अचूक वेध घेणारं चित्रण कर्डक आपल्या कवितेतून करतात.
'वागने बाई नीट नाही भरताराची,
आईच्या घराची याद येई माहेराची
पति माला फटकेच देई

सासु बिचारी चट्केच देई
जाचणी जीवाला तीच नंदना, दिराची
पहाटी उठावे दळावं मळावं
कसं बसं शेताला पळावं
खणाची रताळी मीच, काळ्या वावराची
घरी मी करावं, दारी मी करावं
करावं तरी मी उपाशी मरावं
कुणा कीव नाही माझ्या अश्रूंच्या धारांची
पोटाला पुरेशी पेज तरी वामन
असावी सुखाची रोज तरी वामन
पाहतोच होळी तूच माझ्या संसाराची…'

इतरत्र कुठे न आढळलेला अनुप्रास अन यमक यांचा वापर वामनदादांनी इथे केलाय.
अशा प्रकारे विविध आशयाच्या कविता लिहितानाच त्यांनी व्यसनमुक्तीचे गांभीर्य ओळखून एक कविता लिहिली आहे. पिचलेला गोरगरीब माणूस त्याच्या वैफल्यामुळे म्हणा की अन्य कारणामुळे म्हणा त्याच्या जीवनातील संघर्षावर उतारा म्हणून दारुच्या आहारी गेलेला आजही पहायावायास मिळतो. एकेकाळी हे प्रमाण अक्राळविक्राळ स्वरूपात होते. यावर उपाय म्हणून कान टोचणी करणारी ही कविता वामनदादांनी लिहिलीय -
'पिऊ नका ही दारू र्र घरी उपाशी पारू र्र
तू सोडावं दारूला आता पोसावं पारूला
दारुवाल्या सरूला, तिच्या करू, नरूला
कमाई नको चारू र्र …
ती खेड्याची र्ऱ्हाणारी, जे दिल ते खाणारी
जीव जीवाला देणारी, नाव तुझ घेणारी
नको भुकेली मारू र्र ........
तुला घरदार कळेना, तुला संसार कळेना
तुला मोटार कळेना, तुला गटार कळेना
पिऊन पडशील दारू र्र.....
तो वामन विचारी, रोज पारूला विचारी
तरी सांगंना बिचारी असा कसा तू कारू र्र ?'

वामन तबाजी कर्डक यांचा जन्म १५ ऑगस्ट रोजी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यामधील देशवंडी या छोट्याशा गावी तबाजी आणि सईबाई या दांपत्याच्या पोटी झाला होता. सदाशिव आणि सावित्रा ही त्यांची भावंडे होती. वामनदादांची मराठी साहित्यातील ओळख एक तेजतर्रार असा लोकशाहीर, लोककवी आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता अशी बहुआयामी होती. त्यांच्या हयातीतच त्यांचे चार काव्यसंग्रह प्रकाशित झाले होते.त्यांच्या घरची परिस्थिती हलाखीची होती. त्यांचे वडील मोळ्या विकणे, टेंभुर्णीच्या पानाच्या विड्या करून विकणे हे आणि हेडीचा व्यवसाय करीत.

कर्डकांनी लहानपणी आपल्या चरितार्थासाठी गुरे चारणे, जत्रेत कुस्त्या खेळणे असे व्याप केले होते. नंतर शिवडी येथे गिरणी कामगाराची नोकरी त्यांनी केली होती., मातीकाम, सिमेंट काँक्रीटचे काम, चिक्की विकणे, आईसफ्रूट विकणे, खडी फोडणे, टाटा ऑईल मिल मध्ये नोकरी अशी मिळतील अन पडेल ती कामे त्यांनी केली होती. त्यामुळे त्यांचा तळागाळातील लोकांशी कायमचा संपर्क राहिला. मात्र अशी कामे करत असतानादेखील त्यांनी आपला वाचनाचा छंद आवडीने जोपासला होता. या शिवाय 'लल्लाट लेख' या नाटकात घुमा या पात्राची भूमिका केली होती. शांताबाई कर्डक ह्या वामनदादांच्या पत्नी होत्या, या दांपत्याची कूस उजवली मात्र सर्वच मुले अल्पायुषी ठरली. पुढे त्यांनी रविंद्र या मुलास दत्तक घेऊन आपले नाव त्याच्या पुढे लावले. वामनदादा आणि त्यांच्या पत्नीने बौद्ध धम्म स्वीकारला होता ! ते बाबांचे कट्टर अनुयायी होते हे सांगणे नलगे..

कर्डकांनी ३ मे १९४३ रोजी पहिले विडंबन गीत लिहिले व त्यानंतर २००४ पर्यंत गीतलेखन व गायनाचा कार्यक्रम चालू ठेवला.. त्यांच्या प्रकाशित आणि अप्रकाशित मिळून साधारणतः दहा हजाराच्या आसपास गीतरचना असल्याचा अंदाज आहे. कर्डकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना १९४० साली नायगांव येथे पाहिले व त्यानंतर चाळीसगांव, मनमाड, टिळकनगर येथे त्यांनी आंबेडकरांच्या भाषणांत गायन केले. १५ मे २००४ रोजी वामनदादा बुद्धवासी झाले आणि आपल्या लाडक्या बाबाच्या भेटीस निघून गेले.

कर्डकांना त्यांच्या हयातीत अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप, महाराष्ट्र राज्य शासनाचा दलित मित्र पुरस्कार त्यांना मिळाला होता. अनेक ठिकाणी त्यांचे नागरी सत्कार झाले होते. मराठवाडा ‘अस्मितादर्श पुरस्कार’सह विविध संस्थांचे पुरस्कार त्यांना मिळाले होते. १९९३ला वर्धा येथे भरलेल्या पहिल्या अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते. या संमेलनात आपल्या अध्यक्षीय भाषणात महाकवी वामनदादा कर्डक एक वाक्य बोलले होते ते म्हणजे ' मी फकीर आहे पण आंबेडकरी आहे, मी आंबेडकरी आहे पण फकीर आहे '. आजच्या राजकारण्यांनी तसेच साहित्य क्षेत्रात स्वतःला उगीचच मोठं समजणा-यांनी त्यांच्या या कथनातून काही बोध घेण्यासारखा आहे. कर्डकांच्या निर्वाणानंतर १५ मे २००८ रोजी औरंगाबादच्या वामनदादा कर्डक प्रतिष्ठान या संस्थेने पहिले अखिल भारतीय महाकवी वामनदादा कर्डक साहित्य संमेलन भरवले होते. औरंगाबाद येथे झालेल्या या संमेलनाचे डॉ. यशवंत मनोहर हे संमेलनाध्यक्ष होते.

वामन दादा आपल्या गाण्यात म्हणतात की, ‘शेणाचे हात लावले पेणाले‘ ज्यांचे हात नेहमी गाई-ढोराच्या शेणाने माखलेले असायचे, आता त्यांच्या हातात लेखणी आली आहे. ही लेखणी क्रांतीबा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले, राजश्री शाहु महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीच आपल्या हातात दिली ही गोष्ट आपण कधीही विसरता कामा नये.

जगात प्रतिभावंतास आणि क्रांतिकारकास सर्व प्रकारचे त्रास सहन करावे लागतात अन संघर्ष त्यांच्या पाचवीला पुजलेला असतो, या अलिखित नियमास वामनदादा कर्डकही अपवाद नव्हते. त्यांचे आयुष्य देखील संघर्षाने भरलेले असेच राहिले.
'उद्धरली कोटी कुळे । भीमा तुझ्या जन्मामुळे,
एक ज्ञान ज्योतीने कोटी कोटी ज्योती तळपतात तेजाने,
तुझ्या धरती वरती अंधार दूर तो पळे -भीमा तुझ्या जन्मामुळे'
तेजस्वी भीमगीत लिहून आंबेडकरी चळवळीत अजरामर झालेल्या कर्डकांच्या नावावर आज अनेक जण खिसे भरत आहेत मात्र या महान कलावंताची झालेली भयंकर उपेक्षा भारतीय समाजाच्या अधःपतनाचे दयोतक आहे. आंबेडकरी विचारांचा नावालाच वारसा जपणारया आणि उदात्तीकरणात रमलेल्या भारतीय समाजाकडून फार अपेक्षा करणे चुकीचे आहे. मात्र ही जाणीव अत्यंत क्लेशकारक अशी आहे !


- समीर गायकवाड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा