शुक्रवार, ७ ऑगस्ट, २०१५

हिंदुस्थानच्या अखेरच्या बादशहाची दर्दभरी दास्तान .....



साल होतं 1960चं आणि चित्रपट होता ‘लाल किला’. मोहम्मद रफी यांनी मुज़्तर ख़ैराबादी यांनी लिहिलेली एक अप्रतिम गझल या सिनेमासाठी गायली होती. ‘न किसी की आँख का नूर हूँ न किसी के दिल का क़रार हूँ ,जो किसी के काम न आ सके मैं वो एक मुश्त-ए-ग़ुबार हूँ..’ हे तिचे बोल होते. मुज़्तर ख़ैराबादी हे जाँ निसार अख़्तर यांचे वडील नि जावेद अख़्तर यांचे आजोबा होत! लाल किला हा चित्रपट बहादूरशहा जफर या मुघल सम्राटाचा चरित्रपट होता. मुज़्तर ख़ैराबादी यांच्या गझलेची प्रेरणा बहादूरशहाच्या आर्त जीवनातून रूजलेली. हा काव्यातिहास अत्यंत कारुण्यपूर्ण आहे. त्यासाठी इतिहासाची पाने चाळावी लागतील. 

बाबरच्या रूपाने मुघल ज्या क्षणी हिंदुस्तानात दाखल झाले त्या क्षणापासून त्यांनी ह्या भूमीकडे केवळ लुटमार, साम्राज्यविस्तार व अय्याशीच्या हेतूने पाहिले. त्यांच्यातल्या एकाही बादशहाने ह्या भूमीला आपले सरजमीन-ए-वतन मानले नाही की ह्या मातीचे त्यांना ऋण वाटले नाही. पण ह्या सर्व मुघल बादशहांना अपवाद राहिला तो हिंदुस्थानचा अखेरचा बादशहा, बहादूर अली शहा जफर! आधीच्या सम्राटांनी हिंदुस्तानची लयलूट केली तर याचे प्राणपाखरू ह्या भूमीसाठी रुंजी घालत निशब्दतेने भयाण अवस्थेत मरून पडले. ज्या मुघलांनी हिंदुस्थानला कधी आपला वतनमुलुख मानला नाही त्यांचा अखेरचा शिलेदार मात्र ह्या भूमीत दफन केले जावे म्हणून तडफडत राहिला! किती हा दैवदुर्विलास!

1857 च्या बंडात सर्व  हिंदू मुस्लिम राजांनी, उठाव करणाऱ्या सर्व शक्तींनी बहादूरशहाला सर्वानुमते अखंड हिंदुस्तानचा खराखुरा सम्राट म्हणून दिल्लीच्या तख्तावर बसवले होते. मनाला उभारी देणारी एव्हढी एकच घटना त्याच्या उभ्या आयुष्यात घडली असावी. बंड फसल्यानंतर राज्यकर्ते म्हणून ब्रिटीशांचा विजय निश्चित झाल्यावर बहादूरशहा हुमायुनाच्या कबरीजवळ लपून बसला होता. ही बातमी इलाहीबक्ष या मुघलांच्या सेवकाने ब्रिटीशांपर्यंत पोहोचवली. ब्रिटीशांनी त्याला तिथून पकडले. याचवेळेस त्याच्या काही मुलांना गोळ्या घातल्या गेल्या. ब्रिटीशांनी जफरवर थातुर मातुर पुरावे असणारा ब्रिटीश सत्तेविरुद्ध राजद्रोहाचा खटला चालवून त्याला कैद केले आणि ब्रम्हदेशातील (म्यानमार) रंगून येथे 1859 मध्ये बंदीवासात ठेवले. कैदेत असताना या नामधारी बादशहाला 11 ऑक्टोबर 1859  रोजी रंगूनला नेण्यापूर्वी नाश्ता देण्यात आला. मेजर हडसनने नाश्ता दिल्यावर त्या थाळीकडे बादशहा टक्क नजरेने नुसतं बघत राहिला ! त्याचा म्लान चेहरा थरथरत होता, अंगात कंप भरला होता, ओठ नुसतेच हलत होते. त्याचे डोळे थिजले होते. हडसनने उद्दामपणे विचारले, "काय अश्रूही संपले की काय?" बादशहा म्हणाला, "तुझ्यासारख्या साध्या शिपायाला ते कळणार नाही. अरे, राजा कधी रडत नसतो....." बादशहाने रडावे असे त्या नाष्ट्यात काय होते माहिती आहे? मेजर हडसनने आणलेल्या त्या नाश्त्यात काही फळं आणि बादशहाच्या लाडक्या राजपुत्रांची म्हणजे मिर्झा मुघल व मिर्झा खिज्र यांची छाटलेली मुंडकी होती ! हिंदुस्थानचा हा अखेरचा बादशहा, बहादूर अली शाह जफर जगातील सर्वात दुर्दैवी लोकांपैकी एक होता. आपल्या मायभूमीची 'दो गज जमीन'सुद्धा ज्याला नसीब होऊ शकली नाही असा तो अभागी माणूस होता !

शाहआलम सानी उर्फ आफताब हे या बहादूरशहा जफर यांचे आजोबा होत. एकदा त्यांना जाबता खान रोहिल्याचा मुलगा गुलाम कादिर याने त्यांच्याच भर दरबारात खाली पाडले होते. ते दृश्य अंगावर काटा आणणारे दृश्य कारण, शाहआलम सानी यांचा एक डोळाच गुलाम कादिरने खंजिराच्या एका सफाईदार वाराने खस्कन बाहेर काढला. ही घटना घडली तेव्हा शाहआलम यांचा बारा वर्षांचा कोवळा नातू, कवी मनाचा बहादूर ते काळीज पिळवटून टाकणारे दृश्य बघत होता. आपल्या लाडक्या आजोबांची दुर्दशा करून गेलेले हे दृश्य त्याच्या बालमनावर खोल परिणाम करून गेले. सत्ता आणि लालसा या दोन्ही गोष्टींविषयी जफरच्या मनात इथूनच घृणा निर्माण झाली आणि आधीपासून हळवे असणारे त्याचे मन अधिकच हळवे झाले. जे मुघलांच्या क्रूर, विश्वासघातकी आणि कर्मठ परंपरेत बसणारे नव्हते.

महादजी शिंद्यांच्या नेतृत्वाखाली शाहआलम(दुसरा) याची जेव्हा मुघल बादशाहा म्हणून घोषणा झाली होती तेव्हाच खरे तर मुघल सत्तेला घरघर लागली होती पण मराठ्यांच्या संरक्षणाखाली ही सत्ता टिकून राहिली. त्यानंतर मात्र जे व्हायचे तेच झाले. या शाह आलमचा पुत्र अकबर सानी (अकबर द्वितीय) याच्या कारकिर्दीत या एके काळच्या वैभवशाली विशालकाय साम्राज्यास पार उतरती कळा आली. याच्या जनानखान्यातल्या अनेक पत्नींपैकी एक होती लालबाई ! बहादूरशहा हा या लालबाईचा पुत्र होता. बहादूरची आई लालबाई ही हिंदू होती म्हणून वंशाचा ज्येष्ठ पुत्र असूनही केवळ हिंदू मातेच्या पोटचा मुलगा असल्याने जफरचे वडील बादशाह अकबर सानी यांनी बहादूरशहापेक्षा लहान असणाऱ्या धाकट्या मिर्झा जहांगीरला युवराज केले. हे दुःख देखील कवी मनाच्या बहादूरशहाने सहन केले. कारण त्याला सत्तेची लालसा नव्हती. आपणही दिल्लीच्या तख्तावर बसून काही तरी वेगळे करावे अशी इच्छा मात्र त्याच्या मनात होती.

बहादूरशहाच्या आधी तख्तपोशी करून राजा झालेला धाकटा युवराज मिर्झा जहांगीर पुढे अतिमद्यपानाने मेला. त्याच्या निधनानंतर आपल्याला दिल्लीची गादी मिळेल असे बहादूरशहाला वाटत होते. २८ सप्टेबर १८३८ ला जफरला दिल्लीचे तख्त मिळाले देखील ; पण सत्ता, राज्य, ती राजवस्त्रे अंगावर जेव्हा चढली तेव्हा त्यावर अप्रत्यक्षपणे इंग्रजाचाच अंमल होता. धूर्त इंग्रजांनी त्याला बजावले होते की, "तू आता राजा आहेस, पण लक्षात ठेव फक्त फक्त नामधारी राजा !" ज्या मुघल सत्तेच्या सीमा एके काळी चौदिशांना हजारो किलोमीटर अंतरापर्यंत विस्तारल्या होत्या त्या मुघलांच्या अखरेच्या शिलेदाराची सत्तासीमा फक्त लाल किल्ल्य़ाच्या वेशीपर्यंतच राहणार होती. ज्या लाल किल्ल्यात दिवाने खासची शान मुघल बादशहाच्या आगमनाने वाढत होती, तिथे बादशहाच केविलवाणा झाला होता. ज्याच्या मागेपुढे अहोरात्र चवऱ्या ढाळल्या जायच्या त्याच्या मागे आता फक्त त्याची दीनवाणी सावली उरली होती. काळीज विदीर्ण करणारा ही अट बहादूरशहाने डोळ्यात पाणी आणून कबूल केली, कारण त्याच्यापुढे कुठलाही पर्याय बाकी नव्हता..

लाल किल्ला तर लाल किल्ला, अशी मनाची समजूत घालून  बहादूरशहा राज्य करू लागला. पण घर फिरले की वासे फिरतात असं म्हणतात याचा शीघ्र प्रत्यय बहादूरशहाला आला. सत्तेच्या वारशाची ही अशी दुदैवी कश्मकश चालू असताना मुघलांचा वजीर मुघलबेगने सारा शाही खजिना, जडजवाहीर लुटून नेले. ज्या मुघली साम्राज्याचे अनेक स्वाऱ्यांचे मनसुबे वजीरांच्या बुद्धीवर पेलले जायचे तिथल्या अखेरच्या बादशहाच्या अखेरच्या वजिराने थेट मुघली खजिन्यावरच हात मारला. मुघल साम्राज्याची शानो शौकत असणारा तो खजिना दिवसाढवळया लुटला गेला. राजाचे राज्य जे आधीच नामधारी होते त्याचा खजिना देखील कफल्लकाच्या झोळीसारखा झाला. यावेळी बादशहाच्या मनाला काय यातना झाल्या असतील याची कल्पना करवत नाही.

बहादूरशहाला मुघल राजेशाही प्रथेनुसार बहुविवाह करावे लागले, ऐपत आणि इच्छा नसूनही त्याचे एकूण चार विवाह झाले. तत्कालीन मुघल नातलगांच्या सत्तापिपासू धोकेबाजीपायी आणि वारशासाठी होणाऱ्या आप्तेष्टांच्या कत्तली याच्या भीतीने त्याने अनेक अपत्ये या चार पत्नींच्या उदरी जन्मास घातली. या सर्व मुलांमध्ये त्याचे प्रिय होते फक्त तीनच जण! हे तिघे म्हणजे दाराब्ख्त, मिर्झा शाहरुख आणि मिर्झा फखरु! बहादूरशहा दिल्लीच्या गादीवर बसल्यानंतर सर्वात ज्येष्ठ व लाडका मुलगा दाराबख्त हा अल्पावधीतच वेडा झाला होता. त्या पाठोपाठ दुसरा मुलगा शाहरुख अकाली मरण पावला. त्यानंतर 1849 ला म्हणजे दोनच वर्षांनी दाराबख्तही गेला. तिसरा मुलगा मिर्झा फखरूला कुणीतरी विष दिले. या धक्क्यातून सावरण्यासाठी त्याने कवितेचा आसरा घेतला अन् स्वतःच्या नावापुढे जफर लावले ! तो बहादूरशहा जफर झाला ! जाफर म्हणजे विजय. 

आयुष्यभर दुःख, अवहेलना आणि उपेक्षा अपमानाचे अविरत धक्के पचवत जाणाऱ्या या हळव्या माणसाने स्वतःच या सर्व दुर्दैवावर शब्दशः नावापुरती मात देण्याच्या हेतूने तर आपले नाव जाफर ठेवले नसेल ना? जीवनात सातत्याने येणाऱ्या संकटांना तोंड देणाऱ्या बहादूरशहाचे विश्रांतीचं स्थान होतं, कविता. बादशहा जफर कविता करीत होता. त्यासाठी त्याने प्रथम गुरू केले शाह नसीर यांना. ज्यांची काव्यप्रतिभा साधारणच होती. शाह नसीर काखेतली माशी, डोक्यावर तुरा-गळ्यात हार, श्रावण-भाद्रपद अशा अजब शब्दांची यमके घेऊन कविता लिहीत. आपल्या शिष्यानेही तसेच लिहावे हा त्यांचा आग्रह होता. या शाह नसीर यांचा मुलगा देखील कसलंही काव्यलक्षण नसणारी अर्थहीन शायरी करायचा. मात्र आपल्या मुलाच्या दर्जाहीन काव्यास नसीर डोक्यावर घ्यायचा. एवढेच नव्हे तर जौकसारख्या जिंदादिल शिष्याच्या गझला अनेक पटींनी चांगल्या असूनही शाह नसीर केवळ पुत्रप्रेमापोटी फाडून टाकत असे. असला विचित्र  गुरू जफरलाही मिळाला हेच मोठे दुर्दैव. त्यामुळे जफरने गझला लिहूनही त्या अशा चमत्कारिक यमकांमुळे फार वाखाणल्या गेल्या नाहीत. पुढे जाऊन जफरने जौकलाच आपले उस्ताद केले. या काळात त्यांनी चांगल्या गझला लिहिल्या तरीही लोक म्हणायचे, "बादशहाला जौकच गझला लिहून देतो." जौक वारल्यावर जफरने गालिबला गुरू केले. बादशहाने आपल्याला उशिरा गुरु मानल्याने हेकट स्वभावाचा गालिब या उपेक्षित शिष्याकडे फारसे लक्ष देईना. एका देशाचा नामधारी का होईना बादशहा असूनही शायरी, कविता हा ज्याच्या जगण्याचा आधार होता त्या बेमिसाल शायराला या बाबतीतही कमनशिबीच राहावे लागले. इथेही त्यांच्या पदरी उपेक्षा अन् अवहेलनाच आली.

बहादूरशाहच्या आधी त्याचा धाकटा भाऊ मिर्झा जहांगीर जेव्हा दिल्लीच्या गादीवर विराजमान झाला होता तेव्हा जफरला 500  रुपये तनखाह मिळत होता. त्यातील शंभर रुपये तर जौक किंवा नंतर गालिबसारख्या उस्तादांना द्यावे लागत होते. गालिबच्या गझला जिवंत राहाव्यात म्हणून जफर व त्याच्या मुलाने एकत्र करून त्यांना चांदी-सोन्याचा वर्ख लावून नीट ठेवल्या होत्या. पण 1857 च्या लुटालुटीत केवळ चांदी-सोन्याचे रुपडे पाहून लुटारू इंग्रजांनी इतर लुटीसोबत हे सोने अन् सोन्याहून अनमोल हस्तलिखित नेले. वजिराने शाही खजिना लुटल्यावर जितके दुःख झाले होते त्याहून कितीतरी अधिक दुःख या लुटीमुळे बहादुरशहाला झाले. बहादूरला 30 डिसेंबर 1837 ला राज्य मिळाले होते तेव्हा त्याचे वय होते बासष्ट वर्षे. सर्वसाधारणपणे कुठलीही संस्थाने व राजेशाह्या पाहिल्या तर असे दिसून येते की, पंचविशीत गादीवर येऊन पन्नाशीच्या सुमारास पुढच्या पिढीच्या ताब्यात सूत्रे सोपवून आधीचा राजा आपले पद त्यागतो किंवा त्याची पदच्युती होते. इथे बहादूरशहा जेव्हा शरीराने आणि मनाने गलितगात्र झाला होता, जेव्हा तो थकला होता, खंगून गेला होता, झिजून गेला होता तेव्हा वयाच्या बासष्टव्या वर्षी त्याला राजवस्त्रे मिळाली होती ती देखील नामधारी राजाची! वयाच्या 87 व्या वर्षी 7 नोव्हेंबर 1862 रोजी दिल्लीपासून हजारो किमी अंतरावरील रंगूनमध्ये त्याचा मृत्यू झाला. म्हणजेच बहादुरशहा 25 वर्षे दिल्लीचा नामधारी का होईना पण राजा होता. वयाच्या 62व्या वर्षी सत्ता मिळून पुढची पंचवीस वर्षे बहादूरशहाला दुर्दैवाचे दशावतार मुकाटपणे उघड्या डोळ्याने अन् चिरलेल्या काळजाने बघत राहावे लागले. मरणानेच त्याची या अवहेलनेतून सुटका केली... 

तेव्हाच्या ब्रह्मदेशाच्या, म्हणजे आताच्या म्यानमारच्या राजधानीत रंगूनमध्ये बहादूरशहाचा ब्रिटीशांच्या कैदेत जिथे मृत्यू झाला. जफरची कबर अजूनही तिथेच आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी 'चलो दिल्ली' या मोहिमेची सुरुवात रंगूनमधून करताना ह्या कबरीवर फुले वाहून केली होती. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यापासून ते गतपंतप्रधान मनमोहन सिंह यांनी ह्या कबरीला अभिवादन केले आहे ; पण अद्यापही तिचे अवशेष भारतात आणले गेले नाहीत.

बहादूरशहाला खरे तर सम्राट म्हणून त्याला काही कामच नव्हते. तो एक संवेदनशील कवी म्हणूनच प्रसिद्ध होता. त्याचे बरेच काव्य बंडाच्या धामधुमीत नष्ट झाले पण उरलेलेही अगदी अस्सल आहे. मरेपर्यंत जफर आपल्याला मातृभूमीत मृत्यु यावा म्हणून तळमळत होता. निदान मेल्यावर तरी आपले दफन आपल्या मायभूमीत केले जावे असं तळमळून सांगायचा. 7 नोव्हेंबर 1862च्या एका उदास दुपारी कारागृहाच्या पोलादी भिंतीआड बसलेला बहादूरशहा पूर्वेकडील खिडकीकडे तोंड करून बसला होता. त्याच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा लगल्या होत्या. गालफाडे आत गेले होती. डोईवरचे पांढरेशुभ्र केस अस्ताव्यस्त झाले होते. त्याची निस्तेज त्वचा मलूल झाली होती. सगळी गात्रे शिथिल होऊन गेली होती. त्याच्या अंगावरील वस्त्रांसारखीच त्याच्या देहाची लक्तरे झाली होती. मृत्यू त्याच्या समोर उभा होता तेव्हा तो मृत्युच्या भीतीने रडत नव्हता तर आपले दफन इथे मातृभूमीपासून हजारो किलोमीटर अंतरावर होणार या दुःखद विचारांमुळे तो रडत होता. त्याच्या आधीच्या सर्व मुघल बादशहांनी जितके क्रौर्य केले होते, जे अमाप ऐश्वर्य उपभोगले होते, जो अनन्वित अत्याचार आपल्या प्रजेवर केला होता, जी पिळवणूक त्यांनी इथल्या भूमीची केली होती त्या सर्वांची सजा नियतीने बहादुरशहाला दिली असावी. पण एक मात्र नक्की सांगता येईल की इतर मुघल सम्राटांनी हिंदूस्थानकडे कायम अय्याशी आणि सत्तेच्या धुंदीच्या दृष्टीकोनातून बघितले मात्र बहादूरशहा हा त्यांना अपवाद होता. तो नावाप्रमाणे बहादूर नव्हता की त्याच्या जफर या उपाख्य नामाप्रमाणे त्याला कधी दिग्विजयही मिळाला नाही, त्याच्या मृत्युनंतर मायभूमीने देखील आपल्या पोटात घेतले नाही मात्र आजही करोडो देशभक्त हिंदुस्थानींच्या हृदयात त्याला स्थान आहे. हे स्थान आधीच्या कोणत्याही मुघल बादशहाला कधीच मिळाले नव्हते हे विशेष!

कारागृहात असताना जफरने गझला लिहून ठेवल्या होत्या.  बहादूरशहाच्या मनात विचारांचा कोण कल्लोळ उडाला असेल याची कारुण्यपूर्ण कल्पना या गझलांद्वारे येते.
‘लाल किला’मधील मुज़्तर ख़ैराबादी यांच्या गझलेत बहादूरशहाच्या आयुष्यभराच्या दुःखाचे प्रतिबिंब उमटलेय! ही केवळ अंतःकरण पिळवटून काढणारी गझल नसून एका अभागी राजाची दर्दभरी कैफियत म्हणून तिचे मोल कितीतरी अधिक आहे!

न किसी की आँख का नूर हूँ न किसी के दिल का क़रार हूँ
जो किसी के काम न आ सके मैं वो एक मुश्त-ए-ग़ुबार हूँ
मेरा रंग रूप बिगड़ गया मेरा यार मुझसे बिछड़ गया
जो चमन ख़िज़ां से उजड़ गया मैं उसी की फ़स्ल-ए-बहार हूँ
प-ए-फ़ातेहा कोई आये क्यूँ कोई चार फूल चढ़ाये क्यूँ
कोई आ के शम्मा जलाये क्यूँ मैं वो बेकसी का मज़ार हूँ
मैं नहीं हूँ नग़्मा-ए-जाँ-फ़ज़ा मुझे सुन के कोई करेगा क्या
मैं वहीद रोग की हूँ सदा मैं बड़े दुखी की पुकार हूँ
न तो मैं किसी का हबीब हूँ न तो मैं किसी का रक़ीब हूँ
जो बिगड़ गया वो नसीब हूँ जो उजड़ गया वो दयार हूँ
मैं कहाँ रहूँ मैं कहाँ बसूँ ना ये मुझसे ख़ुश ना वो मुझसे ख़ुश
मैं ज़मीं की पीठ का बोझ हूँ मैं फ़लक़ के दिल का ग़ुबार हूँ....

१८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामातला हा एक असा मोहरा ज्याला कधी चमकण्याचे भाग्यच लाभले नाही त्याला सलाम. लेखाच्या अखेरीस बहादूरशहा किती बदनसीब होता हे त्याच्याच शब्दात सांगणे योग्य होईल...

"कितना है बदनसीब “ज़फ़र″ दफ़्न के लिए
दो गज़ ज़मीन भी न मिली कू-ए-यार में....."

- समीर गायकवाड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा