Wednesday, May 31, 2017

प्रेक्षकांशी 'बाँड' केलेला अभिनेता - रॉजर मूर


चित्रपटात काम करणारी स्टार मंडळीही हाडामासाची माणसंच असतात, एके दिवशी ते ही आपली साथ सोडून आपल्या अनंताच्या प्रवासाला निघून जातात. मग चाहते मंडळी आपला शोक प्रकट करतात, त्यांचे स्नेहीजन जुन्या आठवणींना उजाळा देतात तर आप्तेष्ट लोक दुःखात बुडून जातात. पण सामान्य माणूस या सर्वांपासून अलिप्त असतो. रसिक मात्र दीर्घ काळ हळहळ व्यक्त करतो. आपल्या भाषेचा, प्रांताचा, देशाचा माणूस असला तर हे दुःख उमजू शकते. कोण कुठला सातासमुद्रापाडचा एका विशिष्ट पठडीतील भूमिका करणारा वृद्धत्वाला टेकलेला एक अभिनेता एक्झिट घेतो अन अख्खं जग सुस्कारे सोडते. असं सहसा होत नाही. पण कालपरवा रॉजर मूरच्या बाबतीत असं घडलं. कारण बाँडपटाच्या या बेताज बादशहाचा लोकांशी असणारा 'बाँड'च तितका घट्ट होता. 


Tuesday, May 30, 2017

गाय, गोमांस आणि इतिहासएके काळी भारतातील खेड्यांत स्थायी जमातीचे लोक व वाताहत झालेले लोक राहत होते. पहिले गावकुसाच्या आत आणि दुसरे गावकुसाच्या बाहेर असे परस्परांपासून वेगवेगळे राहत असले तरी त्या दोन्ही वर्गातील लोकांत आपसात सामाजिक व्यवहारावर कसलीही सामाजिक बंधने नव्हती. 'हु आर शूद्राज'मधे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, 'जेंव्हा गाय पवित्र बनली आणि गोमांस भक्षण निषिद्ध ठरले तेंव्हा समाजाचे विभाजन दोन वर्गामध्ये झाले.' भारतीय समाजात अस्पृश्यता किंवा प्रखर सामाजिक भेद करणारा जातीभेद/ वर्णभेद पूर्वापार अनेक सह्स्त्रकांपासून कधीच नव्हता. एका विशिष्ट कालखंडापासून अस्पृश्यता रूढ झाली असे नव्हे तर चढत्या कमानीत वाढत राहिली. समाजात अस्पृश्यता रूढ होण्याच्या कालावधीवरून गाय पवित्र कधी मानली जाऊ लागली याचा अंदाज काढणे सोपे जाते. या साठी दोन घटक विचारात घ्यावे लागतील ते म्हणजे किमान व कमाल कोणकोणत्या काळापासून गाय पवित्र मानणे सुरु झाले तो कालखंड हा अस्पृश्यता दृढ होण्याचा कालावधी होय.


Monday, May 29, 2017

देशप्रेमाचा हंगाम .....

"हा भाकरीचा जाहीरनामा
हा संसदेचा रंडीखाना
ही देश नावाची आई
राजरोस निजते कुबेराच्या सोबत ...."
नामदेव ढसाळांची ही कविता मागच्या दोन आठवडयात कानात तापलेलं शिसं घुसावी तशी मेंदूत रुतून बसली आहे....


बॉलीवूडमधले 'भेसूर' वृद्धत्व ...


बॉलीवूडचा एक चेहरा नेहमीच इतका काळाकुट्ट, किळसवाणा, निर्दयी राहिलाय की अंगावर काटा यावा. आजवर कैकांची स्वप्ने पूर्ण करणाऱ्या बॉलीवूडने अनेकांना भुकेकंगाल करून त्यांचे हाल हाल होऊन मरणासन्न होऊ दिले आहे. त्याकडे डोळेझाक करताना अंगावर गेंड्याचे कातडे पांघरले आहे. अर्थात अशी दुरावस्था होण्यात त्या त्या संबंधित व्यक्तींचा वाटाही बराच मोठा राहिलेला आहे पण माणुसकी नावाची चीज बॉलीवूडमध्ये क्वचित आढळते. इंडस्ट्रीचा हा भयाण चेहरा काही काळाच्या अंतराने सातत्याने समोर येत असतो. जगही तितक्याच कोरडेपणाने या घटनांकडे बघत असते. 'फार रुबाब केला, खूप ऐश्वर्य भोगलंय आता जरा दुर्दशा झाली तर बिघडले कोठे ?' असा द्वेषमत्सरी भाव लोक त्यांच्याबद्दल मनात ठेवून असतात.


Tuesday, May 23, 2017

ओसरीवरची माणसं ......ओसरीवर नाहीतर पारावर बसलेली डोळे विझत चाललेली गावाकडची ही म्हातारी माणसं म्हणजे आयुष्यावरली चालती बोलती पुस्तकं असतात.

आयुष्यभर काबाडकष्ट करून जीव शिणलेला. सारी हयात माळावर घालवल्याने त्वचा रापून गेलेली. ऊन पावसाच्या खेळाने डोळे खोल गेलेल्या विहिरीसारखे . गालावर सुरकुत्यांचे मखमली जाळे. कपाळावर थिजलेला आठ्यांचा गंध जोडीला अष्टगंध नाहीतर बुक्का. नांगर हाकून कमरेला आलेला बाक. नेसूचे जुनाट धोतर अन वर पांढरी छाटी नाहीतर सदरा. कपडे नेहमीच जुने पण स्वच्छ. डोईवर पांढरी टोपी.Friday, May 19, 2017

अंघोळाख्यान ...बाळ जन्मल्यानंतर त्याला अंघोळ घालून स्वच्छ केले जाते आणि मग आईकडे त्याला सुपूर्द केले जाते. तेच मूल मोठे होते. बाल्य, कुमार, तारुण्य, प्रौढ अवस्थेनंतर वृद्धावस्था पार केल्यानंतर एका दुर्दैवी दिवशी त्याचा मृत्यू होतो आणि त्याचे अंतिम संस्कार करण्याआधी त्याला अंघोळ घातली जाते. व्यक्ती कोणत्याही जातधर्माचा असो त्याच्या आयुष्यात आरंभ, अंताच्या या बाबी घडतातच. एक जितेपणी तर एक मृत्यूनंतर ! अशा रीतीने आपल्या जीवनाचा अंघोळीशी अत्यंत जवळचा संबंध येतो ! अंघोळ ही कोणत्याही व्यक्तीच्या दिनक्रमात नित्यनेमाचे स्थान असणारी बाब आहे. तरीही काही आळसप्रेमींना अंघोळ नकोशी वाटते. 'अंघोळीची एखादी गोळी असती तर किती बरे झाले असते' अशी हुरहूर त्यांना वाटते. पण अशी सोय अजून तरी झालेली नाही त्यामुळे जन्मल्यावर सुरु होणारी अंघोळ श्वास थांबल्यावरही एकदा 'अंगावर' येतेच, मग कुठे त्यातून सुटका होते.


''आंखो आंखो में' - आशा पारेख - देव आनंदचं एक अविस्मरणीय गीत..

काही दिवसापूर्वी गतकाळातील दिग्गज अभिनेत्री आशा पारेखचे 'द हिट गर्ल' हे आत्मचरित्र अत्यंत जोशात प्रसिद्ध झाले. बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी यावेळी हजेरी लावली होती. याप्रसंगी पत्रकारांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना आशाजींनी खुमासदार उत्तरे दिली. एका पत्रकाराने त्यांना विचारले की, 'या समयी आणखी कोणता कलाकार सोबतीला हवा होता असे तुम्हाला वाटते ?' यावर क्षणाचाही विलंब न लावता त्या उत्तरल्या होत्या की, 'अर्थातच देव साबअपने देव आनंदजी !'...


Thursday, May 18, 2017

रीमा लागू - पैलू पडायचे राहून गेलेला हिरा ....


रीमा लागू, भक्ती बर्वे आणि लालन सारंग या तिघीजणी सारख्या देहबोलीच्या आणि चेहरेपट्टीत काहीसे साम्य असणारया गुणी अभिनेत्री होत. भक्तीचं अकाली जाणं जसं हुरहूर लावून गेलं तसं आताचं रीमाचं अकस्मात जाणं चुटपूट लावून गेलं. या दोघींच्या तुलनेने लालन सारंग वयाने मोठ्या आणि कलेचा जास्त अवकाश लाभलेल्या.


Monday, May 15, 2017

'बाहुबली'च्या यशाचा मतितार्थ .....

'बाहुबली'च्या यशाचा नेमका मतितार्थ शोधताना १९७५च्या 'जय संतोषी मां' पर्यंत गेले की त्यातला नेमका मतितार्थ लक्षात येतो. त्याचाच हा रंजक आलेख...

१० जुलै २०१५ ला 'बाहुबली द बिगिनिंग' रिलीज झाला आणि देशभरातील १२५ कोटी जनतेसह तमाम मिडियाकर्मींचे कान टवकारले गेले. बाहुबलीने भारतीय जनतेला चर्चेला एक नवा विषय दिला आणि चित्रपटविषयक तमाम परिमाणे मोडीत काढली. याधीही अनेक चित्रपटांनी तुफान गल्ला गोळा केला होता. आमीरच्या 'पीके'ने पाचशे कोटीचा पल्ला जेमतेम गाठला होता. पण 'बाहुबली'ने त्याला मात देत हजार कोटींचा टप्पा लीलया पार केला. त्यानंतर आलेल्या 'दंगल'ला दोन वर्षे अथक मेहनत घेऊन, अत्यंत नियोजनबद्ध प्रमोशन केल्यावर आठशे कोटींचा टप्पा गाठता आला. आता २७ एप्रिलला रिलीज झालेल्या 'बाहुबली - द कन्क्लुजन' या दुसरया भागाने अकरा दिवसात अकराशे कोटी कमावले आहेत. याची घौडदौड पाहू जाता हा दोन हजार कोटीच्या उंबरठयावर जाऊन पोहोचेल असे अंदाज चित्रपटसृष्टीतील काही जाणकारांनी वर्तवले आहेत. भारतीय चित्रपट रसिकांनी 'बाहुबली'च्या दोन्हीही भागांना इतके का उचलून धरले असावे याचा अभ्यास करता काही रंजक तथ्ये समोर येतात..


Wednesday, May 10, 2017

अनुवादित कविता - "गर्भारपण' : कुर्दिश / इराकी कविता - काजल अहमद


तिच्या मैत्रिणींप्रमाणे
आपल्या कटीभाराचं ती आणखी कौतुक आता करू शकत नाही.
तिचे नितंब आता हलत नाहीत की सैलही नाहीत.
ती आता धाडसही करत नाही,
उंच पाळण्यात बसण्याचे आणि सुलेमानियाच्या नौकेत बसण्याचे.
तिचा वाङ्निश्चय होण्याआधी मात्र ती हे करायची.Tuesday, May 9, 2017

पुराने 'जख्म' - तुम आये तो आया मुझे याद....

१९९८ मध्ये महेश भट्टनी 'जख्म' हा चित्रपट काढला होता. त्यात एक अवीट गोडीचं अर्थपूर्ण गाणं होतं. "तुम आये तो आया मुझे याद, गली में आज चांद निकला.."
अलका याज्ञिकनी अगदी जीव ओतून हे गाणं गायलं होतं. आर्त हळव्या स्वरातील ही रचना गाणं ऐकल्यानंतर ओठांवर रेंगाळत राहते. गाणं बारकाईने बघितलं तर लक्षात येतं की या दाखवलेला प्रसंग म्हणजे महेश भट्ट आणि परवीन बाबीच्या जीवनातला 'तो' प्रसंग आहे.


Wednesday, May 3, 2017

पानवेळा...जीवन सुलभ, सुखकर वाटावं यासाठी विरंगुळा गरजेचा आहे. छंद, आवड यातूनही विरंगुळा मिळवता येतो. याही पलिकडे जाऊन सामान्यतः लोक लहान सहान व्यसनातून विरंगुळा धुंडाळतात. ही व्यसनं कालानुगतिक बदलत गेलीत. काही अजून टिकून आहेत तर काही नामशेष झालेत तर काही लुप्त होण्याच्या वाटेवर आहेत. यातील काही नाद, व्यसनं गावगाड्याची ओळख बनून गेले. पैकी एक व्यसन पानविड्याचं होतं. शहरातही पान खाल्लं जातं पण गावाकडची बातच न्यारी होती. पानशौकिनांकडे पानाची चंची असायची तिची ही गोष्ट.


Monday, May 1, 2017

महाराष्ट्रदिन आणि कामगारदिनाच्या लाह्या बत्तासे ...


थोड्या लाह्या थोडे बत्तासे... 
आज एकाच दिवशी दोन ‘दिन’आल्याने शुभेच्छोत्सुकांची चंगळ आहे.. किती शुभेच्छा देऊ आणि किती नको असे काहीसे झाले असेल नाही का ?..असो...    
महाराष्ट्राच्या विभाजनाची स्वप्ने पाहणाऱ्या, त्याची शकले करू इच्छीणाऱ्या लोकांनी महाराष्ट्र दिनाचे गोडवे गावेत हे म्हणजे कसायाने गाईची महती सांगण्यासारखे आहे....
एकीकडे मंगल देशा, राकट देशा, पवित्र देशा, दगडांच्या देशा आणि कुठल्या कुठल्या देशा म्हणून तुताऱ्या फुकत राहायचे आणि दुसरीकडे महाराष्ट्र विभाजनाचे 'रेशीम' विणत राहायचे हा दुट्टपीपणा आहे.