Monday, May 29, 2017

देशप्रेमाचा हंगाम .....

"हा भाकरीचा जाहीरनामा
हा संसदेचा रंडीखाना
ही देश नावाची आई
राजरोस निजते कुबेराच्या सोबत ...."
नामदेव ढसाळांची ही कविता मागच्या दोन आठवडयात कानात तापलेलं शिसं घुसावी तशी मेंदूत रुतून बसली आहे....
आपले सुर्वे मास्तर देखील अशाच रांगेत उभं राहण्याच्या सिच्युएशनमधून गेले होते की काय ?
सुर्वे मास्तर लिहितात -
"दोन दिवस वाट पाहण्यात गेले,
दोन दुःखात गेले
हिशोब करतो आहे आता
किती राहिलेत डोईवर उन्हाळे.
शेकडो वेळा चंद्र आला,
तारे फुलले, रात्र धुंद झाली
भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली...."

दोन घास अन्नाला महाग असणारया कुटुंबाची रोजीरोटी रोजच्या उत्पन्नावर चालते. चलन थंडावले की व्यवहार थंडावतात अन त्याचा सर्वात आधी फटका बसतो रोज कमावून त्यावर आयुष्य कंठणाऱ्या लोकांना. मग त्याचे बँकेत खाते आहे का, त्याच्याकडे आधार कार्ड आहे का, मोबाईल आहे का, स्मार्टफोन आहे का, इंटरनेट आहे का हे प्रश्न त्याला विचारणे म्हणजे त्याच्या गरिबीची थट्टा करण्यासारखे असते. अशा कुटुंबात सगळेच जण आपापल्या परीने जगण्याचा संघर्ष करत असतात, त्यातही घरातली स्त्री जी आपल्या चिमूरडया मुलांसाठी अहोरात्र काम करायला तयार असते ती झिजत राहते, व्यवस्था फक्त आणि फक्त बघत राहते. देवसुद्धा तिची जागा घेऊ शकत नाही. दुःख वेदनांनी गांजलेल्या अशा कुटुंबाची अणकुचीदार व्यथा केशव मेश्रामांनी इतक्या जळजळीत शब्दात मांडलीय की वाचताना काहींना आपण वस्तूस्थितीपासून कोसो दूर असल्याची तत्काळ प्रचीती यावी ...
"साल्या! तुकडाभर भाकरीसाठी
गाडीभर लाकडं फोडशील काय?
चिंधुक नेसल्या आईच्या पटकुराने
घामेजले हाडके शरीर पुसशील काय?
बापाच्या बिडीकाडी
भावाबहिणीची हाडके झिजवशील काय ?
बापाच्या बिडीकाडीसाठी
भावाबहिणीची हाडके झिजवशील ?
त्याच्या दारूच्या घोटासाठी भडवेगिरी करशील ?
बाप्पा रे, देवबाप्पा रे ! तुला हे जमणारच नाही,
त्यासाठी पाहिजे अपमानित
मातीत राबणारी,
प्रेम करणारी मायमाऊली ....."

लोकांना वाटते, सगळीकडे इझी मनी आहे सगळीकडे आबादीआबाद आहे. काहींनी थोडासा त्रास सोसायला काय हरकत आहे, थोडीशी कळ का सोसली जात नाही ? पण जे शतकानुशतके त्रासच सोसत आलेत किंवा जे पिढयान पिढया भुकेकंगाल आहेत त्यांना काही दिवस त्रास सोसायला सांगण्याचा नैतिक अधिकार कुणाला आहे ? कारण हा प्रश्न समस्याग्रस्त भारत आणि सुखासीन इंडिया यांच्यातल्या विषमतेचा आहे !
नारायण सुर्वे म्हणतात -
"लुत अंगावर सडलेली
तुमची दुनियाच निराळी
अमुची दुनियाच निराळी !"

पराकोटीची विषमता नांदत असताना त्या विषमतेची विषवल्ली मोठया आवडीने जतन करणारे लोक आज आधीच गांजून गेलेल्या लोकांना देशभक्तीच्या लेबलाआडून शहाणपणा शिकवण्याचा प्रयत्न करतात तेंव्हा सांगावेसे वाटते, "बाबांनो आधी देशात राहणारया माणसांवर प्रेम करा, मग देशावरच्या प्रेमाच्या गप्पा करा !" शब्दाचे बुडबुडे सोडणे कुणालाही शक्य आहे, मात्र त्याने वंचना दूर होत नाहीत की पोट भरत नाही. विशेष म्हणजे शब्दाचे इमले रचून जे इमोशनल ब्लॅकमेल करत असतात ते सर्वच ह्या परिस्थितीला कमी अधिक जबाबदार असतात. भरल्यापोटी इतरांना उपदेश करण्यात काय पुरुषार्थ असतो हे त्यांना काय ठाऊक ? अशा शब्दवीरांना ज्योती लांजेवारांनी चांगले झोडून काढले आहे. त्या लिहितात -
"वारा येईल तसा रुख करणारे
हे..... रुक्ष वाळवंटातले हिरवे पोपट
मृगजळाचा भास ठरतात ..... आणि
स्वतःच्या सोयीनुसार नजर फिरवत असतात.
आपल्या पंखात दम नसला म्हणजे
दुसऱ्याचे पंख छाटायला
त्यांना शब्दच सोयीचे ठरतात...
अशा शब्दांच्या कित्येक हवेल्या
मी कोसळताना पाहिल्या आहेत.... "

काही लोकांना आपल्याशेजारी फाटक्या कपडयातला, खंगून गेलेला, भुकेने कासावीस झालेला, दैन्याची लक्तरे चेहऱ्यावर घेऊन फिरणारा माणूस जवळ उभा राहिला तरी त्याचं जवळ असणं सहन होत नाही. लोकांना गोमुत्राचा वास चालतो पण गरीबीचा दर्प ओकारया आणतो अशी चमत्कारिक परिस्थिती आपल्याकडे आहे. तरीदेखील 'आहे रे' चा वर्ग 'नाही रे' वाल्यांनाच सुनावत असतो. तिकडे सीमेवर सैनिक प्राणाची बाजी लावून असतात तू इतके क्षुल्लक काम करू शकत नाहीस ? भरपेट खाऊन तृप्तीची ढेकर देत  लोक असे एकमेकाला सुनावतील हे तुकोबालाही उमगले असावे. कारण युद्ध सर्वांनाच करावे लागते हे त्यांनी अभंगात मांडले आहे -
"रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग ।
अंतर्बाह्य जग आणि मन ।।"

काहींचे जगणे हेच एक युद्ध होऊन गेलेलं असते आणि 'स्वांतसुखाय' जगणारे लोकच त्यांना दुषणं देत राहतात. सीमेवरचा सैनिक देशासाठी लढतो तर हे जगण्यासाठी लढतात. शेवटी देश म्हणजे तरी काय ? नुसती जमीन ? त्या मातीत राहणारी माणसे त्या व्याख्येत येत नाहीत का ? मग ज्या माणसांचे आयुष्य हेच एक समरांगण होऊन गेलेलं असते त्यांनी काय करायचे ? त्यांनी रिकाम्या पोटी पोकळ बाता मारायच्या तरी कशा ? अनंत अडचणींचा डोंगर समोर असताना पंधरा वीस दिवस एखाद्या कुटुंबावर पोट मारायची वेळ आली तर त्याची जबाबदारी कुणाची ? फुकटचे फॉरवर्डड मेसेज एकमेकांना पाठवत राहणारे सो कॉल्ड पेट्रीयटस ही जबाबदारी घेणार आहेत का ? 'तुम्ही घरी जावा, मी सच्चा देशभक्त आहे मी तुमच्या ऐवजी रांगेत उभं राहतो' असे सांगून सलग पंधरा दिवस रांगेत उभा असलेला सच्चा माई का लाल आहे का कुणी ? असं कुणी नसतं ... कारण उपदेशाचे डोस पाजणे फार सोपे असते.... 'जावे त्याच्या वंशा, तेंव्हा कळे' हेच खरे !

अडचणी काळ, वेळ, पत्ता सांगून येत नसतात. त्यांना अनेक चेहरे असतात. अडचणीच्या काळी कामी मदत होईल या आशेने कुणी काही योजना आखलेल्या असतात, त्यांना सुरुंग लागला तर समोर अंधःकार पसरतो. माणसे हताश होतात, अगदीच हतबल झालेला माणूस जीव देतो. त्यावरही काही लोक टोमणे मारतात, 'म्हतारा पैशासाठी मेला' असं म्हणत त्याची टवाळकी करतात. कुणी धक्का बसून मरतो तर कुणी पैशाच्या साठी आस लावलेल्या रांगेत मरतो. पुढारी त्याचे राजकारण करतात तर सारओढे लोक तिथेही कड घेण्याचे काम नेटाने करत असतात.
"इथे भीक मागून काहीच मिळत नसते
दया आणि माया,
अन्यायासाठी दावे करावे लागतात,
आसवांची नसते किंमत तेंव्हा
जगण्यासाठी लढे द्यावे लागतात ..."
अशी आपली सामाजिक स्थिती आहे...

एखाद्या माणसाला देशप्रेमाचे शब्द ऐकवण्यापूर्वी तो कशा अस्वथेत जगतो आहे किंवा त्याची जगण्याची पार्श्वभूमी कशी आहे याची साधी जाणीव देखील लोकांना नसते तरीही ते सरसकट सर्वांना गृहीत धरून आपलं 'तथाकथित कल्याणकारी धोरण' माथी मारत फिरत असतात. ज्यांना तुम्हाला सुनवायचे असेल त्यांच्या पाऊलखुणा आधी तुम्ही पहा आणि मग काय ते सुनवा असे सांगण्याची वेळ आलीय.
"हे ऐश्वर्य सजवताना
पाण्यानं, वाऱ्यानं झोडलेल्या
उन्हाने करपलेल्या त्यांच्या प्रत्येक पिढीच्या
अनावृत्त पाऊलखुणा नीट डोळे उघडून पाहा,
पुढच्याच्या पावलावर पाऊल ठेवून मागचाही
पिसला जातोय चक्कीत,
आणि चालू लागतोय वाट काळ नदीच्या किनारयाने
जसा होता तसाच रिकाम्या हाताने,
ऐश्वर्याच्या नदीतीराला दिसताहेत
त्यांच्या प्रत्येक पावलाखालच्या रक्तखुणा !"

गरजासाठी तिष्टणारे किंवा रोजच्या जीवनाच्या लढाईत झुंजणारे लोक ह्या व्यवस्थेचा एक घटक आहेत. त्यांच्या गरजा सीमित असतात तरीही त्या पुऱ्या होत नाहीत. अशा लोकांचा चरितार्थ देशभक्तांनी चालवावा मगच त्यांना देशभक्ती शिकवावी. पण तसेही घडत नाही. अशा लोकांबद्दल मल्लिका अमरशेख लिहितात -
"संभावित सूर्यासारखे तुम्ही नेहमीच निर्विकार असता
नित्यनेमाने पाठ फिरवून चालायला लागणारे,
तुमचे विचार मुरलेल्या लोणच्यासारखे बंद बरणीत
सारं पंचतंत्र तोंडपाठ असतंय तुम्हाला,
तुम्ही हुकुमाचे पत्ते हातात ठेवूनच नेहमी खेळत असता ..."
काय चूक आहे ह्या पंक्तीत ? जे नियम बनवतात त्यांनी काहींची सोय आधीच केलेली असते पण जे मुळातच नागवलेले असतात ते अधिकच रस्त्यावर येतात ! त्यांचे काय ? त्यांच्यासाठी काही निर्विकार शब्द पुरेसे असतात याची पक्की जाणीव ह्या लोकांना असते.

"मारणारयांनी मारत राहावे
मरणारयांनी मरत रहावे
आया बहिणींची स्वस्त मरणे पहाता पहाता
लोकशाहीतील क्षुधित घुबडे
उदया माझेही मरण घेऊन उभी असतील माझ्या बायकोसमोर
निर्वस्त्र !...."
ही आपल्या लोकशाहीची शोकांतिका आहे. पिपासुंना अधिक शोषण करायचे आहे आणि शोषितांचे पर्याय हळूहळू खुडून काढायचे आहेत. हे करत असताना त्याला इंद्रधनुष्यी मुलामा दयायला लोक विसरत नाहीत जेणेकरून इतरांचे मरण स्वस्त होत जाते. साठ सत्तर माणसे अशीच मेली तरी त्याचे दुःखच वाटेनासे होते.

जुलूमग्रस्तांच्या, वंचितांच्या भाळावरील लाचार तगमग पुसून देशभक्तीचे अन्न त्यांच्या तापलेल्या माथ्यावर शिजवणे माणुसकीला धरून नाही ....या पंधरा दिवसात आलेला हाही एक देशभक्तीचा हंगामच होता. पण ढसाळ म्हणतात तसा "येथला प्रत्येक हंगाम बेदर्दीच असतो" ..तसाच हाही हंगाम आहे ज्याला इतरांचे काही देणेघेणे नाही....आहे फक्त उपदेशात्मक देशभक्तीची औपचारीकता ...म्हणूनच काही माणसे मेली तरी काहींना फरक पडत नाही. देशभक्तीखाली काहीही खपवून नेता येते हे या चाणक्यांना ठाऊक असते.
"म्हणून फांदीला नुसता सांगाडाच लटकवून भागत नाही रे
इथे पापणीलाच केस नसतो
आणि बुबुळाच्या काचा झालेल्या असतात रे
येथला प्रत्येक पिवविता कंजूषच असतो
म्हणून नुसते प्याले फोडून चालत नाही रे
इथे आतून पेटलेला आत्माच नसतो
आणि सर्जनांचे कोळसे झालेले असतात रे
येथला प्रत्येक महाकवी आखूडच असतो
म्हणून माण्सालाच माणूस खात असतो
आणि वाल्याच्या पाठीवरले वळ लपवले जातात रे !...."       

हा देश फक्त देशभक्तीचे पंचामृत पाजणाऱ्या लोकांचाच देश आहे का ? नक्कीच नाही ...
"हा माझाही देश ; आणि त्यातील पोके पोकेसे लोक !, आपल्या घरालाच असे पोकेपण यावे ; तर काय करावे ?" असे सुर्वे मास्तर विचारतात तेंव्हा समोरचा आपोआप निरुत्तर होतो.. हे पोकेपण अनेक गोष्टीतून आपल्यात पाझरत आलेले आहे आणि आपण मोठ्या आत्मीयतेने त्याला गोंजारत आलो आहोत ... आपण खरेच देशप्रेमी असू तर देशातील अवघ्या चराचरावर आपले प्रेम असायला हवे. तसे चित्र तर आपल्या देशात नाहीये. मृत पशुची कातडी काढली तर ती माणसे मारली जातात अन त्याचे समर्थन इथे उघडपणे केले जाते, वर त्याला देशप्रेमाचा लेप चढवला जातो ! हे कसले देशप्रेम ?

आपल्याच देशातील काही परधर्मीय, परजातीय, परपंथीय, परवर्णीय लोकांबद्दलच्या द्वेषाचा विटाळ ज्यांच्या रक्तवाहिन्यातून साकळत असतो ते लोक जेंव्हा देशभक्तीच्या बाता मारत असतात तेंव्हा तर देशप्रेम ही भावना न राहता ती एक पोकळ संज्ञा होऊन जाते ......
उठता बसता देशप्रेमाचे आणि सीमेवरील सैनिकांचे दाखले देणारया माझ्या दोस्तांनो, सजवलेल्या बिजवर शब्दांनी पिचलेल्या मनात राष्ट्रवादाचा तेजोनिधी निर्माण होत नसतो. त्यासाठी आधी आपला स्वतःचा जीवच जाळावा लागतो. मगच तयार होऊ शकतात जाज्वल्य त्यागाच्या आणि प्रखर देशभक्तीच्या प्रकाशवाटा !!! अन्यथा वेगवेगळ्या रुपात होत राहतो विद्रोहाचा दाह जो सूर्याचा आव आणणारया काजव्यांना प्रकाशाची खरी व्याख्या समजावून देतो. देशप्रेमाची ज्योत प्रत्येकाच्या अंतरंगात तेवत असते त्याला इतरांनी उसने तेल घालण्याची गरज नसते इतके कळाले तरी पुष्कळ झाले ....

- समीर गायकवाड.