Tuesday, May 30, 2017

गाय, गोमांस आणि इतिहासएके काळी भारतातील खेड्यांत स्थायी जमातीचे लोक व वाताहत झालेले लोक राहत होते. पहिले गावकुसाच्या आत आणि दुसरे गावकुसाच्या बाहेर असे परस्परांपासून वेगवेगळे राहत असले तरी त्या दोन्ही वर्गातील लोकांत आपसात सामाजिक व्यवहारावर कसलीही सामाजिक बंधने नव्हती. 'हु आर शूद्राज'मधे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, 'जेंव्हा गाय पवित्र बनली आणि गोमांस भक्षण निषिद्ध ठरले तेंव्हा समाजाचे विभाजन दोन वर्गामध्ये झाले.' भारतीय समाजात अस्पृश्यता किंवा प्रखर सामाजिक भेद करणारा जातीभेद/ वर्णभेद पूर्वापार अनेक सह्स्त्रकांपासून कधीच नव्हता. एका विशिष्ट कालखंडापासून अस्पृश्यता रूढ झाली असे नव्हे तर चढत्या कमानीत वाढत राहिली. समाजात अस्पृश्यता रूढ होण्याच्या कालावधीवरून गाय पवित्र कधी मानली जाऊ लागली याचा अंदाज काढणे सोपे जाते. या साठी दोन घटक विचारात घ्यावे लागतील ते म्हणजे किमान व कमाल कोणकोणत्या काळापासून गाय पवित्र मानणे सुरु झाले तो कालखंड हा अस्पृश्यता दृढ होण्याचा कालावधी होय.

विविध गृहीतके अवलंबून नाना इतिहासकार आणि भाष्यकारांनी आपल्या परीने याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. आजच्या हिंदू धर्मात मागील शतकापर्यंत अस्पृश्यता अस्तित्वात होती, ज्या जाती या अस्पृश्यतेच्या जात्यात भरडून निघाल्या त्यांचे दुर्दैवाचे दशावतार झाले. या जातींपैकी काहींचे नामोल्लेख वेदकाळातही आढळतात. प्रारंभिक वेदिक वाड्मयामध्ये स्मृतिकार ज्यांना अंत्यज म्हणतात अशा अनेक जातींची नावे यात आहेत. विशेष म्हणजे ज्यांना अंत्यज मानले गेले त्यांना अस्पृश्यही मानले जात नव्हते नि अपवित्रही मानले जात नव्हते. ऋग्वेदामध्ये (८,८, ३८) चमन्न जातीचा, वाजसनेयी संहितेत चांडाळ व पौल्कस यांचा उल्लेख आहे. वेप, वप्त (न्हावी) बिडालकर (बुरुड सदृश) अशा जातींचे उल्लेख आढळतात. वैदिक काळात जाती वेगवेगळ्या असल्या तरी त्यात अस्पृश्यता वा अपवित्रता नव्हती असे आंबेडकर सांगतात. यात उल्लेखलेल्या जातीतील लोक गोमांस खात होते तरीही त्यांना अपवित्र मानले जात नव्हते त्यामुळे याची काळनिश्चिती करणे अनिवार्य ठरते. मॅक्सम्युलरने वेदकालाचे छ्न्द्काल, मन्त्रकाल, ब्राह्मंकाल व सुत्रकाल असे चार काळ केले व प्रत्येक काळ २०० वर्षांचा असावा अशी कल्पना मांडली होती. हा एकूण काळ ८०० वर्षांचा असावा आणि तो काळ बुद्धकाळाच्या सुमारे ५०० वर्षे पूर्वीचा असल्याने आपल्याकडील वेद हे इ.स. पूर्व १२०० वर्षे या काळात किंवा त्या सुमारास लिहिले असावेत असा त्याचा अंदाज होता. ऋग्वेदात वसंतसंपात मृगशीर्ष नक्षत्रात आहे असा उल्लेख आहे त्यावरून टिळकांनी गणित मांडले. मृगशीर्ष नक्षत्राचे दुसरे नाव अग्रहायण. वसंत संपात मृगनक्षत्रात होता त्यावरून आपल्या वेदांचा काळ इसवी सन पूर्व ४००० वर्षांपासून इसवी सन पूर्व २५०० वर्षांपर्यंत असावा. भग्वद्गीतेत श्रीकृष्णाच्या तोंडी मसानाम मार्गशीर्शोहं असे शब्द आहेत. मार्गशीर्ष आणि मृगशीर्ष या दोन शब्दात टिळकांना साम्य आढळले. हे दोन्ही युक्तिवाद ग्राह्य धरले तरी असे मानता येते की इसवीसनपूर्व काळात गायीचे मांस भक्षण करणे अपवित्र नव्हते. कारण यज्ञात बळी देण्यासाठी सरसकट पाळीव पशूंचा बळी दिला जाई व त्याचे भक्षण केले जाई. त्या काळी यज्ञाचे कर्मकांड वाढतच गेले.

वेदकाळानंतर ठळकपणे जाणवणारा ऐतिहासिक काळ म्हणजे मनुस्मृतीचा काळ. वेदकाळाप्रमाणे या काळातही यज्ञात आहुती देण्यासाठी पशूंचा वापर होई किंबहुना यज्ञ संस्कृती म्हणून या काळाचा उल्लेख केला तरी चालेल इतका सर्व प्रकारच्या यज्ञांना तो अनुकुल होता. या यज्ञात मारल्या जाणाऱ्या पशूंसंबंधी मनूने अत्यंत विस्ताराने, बारकाईने वर्णन केलेले आहे. मांस खाण्याचे काही नियमही त्याने दिले आहेत. ब्रम्हानेच भक्ष व भक्षक निर्माण केलेले असल्याने भक्षकाने रोज भक्ष खाल्ले तरी हरकत नाही (४.३०), मांस खाणे, मदिराप्राशन आणि मैथुन यात दोष नाही, त्या सहज प्रवृत्ती आहेत मात्र त्यापासून दूर राहणे महाफलदायी आहे (५.५६), मंत्रयुक्त पाणी शिंपडून पवित्र केलेलं मांस विधिवत खाण्यास हरकत नाही, इतर अन्न न मिळाल्यास ब्राम्हणाने मांस खाण्यात हरकत नाही (५.२७) पितृ देव इत्यादीस अर्पण करून उरलेले मांस खाल्ले तरी खाणाऱ्याला दोष लागत नाही (५.३२) 'नियुक्तस्तु यथान्यायं यो मांस नात्ति मानवः। स प्रेत्य पशुतां याति संभवानेकविशतिम ।। ' (५.३५) अर्थ - यथावधी नियुक्ती झाल्यानंतर (यज्ञामध्ये पुरोहित म्हणून नियुक्ती झाल्यावर) जो मनुष्य मांस खाण्यास नकार देतो तो मेल्यानंतर २१ जन्मपर्यंत पशू होतो. मनूने मांसाहारावर प्रतिबंध घातला नव्हता मात्र तो टाळलेला बरा असे तो सांगतो. सोबतच त्याने गोहत्येवरही बंदी घातली नव्हती. अध्याय ४ मधील श्लोक २०९, ३८, ४५, ४८, ५८ मधून गायीच्या स्नातकासंबंधीचे विश्लेषण आहे. अध्याय ३ मधील ३ ऱ्या श्लोकात मनू स्नातकास गाय दान द्यायला सांगतो. कोणते मांस खावे आणि कोणते खाऊ नये हे सांगताना अध्याय ५ मधील १८ व्या श्लोकात मनू सांगतो - 'स्वाविधं शल्यकं गोधां खड्गकूर्मशशांस्तथा। भक्ष्यान्पत्र्दनखेष्वाहुरनुष्ट्रांश्चैकतो दंतः।।' (५.१८) अर्थ - पाच नखे असणाऱ्या प्राण्यांपैकी शालशिंदर, शाळू, घोरपड, गेंडा, कासव व ससा हे प्राणी भक्षण करण्यास योग्य आहेत. त्याचप्रमाणे एका जबड्यात दात असणाऱ्या प्राण्यांपैकी उंट सोडून बाकीचे पशूही भक्ष्य आहेत. खरे तर एका जबड्यात दात असणाऱ्या सर्व प्राण्यांना खाण्याची अनुमती मनूने दिली आहे अपवाद उंट. विशेष म्हणजे इथे गाय हा अपवाद केला नाही. म्हणजेच गायीचे मांस खाल्ले तरी चालत असे. गायीची हत्या हे महापाप आहे असे मनू मानत नाही. महापाप आणि मामुली स्वरूपाचे पाप असे विभाजन करताना श्लोक ११.५४ मध्ये त्याने महापापाचे प्रकार दिले आहेत. तर श्लोक ११.५९ मध्ये गोवधाचा समावेश त्याने मामुली पापात केला आहे. गोहत्या समर्थनीय कारणापायी झाली असल्यास ती घृणास्पद मानली जात नसे. याज्ञवल्क्यात देखील हेच मत व्यक्त झाले आहे (३.२२४, ३.२२७). गायीचे दैवतीकरण अद्वैत सिद्धांतामुळे ( संपूर्ण विश्वामध्ये ब्रम्ह व्यापले असल्याने सर्व प्राणी पवित्र आहेत) घडून आले असे मानले तरी मग ही देवानुभुती फक्त गायीपाशी का थांबली याचे उत्तर बौद्ध आणि ब्राम्हण्य यांतील संघर्षात आहे. याहीपुढे जाऊन गोवंश भक्षणाने काय साध्य करता येते याचे अनोखे उदाहरण म्हणून बृहदारण्यक उपनिषदात (६.२) म्हटलंय की, एखादयाला विद्वान पुत्र आपल्या पोटी जन्मास यावा अशी इच्छा असेल तर त्याने बैलाचे किंवा इतर मांस आणि भात व तूप यांचे मिश्रण करून खावे असे म्हटले आहे. (धर्मशास्त्र - पा. वा. काणे, भाग २, पान ७७६). या दरम्यानची विशेष बाब म्हणजे इ.स. पूर्व दुसऱ्या शतकात (सम्राट अशोकाच्या शिलालेख क्रमांक १ आणि स्तंभलेख २ व ५ मध्ये भूतदया आणि प्राणीमात्रावर अनुग्रह कसा करावा याचे विश्लेषण आहे ) पशुहत्या करू नये याकडे सम्राट अशोकाने जनतेचा कल वळवला होता !

आज मनूस्मृती ज्या स्वरूपात उपलब्ध आहे ती इ.सनाच्या दुसऱ्या शतकात अस्तित्वात आली असं प्रो. बुहलर मानतात (Buhler laws of Manu S.B.E. Vol XXV Int CXN). याचकाळात बृहद्रथ मौर्याचा खून पुष्यमित्राने केला होता आणि वैदिक धर्मात यज्ञविधीतून होणाऱ्या पशुहत्येला कंटाळलेल्या आणि बौद्ध धर्माकडे झुकलेल्या कृषीबहुल समाजाला आपल्याकडे आकर्षित करून घेण्यासाठी पशुहत्या रोखण्यापलीकडे जाऊन शाकाहार स्वीकारणे हा एकच पर्याय धर्ममार्तंडांच्यापुढे राहिला होता. तो त्यांनी अंगिकारला आणि तिथून यज्ञात गायी मारणे जवळपास बंद झाले, ब्रम्हवृंद शाकाहारी होत गेला आणि गायीला पवित्र मानणे सार्वत्रिक होत गेले. बिल लिखित 'बुद्धिस्ट रेकॉर्डस इन वेस्टर्न इंडिया' यात इ.स. ४०० मध्ये भारतात आलेल्या चीनी प्रवासी फाहियान याने लिहिलेल्या वृत्तांतापैकी एका वृत्तांतात मथुरेजवळील मध्यदेश नावाच्या प्रदेशाचे जे वर्णन आहे त्यात एक उल्लेख असाही आहे - 'संपूर्ण देशभर इथे कोणीही प्राणीहत्या करत नाही किंवा मद्य पीत नाही, किंवा कोणी कांदा लसूणही खात नाही ! याला अपवाद फक्त चांडाळ लोक आहेत.' या चांडाळांचे जे वर्णन त्याने केलेले आहे ते वर्णन अस्पृश्यांच्या वर्णनाशी मेळ खाणारे आहे. फाहियान भारतात जेंव्हा आला तेंव्हा तो काळ गुप्त वंशाच्या राजवटीचा होता. गुप्त राजे वैदिक चालीरितीकडे कल ठेवणारे आणि ब्राम्हण्यवादाकडे झुकणारे होते. इ.स. ४६५ मधील स्कंदगुप्ताच्या एका ताम्रपटावरील दानपत्रानुसार ब्रम्हहत्या आणि गोहत्या हे समान दर्जाचे गुन्हे मानलेत. स्कंदगुप्ताचा आजा दुसरा चंद्रगुप्त याचा सांचीच्या स्तुपाच्या कठडयावर कोरलेला लेख तर बौद्धांना गोहत्येच्या पातकाचे धाक घालतो. याचा एक अर्थ असाही होतो की पाचव्या शतकाच्या सुरुवातीला गोहत्या हे महापातक असल्याचे जनमनात रुजवले गेले. जे इसवीसनपूर्व काळात निषिद्ध मानले गेले नव्हते. वेद, मनूस्मृती आणि गुप्तकाळ या तिन्ही कालखंडात गोमांस आणि गोरक्षण याप्रती झालेले बदल लक्षणीय आहेत.

इ.स. ६२९ मध्ये भारतात आलेला दुसरा चीनी प्रवासी ह्युएनत्संग याने केलेलं भारतीय जीवनशैलीचे जे वर्णन आहे त्यात गावाबाहेरील जातींचे लोक आणि त्यांची जीवनशैली याचे जे उल्लेख आहेत त्यावरून हे स्पष्ट होते की ६ व्या शतकात अस्पृश्यता अधोरेखित झाली. विशेष म्हणजे गावकुसाबाहेरील या लोकांना गावात मेलेलं कोणतंही जनावर ओढून न्यावे लागे आणि त्याचे मांस खाण्याची त्यांना मुभा असे. यूपाला बांधलेला पशू एकेकाळी खुलेआम मारून स्वाहा केला जात असे त्याचे ३६ प्रकारचे तुकडे कसे आणि कुणाला वाटावेत याचे वर्णन ऋग्वेदशाखा 'ऐतरेय ब्राम्हण'मध्ये आहे, पशु कसा मारावा कसा फाडावा, कसा कापावा कसा खावा याचे वर्णन एकेकाळी जो वर्ग करत होता तोच वर्ग आता गाय अतिपवित्र असल्याचे प्रतिपादन करू लागला. उच्चवर्णीयांनी जेंव्हा मांसाहार वर्ज्य केला तेंव्हा निम्नवर्गीय लोकांनी तो त्यागला नाही कारण ते जिवंत गायीचे मांस खात नव्हते तर मृत गायींचे / पशुंचे मांस खात होते. जे त्यांच्या उदरनिर्वाहाचे पोटभरू साधन होते. महार, चांभार, ढोर यांचा आधी तो अधिकार होता आणि नंतर ती जबाबदारी बनली. गुप्तांनी जर या लोकांना मांस खाण्यापासून रोखले असते तर समाजरचनेतील पायी तुडवलेला हा घटक उपासमारीने तडफडून मेला असता त्यामुळे त्यांना मृत पशूंचे मांस खाण्यापासून कोणी रोखू शकले नाही आणि तसा प्रयत्नही झाला नाही. उलट गोमांस खाणारे आणि न खाणारे असे दोन अंतस्थ वैर वाढवणारे वर्ग यामुळे तयार झाले.

त्या नंतर अनेक शतके हे समज तसेच दृढ राहिले. जगभरात विज्ञानाचे वारे वाहू लागल्यावर आपल्याकडील अनेक विचारवंतांनी या प्रमेयांना हादरा दिला. .सावरकरांनी तर गाय हा उपयुक्त पशू असून त्यात देवत्व नसल्याचे प्रतिपादनही केले. एकमेकांच्या धर्माचा व धार्मिक श्रद्धांचा आदर हा झालाच पाहिजे पण आपल्या श्रद्धा इतरेजणांवर लादू नयेत हे ही खरे आहे. दीक्षाभूमीवर दीक्षा घेतल्याच्या दुसऱ्या दिवशी भाषण करताना आंबेडकर म्हणाले होते की, "ज्या लोकांना गाय पवित्र वाटते ते लोक मेल्यावर गाय नेण्यासाठी आम्हाला बोलवतात. ते जशी गाय, म्हैस देतात तसेच त्यांनी त्यांची म्हातारी मेली तर तिला का ओढू देत नाहीत ?" विज्ञानाने इतकी प्रगती केली की मानवी जीवनमान बदलले. मूळ धर्मसंहितेत नसलेले अनेक गृहीतके. सिद्धांत आजकाल सप्रमाण नाकारले जात असताना आता पुन्हा गायीच्या नावावर ध्रुवीकरण केले जात आहे. खरे तर हा धार्मिक श्रद्धांचा भाग नव्हता पण तो तसा मांडला व लादला गेला. हा मुद्दा वर्चस्ववादाचे राजकारण करण्यासाठी उपयोगी पडतो. एका सहस्त्रकात याच्या आधारे जातीभेद केला गेला आता धर्मभेद केला जातोय आणि जग मूकदर्शक होऊन बघत राहिले आहे. यावर मत नोंदवणेही अनेक जण टाळतात. घटनेने जे आहार, विहार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य अधिकार सर्वांना दिले आहेत त्याचे काटेकोर पालन जरी झाले तरी हा वर्चस्ववाद पंगू होऊन जाईल. पण समस्या सोडवायची नसेल तर उत्तर शोधण्याचा आटापिटा कोण करेल ?

- समीर गायकवाड