Sunday, February 25, 2018

श्रीदेवी - नीले नीले अंबर पर चांद जब आ जाये..


काल 'ती' गेल्यावर सर्वात आधी प्रतिक्रिया देणाऱ्या लोकात अमोल पालेकरांचा समावेश होता याचे अनेकांना आश्चर्य वाटेल. पण त्याला कारणही तसेच होते. लकवा मारलेल्या फुम्मन (अमोल पालेकर) या कुरूप अजागळ नवऱ्याच्या उफाड्याच्या बांध्याची षोडश वर्षीय पत्नी मेहनाची भूमिका तिने एका चित्रपटात केली होती ! १९७८ मध्ये आलेला हा चित्रपट होता 'सोलवा सांवन' ! याचे तमिळ व्हर्जन (पथीनारु वयतीनील - सोळावा श्रावण ) तिच्याच मुख्य भूमिकेने अफाट गाजले होते. त्यात रजनीकांत आणि कमल हासन होते.  हिंदीत मात्र अमोल पालेकरांसोबत हीच केमिस्ट्री जुळली नाही. ती काही फारशी रूपगर्विता वगैरे नव्हती. तिचे नाक किंचित फेंदारलेले होते, ओठही काहीसे मोठे होते, वरती आलेले गोबरे गाल, कुरळे केस आणि बऱ्यापैकी सावळा रंग असा काहीसा तिचा इनिशियल लुक होता. तिचे सुरुवातीचे तेलुगु - तमिळ सिनेमे पाहिल्यावर हे लगोलग जाणवते. मात्र तिच्याकडे काही प्लस पॉइंट होते, कमालीचे बोलके डोळे, काहीसा सुस्कारे टाकल्यासारखा खर्जातला आवाज, सशक्त अभिनय आणि अत्यंत आखीव रेखीव आकर्षक देहयष्टी ! तिने स्वतःच्या रुपड्यात आमुलाग्र बदल करत 'रूप की राणीत' कधी कन्व्हर्ट केले कुणालाच कळले नाही. काल ती गेल्यावर याची जाणीव प्रकर्षाने झाली.


Saturday, February 17, 2018

पीएनबी घोटाळयाची जबाबदारी कुणावर ?


१९ मे १८९४ रोजी लाहोरच्या अनारकली बाजारात मुख्य कार्यालयासह पंजाब नॅशनल बँकेची नोंदणी झाली होती. हा काळ फाळणीपूर्व भारतातला संघर्षकाळ होता. वसंत पंचमीच्या एक दिवस आधी १२ एप्रिल १८९५ रोजी बँकेची शाखा सुरू झाली. त्या काळातील भारतीय जनमानसाची छाप या संचालक मंडळावर आणि कार्यप्रणालीवर होती. संपूर्णतः भारतीयांच्या पैशाने कामाला सुरुवात करणारी ही पहिली बँक होती. सर्वधर्मसमभावाची प्रेरणा घेऊन एक शीख, एक पारसी, एक बंगाली आणि काही हिंदूंनी मिळून बँकेचा पाया रचला होता. यातही लोककल्याणाचा विचार करत बँकेचे नियंत्रण इतर शेअरधारकांकडे असावे याकरिता सात संचालकांनी अत्यंत कमी शेअर घेतले होते. या कामी महान स्वातंत्र्यसेनानी लाला लजपतराय यांच्या मार्गदर्शनाखाली पंजाबचे पहिले उद्योगपती लाला हरकिशन लाल यांनी पुढाकार घेतला होता. त्यांना ट्रिब्यूनचे संस्थापक दयालसिंह मजेठिया सुलतानचे श्रीमंत प्रभूदयाल यांच्यासह अनेक विख्यात लोकांनी स्वतःला सामील केलं होतं. या बँकेत महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री यांच्यासह जालियनवाला बाग समितीचेही खाते होते.Friday, February 16, 2018

'फिल्लमबाजी'तले कललेले दिवस...आमच्या सोलापुरात ओएसिस मॉलमध्ये नुकतेच इ-स्क्वेअरची मल्टीप्लेक्स सुरु झालीत, एकदम चकाचक. गारवा देणारी हवा, बाहेर फ्लॅशलाईटस आणि आत थोडासा अंधुक उजेड असणारया या थियेटरची तिकिटे बहुतांशी पब्लिक ऑनलाईन काढूनच थियेटरला येतं....


Friday, February 9, 2018

फिल्मी शोकांतिकेची गाथा....देखणी केट विन्स्लेट,राजबिंडा लिओनार्डो डीकॅप्रीओ आणि जेम्स कॅमेरूनच्या दिग्दर्शनासाठी टायटॅनिक किमान पंचवीसेक वेळा तरी पाहिलाय. दर वेळेस शेवट पाहताना भारावून जायला होतं. उत्तर अटलांटीक समुद्राच्या रक्त गोठवणाऱ्या पाण्यात ती अजस्त्र बोट जलसमाधी घेते आणि हजारो जीव तिच्या सोबत आपली स्वप्ने त्या काळ्या निळ्या पाण्यात विरघळवत तळाशी जातात. काही जीव कसेबसे तरतात. एकाच माणसाचं वजन झेपू शकेल अशा एका अलमारीच्या फळकुटावर रोझ पडून आहे. तिचे श्वास धीमे होत चाललेत. ती अर्धवट बेशुद्ध व्हायच्या बेतात आलेली आहे हे जॅकने ओळखलेलं. त्या लाकडावर हात टेकवून त्या थंडगार पाण्यात तो उभा तरंगतोय. तिने भान हरपू नये म्हणून बोलण्यात गुंतवून ठेवतोय. खरं तर त्याला तिथून सरकणं शक्य होतं पण तो तिला सोडून जात नाही. तिनं जगावं म्हणून तो पाण्यात उभा आहे, तिनं गिव्ह अप करू नये याचं प्रॉमिस त्याने घेतलंय. तिचा हात त्याच्या हातात आहे. त्या हाताची ऊब आणि त्यातून जाणवणारे तिच्या काळजाचे ठोके हीच काय ती त्याची उर्जा, त्यावर तो तरून आहे.


Saturday, February 3, 2018

राजाच्या दरबारी - दुखवटा !


मिशावर ताव देत भालदार आरोळी देतो, "सावधानमेहरबानकदरदानराजाधिराज सिंहासनाधिश गप्पेश्वर संस्थांननरेश राजा अर्धचंद्रजी यांचे आगमन होत आहे !! " 
चोपदार ( भालदाराला ढूसणी देत बारीक आवाजात )  - "ते बारदाण म्हणायचं विसरलास की !"
भालदार - (ओठात जीभ चावत)  - "खरंच की राहिलं गड्या." 
जबडा हलवत पोटावरून हात फिरवट महाराज आपल्या आसनावर आरूढ होतात.
चुटकी वाजवून इशारा देतात आणि दरबारातील कामकाजास सुरुवात होते. 


वाहनप्रणालीच्या परिवर्तनाची नांदी....'द इकॉनॉमिस्ट'मध्ये कार उद्योगाच्या बदलत्या चेहऱ्यावर वेधक भाष्य करणारा एक रोचक लेख नुकताच वाचनात आला. जगभरातील कार उद्योग कशी कात टाकतो आहे यावर प्रकाश टाकतानाच भविष्यातील कारचा चेहरा कसा कॅरेक्टराईज्ड असणार आहे याची एक झलक त्यात दिसून आली. आदिमानवाचा इतिहास पाहू जाता अश्मयुगापासून माणूस स्वतःची हत्यारे बनवताना नजरेस पडतो. ताम्रयुगात त्याची धातुशी जवळीक वाढली. चाकाचा शोध लागेपर्यंत वाहतुकीसाठी चतुष्पाद प्राण्यांचा वापर केला. वेगवेगळ्या खंडात त्या त्या भौगोलिक रचनेनुसार माणसाने प्राण्यांवर हुकुमत मिळवत त्यांचा वापर साधन म्हणून केला. चाकाचा शोध लागल्यावर माणसाने रथांची निर्मिती केली, टांगे, चाकगाड्या निर्मिल्या. विशेष म्हणजे चाके असलेली ही वाहने चालवण्यासाठी त्याने प्राणीच जुंपले. जेंव्हा इंजिनाचा शोध लागला तेंव्हा माणसाने स्वयंचलित वाहने वापरण्यावर भर दिला. प्राणी जुंपून चालवल्या जाणाऱ्या वाहनातील प्रवासात आणि इंजिनाच्या वाहनातील प्रवासात वेळेचा प्रचंड फरक होता.