शुक्रवार, १२ ऑगस्ट, २०१६

चित्रकवी - वसंत आबाजी डहाके ....आता डोक्यात चंद्र घेऊन उभं राहायचं विठ्ठलासारखं,
कमरेवर हात ठेवून.
नाही तर विष्णूसारखं पडून
राहायचं पाण्यावर तरंगत.
चांदणं पाझरत राहील आत आत
सगळ्या नळ्यांमधून सावकाश.
आपलं शरीर इथं सापडतं
संतांना विठ्ठल सापडल्यासारखं.

‘टाटा मेमोरिअल हॉस्पिटल'मधून वावरताना कवी वसंत आबाजी डहाके यांना सुचेलेली ही कविता 'चित्रलपी' या काव्यसंग्रहातील आहे. या काव्यसंग्रहास साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता...

बुधवार, १० ऑगस्ट, २०१६

नावाची 'जन्म'कथा.....घटना फार जुनी नाही. माझ्या एका मित्राला मुलगी झाली अन त्याने विचारले की माझ्या चिमुकल्या डिअर डॉटरसाठी काही नाव सुचवशील का ?
मी काहीच बोललो नाही मात्र थोडा विचारात पडलो. थोडा मागे भूतकाळात गेलो ….
खरे तर आजकालची नावे काहीशी क्लिष्ट, अगम्य, दुर्बोध तर असतातच पण त्यातलं मराठीपण हरवत चालले आहे. शिवाय भावंडांना हाक मारण्यासाठी दादा, ताई, अक्का, जिजी, माई, भाऊ अशी संबोधनेही वेगाने लोप पावताना दिसताहेत. आईबाबांच्या ऐवजी मॉम डयाडची ब्याद कमी होती की काय म्हणून ड्यूड, ब्रो, सिस, बेबी याचं फॅड सगळीकडे वाढलंय ! या आंग्लाळलेल्या संबोधनात भर घालण्याचे काम प्रेमीयुगुलंही नेटाने करताहेत. वानगीदाखल बोलायचे झाले तर काही मुली दिवसभरातून (चार वेगवेगळ्या) मित्रांना माझं पिलू, माझं कोकरू असल्या नावाने आळवत असतात. तर मुलंही मागे नसतात तेही अनेकींना एकाच वेळी सनम, जानम, जानू, पाखरू अशा नावांनी आळवत असतात. सखी आणि मित्रही हरवले आहेत. तिथे रुक्ष फ्रेंड आलेय.

मंगळवार, २ ऑगस्ट, २०१६

पुरुषी वासना आणि सखाराम बाईंडर......


पुरुषी विकार-वासना ह्या कधी प्रकट तर कधी अप्रकट स्वरुपात असतात. ह्या वासना कधीकधी पुरुषाचा कब्जा घेतात अन त्याच्या जीवनात रोज नवे नाट्य घडू लागते.
इतर लोकांना कधी बलात्कार वा अन्य अनैतिक बाबीतून हे नाट्य जाणवत राहतं. एखाद्या पुरुषाच्या मनात किती व कोणते वासना विकृती विकार असू शकतात किंवा तो वासनांचे शमन राजरोसपणे बायका ठेवून कसे करतो या बाबी समाजाच्या दृष्टीने नेहमीच औत्सुक्य विषय झाल्या आहेत !
मराठी रंगभूमीवर या अंतहीन पुरुषी वासनांचा वेध एका नाटकाने घेतला होता ते नाटक म्हणजे 'सखाराम बाईंडर'....त्याच्या अनुषंगाने या विकाराचा एक छोटासा धांडोळा...  

मराठी रंगभूमीने कात टाकली होती तेंव्हाच्या एका नाटकाची ही गोष्ट आहे. 
सत्तरचे दशक होते.
‘सखाराम बाईंडर’मधील सखारामचे काम निळू फुले करायचे.
यातील सखारामची एण्ट्री अंगावर काटा आणणारी अशी असायची.
सत्तरीच्या दशकात निळू फुुलेंनी त्यांच्या मुरब्बीपणाने व  इरसाल आवाजात केलेली ती संवादफेक अन त्यात घेतेलेले पॉझेस अगदी प्रेक्षकाचा कलेजा खलास करणारे होते. “हा राजाचा महाल नाही हे सखाराम बाईंडरचे घर आहे” अशी सुरुवात होऊन हा सखाराम प्रेक्षकाच्या डोळ्यातून मेंदूत उतरायचा. 
नाटक पुढं सरकत रहायचं. सखाराम आणि त्याच्या एकापाठोपाठ त्याच्या आठ बायका रंगमंचाचा नव्हे तर नाट्यगृहातील प्रेक्षकांचा ताबा घेत. त्याच्या घरात या सगळ्या बायका राहून मागे पुढे होत निघून जातात अन एक गेली की दुसरी असं चालत राही. लक्ष्मी ही त्याची सातवी आणि चंपा ही आठवी बायको !
ज्या ज्या वेळी घरात सखारामच्या घरात नवीन स्त्री येते किंवा आणली जाते तेव्हा तो तिला या घरात राहताना काय आहे, काय नाही, याची स्वच्छ शब्दांत कल्पना देतो.

सखाराम तिला सांगतो म्हणण्यापेक्षा सुनावतोच - "तोंड शिवराळ आहे. परिस्थिती जेमतेम, पण दोन वेळा खायला नक्की मिळेल. दोन पातळं सुरुवातीला, मग वर्षाला एक. ते पण भारी नाही. मग तक्रार चालणार नाही. घरात सगळं शिस्तशीर आणि बिनचूक करावं लागेल. गलथानपणा घडायला लागला की बाहेरची वाट. गय होणार नाही. नंतर दोष देता कामा नये. आपल्या घरात आपण राजे असतो. गावात जोड्याशी उभे न का करीनात, घर कसं घरासारखं हवं आपल्याला. काय?..."
नाटक पाहताना अडीच तास प्रेक्षक मंत्रमुग्ध होऊन राहायचा. नाटकाला तुफान व्यावसायिक यश मिळाले अन तितकीच वादग्रस्त लोकप्रियता देखील मिळाली. हे यश फक्त त्यातल्या निव्वळ भाषेमुळे, अभिनयामुळे नव्हते तर सखारामचे पुरुषीपण आणि त्याला शांतपणे आव्हान देणाऱ्या लक्ष्मीच्या बाईपणाची शरीर-भाषा यांचे होते. हे द्वंद्व नाटकाला अविस्मरणीय करून गेलं. वासना समजून घेण्यासाठी ही शरीर-भाषा सजगतेने पाहावी आणि ऐकावी लागते.

सखाराम बाईंडर हे विजय तेंडुलकर यांनी लिहिलेले स्त्री-पुरुष संबंधांवरचे एक श्रेष्ठ नाटक. सखाराम बाईंडरमध्ये हाताळलेला स्फोटक विषय रसिकांपर्यंत पोहचविण्यास दिग्दर्शकाला कंबर कसूनच काम करावे लागते. निळू फुले, लालन सारंग या कलाकारांनी या नाटकाचा पहिला प्रयोग १९७२ केला होता. पुढे वाद-विवादांमुळे हे नाटक समाजात सतत गाजत राहिले. इंग्रजी भाषेतही याचे भाषांतर झाले. न्यूयॉर्क शहरातही  दीर्घकाळपर्यंत या नाटकाचे प्रयोग होत राहिले. 

नाटकाचा विषय असलेला बाईंडर वाईला राहायचा, खाणावळ चालवायचा. म्हणजे त्याने त्या वेळी ठेवलेली बाई ती खाणावळ चालवायची. तेंडुलकर या बाईंडराला भेटले होते. त्यांना तो चांगलाच लक्षात राहिला होता. तो तऱ्हेवाईक होता म्हणून नव्हे, तर तो 'खरा' होता, म्हणून. ते त्याच्याविषयी बोलायचे, विचार करायचे. या तुकडयातुकडयांतील विचारांतून ती व्यक्तिरेखा त्यांच्या मनात आकार घेत होती. एके दिवशी संध्याकाळी डॉ. श्रीराम लागू यांच्याशी बोलताना तेंडुलकरांना वाईचा हा बाईंडर आठवला. त्याच्याबद्दल लागूंशी बोलताना कल्पनेत असलेले, नसलेले अनेक तपशील स्पष्ट झाले. त्या बोलण्यातून 'सखाराम बाईंडर' ही व्यक्तिरेखा जन्माला आली. तो नाटकात बोलणार असलेली अनेक वाक्ये तेंडुलकरांना ऐकू येऊ लागली. 

त्याच रात्री तेंडुलकरांनी नाटकाचा पहिला अंक एकटाकी लिहून काढला. सखाराम बाईंडरमधे प्रमुख पात्राचं अगदी सुरवातीलाच भलंथोरलं स्वगत आहे. निळू फुल्यांच्या आवाजातलं हे स्वगत मेंदूला पोखरण्यास पुरेसं होतं. 'बाईंडर'चं नाट्य त्या स्वगतामध्ये नाही. नाटक पाहिल्यानंतर त्या सुरुवातीच्या स्वगताविषयी विचार केला, तर हे लक्षात येतं की त्या स्वगतात अर्थ नाही. म्हणजे, आपण कसे आहोत ह्याविषयी बाईंडरला जे वाटतं ते वेगळं आणि त्याच्या आयुष्यात आलेल्या बायका त्याचं जे काही करतात ते वेगळं. आणि हे कुणी समजावून सांगत नाही, तर आपलं आपण समजून घेतो. तेंडुलकरांच्या अनेक नाटकांमध्ये सुरूवातीला 'मी कोण' हे सांगणारी स्वगतं असतात. 'शांतता कोर्ट चालू आहे' मध्येही बेणारेबाई मी अमुक मी तमुक असं सांगते. अनेक पात्रं घटना सांगतात. पण ते काहीसं नैसर्गिक वाटावं म्हणून आख्ख्या नाटकालाच एका खोटया खोटया वाटणाऱ्या पण तरीही खरोखर समाजात चालणाऱ्या कोर्ट केेसचं स्वरूप दिलेलं आहे.

बाईंडरच्या आधी निळूभाऊंचे देखील फारसे नाव नव्हते. अभिनेता म्हणून प्रसिद्ध होण्यापूर्वी सुरवातीच्या काळात त्यांनी माळी म्हणून पुण्यातील एका मेडिकल कॉलेज मध्ये नोकरी केली होती. “कथा अकलेच्या कांद्याची” हे भाऊंचे पहिले नाटक. या नाटकाचे निळू भाऊंनी जवळ जवळ २००० प्रयोग केले. या नाटकामुळेच भाउंना त्यांचा पहिला सिनेमा “एक गाव बारा भानगडी” मिळाला होता. 'एक गाव बारा भानगडी'च्या झेलेअण्णांच्या भूमिकेनं त्यांना मराठी चित्रसृष्टीची कवाडं खुली झाली. त्यानंतर निळूभाऊंना 'सखाराम बाईंडर' नाटक मिळालं आणि या नाटकानं इतिहास घडवला. निळूभाऊंच्या कारकिर्दीतला मैलाचा दगड असं या नाटकाचं वर्णन करावं लागेल. वास्तविक तेंडुलकर निळूभाऊंना 'सखाराम' पेलवेल का, याविषयी साशंक होते. मात्र, कमलाकर सारंग निळू फुलेंच्याच नावावर ठाम होते. त्यांनी तेंडुलकरांना 'कथा'चा प्रयोग दाखवला. त्यानंतर निळूभाऊंना हे काम मिळालं. 'बाईंडर' आणि त्याचा पुढचा सगळा इतिहास सर्वज्ञात आहे. या नाटकानं निळूभाऊंना आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव मिळवून दिलं. 'कथा अकलेच्या कांद्याची', 'सखाराम बाईंडर', 'सूर्यास्त', 'जंगली कबुतर' या सर्वाचे त्यांनी जवळपास दहा एक हजार प्रयोग केले. त्यातही 'कथा'चे दोनेक, 'जंगली कबूतर'चे दीडेक हजार, 'सखाराम'चे आठशे प्रयोग केले. 

'सखाराम बाईंडर’ या नाटकामध्ये निळूभाऊसोबत १९७२ मध्ये चंपाचे काम लालन सारंग यांनी असं काही साकारलं की त्यांचं सार्वजनिक जीवन ढवळून निघालं. हे त्यांचं पहिलं मराठी नाटक होतं. त्यात वेगळेपणाही होता अन्‌ भूमिका साकारण्यासाठी त्यांना स्वातंत्र्यही दिलं होतं. खरंतर ही भूमिका त्यांच्या व्यक्तिमत्त्वाविरुद्ध होती. त्यांना स्वतःला त्या चंपाची भूमिका इतकी दर्जेदार करतील अन्‌ हे नाटक खूप गाजेल, विशेष म्हणजे हे नाटक इतिहास घडवेल होईल, असं कधीही वाटलं नव्हतं. मात्र ही भूमिका सगळ्याच दृष्टिकोनातून वेगळी ठरली. असो...बाईंडरची कथा हा या नाटकाचा प्राण होता... 

एका झोपडपट्टीत बाईंडर राहतो. तो आपल्या घरी बायका आणतो. अशा सात बायका त्यानं ठेवलेल्या असतात. त्यातल्या काही जणी निघून जातात, तर काहींना त्यानं सोडून दिलेलं असतं. या नाटकातील चंपा त्याची आठवी बायको असते. चंपा म्हणजे सखारामाच्या आयुष्यात आलेलं एक वादळच. त्यालाही चक्रावून टाकणारं. चंपा बिनधास्त आहे. बेफिकीर आहे. आपण आकर्षक आहोत, याचं तिला भान आहे. पुरुष आपल्याकडे आकृष्ट होतात हेही तिला ठाऊक आहे. तिनं जीवनातले बरेच अनुभव घेतले आहेत. 
नवरा नपुंसक असल्यानं तिनं त्याला सोडलं आहे. तीही गरज म्हणूनच सखारामाकडे आलेली असते. त्याच्या अटी ऐकूनही न ऐकल्यागत करते. अरेरावी करणारा, आक्रमक असणारा सखारामही चंपाचं वागणं पाहून अवाक होतो. सखाराम आणि दाऊद, दोघंही चंपावर भाळतात. 
सखारामाला शरीरसुख देण्यास ती नाखुष असते. डोक्यावर छप्पर हवं असेल, तर कोणत्यातरी पुरुषाला शरीर द्यावं लागणारच, या हिशोबानं दारू प्यायल्यानंतरच ती सखारामच्या अधीन होते. खरं तर ती तिच्या पहिल्या नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून सखारामच्या आश्रयाला आलेली असते. ती तिथ मुक्तपणे जगण्यासाठी धडपड करते. चंपावर फिदा झालेला बाईंडर तिला आपल्या घरी कायमचे 'ठेवतो'. ती घरात येताच त्याची आधीची बाई लक्ष्मी घरी परत येते.

ही लक्ष्मी सुरुवातीला सदाचरणी, भाबडी, सहृदय आहे. तिला मूलबाळ नाही, आणि म्हणून पहिल्या नवऱ्यानं तिला टाकलं आहे. सासरी आणि माहेरी तिला कोणी विचारत नाही. जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे. ती देवावर उत्कट प्रेम करते. देवानं निर्माण केलेल्या जीवांवरही प्रेम करते. कावळा, मुंगी-मुंगळ्याशी बोलते. त्यांना खायला देते. ती घरात आल्यापासून देवपूजा, निरांजन लावणं वगैरे गोष्टी गृहिणीप्रमाणे करत असते. आपण गरजू असल्यानं सखारामाकडे राहायला आलो आहोत, याची तिला जाणीव असते. पण त्याचबरोबर आपली व्यक्तिगत जीवनमूल्यं, निष्ठा जपण्याचाही ती प्रयत्न करत असते. गणपतीच्या आरतीला सखारामाचा मित्र असलेला दाऊद तिला नको असतो. हे सारं सखारामाच्या जगण्याला, दृष्टिकोनाला छेद देणारं आहे. सखाराम तिच्यात गुंततो आहे, असं वाटत असतानाच तो तिला हाकलून देतो. लक्ष्मी आपल्या पुतण्याकडे राहायला जाते. मात्र चंपा सखारामच्या घरी येताच तीही तिथं परतते.  

सखारामाच्या घरी परतल्यावर लक्ष्मीला आधी चंपाचा सामना करावा लागतो. 
'चंपा सखारामाच्या शारीरिक मागण्या पुर्‍या करत राहील आणि लक्ष्मी घरातली पडतील ती कामं विनातक्रार करेल', या अटीवर चंपा लक्ष्मीला निवारा देते. 
खरं तर दोघींचे हितसंबंध परस्परविरोधी आहेत. बर्‍यावाईटाच्या दोघींच्या व्याख्याही अगदीच विरुद्ध आहेत. चंपाला सखारामबद्दल अजिबात प्रेम नाही. त्याच्याशी शरीरसंबंधही ती दारू प्यायल्यावरच ठेवू शकते. तिला सखारामाचा केवळ आसरा हवा आहे. लक्ष्मी मात्र सखारामबद्दल सकारात्मक  आहे. पण तरीही चंपा लक्ष्मीचा स्वीकार करून तिला घरात घेते.
लक्ष्मीनं घरात राहणं सखारामाला अजिबात मंजूर नाही. पण चंपापुढे त्याचं काही चालत नाही. लक्ष्मीच्या येण्यानं सखारामामध्ये हळूहळू बदल होत जातो. 
तिला, तिच्या देवांना तो घाबरू लागतो. चंपाशी संबंध ठेवण्यासही तो घाबरू लागतो. चंपा दाऊदशी संधान बांधते. चंपाचे हे बाह्यसंबंधच तिच्या जीवावर येतात. लक्ष्मी सखारामला सावध करू पाहते पण यातच तिच्या हातून चंपाचा खून होतो.    

प्रेमळ असणारी लक्ष्मी शेवटी चंपाचा आपल्या हातून झालेला खून थंडपणे पाहते. चंपा मेल्यावर तिला आनंद होतो. तिचं प्रेत पुरायला ती लगेच जमीन खणू लागते. इतकी क्रूरता तिच्या अंगी कुठून येते? 
लक्ष्मी अशिक्षित आहे. कर्मठ, सनातनी आहे. पहिल्या नवर्‍यानं घरातून हाकलून दिल्यावर सखाराम हाच लक्ष्मीच्या दृष्टीनं तिचा पती. तिचं त्याच्यावर प्रेम आहे आणि अशा आपल्या नवर्‍याच्या घरात आपलं स्थान बळकावून आलेली चंपा, दाऊदासारख्या ’मुसलमाना’बरोबर अनैतिक संबंध ठेवते? 
प्रत्यक्ष देवाशी बेईमानी! 
चंपाच्या या कृत्याला लक्ष्मीच्या जगात क्षमा नाही. 
लक्ष्मी धूर्त आहे. असुरक्षिततेचा भयगंड तिला ग्रासतो आहेच. अशा तणावाच्या अवस्थेत ती ते गुपित सखारामाला सांगते. स्वत:च्या बचावासाठी पशू असाच प्राणांतिक झुंज देतो. 
चंपाचा खून झाल्यावर तिची प्रतिक्रिया : "नाही तरी पापीच होती ती, नरकात जाईल'. तिच्या हिशेबी या बेईमानीला हीच शिक्षा." 
आता पोलादी, कणखर सखाराम हातून पाप घडल्याची जाणीव झाल्यावर संपतो. पार निर्जीव होतो. आणि आतापर्यंत मार खाऊन निर्जीव झालेली लक्ष्मी आपल्या कुंकवाच्या रक्षणासाठी चंपाच्या प्रेताची विल्हेवाट लावण्यासाठी प्रचंड ताकदीने, धैर्याने उभी राहते.

नाटकाच्या शेवटी सखाराम पूर्णपणे पराभूत होतो. मात्र चंपाला मारून मिळवलं काय? रागाच्या भरात चंपाचा खून होतो खरा पण चंपाच्या खुनानंतर लक्ष्मी त्याचा ताबा घेते आणि मनानं, शरीरानं तो सपशेल खचून जातो. 
कावळ्याशी, मुंगळ्याशी बोलणारी लक्ष्मी, त्याची मारझोड सहन करणारी लक्ष्मी आता त्याचा खरडून खरडून होणारा अंत शांतपणे बघते. आपली चूक झाल्याची त्याला कल्पना येते पण आता हताश होण्यापलीकडे त्याच्या हाती काहीच नाहीये.  

'बाईंडर'मधली सखारामची भुमिका जितकी महत्वाची आहे तितकीच महत्वाची भूमिका चंपाची आहे. या भूमिकेच्या मागणीनुसार त्यासाठी लालन सारंगना गावरान अन्‌ शिवराळ भाषा शिकावी लागली. अशा प्रकारची भूमिका यापूर्वी त्यांनी कधीच केली नसूनही ही भूमिका त्या अक्षरशः जगल्या. 

नाटकाचे जेव्हा राज्यभरात प्रयोग सुरु झाले तेंव्हा त्याला प्रचंड प्रतिसाद मिळू लागला अन तितकेच तथाकथित संस्कृतीरक्षकांचे अरण्य रुदन वाढू लागले. कल्याणच्या साहित्य संमेलनात रणजित देसाईंनी या नाटकावर बहिष्काराचा ठराव मांडला. प्रस्तावावर एका शब्दाची चर्चा न होता केवळ आवाजी मतदानाने या नाटकावर बंदी घालण्याची मागणी मराठीतील थोर साहित्यिकांनी केली. मजा म्हणजे त्यांपैकी अनेकांनी हे नाटक बघितलंच नव्हतं. नाटकाचे तेरा प्रयोग झाल्यानंतर सेन्सॉरने या नाटकावर बंदी आणली. 
ज्या काळात रंगभूमीला अतिशय पवित्र मानलं जायचं त्या काळात अखेर पडती भूमिका घेऊन सेन्सॉरला हे नाटक बंद करणं भाग केलं गेलं. 
अर्थातच हे आंदोलन शिवसेनेनं  केलं होतं. 
राज्यभरात अनेक वाद झाले, न्यायालयात खटले दाखल केले गेले. तेव्हा लालन सारंग यांचे पती कमलाकर सारंग जे या नाटकाचे दिग्दर्शकदेखील होते त्यांनी न्यायालयीन लढा दिला. हा लढा सहा महिने सुरू होता. 
त्याच दरम्यान इतर नाटके 'बाईंडर'पायी सोडून दिल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती गुंतागुंतीची झाली असूनही लालन 'बाईंडर' मधून बाहेर पडल्या नाहीत हे विशेष.मात्र या लन्यायालयीन लढ्याला यश आलं. 'सखाराम बाइंडर'चे प्रयोग पूर्ववत सुरू झाले असे वाटत असतानाच, शिवसेनेने झुंडशाहीच्या जोरावर काही प्रयोग बंद पाडले. 
शेवटी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून हे नाटक 'संमत'(!) करून घेतल्यावरच पुढचे प्रयोग होऊ शकले. हा सगळा त्रास सहन केल्यानंतरच त्यातून धडा घेत लालन सारंग व कमलाकर सारंग यांनी मिळून ‘कलारंग’ ही संस्था स्थापन केली. त्यानंतर त्यांनी अनेक नाटकं रंगभूमीवर आणली. अनेक नाटकं गाजलीही. त्यात ‘बेबी’, ‘कमला’, ‘पोलिसनामा’, ‘जंगली कबुतर’ यांसह अनेक नाटकांचा समावेश होतो. 
'बाईंडर'मधल्या कुठल्याच कलावंताने पैसा हे कधीच इप्सित मानले नाही त्यामुळेच की काय बाईंडरमधल्या कुठल्याच कलावंताला कधी कामाची ददात पडली नाही. या नाटकाचा हा सर्व भन्नाट प्रवास कमलाकर सारंग यांनी 'बाईंडरचे दिवस' या पुस्तकात शब्दबद्ध केला आहे.

तेंडुलकरांच्या ‘गिधाडे’ आणि ‘सखाराम बाईंडर’ नी मराठी मध्यमवर्गीय माणसाची मूल्यचौकटच मोडून टाकली. त्यांनी ‘लग्न’ या सामाजिक संस्थेलाच प्रश्नांकित केले. सखाराम बाईंडरचे तत्त्वज्ञान हे ‘लग्न’ या संस्थेसंबंधी चिरकालीनत्वाच्या सामाजिक समजाला छेद देणारे तत्त्वज्ञान आहे. मध्यमवर्गीय माणसाच्या आवाक्यापलीकडचं जग तेंडुलकरांनी या नाटकाच्या निमित्तानं मध्यमवर्गीय माणसाच्या जाणिवेत आणून सोडले. मराठी नाट्यपरंपरेला अपरिचित असलेलं जग तेंडुलकरांनी मराठी रसिकाच्या जाणीवेत आणले याला त्यांची प्रायोगिकता म्हणता येईलच, परंतु परंपरेला माहीत असलेला ऐवजही तेंडुलकरांनी प्रायोगिक केला. ज्या नाटकाने तेंडुलकरांना भारतीय स्तरावर नाटककार म्हणून मान्यता मिळवून दिली, ते नाटक म्हणजे ‘घाशीराम कोतवाल’. मराठी रंगभूमीच्या इतिहासाला वळण देणारे हे अनैतिहासिक नाटक होते. लोकसंगीत हा ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकाचा आत्मा आहे. कीर्तन, तमाशा, लावणी, मुजरा आदी लोककलांच्या वापरातून या नाटकाने हे दर्शवून दिले की, लोकनाट्य आणि वास्तववादी नाटकाच्या सरमिसळीतून समकालीन नाट्य घाटाची निर्मिती होऊ शकते. या नाटकाने हे देखील दर्शवून दिले की, ऐतिहासिक ऐवजातून अनैतिहासिक नाटक घडविता येते. या नाटकातून उपहास, विनोद, हिंसा आणि करुणा यांचा एकत्रित प्रत्यय येतो. लोकरंगभूमीच्या वैशिष्ट्यांचा प्रभावी वापर करणारे ते आधुनिक संवेदनांचे नाटक आहे. लोकरंंगभूमीवरील लवचिकता, ऊर्जा आणि कल्पकता यांचा वापर करून आधुनिक आशय मांडण्यात हे नाटक यशस्वी ठरले आहे. म्हणून हे नाटक मराठी प्रायोगिक रंगभूमीवरील मैलाचा दगड ठरलेे. घाशीरामने पुण्यातील ब्राम्हणी संस्कृतीवर हल्ला केला असे ब्राम्हणांचे म्हणणे तर सखारामने नवी नैतिक अधोगतीची पातळी (हिला खालची सीमा नसते बहुतेक, कारण कितीही पडली तरीही तिला परत अजून खाली पडायला जागा उरलेली असते) गाठली असे काहींचे म्हणणे. दोन्हीही नाटकात स्त्रीपात्रे अगदी पॉवरफुल होती आणि माणसाच्या (पुरुषांच्या?) कामुकतेचे बहुतेक सर्वांना पटणारे दर्शन त्यात होते.  घाशीराम मधली गौरी आणि बाईंडर मधल्या लक्ष्मी आणि चंपी, त्याचप्रमाणे बाईंडरची कामुकता बेडरपणा, आणि नाना फडणविसाचे "ते तुम्ही म्हणजे आम्हाला दुसऱ्याच्या मुलींसारख्या" उद्गार अगदी अंगावर काटा आणतात आणि विचार करायला लावतात, की माझ्यात पण एक बाईंडर आणि नाना आहे का? 
मी असा विचार करू आणि वागू शकतो का? 
कामुकता आणि हिंसाचार अंगावर सर्र्कन्न काटा आणणारा आणि वाचल्यानंतर/ नाटक बघून महिने झाले तरी चटका लावणारे. हे असले लिखाण सोपे नाही किंबहुना अशक्यच आहे. अनंत वेलणकरची तो भीषण मानसिक कुतरओढ, तो त्याचा जमादार बाप आणि शेट्टी आणि त्याचे हसणे. हे राम! 

अर्थात बाईंडर गाजले ते लालन सारंग कशी स्टेजवर लुगडे बदलते, आणि सखारामच्या शिव्या आणि त्याच्या मित्र्याशी "पक्षी" ह्या अर्थाने बायकांचा उल्लेख करून केलेली चर्चा ह्या असल्या गोष्टींमुळे गाजला. 
तर घाशीराम त्यात ब्राह्मणांवर टीका आहे त्यामुळे जास्त वादग्रस्त ठरला, नाना फडणवीस हे असे  नव्हतेच असा प्रतिवाद केला गेला. 
असल्या टीकेमुळे आणि दोन्ही नाटकांवरच्या बंदीमुळे गाजली. सध्याच्या काळात चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी मुद्दाम कॉंट्रोव्हर्शीयल गोष्टी आणि रिएलिटीमधला विटून गेलेला मसाला घातलेला असतो. विविध खानांच्या माकडचाळयांपेक्षा अन चिंधीभर कपडे अंगावर घालून पडद्यावर मिरवणाऱ्या  बाजारू अभिनेत्र्यांच्या हिडीसपणापेक्षा तो काळ कलात्मकदृष्ट्या निश्चितच उजवा होता. मात्र दुर्दैव असं की अशा नाटकांना रंगभूमीवरचं आगमन सुसह्य व्हावं म्हणून स्थापन झालेली 'थियेटर अकेडमी' पुढे जाऊन बंद पडली, काही लोकांनी त्यात बराच आर्थिक तोटा सोसला. त्यापैकीच एक धगधगत्या प्रतिभेचे ज्वालाग्राही लेखन करणारे तेंडुलकर होते. पुढील काळात त्यांना आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय लोकमान्यता मिळाली. महाराष्ट्राचे सामाजिक आणि राजकीय वातावरण ढवळून काढून, देशाच्या रंगभूमी आणि कला ह्या प्रांतात मराठी कलेला अटकेपार घेऊन जाण्याचे काम या दोन्ही तेंडुलकरी नाटकानीच केलं होतं.

मराठी रंगभूमीवर प्रायोगिकतेचे पितृत्व विजय तेंडुलकरांना सार्थपणे बहाल केले जाते. त्यांनी मराठी रंगभूमीवर प्रायोगिक नाटकांची मुहूर्तमेढ रोवली. त्यांनी मराठी रंगभूमीवर एक नवी रंग-परंपरा निर्माण केली. समाजातील सुप्त स्वरूपाची हिंसा आणि लैंगिकता त्यांनी रंगभूमीच्या चव्हाट्यावर मांडली. त्यांना विरोध पत्करावा लागला. अपमान सहन करावे लागले. त्यांच्या नाटकांनी अनेक विवाद निर्माण केले. परंपरावाद्यांनी तेंडुलकरांना नेहमीच असहिष्णूपणे वागवले. पण ते डगमगले नाहीत. त्यांनी व्यवस्थेसमोर शरणागती पत्करली नाही. त्यांच्या वृत्तीप्रवृत्तीला मानवेल तेच आणि तसेच ते लिहीत राहिलेत. नभोनाट्य, एकांकिका, निमव्यावसायिक नाटक आणि काही प्रमाणात व्यावसायिक नाटक असा तेंडुलकरांच्या नाट्यलेखनाचा जवळ जवळ पाच दशकांचा कालखंड आहे. परंतु नाटक कुठल्याही वर्गातले असले तरी प्रत्येक नाटकातून तेंडुलकरांची प्रायोगिकताच प्रकर्षाने जाणवली. पारंपरिकरीत्या जे मराठी रंगभूमीवर दाखवले जात होते ते सारेच त्यांनी नाकारले. त्यांनी नव्यानव्या विषयांना हात घातला आणि नाटकासारखे कृतिप्रधान माध्यम आशयगर्भ केले.

कमीत कमी शब्द, कोर्‍या जागा, टिंबांचा विपुल वापर आणि विरामचिन्हें यातून तेंडुलकरांनी एका वेगळ्याच रंगभाषेची निर्मिती केली. त्यांनी नाटकातून कधीच गोष्ट सांगितली नाही. त्यांच्या नाटकांनी नेहमीच अंतर्मुख करणारा नाट्यानुभव दिला. ते आरंभापासूनच प्रयोगशील राहिले. मध्यमवर्गीय जीवनातील वासनेची, हिंसाचाराची, त्यातून येणार्‍या उद्ध्वस्ततेची गाज त्यांच्या नाटकांतून ऐकू येत राहिली. माणसाला येणार्‍या एकाकीपणाचे भकास-विदीर्ण अनुभव त्यांच्या नाटकांतून अत्यंत प्रभावीपणे व्यक्त होत राहिले. पन्नास वर्षे ते सातत्याने नाटकाच्या रचनेत विविधांगी प्रयोग करीत राहिले. त्यांच्या नाटकांची सर्व भारतीय भाषांत भाषांतरे झालीत. देशभरात त्यांच्या विविध नाटकांचे प्रयोग सातत्याने झालेत. देशातील महत्त्वाच्या रंगकर्मींना तेंडुलकरी नाटक नेहमीच मोह घालीत राहिले. ते केवळ मराठी रंगभूमीवरचे महत्त्वाचे नाटककार नाहीत, तर भारतीय रंगभूमीवरचे अतिशय महत्वाचे नाटककार आहेत. माणसाच्या मनातील आदिम भाव-भावनांचा शोध तेंडुलकरी नाटक सातत्याने आणि अथकपणे पन्नास वर्षे घेत राहिले. त्यांच्या नाटकातील अनुभवांच्या पृथगात्मतेमुळेच त्यांना मळलेली वाट नाकारावी लागली. परंतु त्यामुळे मराठी रंगभूमीवर एक वेगळी वाट निर्माण झाली. याच वाटेवर तेंडुलकरोत्तरी प्रायोगिक नाटक निर्माण झाले आणि बहरलेही.

यंदाच्या दोन फेब्रुवारीला 'सखाराम बाईंडर'ची पन्नास वर्षे पूर्ण झाली . 'सखाराम...' च्या पहिल्या तीन आवृत्त्या कमलाकर सारंग यांनी १९७२ ते १९९५ पर्यंत रंगमंचावर सादर केल्या. हे नाटक पहिल्यांदा वाचल्यानंतर डॉ. श्रीराम लागू आणि अरविंद देशपांडे यांनी त्याचं दिग्दर्शन करण्याची इच्छा तेंडुलकरांकडे व्यक्त केली होती. कमलाकर सारंग तर ते नाटक अगदी आपल्याचसाठी असल्याचा हट्ट तेंडुलकरांकडे करून बसले होते. शेवटी तेंडुलकर, डॉं.लागू आणि देशपांडे यांना म्हणाले की, 'सारंग व्यावसायिक रंगभूमीवर नवा असला तरीही मी हे नाटक त्याला दिलं आहे. तो करणार नसेल तरच तुम्ही ते करा.' या नाटकाचा इतिहास सारंगच्या हातूनच घडावा ही निर्मिकाची इच्छा असावी. तेंडुलकर लोकनिंदेत होरपळलेले, तर लालन आणि कमलाकर सारंग मानसिक, आर्थिक त्रासाने त्रस्त होते. पण यांच्यापैकी कोणीही डगमगलं नाही आणि नाटकाचे प्रयोग अनेक अडथळे पार करत होतच राहिले. या संचांनंतरही पुढच्या दशकात प्रयोग होतच राहिले. अनेक नाट्यसंस्थांना याची भुरळ पडली. विविध संस्थांकडून प्रयोग होतच राहिले; पण त्याची दाहकता संपली होती. पहिल्या शिल्पाची दाहकता सहन करणारे जवळजवळ सगळेच आज हयात नाहीत. मात्र आजही मराठी नाट्यरसिक बाईंडरच्या आठवणीने भरून पावतो.

यातील सखाराम हा पुरुषी वासना विकृतीचं शिसारी आणणारं प्रतिक आहे, जोवर पुरुषी विकृत वासना विकार असतील तोवर सखाराम असणार आहे. आयुष्याच्या कोणत्या न कोणत्या वळणावर या वासना पुरुषाच्या मनाचा ताबा घेतातच. मध्यमवर्गी पांढरपेशी माणूस हे सत्य कधीच स्वीकारत नाही, तो दांभिकपणे तो आपला 'विश्वामित्री' पवित्रा सुरूच ठेवतो. सखारामसारखे काही पुरुष आपल्या वासना खुल्लेपणाने बायका ठेवून शमवत राहतात तर बहुतंशी पुरुष वासनेमुळे हिंसेच्या आहारी जातात. घरच्या बायकांना मारणे, कार्यालयातील सहकारी महिलेचा छळ करणे, सार्वजनिक ठिकाणी केवळ नजरेने स्त्रियांचे शोषण करणे, गरिबी आणि अडचणी याच्या दैन्यचक्रात अडकलेल्या महिला तर सर्वात सॉफ्ट टारगेट ठरतात, लहान बालिकांपासून ते जरठ वृद्धेपर्यंत यांच्या तावडीतून कुणीच सुटू शकत नाही. वासनापासून दूर पळून गेलेले देखील कुठल्या न कुठल्या मार्गे वासनांचे शमन करताना आढळतात. पुरुषांची लैंगिक अतृप्तता अन लैंगिक हिंसा जेंव्हा सर्व सीमा पार करते तेंव्हा त्या पुरुषाचा अंत समीप येतोच. मात्र हे सर्व सहन करणारी स्त्री जोवर पुरुषाला आव्हान देत नाही, त्याच्या समोर उभी ठाकत नाही तोवर ती पिचलेली राहते, तिचे स्थान दुय्यमच राहते.पुरुषी वासनांचे अंतरंग असे ढवळून काढून गेलेल्या सखाराम बाईंडरसारख्या नव्या कलाकृती जोवर लिहिल्या,वाचल्या, पाहिल्या जात नाहीत अन त्यावर साधक बाधक खुली चर्चा होऊन ह्या नागड्या गोष्टीवर मनमोकळे संवाद होत नाहीत तोवर ही पुरुषी वासनांध श्वापदे असहाय स्त्रियांचा छळ करत राहणार हे स्पष्ट आहे. कारण या पुरुषी विकार वासनांना माझ्या मते तर अंत नाही कारण त्या मानवी मनाचा एक भाग आहेत म्हणूनच सखाराम अमर आहे.....

- समीर गायकवाड.

संदर्भ - 'बाईंडरचे दिवस' : लेखन - कमलाकर सारंग