Sunday, July 28, 2019

भाऊसाहेब ..


भाऊसाहेबाला जाऊन एक दशक होत आलंय पण अजूनही गावात त्याचं नाव निघतं. कुणी आदरानं, प्रेमानं, कृतज्ञतेनं तर क्वचित कुणी कुचेष्टेने त्याचं नाव काढतात. पण एक काळ होता की भाऊसाहेबाशिवाय गावाचं पान हलत नव्हतं, नव्हे गाव ठप्प होत होतं. भाऊ दशरथ रास्ते हे त्याचं पूर्ण नाव. त्याचे वडील दशरथ यांना चार भावंडे होती, चौघात मिळून दोन एकर जमीन होती. त्यामुळे थोरल्या दशरथसह तिघे दुसऱ्यांच्या जमिनी कसायला जात, वा जमीन घेऊन खंडाने करत. धाकटा सोमेश्वर मात्र त्यांची स्वतःची जमीन कसे आणि अर्धा हिस्सा त्या तिघांना देई. मिळालेल्या घासात रास्त्यांचं कुटुंब समाधानी होतं. रास्ते मंडळी जितकी कामसू होती तितकीच बेरकी होती, पाण्यावर लोणी काढायची कला त्यांना अवगत होती. लोकाच्या विळ्याचा खिळा होई पण रास्त्यांची मंडळी खिळ्याचा फाळ करत आणि आडवं येणाऱ्याला तोच फाळ लावत ! पण त्यांनी कधी चोरीचपाटी केली नाही की कामचुकारपणाही केला नाही. या बोटावरचं त्या बोटावर करण्यात ते कुशल होते. पैसा कुठं वाचवावा, कुठं काढावा आणि आयजीच्या जीवावर बायजी कसं व्हावं याचं ज्ञान त्यांना चांगलंच अवगत होतं. याच तत्वाला अनुसरून या चारी भावंडांची एका मांडवात लग्नं झाली, शेळीची लेंडं पडावीत तशी घरात पाच वर्षात वीस लेकरं झाली. त्यांच्या घराला लागून असलेली शेळक्यांची खोली त्यांनी लग्नात जानवसघर म्हणून जी घेतली तिचं पुढं जाऊन बाळंतघर झालं. तिथं सदा अंधार असे. आत दोन पलंगावर दोन बाळंतीण बाया बसलेल्या असत. मौसम कुठलाही असो अंगावर वाकळ पांघरून, साडीचा पदर डोक्यावरून गच्च आवळून कानटोपडं गुंडाळून छातीला लेकरू पाजीत बसलेली बाई तिथं ठरलेली असे. पलंगाखालून गवऱ्यांच्या धुरीचा शेक सुरु असेम लेकरांची पीरपीर त्यात रंग भरे. तर या खंडीभर लेकरात सर्वात थोरला होता तो भाऊसाहेब रास्ते !


Thursday, July 25, 2019

जगणं ...

तुझ्या शहरात आता पाखरांचा किलबिलाट तर होतच नाही
खूपच नीरस संध्याकाळ असेल ना !
घराकडे निघालेली माणसं आणि तुडूंब भरलेले रस्ते असंच काहीतरी..
'ती डोळे मिटून म्हटली जाणारी रामरक्षा आता कानी पडत नाही'
अंगणातल्या तुझ्या तुळशी वृंदावनाने कालच निरोप धाडलाय !
घरात आता माणसं कमी असतात, ऐसपैस खोलीत भिंतींशी बोलतात म्हणे.
एकाच डायनिंग टेबलवरती तुम्ही भिन्न वेळांना जेवता
बिछान्यात शेजारीच झोपूनही एकमेकांना अनभिज्ञ असता...

बरं ते जाऊ दे.
मला एक सांग, शेवटची मिठी कधी मारलीस तू बाबांना
आईच्या मखमली गालांचा मुका कधी घेतला, आठवत नसेल नाही का ?
तुझ्या गार्डन एरियातलं हिरमुसलेलं झाड सांगत होतं,
"आता उरलोय मी सेल्फीपुरतं !"

अरे तू मैदानात खेळायचास ना ?
तळ्यातल्या पाण्यात पाय सोडून बसताना दंग होऊन जायचास
सोनेरी स्वप्नांच्या रुपेरी कथा सांगायचास
कुणी चिडवलं तरी खळखळून हसायचास
तेंव्हा तुझे मोत्यासारखे दात आकर्षित करायचे
आता यंत्रवत आखीव रेखीव वागत असतोस.

वाचनखुणा म्हणून पानं दुमडून ठेवून कैक पुस्तके तू एकाच वेळी वाचायचास,
आता पुस्तकांवरची धूळही तुझ्या नजरेस पडत नाही, खरंय का हे ?
मित्रा तू वाचणं विसरलेला नाहीस,
तू तर जगणंच विसरलास !

- समीर गायकवाड


Sunday, July 21, 2019

अखेरचा स्पर्श..


"आमच्या अन्याबाला कुटं बगितलंस का रे बाबा ?" डोक्यावरून घेतलेल्या इरकली साडीचा पदर ओठात मुडपून डोळ्यात पाणी आणून कापऱ्या आवाजात अक्काबाई विचारत असे. समोरचा हसत विचारे, "कोण पावल्या का ?" यावरचा तिचा होकार असहायतेचा असे. मग त्या माणसाने 'दाव'लेल्या जागी अक्काबाई घाईनं जायची. हे दृश्य महिन्यातून एकदा तरी गावात दिसे. चालतानाची तिची लगबग लक्षणीय असे. म्हाताऱ्या अक्काबाईच्या वयाची चर्चा गावात नेहमीच व्हायची. म्हातारी अजून वाळल्या खारकेसारखी टिकून आहे असं हमखास बोललं जायचं. माथ्यावरची चांदी विरळ झाली असली तरी मस्तकावरचा पांडुरंगाचा हात अक्काबाई टिकवून होती. अक्काबाईच्या समवयीन बायकांनी आपला जीवनप्रवास केंव्हाच संपवला होता. तिच्या वयाची पुरुष मंडळीदेखील एकदोनच होती ती देखील गलितगात्र होऊन गेलेली. नव्वदीत गेलेली अक्काबाई मात्र लिंबाच्या काटकीसारखी टकटकीत होती. असं असलं तरी तिच्या तळव्यातली साय आणि डोळ्यातली गाय शाबित होती. बोटांची लांबसडक पेरं चिंचेच्या आकड्यासारखी वाकडी तिकडी झाली होती, तळहातावरच्या रेषांनी हात पोखरायचा बाकी ठेवला होता. मनगट पिचून गेलेलं असलं तरी त्यातली ताकद टिकून होती, मनगटापाशी असलेलं कातडं लोंबायचं, त्याचा स्पर्श झाला की गायीच्या गळ्याच्या रेशमी कांबळीस शिवल्यागत वाटायचं. वर आलेला पाठीचा कडक कणा स्पष्ट दिसत होता, ढोपराची हाडे टोकदार होऊन बाहेर डोकावत होती. तरातरा चालताना तिने काष्ट्याचा सोगा वर ओढलेला असला की लकालका हलणाऱ्या गुडघ्याच्या वाट्या लक्ष वेधून घेत. नडगीचं हाड पायातून बाहेर आल्यागत वाटे, पिंडरीचं मांस पुरं गळून गेलेलं. पोट खपाटीला जाऊन पाठीला टेकलेलं. अक्काबाईचा चेहरा मात्र विलक्षण कनवाळू ! तिच्याकडे पाहता क्षणी काळीज डोळ्यात येई. तिच्या हरणडोळ्यात सदैव पाणी तरळायचं. थरथरत्या ओठातून शब्द बाहेर पडण्याआधी धाप बाहेर पडायची. पुढच्या दोनेक दातांनी राजीनामा दिलेला असला तरी दातवण लावून बाकीची मंडळी जागेवर शाबूत होती. अक्काबाई बोलू लागली की तिच्या कानाच्या ओघळलेल्या पातळ पाळ्या टकाटका हलायच्या, हनुवटी डगमगायची. बोलताना समोरच्याच्या नजरेत डोळे घालून बोलणारी अक्काबाई मृदू आवाजाची आणि मितभाषी होती. खोल गेलेल्या डोळ्याखालच्या काळया वर्तुळातून तिची चिंता उमटायची. अक्काबाईचं बोडखं कपाळ डोळ्यात खुपायचं, त्यावरची आठयांची मखमली जाळी रुखमाईसमोरच्या स्वस्तिक रांगोळीसारखी भासे.


Sunday, July 14, 2019

भिजलेलं पितांबरगावाच्या मधोमध असणारं सुतार आळीतलं विठ्ठल मंदिर नेमकं कधी आणि कुणी बांधलंय याची अचूक माहिती गावातल्या पिकल्या पानांनाही नव्हती. वेशीपासून ते गावाच्या कोपऱ्यांनी चौदिशांना असणाऱ्या छोटेखानी गल्ल्यांतून मंदिर समान अंतरावर होतं. मंदिर बरंच जुनं असल्याने जीर्ण झालेलं. कधी काळी ते भव्य असावं, त्याची बांधणी आता ढासळण्याच्या बेतात आलेली. माळवदावर कुणी पाय जरी ठेवले तरी खाली माती पडू लागली होती. सभामंडपाची शान गेली होती. त्याला आधार देणाऱ्या लाकडी खांबांनाच सहारा देण्याची गरज वाटावी अशी स्थिती होती. त्या खांबांच्या बारीक ढलप्या उडाल्या होत्या, त्यांना चिरा पडल्या होत्या. कधी काळी त्यावर असलेला लालभडक रंग पुरता मिटून गेलेला, त्याचे अवशेष खांबांच्या एकदम टोकाला छतापाशी नजरंस येत. भिंतींचे दगड बऱ्यापैकी निसटले होते. त्या आडून माती, चुना, मुरूम बाहेर डोकावत होता. पायऱ्यांचे दगड निम्मे अर्धे गायब झालेले तर बाकीचे ढासळलेले. पायऱ्या म्हणून दोन दोन आडमाप दगडांच्या रांगा उरल्या होत्या. त्यावर पाय ठेवून मंदिरात जाणं हे दिव्य असे, पोरा ठोरांना थोडं फार जमायचं पण म्हाताऱ्या कोताऱ्यांची अब्दा व्हायची. गाभाऱ्यात एका विशिष्ठ कुबट दर्पाचा घमघमाट भरलेला असे. तिथं साठ वॅटच्या जुन्या टंगस्टनच्या काचेरी बल्बचा तांबूस पिवळा उजेड थिजल्या अवस्थेत असे.शेजारी शेजारीच असलेल्या विठ्ठल रुखमाईच्या मुर्त्या बऱ्यापैकी ठिसूळ झालेल्या. त्यांची काया पुरती तेलकट झालेली, अंगावरची वस्त्रे जुनाट झालेली. रोज नित्यनेमाने अर्पण केल्या जात असलेल्या हार फुलांचा, तुलसी मंजुळांचा वेगळा गंध तिथं जाणवे, ही फुलं सुकून त्याचं निर्माल्य झालं की त्यावर माशा घोंघावू लागत. त्यातले बारीक सारीक किडे सगळ्या गाभाऱ्यात पसरत. गाभाऱ्याच्या भिंतींना दिलेला रंग नेमका कोणता असावा असा प्रश्न पडे, दर साली दिलेले रंग एकात एक मिसळून तपकिरी निळसर रंग भितींवरून ओघळायचा, होय ओघळायचाच !


Monday, July 1, 2019

'लग जा गले'ची दर्दभरी दास्तान...२००८ ला कोलकत्यातल्या रेड लाईट एरियात गेल्यावर तिथल्या एका बंगाली गायिकेने फार सुंदर आवाजात 'लग जा गले के फिर ये हंसी रात हो न हो ...' हे गीत ऐकवलं होतं. ऐकताक्षणापासून काही केल्या त्या आवाजाने पिच्छा सोडला नव्हता, त्या मुलीच्या आवाजात प्रचंड वेदना जाणवत होत्या.. आठवड्यानंतर तिथून निघण्यापूर्वी पुन्हा एकदा तिला भेटावं म्हणून दरबार एनजीओच्या कार्यकर्त्यासोबत तिच्या बगानवाडीवर गेलो तर वाईट बातमी कानावर आली होती. तिने पंख्याला ओढणी बांधून जीव दिला होता. कुणाच्या आठवणीने ती इतकी शोकाकुल झाली होती हे उमगलेच नाही. तेंव्हापासून हे गाणं माझ्यासाठी हॉन्टेड सॉन्ग झालं होतं. काही काळानंतर राजाजींची माहिती कळली आणि मग हे गाणं आवडत असूनही आपण होऊन ऐकणं बंद केलं. कुठं कानावर पडलं की मग मात्र राहवत नाही. 'लग जा गले...' हे नुसतं गाणं नसून त्यात दोन जीवांच्या भावना कैद आहेत !