![]() |
| तुम्हाला असं कुणी मान वेळावून पाहिलंय का ? |
नेहमीच तिच्या अंगावर प्लेन सिंगल कलर्ड लेहंगा चोळी आहे, तर त्याचे सर्व शर्ट नक्षीदार आहेत. तिचे कलर्स मंद फिकट आहेत तर त्याच्या शर्ट्सचे कलर काहीसे भडक आहेत. त्यानं शर्टला कॉन्ट्रास्ट पॅन्ट घातलीय तर तिच्या आवळ ब्लाऊजला मॅच होणारा दुपट्टा तिला शोभून दिसतो. कधी ती एक वेणी घालते जणू नागीण सळसळते ! तर कधी दोन वेण्या तर कधी अंबाडा बांधते. मात्र तिच्या केसांतला गजरादेखील आकार बदलतो. कधी तो दुपेडी आहे तर कधी सरळ वेणीला पिळे घेणारा आहे तर कधी अर्धवर्तुळाकार आहे. तिच्या गजऱ्यातल्या मोगरकळ्या तिच्यासारख्याच टवटवीत तजेलदार आहेत. तिच्या चेहऱ्यावर रंगरंगोटी दिसत नाही. या बाबतीत त्याचा तर प्रश्नच नाही. दोघानांही रूढार्थाने फेस व्हॅल्यू नाही. कथित देखणेपणाच्या चौकटबद्ध फिल्मी व्याख्येत ते चपखल बसत नाहीत. नायकाला असतो तसा सिक्स पॅक ऍब्जवाला स्टायलिश देखणा लूक त्याच्या तर गावीही नाही. नायिकेसाठी आवश्यक असणारी कोणतीच गणिते तिच्या अंगी नाहीत. तरी देखील ती दोघं आपल्याला खुपत नाहीत ! असं का ? याचं उत्तर प्रेझेंटेशनमध्ये आहे !



















