पोस्ट वाचण्याआधी एक सवाल प्रत्येकाने आपल्या मनाला विचारावा. आपल्याकडील किती महिला आपली इच्छा नसताना देखील आपल्या पार्टनरसोबत सेक्स करतात आणि त्यांची इच्छा असताना पार्टनरने सेक्स न केल्यावर त्याला त्याची जाणीव करून देतात ? किती पुरुष फक्त आपल्या इच्छेनुसारच सेक्स करतात का कधी पार्टनरच्या इच्छेनुसारही सेक्स करतात ? यावरच्या तिच्या प्रतिक्रिया त्यांनी कधी जाणून घेतल्यात का आणि त्याचा विचार कधी केलाय का ? याची बहुतांश उत्तरे नकारार्थीच येतील. ही पोस्ट अशा विचारांवर प्रकाश टाकणाऱ्या सिनेमावर आहे. असो. आपल्याकडच्च्या काही लोकांना आपला नसलेला संस्कारीपणा दाखवायची खोड असते, सोबत आपण किती सभ्य आहोत आणि आदर्श समाजविचारांचे प्रणेते आहोत हे दाखवण्याची केविलवाणी धडपड असते. आपले सेन्सॉर बोर्ड यात आघाडीवर आहे. २६ ऑक्टोबर २०१६ ला वर्ल्ड रिलीज झालेल्या 'लिपस्टीक अंडर माय बुरखा'ला आपल्या देशात सेन्सॉरने रिलीज होऊ देण्यास नकार दिला होता. याची कारणे होती - चित्रपटात सेक्सुअल सीन्स आहेत, शिव्यांचा भडीमार आहे, संवादात अश्लीलता व अर्वाच्चता आहे.
शेवटी न्यायालयीन लढाईची वेळ
आल्यावर सेन्सॉर बोर्डने तब्बल २७ बदल केले. काही संवाद म्युट केले, काही दृश्ये वगळली तर काही संदर्भदर्शी वाक्ये उडवून लावली. अखेर
२१ जुलैला चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्याने ढोंगी समाजासह सेन्सॉरचाच बुरखा
फाडला.सेन्सॉरने म्हटले होते की, 'हा अतिरंजित स्त्रीवादी फँटसीचा
चित्रपट आहे ज्यामुळे काही विशिष्ट वर्गाच्या भावना दुखावू शकतात.' या चित्रपटामुळे महिलांचे वर्तन बिघडेल आणि सामाजिक जडणघडणीवर
प्रभाव पडेल अशी भीती व्यक्त केली होती. प्रत्यक्षात चित्रपटातली हकीकत आणि
देशातले वास्तव उलटे आहे. 'लिपस्टिक अंडर ..' हा एक स्त्रीप्रधान चित्रपट आहे आणि यातील स्त्रिया स्वतःच्या मर्जीने
जगू शकत नाहीत. कुठली न कुठली बंधने त्यांना आडवी येतात किंवा त्यांच्या गळ्यात
संस्कृतीच्या नावाखाली मर्यादांची लोढणी बांधली जातात. चित्रपटात जे दिसते तो
समाजाचा आरसा आहे याचा सेन्सॉरला विसर पडला असावा आणि या चित्रपटामुळे दांभिक
पुरुषी वर्चस्ववादी समाजरचनेचे ढोंग उघडे पडेल असे सेन्सॉरला वाटले असावे. असो.
अभिनेत्री कोंकणा सेन शर्माने शिरीन
अस्लम ही तीन पोरांची आई साकारली आहे. तिच्या पतीच्या दृष्टीने ती फक्त शय्यासुखाचे साधन आहे, त्याच्यासाठी त्यापलीकडे तिचे
अस्तित्व नाही. आपल्या नवऱ्याचा हा बिस्तरबाज अंदाज तिला ठाऊक आहे. तरीही
त्याच्याशी प्रामाणिक असते पण तिच्या आयुष्यात एक वळण असे येते की तिला स्वतःचं मत
मांडावं वाटतं. या भूमिकेत असणारं भोळेपण, अगतिकता आणि शेवटी जाणवलेला आक्रोश
तिने छान व्यक्त केला आहे. अभिनेता सुशांत सिंगने कोंकणाच्या पतीची रहीमची भूमिका
अत्यंत दमदारपणे साकारली आहे. त्याची देहबोली विलक्षण बोलकी वाटते.
अहाना कुमराने लीला ह्या तरुणीची
भूमिका केली आहे. लीला आपला प्रियकर आणि ज्याच्याशी तिचा वाड्निश्चय झालेला आहे तो
भावी पती यांच्या कात्रीत सापडली आहे. यात तिचे मन कुठेच दिसत नाही. सारी
इतरेजणांची मर्जी. अहनाच्या डोळ्यात एक नखरेलपणा आहे आणि तिच्या चेहऱ्यावर एक
तरतरीतपणा आहे जो या भुमिकेला चपखल शोभला आहे. विक्रांत मेसीने तिच्या प्रियकराची
भूमिका केली आहे तर मराठमोळ्या वैभव तत्ववादीने तिच्या नियोजित वराची भूमिका
ठीकठाक केलीय.
चित्रपट पाहताना प्रेक्षक अनेकवेळा
शेरेबाजी करून प्रसंगातील गांभीर्य नष्ट करून सिनेमाची आणि स्वतःची चव घालवतात.
प्रेक्षकवर्गात महिलांची संख्या उल्लेखनीय ही बाब आशादायक वाटते. काही प्रसंग आणखी
उठावदार करता आले असते ही एक खंत वगळता नाव ठेवण्याजोगे काही आढळत नाही. अलंकृता
श्रीवास्तवने दिग्दर्शनासोबत कथा - पटकथालेखनाची जबाबदारी सांभाळली असल्याने
सिनेमा प्रारंभापासून ते अंतापर्यंत लय हरवत नाही. दिग्दर्शिकेचे विशेष कौतुक
यासाठीही केलं पाहिजे की इतका गंभीर आणि उपेक्षित विषय मांडताना तो बोजड व
प्रबोधनवादी बाजाचा होऊ न देता आपल्याच आजूबाजूचे प्रत्ययकारी चित्रण वाटावं इतका
टोकदार झालाय. स्त्रीचे सुख ठरवण्याचा अधिकार स्त्रीला कधी मिळेल असे प्रश्नचिन्ह
मूक व्यवस्थेसमोर उभं करून चित्रपट संपतो तेंव्हा प्रेक्षक कमालीचे अस्वस्थ झालेले
पाहायला मिळाले. एका वेगळ्या विषयावरचा चित्रपट पाहिल्याचे समाधान या चित्रपटातून
मिळते. पण सोबतच आपण अशा स्त्रीशोषक व लिंगभेद करणाऱ्या समाजाचे एक कणाहीन घटक
आहोत याची टोचणीही मिळते.
सेन्सॉरने अडवलेल्या / काटलेल्या / बदललेल्या सीन्सची लिस्ट-
छोट्या शहरांत राहणाऱ्या चार
स्त्रियांचं कथानक यात आहे. या चौघी जणी आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणावर पोहोचल्या
आहेत, त्यांचे वयोगट भिन्न आहे, राहणीमान आणि विचारसरणीही भिन्न आहे.
मात्र त्यांच्यात एक समानता आहे ती म्हणजे त्या चौघींनाही त्यांच्या स्वप्नांना
वास्तवाचे पंख लावायचे आहेत. ही स्वप्ने प्रेमाची आहेत, शरीरसुखाची आहेत, वरवर किरकोळ वाटणाऱ्या परंतु
स्त्रीसुलभ विचारांच्या अस्मितेच्या दृष्टीने आधारभूत वाटणाऱ्या मुद्द्यांना या
स्वप्नांत स्थान आहे. ज्या समाजात घरातला पुरुष सांगेल तोच स्वयंपाक बनवला जातो
आणि नवऱ्याच्या मर्जीनुसारच शरीरसुखाचे मनसुबे रचले जातात त्या समाजात या चौघींची
स्वप्ने पूर्ण होणे किंवा त्यांची वाच्यता करणे देखील कठीण कार्य आहे. मात्र 'लिपस्टिक'ने ही कमाल साध्य करून दाखवली आहे.
पुरुषासाठी ताट आणि खाट मग बाईसाठी काय या प्रश्नाचा आसूड हा सिनेमा उगारतो हे
याचे निर्भेळ यश म्हणावे लागेल. या सारया गोष्टीत 'तिची' मर्जी आपण कधी जाणून घेणार आहोत की
नाहीत की संस्कृतीच्या नावाखाली तिचे शोषण करत राहणार आहोत हा विचार करणं आपल्याला
भाग पडतं.
या चौघीजणी वेगवेगळ्या जातधर्माच्या
आणि भिन्न सामाजिक रचनेच्या प्रतिनिधी आहेत. खरेतर त्यांचे आपसातील विचार देखील
मेळ खात नाहीत. कुठेतरी त्यात उन्नीसबीस नक्कीच होते. पण काळाच्या ओघात आपले
पॉझिटिव्ह पॉईंटस, आपल्या उणीवा आणि अविश्वसनीय हिंमत
याच्या जोरावर त्या स्वतःच्या आयुष्यावर कसा ताबा मिळवतात हे बघण्यासारखं आहे.
डोक्यावरचा बुरखा प्रत्येक स्त्रीने काढला पाहिजे, तिच्या लिपस्टिकच्या लालीची लाज वा
भीती बाळगायचे कारण नाही. तिला ते स्वातंत्र्य हवेच हवे. दोष पुरुषाच्या नजरेत
असेल तर स्त्रीवर बंधने कशाला ? तिनं आपलं मन का मारावं ? यात तिची काय चूक आहे ? हे दाखवताना सिनेमा कुठेही भरकटू
दिलेला नाही, वा तो पॉर्नपटाकडे झुकणार नाही याची काळजी घेतलेली आहे. अत्यंत
खुमासदार पद्धतीने कधी कोपरखळ्या तर कधी चिमटे काढत तर तापलेल्या शिशासारखे धारदार
संवाद याचा आधार घेत दिग्दर्शिका अलंकृता श्रीवास्तवने हे दिव्य साधले आहे.
सिनेमाचा प्राण म्हटलं तरी वावगं
ठरणार नाही असा सरस अभिनय रत्ना पाठक शहाने केला आहे. उषा उर्फ रोझी बुआजीची ही
भूमिका आज जर स्मिता पाटील हयात असती तर तिने तितक्याच सफाईदारपणे रंगवली असती. पण
सध्याच्या अन्य कोणत्याही अभिनेत्रीला ह्या भूमिकेचं बेअरींग जमलं नसतं. रत्नामुळे
हे पात्र सच्चे वाटते. अन्यथा ही भूमिकाच कोलमडली असती. एक पंचावन्न वर्षाची
स्त्री एका तरुण पोरात आपल्या मनातले कसे भावबंध शोधते हे तिने अत्यंत बेमालूमपणे
वठवलंय. तिच्या डोळ्यात कधी गहिरी वासना दिसते तर कधी अधीरता तर कधी सैतानी
आक्रमकता ! ती शॉर्टस्कर्ट घालून स्वतःला आरशात
न्याहाळते तो क्षण तिनं अफाट साकारला आहे. वार्धक्याकडे झुकलेल्या स्त्रीला
सेक्सच्या भावना असू नयेत का ? मग त्याचं शमन तिने कसे करावे का
तिच्या मनाचा कोंडमाराच केला पाहिजे ? तिला जे क्षण जगावेसे वाटतात यात तिचा
काय दोष ? हेच इच्छासुख पुरुषाला हवे असते तेंव्हा तो कशा पळवाटा काढतो याचे
बोलके चित्रण या पात्राच्या निमित्ताने केलं आहे.


'लिपस्टिक' मधील चौघी नायिकांत वयाने सान असणारं पात्र म्हणजे रेहाना अबिदी.
प्लबिता बोरठाकूरने या पात्राला मस्त न्याय दिला आहे. रेहानाला रॉकस्टार व्हायचं
असतं पण सनातनी विचारांचे तिचे आईबाबा याला विरोध करतात. त्यांची इच्छा असते की
तिनं इतर चारचौघ्या मुलींसारखं साधंसुधं राहावं, बुरखा घालावं आणि मर्यादेत जगावं.
रत्नाचा अभिनय या सर्वांत अधिक सरस झाला आहे. ती भूमिका जगली आहे याचा संपूर्ण
चित्रपटात प्रत्यय येतो.

- समीर गायकवाड.
सेन्सॉरने अडवलेल्या / काटलेल्या / बदललेल्या सीन्सची लिस्ट-
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा