Saturday, July 22, 2017

गुन्हेगारांचे जातीय उदात्तीकरण..


राजकारण्यांचे गुन्हेगारीकरण किंवा गुन्हेगारांचे राजनीतीकरण आपल्या देशाला अलीकडे सवयीचे झाले आहे त्याचे फारसे वैषम्य कुणालाच वाटत नाही. हा मुद्दा आता नागरीक, प्रशासन आणि सरकार या तिन्ही प्रमुख घटकांच्या अंगवळणी पडला आहे. सर्व वर्गातील गुन्हेगार राजकारण्यांच्या संपर्कात असतात हे आजवर अनेकदा सिद्ध झालेलं आहे. जनतेने, मिडीयाने त्यावर वेळोवेळी टीकाही केली आहे. पण मागील काही दशकात याचा एक वेगळा ट्रेंड तयार होताना दिसतो आहे त्याचा थेट परिणामही आता दिसून येऊ लागला आहे.  स्वातंत्र्याआधीही आपल्या देशात अनेक गुन्हेगार होऊन गेलेत. पण त्यांची कधीच व कुणीच भलावण केली नव्हती. स्वातंत्र्योत्तर काळात या दृष्टीकोनात झपाट्याने बदल घडत गेले. गुन्हेगारी जगतात शिरताना काही लोकांनी आपल्यावरील अन्यायासाठी बंदूक हाती घेतली, अपराधाचा रक्तरंजित इतिहास लिहिला. त्या व्यक्तीशी निगडीत काही वर्गातील विशिष्ट लोकांनाच या बद्दल थोडीफार सहानुभूती असल्याचंही दिसून आलं. फुलनदेवी हे याचं सर्वात बोलकं उदाहारण ठरावं. फुलनचे समर्थन करणारे एका विशिष्ट भूभागापुरतेच मर्यादित होते. तिच्यावरील अन्यायाचे कोणीही समर्थन करायला नको होते पण एका ठराविक वर्गाने तेही केलं तेंव्हा त्यांच्या अरेला कारेचा आवाज आपसूक आलाच. हीच अवस्था विविध राज्यात थोड्याफार प्रमाणात वेगवेगळ्या रुपात आढळून येऊ लागली आणि राजकारण्यांना यातील व्हॅल्यू पॉईंट ध्यानी आले. त्यांनी खतपाणी घालायला सुरुवात केली आणि असे लोक सर्वच राज्यातील विधीमंडळातच नव्हे तर संसदेतही दिसू लागले. 

राजाभय्या, मोहम्मद शहाबुद्दिन, मुन्ना बजरंगी, सीमा परिहार, डीपी यादव, मुख्तार अन्सारी, शेखर तिवारी, अरुण शंकर शुक्ला अशी यांची मोठी यादी तयार होते. काश्मीर, आसाम, मणिपूर या अशांत राज्यातील राजकीय वरदहस्त असणारे गुन्हेगार वेगळे आणि इतर भागातील राजाश्रय असणारे वेगळे. आपल्याकडेही अरुण गवळीचे राजकीय उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न केला गेलाच. यंदाही अश्विन नाईक व अरुण गवळीच्या घरात निवडणूकीचे तिकीट दिले गेलेय आणि लोकांनी त्यांना निवडून दिलेय. इतकेच नव्हे तर 'तुमचा दाऊद तर आमचा गवळी' असे गुन्हेगारीचे धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्नही झाला आहे. दक्षिणेकडेही वीरप्पन मरावा असे कुठल्या राजकारण्याला वाटत नव्हते पण त्याने तोंड उघडताच आपली अडचण होईल हे लक्षात आल्याबरोबर त्याचा खात्मा केला गेला हे वास्तव आहे.  वरदराजन मुदलियार बद्दल मुंबईतल्या काही दाक्षिणात्यांची सहानुभूती होती हे ही लपून राहिले नव्हते. संतोकबेन जाडेजाला गुजरातेतील पोरबंदर भागात गॉडमदर म्हटलं जात होतं. ही सगळी अलीकडची उदाहरणे आहेत. इतकेच नव्हे तर दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर मरण पावली तेंव्हा मुंबईची क्विन म्हणून तिची भलावण करणारानागपाडयाची गॉडमदर म्हणणारा वर्ग मोठ्या प्रमाणात तिच्या अंत्यसंस्कारास हजर होता. 

स्वातंत्र्यपूर्व काळात गुन्हेगारांप्रती असणारी चीड, संताप, तिरस्कार कुठे गेला ? गुन्हेगारांचे उदात्तीकरण होत असताना समाज कसा मूकदर्शक राहिला याचे उत्तर समाजशास्त्राचे अभ्यासक नक्की देतील. पण जनमानसाच्या या बदलत्या व बिघडत्या जडणघडणीत राजकारण्यांचा वाटा मोठया मोलाचा आहे हे कोणीही नाकारणार नाही. पूर्वी गल्लीतील एखाद्या गुंडाचा वृथा अभिमान त्याच्या घरातील लोकांना वा आप्तमित्रांना असायचा. आता त्याची संपूर्ण एरियात क्रेझ असते हा बदल घातक आहे पण आता तो जगमान्य झालाय.   ब्राझीलमध्ये २०११ ला पकडला गेलेला अँटानियो लोपेस हा रोसिना आणि रिओमधील अनेक लोकांना मसीहा वाटे, नुकतेच पकडले गेलेल्या लुईझ कार्लोसचीही तीच गत आहे. रॉबिनहूड या ऐतिहासिक व्यक्तीरेखेने भुरळ पडल्यागत वागणारे गुन्हेगार जगभरातील बहुतांश देशात आढळतात. याचे प्रतिक सिनेमा, कथा, कादंबऱ्या, डेली सोपमध्येही पडून गेले पण त्याचा प्रभाव हा त्या त्या परगण्यापुरता मर्यादित राहायचा. 

काही लोकांनी आत्मसंघर्षाच्यापुढे जाऊन आततायी विभाजनवादी भूमिका स्वीकारत त्याच्या आडून अनेक गंभीर गुन्हे प्रसवले. आपल्याकडचा खलिस्तानवादी जर्नेलसिंह भिंद्रनवाले आणि श्रीलंकेतील तमिळ इलमचा म्होरक्या व्ही. प्रभाकरन ही आपल्याला ठळक जाणवणारी नावे. विशेष म्हणजे या दोन्ही व्यक्तींना त्या त्या समाजातून काही प्रमाणात पाठिंबा मिळाला आणि त्यांची विषवल्ली फोफावली. यांना राजकीय पाठबळ होते हे इतिहासही मान्य करतो. अशा लोकांना जनतेने थोडासा सपोर्ट दिला त्याचं कारण अस्मितेच्या आडून हा खेळ सुरु होता. या सर्व गुन्हेगारीच्या आलेखात सामान्य माणूस कुठेच व्यक्त होत नव्हता. आपले मत तो राखून ठेवत होता. "आपल्याला काय" ही भावना त्याच्या ठायी रुजली होती. पण दुर्दैवाने हे चित्रही आता बदलत चालल्याची ग्वाही देणारी घटना आपल्या देशात घडते आहे. 

घटना आहे राजस्थानची. धोक्याची घंटा वाजवणारी अशी ही घटना आहे.  गर्दीच्या मानसिकतेचे पुढचे रक्तरंजित पाऊल कसे असेल याची सूचक जाणीव देणारी आहे. काही दिवसांपूर्वी राजस्थानमधील कुख्यात बदमाश आनंदपाल सिंह याला राजस्थान पोलिसांनी तथाकथित बनावट चकमकीत मारले आणि आपल्या हातांनी लावलेल्या विषवृक्षाची फळे चाखण्याची वेळ सीएम वसुंधरांवर आली. वसुंधरांनी सत्तेत येताना हिंदुत्वाचे, राजपूतांचे कार्ड खेळून सत्तेत आल्या होत्या, अशोक गहलोत आणि काँग्रेसची त्यांनी पार धूळधाण केली होती. त्यांचेच अभय या आनंदपाल सिंहांना होते पण दोन पावले पुढे जाऊन आनंदपाल सिंहाने सगळ्या पातळ्या ओलांडल्या. त्याच्या फार्महाऊसमध्ये जे काही सापडले ते आजवरच्या सर्वात क्रूर आणि विकृत हत्याऱ्यांपाशीही आढळले नव्हते.  माणसाला बसता येणार नाही अन झोपताही येणार नाही असे लोखंडी पिंजरे, बुलेटप्रुफ खिडक्यांचे टॉर्चररूम्स, दात - हाडे विरघळवण्यासाठी ऍसिड, माणसांचा भुगा करण्यासाठी क्रशचेंबर आणि काळोख्या भूमीगत बराकी. हे सर्व एका बंकरवजा हवेलीमध्ये राजरोस सुरु होतं. 
राजस्थानमध्ये संगमरवर - ग्रॅनाईटच्या खाणी आहेत, त्यांचे माफिया आहेत. त्यांचा पैसा निवडणुकीत फिरतो.  हे लोक निवडणुकात सत्ताधाऱ्यांच्या पाठीशी होते त्याने त्यांचे काम थोडे सुकर झाले होते. मात्र मागील चार वर्षात आनंदपालने ह्या खाणमालकांना आणि त्यांच्या फायनान्सशी संबंधित लोकांनाच लक्ष्य करायला सुरुवात केली.  खाणलॉबीचा वसुंधरांवर दबाव वाढू लागला तास त्यांचा नाईलाज झाला आणि इतके दिवस जे पोलीस आनंदपालच्या हातात हात घालून होते त्यांनी त्याला गोळ्या घालून ठार केले. इथंपर्यंत काहीच अराजक नव्हते पण लोकांच्या मनात जो जातीय अभिनिवेश राजकरण्यानी जागृत केला होता त्याचा आता ज्वालामुखी झाला होता. त्याची यथासांग परिणती होऊन राजपूतांनी आनंदपालला आपला हिरो घोषित केलं. अनेक तरुणांनी आपल्या छातीवर त्याचे नाव गोंदवून घेतल्याचे पाहण्यात येतेय. तर काही लोक त्याची तुलना थेट वीर राणाप्रतापशी करताहेत ! त्याच्यावर वीर गीते रचली जाताहेत त्यांचं सार्वजनिक कौतुक केलं जातंय ! तसे अनेक व्हिडीओ मागील काही दिवसांत यु ट्यूबवर अपलोड झाले आहेत !! 'अब कुछ न सहेगा गायेगा गाना, एक हुआ अब राजपूताना जिसके सामने झुकता है जमाना' अशी त्यांनी भावनिक साद घातली आहे. भरीस राज्याच्या पोलीस प्रशासनाने अनेक संशयी भूमिका घेतल्या आहेत या सर्व गदारोळात आनंदपालचा अंत्यविधी होण्यास हत्येपासूनचा चक्क वीसावा दिवस उजडावा लागला ! 

आता तर राजपूत समाजाच्या वतीने सुखदेवसिंह गोगामेडी यांनी व्यवस्था आणि प्रशासन यांनाच आवाहन दिले आहे. त्यांना पकडण्यासाठी सरकार जीवाचे रान करते आहे, स्थानिक लोकांनी त्यांना आपल्या हृदयात स्थान दिले आहे.  ज्या आनंदपालने अनेक गंभीर गुन्हे केले त्याची राजपूत लोकांनी केलेली भलावण डोळे पांढरी करणारी आहे. तो आपल्या जातीचा माणूस आहे, तो आपला राजा आहे, तो आपला आयडॉल आहे हे विचार आता इतके खोलवर रुजले आहेत की त्यात मतपरिवर्तन होणे महाकठीण झाले आहे ! हे जातीप्रेम, धर्मप्रेम ज्यांनी रुजवले त्यांना हा धडा असणार आहे. संपूर्ण राजस्थानात अखिल राजपूत मेळाव्यासाठी सोशल मिडीयावरून अत्यंत भयानक मेसेजेस शेअर केले जाताहेत. या समर्थकांना आनंदपालचे अपराध दिसत नाहीत, त्याची खंडणीखोरी दिसत नाही, त्याचे अपहरणाचे गुन्हे दिसत नाहीत, त्याचे क्रौर्य दिसत नाही, त्याचे विकृत वर्तन दिसत नाही. दिसतेय फक्त त्याची जात ! हा आपल्या जातीचा माणूस आहे ही भावना किती हीन स्तराला घेऊन जाते आहे याचे हे बोलके उदाहरण ठरावे. 

आता राजपूतांनी या मुद्द्याआडून आरक्षणापासून ते सत्तासंघर्षापर्यंतची भाषा सुरु केली आहे. त्यांची भाषा वसुंधरांना धडा शिकवण्याची आहे, त्यांची भाषा सरकारविरोधी आहे ! कालपर्यंत जे सरकारच्या बाजूने होते ते एका रात्रीत कसे विरोधात जाऊ शकतात आणि त्यासाठी किती नीच पातळीचे निमित्त पुरेसे ठरते हेही या निमित्ताने समोर आलेय. आनंदपालच्या मृत्यूनंतर नागौर आणि नजीकच्या जिल्ह्यात जाळपोळ आणि दगडफेकीच्या अनेक घटना घडल्या पण राजस्थान वगळता इतरत्र त्याची दखल शब्दमात्र घेतली गेली नाही त्याच वेळी बंगालमधील हिंसाचारासाठी मिडीयाने खर्ची घातलेला आत्यंतिक वेळ खूप काही सांगून जातो !! आजघडीला सुखदेव गोगामेडी ही वसुंधरा सरकारसाठी सर्वोच्च डोकेदुखी ठरली आहे भरीस भर म्हणजे आनंदपालच्या कुटुंबीयांनी हा समग्र राजपुतांवर हल्ला असल्याचे सांगत प्रसंगी जीव देण्याची वा जीव घेण्याची तयारी ठेवण्याची भाषा केली आहे. या सर्व प्रकरणात जोधपूर, उदयपूर, जयपूर आणि मध्य राजस्थानमधील सर्व जिल्हे ढवळून निघाले आहेत तिथे जातीय ध्रुवीकरण अत्यंत वेगाने होते आहे. तथाकथित गोरक्षकांनी या प्रकरणी आनंदपालला शहीद ठरवून सरकारची कोंडी केली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे वसुंधरा सरकारमधील अनेक मंत्री आनंदपालला भेटत होते असे तथ्य आता समोर येते आहे आणि त्याच वेळेस राजस्थान पोलिसांना पत्रकार परिषद घेऊन सांगावे लागतेय की हा काही रॉबिनहूड नव्हता ! पोलिसांना हे ठाऊक होते तर इतके दिवस ते कशाची वाट पाहत होते ?  आता घाईगडबडीत राजस्थान सरकारच या हत्येची सीबीआय चौकशी व्हावी म्हणून न्यायालयात गेले आहे हा मोठा विनोद म्हणावा लागेल.   

विशेष म्हणजे आजही देशभरातले जवळपास सर्वच राजकीय पक्ष जातीय अभिनिवेशाचे राजकारण अत्यंत जोमाने पुढे रेटत आहेत. त्यामुळेच धार्मिक - जातीय विद्वेषी दृष्टीकोनाने ग्रासलेल्या गर्दीला एखाद्या माणसाचा केवळ संशयावरून खून करावासा वाटतो, केवळ पूर्वग्रहदूषित वृत्तीमुळे गर्दीला वाटते की एखादा माणूस चेचून काढावा आणि गर्दीच्या अनेक जथ्थ्यांना एकत्रित रित्या वाटते की एक हत्यारा, अपराधी, क्रूर, विकृत माणूस हाही आपला मसीहाच आहे कारण तो आपल्या जातीधर्माचा आहे ! असे अभिनिवेशी विचार रुजवणाऱ्या लोकांना आनंदपालसिंह प्रकरणातून नवा धडा मिळेल, त्याचे धोके ओळखण्याची गरज आहे पण त्यासाठी या सर्व जातधर्मद्वेषी आणि अभिनिवेशीय राजकारणातून बाहेर तर पडायला हवे. तूर्तास तरी त्याची कोणती चिन्हे दूरदूरपर्यंत दिसत नाहीत. त्यामुळे जे विषवृक्ष लावले जाताहेत त्याची फळे चाखण्याची तयारी सर्वांनी ठेवायला हवी. 

एके काळी सामान्य दूधवाला असणाऱ्या निर्व्यसनी आनंदपालला त्याच्या लग्नाच्या वरातीत तो खालच्या उपजातीतला आहे म्हणून उच्चकुलीन राजपुतांनीच घोड्यावर बसू दिले नव्हते तेच राजपूत आता त्याच्या ग्लोरीफिकेशनसाठी कसे झटताहेत हे सर्व पाहता लोकमानस किती जातीसापेक्ष होत चालले आहे हे ध्यानी येते. वीरप्पन आजच्या काळात जन्माला येऊन भविष्यात मृत्यूमुखी पडला असता तर त्याच्या उदात्तीकरणासाठी त्याच्या वन्नीयार जातीच्या लोकांनीही आंदोलन केले असते का ? लोक इतके दिवस राजकारणी, कलाकार, लेखक, खेळाडू अशांचीच जातधर्म पहायचे आता या यादीत गुन्हेगारांची भर पडत्येय हे लोकशाहीला नक्कीच पोषक नाही...       


दैनिक दिव्य मराठी - २२/०७/१७ 

No comments:

Post a Comment