गुरुवार, २ जुलै, २०२६



एक नोंद पाकिस्तानच्या विख्यात गायिका फ़रीदा ख़ानम ह्यांच्याविषयीची. सोबतचा फोटो त्यांचाच आहे. त्याच त्या, - "आज जाने की जिद न करो..." फेमवाल्या, एक महान चितचोर नार !नव्वदच्या दशकात विख्यात शायर मुनीर नियाजी यांनी, 'हमेशा देर कर देता हूँ..' ही त्यांची बेमिसाल नज्म ऐकवली होती तेव्हा श्रोत्यांमध्ये बसलेल्या फ़रीदा ख़ानमना अश्रू अनावर झाले आणि नकळत त्या रडू लागल्या. त्यांना दिवंगत बहिणीची आठवण झाली होती!

त्यांची बहीण मुख्तार बेगम एकाएकी आजारी पडली आणि तिचा आजार बळावत गेला. विविध ठिकाणी म्युझिक टूरवर गेलेल्या फ़रीदा वेळेवर आपल्या आजारी बहिणीकडे पोहोचू शकल्या नाहीत. त्यांच्या बहिणीचा इंतकाल झाल्यावरच त्या पोहोचल्या. एकुलत्या बहिणीच्या शेवटच्या क्षणी आपण हजर राहू शकलो नाही ह्या गोष्टीची त्यांना कायमची खंत राहिली.

फ़रीदा ख़ानम ह्यांचा संसार सुखाचा होता. गायन हा त्यांचा प्राण! पतीच्या निधनानंतर त्यांनी गायन सोडलं होतं मात्र केवळ चाहत्यांच्या प्रेमाने त्यांना पुन्हा माईकपुढे उभं केलं. 2015 साली पाकिस्तानस्थित कोक स्टुडिओमध्ये त्यांनी, 'आज जाने की जिद ना करो..' ही नज्म अशी काही गायली की, आताची पिढी देखील त्यांची आशिक झाली.

बुधवार, १ जुलै, २०२६

विजया मेहता – काही नोंदी.

  


विजयाबाई काल गेल्या. त्यांच्याविषयी अनेकांनी भरभरून लिहिलंय, यावरून त्यांच्या समृद्धीची, त्यांच्या योगदानाची प्रचीती यावी. त्यांच्याविषयी काही नोंदी.

अनिल बर्वे यांच्या ‘हमीदाबाई की कोठी‘ या नाटकाचे दिग्दर्शन करताना विजयाबाईंना हमीदाबाई या वृद्ध तवायफेच्या शरीर-भाव-चाल-बोली यांचा खरा आत्मा कसा असेल, याची कल्पना येत नव्हती. त्यांच्या सासूबाई दुर्गा खोटे यांनी सल्ला दिला: “एका खऱ्याखुऱ्या कोठीवालीकडे जा.” हा सल्ला मिळताच त्या तडक निघाल्या. त्या काळात ही गोष्ट किती धाडसी होती याची तुम्हाला कल्पना असेलच!

त्या काळात मुंबईत नेहल मंजिलमध्ये राहणारी एक वृद्ध तवायफ नीलम बाई यांच्याकडे विजयाबाई गेल्या. नीलम बाईंनी त्यांना आपले जीवन, सौंदर्य, वृद्धत्व, एकटेपण आणि त्या जगाचे सूक्ष्म बारकावे सांगितले.

हा अनुभव इतका संवेदनशील होता की, विजयाबाईंना हमीदाबाईची भूमिका आणि संपूर्ण नाटकाची दृष्टी मिळाली. ही भूमिका त्यांनी स्वतः केली होती, यावरून नाटकाकडे आणि नाटकातील पात्राकडे पाहण्याची त्यांची दृष्टी लक्षात यावी.

मंगळवार, ३० जून, २०२६

देशोदेशीचे विकृत कॅलिगुला!


रोमन सम्राट, किंग कॅलिगुला आणि त्याचा घोडा ह्यांची गोष्ट दोन हजार वर्षांपुर्वीची आहे मात्र आजच्या काळात तिचे पुनरुज्जीवन झाल्यासारखे वाटतेय! त्याची ही नोंद. जगाच्या इतिहासात अशा काही घटना घडून गेल्यात आणि अशी माणसं होऊन गेलीत की, मानवतेसाठी ते कलंक मानले गेलेत. अशीच एक कहाणी जगातील सर्वात कुख्यात लिंगपिसाट राजा कॅलिगुलाची आहे. हा राजा इतका विकृत आणि घाणेरडा होता की, त्याने आपल्याच बहिणींसोबत शारीरिक संबंध बनवून त्यांना देशोधडीला लावले. एवढेच नव्हे, तर आपल्या मित्रांच्या बायकांवर बळजोरी केली. त्यांना निर्वस्त्र करून मिरवलं.

त्याच्या राज्यात लैंगिक अत्याचार अशा काही टोकाला गेले होते की त्याविषयी बोलणाऱ्यास देखील शरम वाटावी! त्याने त्याच्या पत्नीवर देखील असेच विकारी अत्याचार केले होते. आपली बहीण, पत्नी आणि सहकाऱ्यांच्या बायका, राज्यातील स्त्रिया ह्यापैकी कुणावरही त्याचं मन मानेल तेव्हा तो जबरदस्ती करत असे आणि ती देखील सार्वजनिक रित्या!

रविवार, २८ जून, २०२६

आधुनिक काळातले कॅलिगुला!



ह्या फोटोमधला राजा आणि त्याचा घोडा ह्यांची गोष्ट दोन हजार वर्षांपुर्वीची आहे मात्र आजच्या काळात तिचे पुनरुज्जीवन झाल्यासारखे वाटतेय! त्याची ही नोंद. 
\जगाच्या इतिहासात अशा काही घटना आणि माणसं होऊन गेली की मानवतेसाठी ते कलंक मानले गेले आहेत. जातात. अशीच एक कहाणी जगातील सर्वात कुख्यात लिंगपिसाट राजाची आहे. हा राजा इतका विकृत आणि घाणेरडा होता की, त्याने आपल्याच बहिणींसोबत शारीरिक संबंध बनवून त्यांना वेश्यालयात विकले. एवढेच नव्हे, तर आपल्या मित्रांच्या बायकांवर बळजोरी केली. त्यांना निर्वस्त्र करून मिरवलं.

त्याच्या राज्यात लैंगिक अत्याचार अशा काही टोकाला गेले होते की त्याविषयी बोलणाऱ्यास देखील शरम वाटावी! त्याने त्याच्या पत्नीवर देखील असेच विकारी अत्याचार केले होते. आपली बहीण, पत्नी आणि सहकाऱ्यांच्या बायका, राज्यातील स्त्रिया ह्यापैकी कुणावरही त्याचं मन मानेल तेव्हा तो जबरदस्ती करत असे आणि ती देखील सार्वजनिक रित्या!

सोमवार, १५ जून, २०२६

वेश्या व्यवसाय कायदेशीर की बेकायदेशीर?



A)17 सप्टेंबर 1999. खोली नंबर 8, दुसरा मजला, देविका बिल्डिंग, जोगेन दत्त लेन, सोनागाची कोलकता. थंडीचे दिवस होते. अधून मधून पावसाची एखादी सर पडून जात होती. अख्ख्या सोनागाचीमध्ये बायकांच्या गलक्याने आणि विविध प्रकारच्या आवाजांनी एकच गहजब माजवला होता. आसमंतात सतराशे साठ प्रकारचे गंध दरवळत होते. दाटीवाटीने वसलेल्या त्या कोंदट वस्तीत मधूनच वाऱ्याची एखादी शीतल झुळूक येऊन गेली की बरे वाटे. कानाकोपऱ्यातून आलेले हजार तऱ्हेचे पुरुष हव्या त्या बाईच्या शोधात फिरत होते. 'बुरी'ला त्या दिवशी खूप लवकर झोप लागली होती कारण मागच्या काही दिवसात तिला थकवा जाणवत होता. बुरी उर्फ छाया रानी पॉल हिच्या आयुष्यातली तीस वर्षे सोनागाचीच्या रेड लाइट एरियात गेली होती, तिथल्या भल्या बुऱ्या गोष्टींना ती पुरती जाणून होती.

मागील काही वर्षांपासून बुद्धदेव कर्माकर हा अट्टल गुन्हेगार तिच्याकडे यायचा. तिला जबरी भोगायचा, कधी पैसे दयायचा तर कधी तसाच निघून जायचा. कधी कधी मारहाण देखील करायचा. मात्र त्याच्यासोबत तिचे नाव जोडले गेल्याने तिला इतरांचा त्रास कमी झाला होता. तरीही त्याचे पाशवी वागणे तिला असह्य व्हायचे. त्याचा स्पर्शदेखील नकोसा वाटायचा. त्याच्या तोंडाला येणारा दारूचा वास आणि घामेजलेलं अंग ह्याची तिला तिडीक बसली होती. त्याला हाकलून दिले पाहिजे असे तिला राहून राहून वाटत असे.

रविवार, १४ जून, २०२६

जांभूळ आख्यान आणि व्हायरल दुष्काळ!


सध्या सोशल मीडियामध्ये जांभूळ ट्रेंडमध्ये आहे. बऱ्याच जणांनी त्याविषयी भाष्य केले आहे, काहींनी अंदाज वर्तवलेत तर काहींनी शास्त्रोक्त चिकित्सा केली आहे. त्या अनुषंगाने जांभुळाची ही एक वेगळी नोंद! आपल्यापैकी अनेकांना जांभूळ आख्यान ठाऊक असेलच. त्याचा ह्या नोंदीशी थेट संबंध आहे.

व्यासांच्या महाभारतात नसलेली मात्र महाभारतीय लोककथेत असलेली ही एक बोधकथा आहे. 'जांभूळ आख्यान' या कथेच्या नावाचा आणि 'जांभूळ' या फळाचा थेट, अतिशय महत्त्वाचा संबंध आहे; कारण ही संपूर्ण कथा एका जांभळाच्या फळाभोवती आणि त्यावरून समोर येणाऱ्या कटूसत्याभोवती फिरते. ह्या कथेमध्ये जांभूळ हे केवळ एक फळ नसून ते मानवी मनातील दडलेली रहस्ये आणि सत्य बाहेर आणण्याचे एक माध्यम ठरते.

बुधवार, १० जून, २०२६

आधार कार्ड आणि बेपत्ता झालेल्यांचा शोध!



अडीच वर्षांपासून छत्तीसगडमधील रायपूरच्या खामतारिया येथील घरातून बेपत्ता असलेला 17 वर्षीय कर्णबधिर मुलगा रोहन सोना, हा त्याच्या आई-वडिलांना भेटला तो एक हृदयस्पर्शी क्षण होता आणि हे केवळ झारसुगुडा चाइल्डलाइनच्या अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांमुळेच शक्य झाले होते.

5 जुलै 2017 रोजी सकाळी रोहन, जवळच्या बागेत खेळायला गेला होता. त्याचे घर छत्तीसगडमधील रायपूर जिल्ह्यातील खमतराई येथील डब्ल्यूआरएस कॉलनी पीएच रेल्वे स्टेशनजवळ असल्याने, चुकून ट्रेन पकडून झारसुगुडा येथे पोहोचला होता.

झारसुगुडा येथे पोहोचल्यावर, 6 जुलै 2017 रोजी चाइल्डलाइनच्या अधिकाऱ्यांनी त्याला झारसुगुडाच्या तिकीट काउंटरजवळून वाचवले होते. तो कर्णबधिर आणि मुका आहे हे कळल्यावर, चाइल्डलाइनच्या अधिकाऱ्यांनी त्याला ट्रेन/बसचे फोटो दाखवून तो झारसुगुडाला कसा पोहोचला याची चौकशी केली. त्याने होकारार्थी मान डोलावून ट्रेनने झारसुगुडाला पोहोचल्याचे खुणांनी सांगितले.

त्यांच्या घरात चार सदस्य होते. त्याचे वडील रोजंदारीवर काम करत, तर त्याची आई आणि एक मोठी बहीण मोलकरीण म्हणून काम करत असत. घटनेच्या वेळी आई वडील आणि बहीण घरी नव्हते, ते कामावर गेले होते.

मंगळवार, २ जून, २०२६

बजाजी नाईक निंबाळकर - एक चिकित्सा!



'शिवाजी कोण होता' ह्या मूळ पुस्तकाच्या आशयात बदल केल्याचे आणि त्यातील मजकुराशी छेडछाड केली असल्याचे काल स्पष्ट झाले.

मूळ पुस्तकातली अतिशय महत्वाची अशी, न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची प्रस्तावना गाळली गेलीय. मूळ पुस्तकातील काही पाने वगळली गेलीत आणि काही पाने वा काही पंक्ती घुसडल्या गेल्यात. दादोजी कोंडदेव, शिवा काशीद यांच्या उल्लेखांची छेडछाड केली गेल्याचा आरोप पानसरे कुटुंबाने केलाय.

संबंधित प्रकाशकाकडून फक्त वीस रुपये किंमत ठेवून हे पुस्तक विकले गेलेय; इतक्या कमी मूल्यात दर्जेदार छपाई मूल्य असलेल्या पुस्तकाची निर्मितीच शक्य नसल्याने, इतके कमी मूल्य ठेवून विक्री करणे कोणत्याही प्रकाशकाला शक्य नाही, साहजिक कमी किंमत असल्याने हे पुस्तक अधिक विकले जाईल आणि मूळ मजकूर असलेले पुस्तक कमी विकले जाईल असा संबंधितांचा अंदाज होता का?

सोमवार, १ जून, २०२६

सुमन कल्याणपूर - सुमन सुगंध!



'सुमन सुगंध' हे सुमन कल्याणपूर यांचे मंगला खाडिलकर ह्यांनी लिहिलेलं चरित्र. ते वाचताना जाणवते की, त्यांच्या जीवनाचा प्रवास अत्यंत खडतर होता. आयुष्यभर सल लागून राहिल, अशी एक घटना त्यांच्या बाबतीत घडली होती आणि त्या घटनेच्या परिघात लता मंगेशकर, सी. रामचंद्र आणि पंडित नेहरू यांच्यासारखी उत्तुंग माणसं होती.

1963 मध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीत पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या उपस्थितीत 'ऐ मेरे वतन के लोगों' हे अजरामर देशभक्तीपर गीत सादर केले जाणार होते. संगीतकार सी. रामचंद्र यांनी सुरुवातीला हे गाणे गाण्यासाठी सुमन कल्याणपूर यांची निवड केली होती व त्यांच्यासोबत या गाण्याचे तास न् तास सराव देखील पूर्ण झाले होते.

मात्र हे गाणे लता मंगेशकर गाणार असल्याचे त्यांना अचानक सांगण्यात आले. शेवटच्या क्षणी इतकी मोठी ऐतिहासिक संधी हातातून निसटल्यामुळे सुमनजींना प्रचंड मानसिक त्रास झाला. ह्या घटनेची सल आणि संधी हिरावली गेल्याचे दुःख त्यांच्या मनात आयुष्यभर कायम राहिले. त्यांच्या जागी अन्य कुणी व्यक्ती असती तर तिने लता मंगेशकरांना याचा दोष सहज दिला असता!

शनिवार, ३० मे, २०२६

एक शायर की मौत!



मध्यप्रदेश सरकारने ख्यातनाम कवी बशीर बद्र यांच्यासोबत जो मरणोत्तर व्यवहार केला आहे तो अतिशय क्लेशदायक आणि संतापजनक आहे. आज अटल बिहारी वाजपेयी हयात असते तर कदापिही असे घडले नसते.

बशीर बद्र यांचे निधन झाले तेव्हा देशाच्या सर्व भागातला सोशल मीडिया त्यांच्या शायरीने भरभरून वाहिला, लोकांनी आपल्या आवडत्या शायरला प्रेमाने निरोप दिला; त्यांच्या रचनांची नव्याने उजळणी झाली इतके प्रेम लोकानी केले.

मात्र काल त्यांना अंतिम विदाई देण्यात आली तेव्हा मोजके लोक त्यांच्या जनाजाला खांदा देण्यासाठी जमा झाले होते. ही गोष्ट खटकली तरीही, 'कुछ तो मजबुरिया रही होंगी' ही पंक्ती आठवून आपण गप्प राहिलं पाहिजे!

त्यांच्या अंतिम यात्रेत अनेक लोक सहभागी होतील अशी अपेक्षा होती, परंतु जनाजाच्या नमाजात म्हणजेच अंत्यविधीच्या प्रार्थनेत मात्र पाचशे लोक सहभागी झाले आणि त्यानंतर लोकांची संख्या आणखी कमी झाली.

शनिवार, २३ मे, २०२६

ट्रेन, टागोर आणि एका वेश्येचा आत्मशोध!


26 डिसेंबर 1977 च्या दिवशी तत्कालीन रेल्वेमंत्री मधु दंडवते यांच्या हस्ते मुंबईच्या व्हिक्टोरिया टर्मिनस म्हणजे आताचे सीएसएमटी रेल्वे स्टेशनवर हिरवा झेंडा दाखवून गीतांजली एक्सप्रेसचे लोकार्पण करण्यात आलं. मुंबई ते हावडा असा तिचा रूट होता. महान कवी रवींद्रनाथ टागोर यांच्या 'गीतांजली' या जगप्रसिद्ध पुस्तकाचे नाव ह्या ट्रेनला देण्यात आलं होतं. 'गीतांजली' म्हणजे 'गाण्यांची भेट'.

ही ट्रेन सुरू झाली, तेव्हा ती भारतातील पहिली क्लासलेस ट्रेन म्हणून ओळखली जात होती, म्हणजेच, सर्व वर्गांमध्ये समान सुविधा असलेली आणि वातानुकूलित डबे नसलेली ट्रेन असं तिचं स्वरूप होतं. हुगळी नदीच्या काठी असलेल्या हावडा शहरातलं हे स्टेशन, भारतातलं सर्वात मोठं आणि सर्वात व्यस्त, तसेच सर्वात जुन्या जंक्शनपैकी एक रेल्वे जंक्शन आणि मुंबईचं व्हीटी त्याच्या तोडीस तोड!

गुरुवार, २१ मे, २०२६

प्रियंकांचे 'राजीव' संस्कार!


21 मे 1991 रोजी रात्रीच्या अकराच्या सुमारास, तमिळनाडूमधील श्रीपेरंबुदूर येथे राजीव गांधींना जो हार घातला होता त्यातील स्फोटकांचा आणि थनू ह्या आत्मघाती स्त्रीने स्वतःभोवती लपेटलेल्या बॉम्बचा स्फोट झाला, त्या क्षणी संपूर्ण भारताला हादरा बसला! अनेकांचे काळीज विदीर्ण झाले. राजीव गांधी यांच्यासह १४ लोकांचा मृत्यू झाला, ४३ व्यक्ती गंभीर जखमी झाल्या. देशभरात संताप आणि दुःखाची लाट पसरली!

त्या हत्याकांडात सहभागी असलेल्या LTTE च्या सदस्यांपैकी नलिनी श्रीहरन ही एक मुख्य आरोपी होती. आधी तिला मृत्युदंडाची शिक्षा झाली. मात्र, वर्षानुवर्षे तुरुंगवास भोगल्यानंतर, 2008 मध्ये एक अत्यंत भावनिक आणि वादग्रस्त घटना घडली.

रविवार, १७ मे, २०२६

हरलेल्या एकाकी माणसाची गोष्ट!



23 नोव्हेंबर 2023. व्हीआरएल ट्रॅव्हल्सच्या खासगी बसमधून एक प्रौढ दाम्पत्य प्रवास करत होतं. त्यांची मुलगी आणि मुलगाही त्यांच्या सोबत होते. त्यांचा प्रवास मजेत चालला होता. बस वेगाने पुढे चालली होती. मध्यरात्रीच्या सुमारास कोल्हापूर-राधानगरी रोडवरील पिरवाडी-पुईखडी घाटात, ड्रायव्हरला वळणाचा अंदाज आला नाही आणि घाटात बस उलटली.

बसमधले बरेच प्रवासी जायबंदी झाले. तीन जणांचा मृत्यू झाला. त्यात त्या 55 वर्षांच्या कर्त्या पुरुषाच्या शेजारच्या सीटवर बसलेली त्याची पत्नी जागेवर गेली आणि पुढच्या सीटवरची त्यांची टीन एजर मुलंही तत्काळ गेली. त्या इसमाने आपल्या डोळ्यादेखत कुटुंब आचके देत मरताना पाहिलं.

आपण त्यांना वाचवू शकलो नाही याचा गिल्ट त्याच्या मनात तयार झाला. खरे तर अपघातात तेही जखमी झाले होते मात्र त्यांचा जीव वाचला होता. परंतु आपण उगाच वाचलो असं त्यांना राहून राहून वाटू लागलं.

रविवार, ३ मे, २०२६

निषेधाची अगरबत्ती!


बुवा बाबा बलात्कार करतो, तेव्हा समाजातला एक घटक लगेच त्याची बाजू घेऊन पोकळ युक्तिवाद करतो. म्हणजेच धार्मिक शेड्स असणाऱ्या कोणत्याही धर्माच्या नीच इसमाच्या मागे त्या समाजातला एक तरी हिस्सा कधी उघड तर कधी छुप्या पद्धतीने उभा असतो.बलात्काराचा गुन्हा शाबित होऊन सजा भोगून बाहेर आलेल्या अधम पुरूषांचा सत्कार एका विशिष्ट विचारसरणीचे, पक्षाचे लोक करताना दिसतात. विशेष म्हणजे याच्या निषेधार्थ त्या विचारांच्या, त्या पक्षाच्या एकाही माणसाला यावर ब्र शब्द उच्चारावा असे वाटत नाही. ही नैतिकता हेच त्यांचे खरे चरित्र असते!

आमदारासारखे लोकप्रतिनिधी सामान्य माणसाला धमकावतात की तुझ्या आईला झ**, तुझ्या बहिणीला *वतो, बायकोचा फो** फाडतो.. तेव्हा पोलिस सांगतात की हा अदखलपात्र गुन्हा आहे. म्हणजेच सार्वजनिक रित्या बलात्कार करण्याची धमकी देणं गंभीर नाही, त्याने कुणाची आयमाय एक केली तरच कायद्याचे स्तंभन होणार! एरव्ही आरोपी गबरगंड असला की पोलिसांचे वीर्यपतन ठरलेलं असतं.

गुरुवार, २३ एप्रिल, २०२६

आयटी सेलचे - सोशल लिंचिंग


मुंबईमध्ये भाजपने आयोजित केलेल्या मोर्चात वाहतुकीची कोंडी झाल्यावर संतापलेल्या महिलेने आयोजक मोर्चेकरी आणि पोलिसांना धारेवर धरले. अनेकांनी त्या महिलेला समर्थन दिले तेव्हाच शंकेची पाल चुकचुकली होती की या महिलेचे सोशल लिंचिंग होणार! आणि झालेही तसेच!

ही बाई घाण आहे, ही रांड आहे, ही वेश्या आहे, ही तर धंदेवाली छिनाल आहे अशा पोस्टचा रतीब घातला गेला! या पोस्ट टाकणारे लोक आणि यामुळे उत्तेजित होऊन त्यावर कमेंट करणारे, लाइक करणारे लोक जेमतेम आठवड्यापूर्वी नारी सन्मान, नारी वंदन, महिला हक्क इत्यादि गोष्टींवर रान हाणत होते! यांच्या मनात विद्रोही स्त्रियांबद्दल केवळ आणि केवळ गरळ साठली आहे हे नित्य अधोरेखित होत असतं. ही घटनाही त्याला अपवाद ठरली नाही.

मराठा बंधू आणि भगिनींना खुले पत्र..


हे पत्र, मी मराठा आहे म्हणून लिहिलेलं नसून एक सच्चा शिवभक्त म्हणून लिहिलं आहे हे आधी स्पष्ट करू इच्छितो. या पत्राचे प्रयॊजन आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्याविषयीचे आहे.

बुलढाणा जिल्ह्यातले सिंदखेड राजा हे स्वराज्यप्रेरिका, राजमाता जिजाऊ मां साहेबांचे जन्मस्थान. रयतेच्या माता असणाऱ्या जिजाऊंच्या जन्माने पावन झालेल्या बुलढाणा जिल्ह्याचे मुख्य ठिकाण असणाऱ्या बुलढाणा शहरापासून, सिंदखेड राजा 80 किमी अंतरावर वसले आहे. जिजाऊंनी शिवबांच्या मनात स्वराज्याचे बीज रोवले, चारही पातशाहयांच्या विरोधात विद्रोह करण्याचे धडे दिले, अतुल्य पराक्रम, साहस, द्रष्टेपण, मुत्सद्दीपणा आणि रयतेच्या प्रेमाच्या बळावर मावळ्यांच्या मदतीने त्यांनी स्वराज्य उभे केले. जगाच्या पाठीवर शिवरायांसारखा राजा आढळत नाही. शिवबांच्या अंगी सदगुणांची खाण होती त्यातलाच एक मुख्य म्हणजे स्त्रियांचा आदर सन्मान होय! 'परस्त्री मातेसमान' हे पुस्तकी वाक्य त्यांच्या आयुष्यात प्रत्यक्षात उतरलं होतं!

बुधवार, २२ एप्रिल, २०२६

मटक्याची दुनियादारी!



नागराज मंजुळे यांचे दिग्दर्शन आणि संयुक्त निर्मिती असलेली 'मटका किंग' सिरिज पाहिली, मनात अनेक गोष्टींचे मोहोळ जागे झाले. त्या अनेक टपऱ्या आठवल्या आणि त्यांच्या नादाला लागून उध्वस्त झालेले संसार आठवले. मटक्याचे रकाने, काही खास दैनिकात येणारे आकड्यांचे अंदाज, फुल स्केप पेपरचे बरोबर बारा तुकडे करून त्या मध्ये कार्बन पेपर ठेवून दिली जाणारी टीप आठवली. सकाळ संध्याकाळच्या खास नेमक्या वेळी कासावीस होऊन आशाळभुतागत मटका टपरीवर जाऊन ओपन काय आले आहे आणि क्लोज काय आले आहे याचे अदमास घेणारे भुकेच्या डोहात बुडालेले चेहरे आठवले. मटका लागल्यावर ऐश करून पैसे उडवले जायचे आणि मोठी रक्कम हारली की देशी दारूचा गुत्ता जवळ केला जायचा. हारलेला माणूस पुन्हा पुन्हा पैसे लावत राहायचा. कधी तरी एकदा जिंकायचा मात्र बहुतांश वेळी तो गर्तेत जायचा. असं करत करत घरेच्या घरे मटक्याने गिळंकृत केली. पण जे मटका घेत होते त्यांचे काय झाले?

बऱ्याचदा मटका घेणारी माणसं तिशीतली चाळीशीतली असायची. रापलेल्या चेहऱ्याने विस्कटलेल्या केसांची ही माणसं मळकट बिन इस्त्रीच्या कपड्यांवर असायची. टपरीत दोन तीन देवी देवतांची चित्रे असत. साल संपून गेलेले कॅलेंडर असे. शाळेची काळी पाटी एका तारेला अडकवली जायची. पाटीच्या खाली कागदाच्या सुरळ्या असत. कोपऱ्यात कुठे तरी दोन तीन वह्या असत ज्यांची पाने भरलेली असत. सतरंजी अंथरूण त्यावर हा सदगृहस्थ बसलेला असे. गुटखा सुरु होण्याच्या आधीच्या काळात मावा नाहीतर तंबाखू जर्दा यांची गोळी जबड्यात दाबून ठेवलेल्या अवस्थेत तोंडातला तोबरा तसाच धरून ही माणसं येणाऱ्या जाणाऱ्यांचे निरीक्षण करत असत.

गुरुवार, १६ एप्रिल, २०२६

जगण्याची आणि मोक्षाची, संगीतमय कश्मकश!


माणसाला त्याच्या मृत्यूची, मोक्षाची चाहूल लागत असेल का! काही दिवसांपूर्वी निवर्तलेल्या आशा भोसले यांना त्यांच्या शेवटच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये जे काही लिहिलं आहे, ते याकडेच निर्देश करते. आपल्या शेवटच्या पोस्टमध्ये आशाताई, इंटरनॅशनल बँड 'गोरिल्लाज' सोबत दिसल्यात. पोस्टमधील फोटोच्या बॅकग्राउंडमध्ये भारतीय वस्त्या, हत्ती आणि जीर्ण झालेल्या वस्तूंची दृष्टीस पडतात. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलंय -"The Shadowy Light' या गाण्याचा माझ्यासाठी अत्यंत सखोल अर्थ आहे. वाराणसीला भेट देऊन आणि पवित्र गंगा नदीच्या काठानं प्रवास करून, तसेच तिथे मला जे काही दिसलं, त्याचं बारकाईनं निरीक्षण करून आणि ते समजून घेऊन, मला जीवनाचा खरा अर्थ उमजला, मी कोण आहे आणि या पृथ्वीवर माझे काय प्रयोजन आहे. 'द शॅडोई लाइट' (The Shadowy Light) मध्ये, या खोल नदीचा पैलतीर गाठणं हे माझ्या जीवनप्रवासाचं प्रतीक आहे, माझा जन्म, माझे नातेसंबंध, संगीताप्रतीची माझी निष्ठा, माझी कर्तृत्व आणि एक कन्या, माता, भगिनी, पत्नी आणि एक हिंदू भारतीय म्हणून माझी कर्तव्य. या प्रवासात, 'संगीत' हाच माझा नावाडी आहे, तो मार्गदर्शक, जो मला या जीवननदीच्या पैलतीरी घेऊन जातो. जेव्हा मी त्या पैलतीरावर पोहोचेन, तेव्हा माझा हा प्रवास पूर्ण होईल. तेव्हा मला 'मोक्ष' प्राप्त होईल, आपल्या सभोवताली सतत तरंगणाऱ्या अगणित नादांमध्ये मी विलीन होईन. जेव्हा त्यातील काही नाद एकत्र गुंफले जातात, तेव्हा त्यातून एक सुंदर सुरावट निर्माण होते. त्याचप्रमाणे, मी देखील त्या नादांपैकीच एक नाद बनेन, असा नाद, जो अंतिमतः एका सुंदर गीतातील सुराचं रूप धारण करेल. असं गीत, जे पिढ्यानपिढ्या, हजारो वर्षे सातत्यानं ऐकलं जात राहील. हेच स्वातंत्र्य, निसर्गाशी एकरूप होण्याचं स्वातंत्र्य, नदीच्या पलीकडील तीरावर माझी वाट पाहत आहे..."

बुधवार, ८ एप्रिल, २०२६

ऑर्केस्ट्रामधल्या डान्सर्सचा मागोवा!


हे थोडेसे गंभीर आणि महत्वाचे आहे.

बिहार निवडणुकांत प्रचार सुरू असताना मतदानापूर्वीच्या दिवसांत मी एक लेख लिहिला होता, जो सारन जिल्ह्यातील ऑर्केस्ट्रा डान्सर मुलींविषयीचा होता. बिहार, बंगाल, झारखंड या तीन राज्यांमधून मुली एस्कॉर्ट केल्या जातात आणि त्यांना एकतर जबरदस्तीने नाचवले जाते नाहीतर लालूच दाखवली जाते.

एकदा का शीलभ्रष्ट(!) झाले अथवा पैशाची चटक लागली की या मुली यातून बाहेर पडत नाहीत हे वास्तव आहे. या संपूर्ण धंद्याची सूत्रे सारन जिल्ह्यातील छपरा शहरामधून हलवली जातात. यात महिन्याकाठी कोट्यवधीचे व्यवहार होतात.

शनिवार, १४ फेब्रुवारी, २०२६

सलाम बॉम्बे - प्रेमाचे उदास क्षण...



‘सलाम बॅांम्बे'मध्ये पंधरा सोळा वर्षांची एक विलक्षण कोवळी मुलगी लाईनमध्ये आणलेली असते. तिला या विश्वातलं खाण्यापिण्याचं, नटण्यामुरडण्याचं सुखही लोभसवाणं वाटतं. तिची नथ उतरवण्याच्या वेळेस तिचा सौदा होतो.

कृष्णा हा त्याच एरियात चहा नाश्ता पोहोचवण्याचं काम करणारा अनाथ पोर. तिथलं बदमाश पब्लिक त्याला चायपाव म्हणूनच हाक मारतं. ते त्याचं टोपणनाव.

चौदा पंधरा वर्षांचा हा चुणचुणीत पोरगा त्या मुलीवर जीव लावून बसतो! त्या मुलीची तिथली पहचान ‘सोला साल‘ या नावाची!

या कोवळ्या मुलीला ‘बाबा‘चं आकर्षण असतं. बाबा (नाना पाटेकर) हा तिथला नामचीन दलाल. त्याचं रफटफ वागणं, त्याचं व्यसनी असणं आणि त्याचा अय्याशी रूबाब तिला खुणावतो.

बुधवार, ११ फेब्रुवारी, २०२६

गोष्ट सिडनी शेल्डनची!

 


ही गोष्ट अशा लेखकाची आहे, ज्यांची पुस्तके जगातल्या कोणत्याही देशातील कोणत्याही मोठ्या शहरातील बुक स्टॉलवर विक्रीस उपलब्ध आहेत! ज्यांच्या  पुस्तकांच्या वाचनाचा आनंद आजही नव्या पिढीसह जुने वाचकही घेतात! मात्र या लेखकाचे आयुष्य साधे सरळ नव्हते, त्यांच्या आयुष्यात अनेक उतार चढाव येऊन गेले. ज्यांना लेखनासाठी शेरेबाजीही ऐकून घ्यावी लागली!
तुम्ही अमुक वयातच लिहू शकता किंवा तुम्हाला कादंबरी कधीच लिहिता येणार नाही अशा अर्थाची वाक्ये अनेक जण अधून मधून फेकत असतात. मात्र हे सदासर्वकाळ सत्यच असेल असे काही नाही. जगातली सर्वाधिक खपाची पुस्तके लिहिणाऱ्या आणि साहित्यातील महत्वाचे पुरस्कार मिळवणाऱ्या वैश्विक कीर्तीच्या एका लेखकांनी वयाच्या अठराव्या वर्षी आत्महत्येचा प्रयत्न केला होता आणि त्यांची पहिली कादंबरी वयाच्या 53 व्या वर्षी लिहिली होती!

रविवार, ८ फेब्रुवारी, २०२६

बदलता सिनेमा आणि ‘एआय’चे युग!


देशात स्वातंत्र्याचा लढा जोरात होता तेव्हा भारतीय सिनेमा मुख्यत्वे मायथॉलॉजिकल पौराणिक विषयांवर आधारित असायचा.


पन्नासच्या दशकात हिंदी सिनेमात आदर्शवाद हा मुख्य विषय असायचा. नायक शिक्षक, मजूर, शेतकरी असत; क्वचित डॉक्टर, वकील देखील असत, आणि शहरातल्या / गावातल्या अविवेकी व्यक्तीविरोधात त्याचा संघर्ष असे.

साठच्या दशकात आदर्शवादाला रोमँटीसिझमची जोड मिळाली आणि आदर्श प्रेमी युगुल सिनेमाच्या केंद्रस्थानी दिसू लागलं. त्यांच्या प्रेमात अडथळे आणणाऱ्या गोष्टी आताच्या काळात आपल्याला चौकटबंद वाटत असतील मात्र त्या काळात नैतिकता, विवेक, आदर्शवाद, त्याग, करुणा आस्था यांना जे महत्व होतं ते पाहू जाता त्या चौकटी कालानुरूपच होत्या असे म्हणावे लागेल.

सत्तरच्या दशकात सिनेमामध्ये आर्थिक सामाजिक विषमता हळूहळू समोर येऊ लागली. नायक नायिका यांच्यातील कुणीतरी गरीब असायचं आणि तरीही ते एकमेकावर प्रेम करायचे. सोन्याची बिस्किटे आणि घड्याळे यांची स्मगलिंग करणारे स्मग्लर्स या काळात हिंदी सिनेमाच्या खलनायकीत रुजले होते. झाडाआड लपून प्रेम करणारे कपल असायचे आणि फुलाला फुल बिलगल्याचे दाखवले जायचे.

बुधवार, २८ जानेवारी, २०२६

अजितदादा पवार: जननायक कर्मयोद्धा!


महाराष्ट्राच्या राजकीय आकाशात एक चमकदार तारा काल निखळला. काल बारामती विमानतळाजवळ झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित अनंतराव पवार यांचे निधन झाले. वयाच्या 66 व्या वर्षी ते महाराष्ट्रातील जनतेस पोरके सोडून गेले! त्यांच्या आठवणी, त्यांचे भाषण, सभा आणि जनसेवेचा वारसा कायम राहील. 'दादा' म्हणून ओळखले जाणारे अजित पवार केवळ यशस्वी राजकारणी नव्हते, तर एक कर्तबगार प्रशासक, शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे मित्र आणि कुटुंबवत्सल मायाळू व्यक्ती होते. ते जितके मृदु मुलायम होते तितकेच वज्रनिश्चयी आणि प्रसंगी कठोर वाटावे अशा व्यक्तिमत्वाचे धनी होते. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्र खऱ्या अर्थाने सुन्न झाला आहे, आणि त्यांच्या स्मृतींचे आभाळ पुन्हा पुन्हा भरून येत आहे. त्यांची अनेक भाषणे, त्यांची देहबोली, त्यांचं वागणं, त्यांचं कार्यमग्न असणं, त्यांच्या वैयक्तिक आठवणी आणि लाडक्या जनतेप्रती त्यांचं समर्पित असणं आदी गोष्टींद्वारे त्यांची उणीव अधिक गहिरी होतेय! लोकाभिमुख कामे करणाऱ्या अजितदादांची प्रतिमा 'टग्या' अशी का निर्माण केली असेल हा प्रश्न राहून राहून पडतो! कदाचित राजकीय डावपेचातून हे घडले असावे! असो. वास्तवात त्यांची भाषणे आणि त्यांची कामाची शैली तसेच त्यांच्याकडे कामे घेऊन जाणाऱ्या माणसांचे अनुभव पाहू जाता त्यांची प्रतिमा 'कामाचा माणूस' अशीच असायला हवी होती!

शुक्रवार, २३ जानेवारी, २०२६

फायर ऑफ लव्ह - निसर्ग आणि मानवाच्या प्रेमाचे महाकाव्य!




सारा डोस दिग्दर्शित 'फायर ऑफ लव्ह' ही डॉक्युमेंटरी म्हणजे केवळ दोन ज्वालामुखी तज्ज्ञांच्या कार्याचा आलेख नाही, तर तो निसर्ग, विज्ञान आणि प्रेम यांच्या अद्वैताचा एक नितांत सुंदर आविष्कार आहे. कात्या आणि मॉरिस क्राफ्ट या फ्रेंच दाम्पत्याच्या आयुष्यावर आधारित हा माहितीपट प्रेक्षकांना एका अशा जगात घेऊन जातो, जिथे मृत्यूच्या सावलीतही जीवनाचे विलोभनीय संगीत ऐकू येते. कात्या आणि मॉरिस या दोघांचेही ज्वालामुखीवर असलेले प्रेम हे त्यांच्या वैयक्तिक प्रेमापेक्षाही अधिक उत्कट होते की काय, असा प्रश्न ही डॉक्युमेंटरी पाहताना पडतो. ही केवळ दोन भिन्नलिंगी शास्त्रज्ञांची कथा नसून 'निसर्गाच्या काळजाचे ठोके' ऐकणाऱ्या दोन वेड्या निसर्गप्रवाशांची गाथा आहे. 1970 आणि 80 च्या दशकात त्यांनी टिपलेले ज्वालामुखीचे थरारक चित्रीकरण हा या डॉक्युमेंटरीचा मुख्य कणा आहे. 'लाल ज्वालामुखी' (Red Volcanoes) आणि 'राखाडी ज्वालामुखी' (Grey Volcanoes) यांच्यातील भेद स्पष्ट करतानाच, मानवी अस्तित्वाची क्षणभंगुरता यात प्रभावीपणे मांडली आहे. क्राफ्ट दाम्पत्याने ज्वालामुखी विज्ञानात (Volcanology) मोलाची भर घातली आहे. त्यांच्या संशोधनाचे दोन मुख्य भाग पडतात - लाल ज्वालामुखी हे प्रामुख्याने हवाई किंवा आइसलँडमधील ज्वालामुखी होते. यात लाव्हा संथपणे वाहतो. कात्या आणि मॉरिस यांनी या लाव्हाच्या प्रवाहाचा वेग, त्याचे तापमान (जे अनेकदा 1000 डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त असते) आणि त्यातील वायूंचे उत्सर्जन यांचा सखोल अभ्यास केला. राखाडी ज्वालामुखी हे सर्वात धोकादायक ज्वालामुखी मानले जातात. 1980 मधील 'माउंट सेंट हेलेन्स'च्या उद्रेकानंतर क्राफ्ट दांपत्याने आपला मोर्चा या राखाडी ज्वालामुखींकडे वळवला.

बुधवार, २१ जानेवारी, २०२६

सुगंधा!


काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, मंडईलगतच्या रस्त्याच्या कडेला एक अंध चिमुरडी उभी असायची.

तो रस्ता तिच्या परिचयाचा असावा
तिचे अंध वडील तिथेच कुठेतरी आसपास असायचे, तिच्या हाती अंध व्यक्तींची छोटी काठी दिसे.

तिचा चेहरा वाहतुकीच्या सन्मुख असे, रोज सकाळी ठराविक वेळी ती कुणाची तरी वाट पाहत उभी असे.
दरम्यान त्याच वेळी एक हार गजरे विकणारा
वृध्द इसम तिथे येई
बहुतेक त्यांची ओळख असावी.

मंगळवार, २० जानेवारी, २०२६

गोष्ट एका मायाळू घोडीची!



थोरले आजोबा हमालीचे काम करायचे, त्यांच्याकडे एक बैलगाडी होती. छकडाही होता. त्यावर पोती लादून ती पोच करायचे,ट्रक ट्रॉलीमध्ये चढवायचे काम ते करायचे. त्यांच्या चुलत भावाकडे एक टांगा होता आणि दोन घोडे होते. पडीक रान होतं, ज्यात धान्य भाजीपाला पिकवावा म्हटलं तर पाणी नव्हतं. आजोबांच्या घरालगत बरीचशी मुस्लिम वस्ती होती. जवळच्या दर्ग्याला लागून सारी घरं वसली होती. दर्गा ओलांडला की काही अंतरावर हमरस्ता होता. सकाळीच ताज्या दूध भाकरीची न्याहरी करून आज्जा हमालीसाठी घराबाहेर पडायचा. आज्जा बाहेर पडताच टांगा घेऊन त्यांचा चुलत भाऊ देखील बाहेर पडायचा. टांग्याला जुंपलेल्या घोड्याचे नाव होतं शेरा! खास हौस म्हणून ठेवलेल्या दुसऱ्या दोन घोड्यांना रपेटीसाठी वापरले जायचे. त्यात एक नर होता आणि एक मादी. हिरा आणि राणी ही त्यांची नावं.