गुरुवार, १७ फेब्रुवारी, २०२२

द ब्लड इन द बॅरल्स – दशकांच्या इस्त्राईली भ्रमकथांचा भंडाफोड..

हत्याकांडाआधीचे  टँतुरा गावाचे दृश्य 


'द पॅलेस्टाईन क्रॉनिकल'हे लोकवर्गणीद्वारा चालणारं न्यूजपोर्टल आहे. इस्त्राईल पॅलेस्टाईन संघर्षाची धग किती ज्वलंत आहे हे यातील बातम्या वाचून उमगते. आपल्याकडे ज्याप्रमाणे उजव्या, डाव्या विचारसरणीच्या लोकांकडून वर्षानुवर्षे काही कंड्या पिकवल्या जातात नि त्याआधारे बुद्धीभेद करत जनतेमध्ये भ्रम पैदा करून आपली राजकीय पोळी भाजून घेत वर्चस्व वाढवायचं असा फंडा राबवला जातो. याला प्रत्युत्तर देताना समोरून देखील नेमकी माहिती दिली जात नाही. सत्य शोधायची जबाबदारी अर्थातच व्यक्तिसापेक्ष उरते. यातून समाजाच्या शोषणाचे सत्तासारीपाट मांडले जातात. वर्णजातधर्म यांचे वर्चस्ववादी आणि सत्तातुर राजकारणी यांचे साटेलोटे वाढते. एकच कोहराम माजून राहतो. मात्र या सर्व गदारोळात सत्याचा गळा घोटला जातो. सत्य वा शोध पत्रकारिता करणाऱ्या लोकांवर या पाखंडाचा मुखभंग करण्याची जबाबदारी येते. अलीकडे देशोदेशीच्या राजकीय पटलांवर हे चित्र पाहावयास मिळतेय. राजरोस युद्धाच्या झळा सोसणारे पॅलेस्टाईन याला अपवाद कसे असेल ? तिथे वर्षानुवर्षे पेश केल्या जाणाऱ्या एका मोठ्या असत्याचा पर्दाफाश केला गेलाय. त्याची ही बिटवीन द लाईन न्यूज.

बुधवार, १६ फेब्रुवारी, २०२२

रिअल लाईफ पुष्पा - आयुष्याची लक्तरे झालेल्या मुलीची दास्तान

real life pushpa
हृदयी पान्हा नयनी पाणी, बंदिनी !

दिनांक २६ जून २०२१.
गुंटूर. आंध्रप्रदेश.
स्वर्णकुमारी वय वर्षे पस्तीस. पेशा दलाली नि विभ्रम.

देशात कोविडच्या डेल्टा व्हेरीयंटची साथ (दुसरी लाट) ऐन भरात होती तेंव्हाचा काळ. लोक कोविड रुग्णांना अक्षरशः वाळीत टाकत होते. खेड्यांनी संसर्ग वेगाने पसरत होता आणि माणसं किड्यामुंग्यांगत मरत होती. नानाविध अफवा आणि नेमक्या माहितीचा अभाव यामुळे सारेच भयभीत होते. याचा फायदा अनेकांनी वेगवेगळ्या पद्धतीने घेतला आणि नैतिकतेला बाजारात उभं करून आपल्या तुंबड्या भरून घेतल्या. यात विविध स्तरावरील भल्याभल्या गणल्या गेलेल्या पेशांमधली मंडळी होती. यात ह्युमन ट्राफिकिंग करणारी मंडळी मागे कशी असतील ? कोविडकाळातील स्त्रियांचे दमण, शोषण याविषयीची जी भीती व्यक्त केली होती तिला पुष्टी मिळाल्याचे अनुभवतोच आहे. मात्र या सर्व घटनाचक्राचं शिखर ठरावं अशी एक काळीज पिळवटून टाकणारी घटना उजेडात आलीय. ही घटना जिच्या आयुष्याचं मातेरं करून गेली त्या मुलीचं नाव इथे पुष्पा लिहितोय कारण आपल्याला खोट्या नायकांची ओढ फार असते आणि खऱ्यांना आपण किंमत देखील देत नसतो.

आठवीत शिकणारी पुष्पा पंधरा वर्षांची होती. तिचं मूळ गाव गुंटूरमधल्या क्रोसूर तालुक्यातलं. पोटाची खळगी भरायला तिचे कुटुंब गुंटूरमध्ये स्थायिक झालेलं. बंगालच्या उपसागराला लागून असलेल्या या दर्यावर्दी जिल्ह्याच्या सीमेवरून कृष्णेमाई वाहते. पुष्पाने तिच्या बालपणी कृष्णेपाशी आपले अश्रू अर्पण केलेले. कारण ती शैशवावस्थेत असतानाच तिची आई तिची साथ सोडून अनंताच्या प्रवासाला निघून गेलेली. वडील मोलमजुरी करायचे आणि पुष्पा आपलं शिक्षण सांभाळून घरातली सगळी कामे करायची. कोविडच्या लाटेत तिलाही बाधा झाली. तिला बऱ्यापैकी त्रास होऊ लागला. अठराविश्वे दारिद्र्य असल्याने गुंटूरच्या शासकीय रुग्णालयात तिला दाखल केलं. रूग्णापाशी कुणी थांबायचं नाही असा दंडक असल्याने तिच्यापाशी घरचं कुणी नव्हतं, तसेही तिच्याजवळ थांबू शकेल असं तिच्या कुटुंबात कुणी नव्हतंच मुळी. याचा फायदा स्वर्णकुमारीने उचलला. बायकांची ने-आण करणाऱ्या वा त्यांना गुमराह करणाऱ्या टोळ्यांमधली माणसं (?) कुठेही कसल्याही रुपात वावरत असतात. स्वर्णकुमारी गुंटूरच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये सावज हेरण्याच्या मोहिमेवर होती. यासाठी तिने परिचारिका असल्याचा आव आणला होता. बिनाआईची नि कोलमडल्या कुटुंबाची कोवळी पोर असलेली पुष्पा तिने अचूक हेरली. तिने पुष्पाचा विश्वास संपादित केला. तिच्या वडिलांना तिने कळवले की पुष्पाला विशेष देखरेखीची निकड असल्याने ती आपल्या घरी घेऊन जातेय आणि तिची प्रकृती बरी होताच तिला घरी सोडलं जाईल. परिस्थितीने गांजलेल्या आणि नियतीने पोटावर मारलेल्या पुष्पाच्या अल्पशिक्षित पित्याचा स्वर्णकुमारीवर सहजी विश्वास बसला, त्याशिवाय त्यांच्याकडे पर्यायही नव्हता.

चेहरा हरवलेल्या पिढीचा संगीतकार - बप्पी लाहिरी..


एखाद्या माणसाला एकाच फ्रेममध्ये अडकवून ठेवलं की त्याचे बाकीचे पैलू कधीच नजरेत येत नाहीत आणि ती व्यक्ती तितक्याच मर्यादित परिघात बंदिस्त होऊन जाते. बप्पीदा याचे बेस्ट एक्झाम्पल ठरावेत. बप्पीदांविषयी लिहिण्याआधी त्यांनी केलेल्या नियतीच्या पराभवाबद्दल सांगायचेय. साल होते १९८७. आपला दोस्त एका खड्ड्यातून वर यायचा प्रयत्न करतोय म्हटल्यावर त्याला हात देणाराच त्याचा मित्र असतो. राज सिप्पींनी त्यांच्या फिल्मी करिअरमध्ये 'इन्कार'च्या यशातून शिरपेच खोवला. हेलेनचं 'मुंगळा मुंगळा' गाणं आणि तगडा विनोद खन्ना लोकांच्या मनात ठसले. यशाची चव चाखल्यानंतर दोनेक दशकांनी विमनस्क झालेला विनोद खन्ना आधी एकांतवासात आणि नंतर रजनीशआश्रमात गेला. राज सिप्पी दुखी झाले. त्यांनी विनोदखन्नासाठी आपल्या मनाची कवाडे खुली ठेवली ऍज लाईक बेअरर चेक ! विनोद खन्नाचे करिअर मातीत गेल्यात जमा होते. चार वर्षे ओशोंच्या आश्रमात राहून शिष्यत्व पत्करून तो परतला होता. हा माणूस आपल्याला जाम आवडतो. अनेकदा त्याची पडझड झाली, अक्षरशः मातीमोल झाला. मात्र पुन्हा पुन्हा नव्याने तो उभारी घेत राहिला. 'मेरे अपने' ते 'कुर्बानी' हा त्याचा ग्राफ भारीच होता. तगड्या देहाचा मोस्ट हॅण्डसम नायक होता तो ! त्याचं व्यक्तिगत आयुष्य दोलायमान होत राहिलं आणि त्याच्या सोबत त्याच्या अख्ख्या कुटुंबाने त्यात हेलकावे खाल्ले, मुलांचे करिअर दोलायमान झाले. आता तर त्याचा तरुण पोरगाही संन्यासाच्या वाटेवर आहे. असो..

बुधवार, ९ फेब्रुवारी, २०२२

प्रेमात जगणं म्हणजे काय - मस्ट सी मुव्ही - '96' !


तमिळ चित्रपट '96' मधला हा सीन 'वन ऑफ द फाइनेस्ट प्रपोज' आहे !

'आय लव्ह यू' म्हणायची गरजही बऱ्याचदा पडत नाही कारण डोळयांची भाषा प्रेमात अधिक टोकदार असते.
तरीही 'माझं तुझ्यावर प्रेम आहे' हे सांगता येणं हे देखील जगण्यासाठी पुरेसं असतं.
अनेकांना हे सांगता येत नाही, किंबहुना कित्येकांना व्यक्त होण्याची एकही संधी मिळत नाही.
सगळ्या गोष्टी मनात राहून जातात.

रविवार, ६ फेब्रुवारी, २०२२

उनको ये शिकायत हैं आणि यूं हसरतों के दाग - एक गहिरा अर्थ...



कोलकात्यातील कालीघाटापाशी अखेरच्या घटका मोजणाऱ्या एका कोठेवालीने हे गाणं ऐकवून, सिनेमा पाहायला सांगितला होता. तोपर्यंत केवळ यातली गाणीच ऐकली होती. शामश्वेत रंगछटेतला एकोणीसशे अठ्ठावन्न सालचा ‘अदालत’ माझ्या पाहण्यात यायचा एरव्ही प्रश्नच नव्हता. वेश्यांचे आणि तवायफांचे उंबरठे झिजवताना अनेक स्त्रियांच्या दर्दभऱ्या कहाण्या ऐकताना निशब्द झालो, अस्वस्थ झालो नि कोलमडूनही पडलो. तशीच कथा या सत्तरीपार वयातल्या कोठेवालीची होती. तिची दास्तान विचारल्यावर ती फार काही बोलली नव्हती, सोबतच्या बंगाली मित्रापाशी ती त्राग्याने मोजकेच काही पुटपुटली. तिने सांगितले होते म्हणून नंतर आवर्जून हा सिनेमा पाहिला आणि अक्षरशः बधीर होऊन गेलो होतो.

शनिवार, ५ फेब्रुवारी, २०२२

परवीन रहमान ते आयेशा मलिक - बदलता पाकिस्तान...



आजपावेतो परवीन नावाच्या तीन स्त्रियांनी मनावर भुरळ घातली होती. पहिली होती पाकिस्तानची प्रसिद्ध कवयित्री शायरा परवीन शाकीर, दुसऱ्या म्हणजे विख्यात भारतीय गायिका परवीन सुल्ताना आणि तिसरी म्हणजे आयुष्याची वीण विस्कटून गेलेली प्रेमभुकेली अभिनेत्री परवीन बाबी. या तीन नावांत गत सप्ताहात भर पडली त्या म्हणजे परवीन रहमान. पाकिस्तानच्या कराचीमध्ये परवीन रहमान या नागरी हक्क चळवळीविषयी जितक्या ओळखल्या जातात. त्याहून अधिक त्यांची ओळख शहर टाऊनप्लॅनर अशी होती. परवीन रहमान यांचा जन्म बांग्लादेशमधला. बावीस जानेवारी एकोणीसशे सत्तावन रोजी राजधानी ढाकामध्ये त्यांचा जन्म झाला. परवीन यांच्या कुटुंबाविषयी माहिती घेऊन त्यावर नंतर बरेच लेखन केले गेलेय. बांग्लादेशच्याही आधी फाळणीपूर्व ब्रिटीश राजवटीत त्यांचे कुटुंब प्रगत विचारसरणीचे होते आणि कट्टरतावादापासून काहीसे अलिप्त राहण्याकडे त्यांचा कल होता. कालपरत्वे भारतीय उपखंडात भौगोलिक राजकीय बदल होत गेले तरीही त्यांच्या वैचारिक भूमिकेत बदल झाले नाहीत. भारताची फाळणी झाल्यानंतर पूर्व आणि पश्चिम पाकिस्तानची निर्मिती झाली. प्रत्यक्ष फाळणीनंतर भारत पाक यांच्यात झालेलं नागरी स्थलांतर याविषयी आपल्याकडे खूप काही लिहिलं गेलेलं आहे. तद्वतच पूर्व पाकिस्तानचा बिमोड करून तेथे बांग्लादेशची निर्मिती झाली. १९७१ च्या या अस्वस्थ कालखंडात काही महत्वाची स्थलांतरे पूर्व पाकिस्तान ते पाकिस्तान अशी झाली. याच रेषेचा एक बिंदू म्हणून बांग्लादेश निर्मिती दरम्यान रहमान कुटुंबियांस ढाक्यात असुरक्षित वाटू लागल्याने त्यांनी पाकिस्तानात आपल्या आप्तेष्टांकडे जाण्याचे निश्चित केले. कराची मधली त्यांची सुरुवातीची काही वर्षे हलाखीत गेली. अशीच अवस्था अनेक कुटुंबांची झाली होती. किंबहुना अशाच लसलसत्या जखमा भारताने फाळणी आणि बांग्लादेश निर्मितीवेळीही झेलल्या आहेत. या दोन्ही देशांच्या सीमा भागात याची झळ अधिक प्रमाणात बसली. आजही भारतीय राजकारणात आणि समाजकारणात या मुद्द्यांचे प्राबल्य टिकून आहे. त्यामुळे भारताप्रमाणेच पाकिस्तानच्या साहित्यांत यावर नाट्यमय लेखन आढळते.