रविवार, ६ फेब्रुवारी, २०२२

उनको ये शिकायत हैं आणि यूं हसरतों के दाग - एक गहिरा अर्थ...



कोलकात्यातील कालीघाटापाशी अखेरच्या घटका मोजणाऱ्या एका कोठेवालीने हे गाणं ऐकवून, सिनेमा पाहायला सांगितला होता. तोपर्यंत केवळ यातली गाणीच ऐकली होती. शामश्वेत रंगछटेतला एकोणीसशे अठ्ठावन्न सालचा ‘अदालत’ माझ्या पाहण्यात यायचा एरव्ही प्रश्नच नव्हता. वेश्यांचे आणि तवायफांचे उंबरठे झिजवताना अनेक स्त्रियांच्या दर्दभऱ्या कहाण्या ऐकताना निशब्द झालो, अस्वस्थ झालो नि कोलमडूनही पडलो. तशीच कथा या सत्तरीपार वयातल्या कोठेवालीची होती. तिची दास्तान विचारल्यावर ती फार काही बोलली नव्हती, सोबतच्या बंगाली मित्रापाशी ती त्राग्याने मोजकेच काही पुटपुटली. तिने सांगितले होते म्हणून नंतर आवर्जून हा सिनेमा पाहिला आणि अक्षरशः बधीर होऊन गेलो होतो.
"यूं हसरतों के दाग मोहब्बत में धो लिये..." आणि "उनको ये शिकायत हैं की हम कुछ नही कहते.." ही दोन अजरामर गाणी या सिनेमातली आहेत इतकीच माहिती तोपर्यंत होती. सिनेमा पाहिल्यावर त्यातला अर्थ उमगला आणि सद्गदित झालो. या गाण्यांची पार्श्वभूमी जाणून घेण्यासाठी निर्मलाची दर्दभरी दास्तान उमगणं अनिवार्य आहे. निर्मला तिच्या विधवा आईसोबत मामा मामीच्या घरी राहणारी देखणी सुशील सोज्वळ तरुणी. कॉलेजलाईफमध्ये देखण्या राजेंद्रवर तिचे मन लट्टू होतं. त्या दोघात प्रेमाचं नातं निर्माण होतं. ते लग्न करायचं ठरवतात. मात्र निर्मलाच्या दुष्ट मामीला हे पाहवत नाही, ती निर्मलाचा विवाह एका अशिक्षित खेडूताशी करण्याचे कारस्थान रचते. निर्मला त्यास नकार देते. त्याची परिणती तिची गच्छंतीतून होते, तिला घर सोडावे लागते. सदाबहार नृत्यालय इथे तिला नोकरी मिळते. मात्र नियती इथेही तिच्या आड येते. हे विद्यालय शहरातील सर्वात मोठ्या वेश्यावस्तीत असते आणि देहविक्रयाच्या एका खोट्या गुन्ह्यात पोलिस तिला अटक करतात. निर्मलाची रवानगी कारागृहात होते. नंतर खटला उभा राहल्यावर तिची निर्दोष मुक्तता होते. ती नाईलाजाने मामाच्या घरी परतते मात्र तिच्या बदनामीच्या बातमीचा धक्का बसून आईचा मृत्यू होतो. निर्मला पुरती खचते. तिची वणवण पुन्हा सुरु होते. तिच्यावर टपून बसलेला दलाल केदारनाथ तिच्या मागावर राहतो. तिच्या मार्गात अनेक अडथळे आणतो. मात्र तिची धडपड कामी येते आणि राजेंद्रच्या घरी ती केअरटेकर म्हणून कामाला लागते. राजेंद्रच्या आईची काळजी घेण्याचं काम करत असतानाच ते दोघं गुपचूप विवाहबद्ध होतात. दरम्यान उच्च शिक्षणासाठी राजेंद्र इंग्लंडला रवाना होतो. इकडे निर्मला गरोदर असल्याचं राजेंद्रच्या कुटुंबियांच्या लक्षात येतं. ते तिला भंडावून सोडतात. अखेर ती सत्यकथन करते मात्र तिच्यावर कुणी विश्वास ठेवत नाही, गर्भवती असतानाही तिला घराबाहेर काढलं जातं. तिथून ती पुन्हा पोटासाठी दाहीदिशा फिरू लागते. एका हॉस्पिटलमध्ये तिला परिचारिकेची नोकरी मिळतेदेखील. दरम्यान तिची प्रसूती होते आणि एका गोंडस मुलाला ती जन्म देते. मात्र कपटी केदारनाथ तिथेही तिच्याविरोधात गरळ ओकतो. निर्मलाची नोकरी जाते. आता कोठ्यावर जाण्यावाचून तिच्यापुढे पर्याय उरत नाही. निर्मला तिच्या मुलासह तिथे दाखल होते, मात्र त्याच रात्री आपल्या मुलाला डॉ. रेणुका रॉय ह्या सहृदयी स्त्रीच्या हवाली करते. त्या नंतर कधीही ती कोठ्याचा जिना उतरत नाही. रात्री रोशनदान तेवल्यानंतर तिला उमगते की दिवस मावळलाय आणि दिवे विझल्यावर कळे की रात्र सरलीय. तब्बल दोन दशके केवळ रात्र दिवस यांचीच नोंद तिच्या ठायी उरते. इकडे राजेंद्र भारतात परततो तेंव्हा त्याचे वडील निर्मलाविषयी अत्यंत अश्लाघ्य झूठ पेश करतात आणि तोही त्यावर विश्वास ठेवतो. मात्र एका संध्याकाळी केदारनाथच राजेंद्रला आपल्या कोठ्यावर आणतो. कोठ्याबाहेर जिन्यापाशी आल्यावर निर्मलाच्या आवाजातली 'उनको ये शिकायत हैं की हम कुछ नही कहते..' ही गझल कानी पडते. तो अक्षरशः भारल्यासारखा जिना चढून वरती जातो आणि तिथे गाणाऱ्या वृद्ध निर्मलेला पाहून हैराण होतो. निर्मला त्याला सर्व हकीकत सांगते. "भिक मागितली, वाट्टेल ते हाल सोसले मात्र या निर्मलेने कधी जिस्म विकले नाही, जगण्याची शिक्षा म्हणून केवळ आवाजाचा सौदा केला.." असं सांगत राजेंद्रच्या कुशीत शिरून ढसाढसा रडू लागते. त्यांच्या तशा अवस्थेतले फोटो काढून केदारनाथ त्यांना ब्लॅकमेल करू इच्छितो, त्यात त्यांची झटापट होते. त्यातच निर्मलेच्या हातून केदारनाथची हत्या होते. रेणुकारॉय यांनी सांभाळून मोठं केलेल्या बॅरीस्टर झालेल्या मुलाची पहिली कोर्टकेस म्हणजे तिची आई निर्मलाची असते, तिने केलेल्या मर्डरची केस ! अशी ही चित्तरकथा....    

आता गाण्यांविषयी..  
निर्मला कोठ्यावर येते. तवायफ होते मात्र जिस्मफरोशी न करता गाणं गाऊन कदरदानांचे मन रिझवू लागते तेंव्हा तिची पहिली पेशगी म्हणून "यूं हसरतों के दाग मोहब्बत में धो लिये, खुद दिल से दिल की बात कही और रो लिये... " हे दर्दभरे गीत सादर करते. या गीताची निवड करण्याआधी गीतकार राजेंद्रकृष्ण यांना हा सीन समजावून सांगितला गेला आणि त्यानुरूप हे गाणं लिहून दिलं. मदनमोहननी त्याला संगीतात गुंफलं. लतादीदींनी हे गाणं गायलं तेंव्हा त्या एकोणतीस वर्षांच्या होत्या आणि विशेष बाब म्हणजे नर्गिसचं वय देखील तेव्हढंच होतं. मात्र पटकथेतली निर्मला पस्तीशीमधली आहे, तिचा दर्द एका कोठेवाल्या तवायफचा आहे आणि त्यात तिच्या आयुष्याची ससेहोलपट पाझरलीय. अशा अवस्थेतल्या नायिकेचे दर्दभरे गीत गाताना त्यात ते भाव तितक्याच ताकदीने येणं अनिवार्य होतं. दीदींनी हे काम लीलया पार पाडलं. आजही कधीही कुणीही हे गाणं ऐको त्याला त्यात अत्यंत करुण आर्त विराणी जाणवेल, त्यातला दर्द थेट भिडेल ! निर्मलाची दास्तान ऐकल्यावर तर गायिका आणि नायिका एकजीव झाल्यागत वाटते !

राजेंद्र जेंव्हा निर्मलाच्या कोठ्यावर येतो तेंव्हा ती साठीपार वयाची वृद्धा असते. तिच्या आवाजात एक पोक्तपण आलेलं असतं. कोठेवाल्या तवायफचं उठवळ प्रसंगातलं गाणं वेगळं आणि तिथलं गझल सादरीकरण वेगळं. दोन्हीवेळेसचा जामानिमा वेगळाच असतो. "उनको ये शिकायत हैं की हम कुछ नही कहते.." हे गाणंच मुळात अल्टीमेट आहे. अगदी प्रसंगाला चपखल अशी शब्दरचना आणि आशय त्यात आहे. सुमित्रानंदन पंत आणि निराला यांचं काव्यवैभव ठायी असणाऱ्या व स्वतःला फिराक गोरखपुरींचा शिष्य म्हणवून घेणाऱ्या राजेंद्रकृष्ण यांना संपर्क केला गेला, त्यांनी ही गझल लिहून दिली. वरवर गद्य वाटणाऱ्या या गीतास चाल देणं कठीण काम होतं, मात्र मदनमोहननी त्याला अप्रतिम चाल दिली. लतादीदींचे कौशल्य असे की युं हसरतों के दाग मधील त्यांचा टोन आणि उनको ये शिकायत मधला टोन वेगळा वाटतो, इथे त्या पोक्त वयस्क नायिकेसाठी गाताहेत हे त्यांनी नेमकं लक्षात ठेवून पार्श्वगायन केलंय ! हा बारकावा विलक्षण अभूतपूर्व होता.

माणसानं जी दुःखे झेललेली असतात, जी अवहेलना सोसलेली असते ती त्याच्या अंतरगातून कधी तरी व्यक्त होतेच. लतादीदींचे वडील दिनानाथ यांच्या आई येसूबाई ह्या देवदासी होत्या. लतादीदींच्या वयाच्या तेराव्या वर्षी वडील निवर्तले आणि कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर आली. या काळात त्यांना येसूबाईपासूनची फरफट नक्कीच कुठे तरी जाणवली असणार. या वेदनेचा सल या दोन्ही गीतांत ओतप्रोत भरलेला आहे, किंबहुना ही गाणी 'अदालत'मधल्या निर्मलाची न होता लतादीदींची होऊन जातात कारण सगळीच दुःखे सगळ्यांना उघडपणे सांगता येत नसतात ! वरवर आपल्याला सगळं आलबेल नि समृद्ध वाटतं मात्र ज्याची त्याची दुःखे ज्याला त्याला ठाऊक असतात. त्यामुळेच या दोन गीतांचे स्थान वेगळं आहे. ही केवळ फिल्मी गाणी नाहीत, एका पवित्र आत्म्याच्या या आर्त कैफियती आहेत !

- समीर गायकवाड.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा